सार्थ पंचदशी मराठी सप्तमः परिच्छेदः- तृप्तिदीपः श्लोक २८१ ते २९८

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
सार्थ पंचदशी सूची

आदावविद्यया चित्रैः स्वकार्यैर्जृम्भमाणया ।
युद्ध्वा बोधोऽजयत्सोद्य सुदृढो बाध्यता कथम् ॥ २८१ ॥
पूर्वीं अभ्यासकाळीं आपल्यापासून उत्पन्न झालेल्या नानाप्रकारच्या कार्याहीकरून विस्तार पावलेल्या अविद्येबरोबर लढाई करून बोधाला जय मिळून तो सुदृढ झाल्यावर त्याला तिजपासून कसची बाधा होणार आहे ? ॥ २८१ ॥

तिष्ठन्त्वज्ञानतत्कार्यशवबोधेन मारिताः ।
न भीतिर्बोध सम्राजः कीर्तिः प्रत्युत तस्य तैः ॥ २८२ ॥
आतां अज्ञान व त्याचीं कार्यें ही केवळ प्रेतें होऊन पडलीं राहोत. त्यांपासन आता मुळींच भीति नाहीं. इतकेंच नव्हे, तर बोधराजाच्या कीर्तीचीं तीं स्मारक कृत्येच म्हटलीं पाहिजेत. ॥ २८२ ॥

य एवमतिशूरेण बोधेन न वियुज्यते ।
निवृत्त्या वा प्रवृत्त्या वा देहादिगतयाऽस्य किम् ॥ २८३ ॥
अशा प्रकारचा शूर बोधराजा ज्याच्या हृदयमंदिरीं नेहमी वास करतो, त्याला शारीर अथवा मानसिक कर्माच्या प्रवृत्तीनें किंवा निवृत्तीनें काय होणार आहे ? ॥ २८३ ॥

प्रवृत्तावाग्रहो न्याय्यो बोधहीनस्य सर्वथा ।
स्वर्गाय वाऽपवर्गाय योजितव्यं यतो नृभिः ॥ २८४ ॥
कर्माविषयी प्रवृत्ति असावी असा आग्रह ज्ञानहीन पुरुषालाच योग्य आहे. कारण, तशा लोकांनी स्वर्गमोक्षाकरितां यत्‍न केलाच पाहिजे. ॥ २८४ ॥

विद्वांश्चेत्तादृशां मध्ये तिष्ठेत्तदनुरोधतः ।
कायेन मनसा वाचा करोत्येवाखिलाः क्रियाः ॥ २८५ ॥
अशा ज्ञानहीन पुरुषामध्ये जेव्हां एकाद्या तत्त्ववेत्त्या पुरुषाला रहावे लागतें, तेव्हां तो आपल्या कायीक, वाचिक व मानसिक सर्व क्रिया त्यांना अनुसरून करतो. ॥ २८५ ॥

एष मध्ये बुभुत्सानां यदा तिष्ठेत्तदा पुनः ।
बोधायैषां क्रियाः सर्वा दूषयंस्त्यजतु स्वयम् ॥ २८६ ॥
आणि जेव्हां मुमुक्षूंमध्यें त्याला रहावे लागतें, तेव्हां त्यास ज्ञान व्हावें म्हणून त्याच्या क्रियेस दूषण देऊन अपणही क्रिया टाकतो. ॥ २८६ ॥

अविद्वदनुसारेण वृत्तिर्बुद्धस्य युज्यते ।
स्तनन्धयानुसारेण वर्तते तत्पिता यतः ॥ २८७ ॥
ज्ञान्याचें आचरण अज्ञान्याच्या आचरणास अनुसरून असणे हेंच योग्य. कारण बाप हा तान्ह्या मुलाला अनुसरून वागतो. तसा हा अज्ञजनास बापासारखा आहे. ॥ २८७ ॥

अधिक्षिप्तस्ताडितो वा बालेन स्वपिता तदा ।
न क्लिश्यति न कुप्येत बालं प्रत्युत लालयेत् ॥ २८८ ॥
लहान मुलानें बापाला शिव्या दिल्या किंवा मारले तरी त्याला त्यापासून दुःख होत नाहीं व रागही येत नाहीं; उलटें त्याला त्याचें कौतुकच वाटतें. ॥ २८८ ॥

निन्दितः स्तूयमानो वा विद्वानज्ञैर्न निन्दति ।
न स्तौति किन्तु तेषां स्याद्यथा बोधस्तथाऽऽचरेत् ॥ २८९ ॥
त्याप्रमाणें तत्त्ववेत्त्याची मूढांनीं स्तुति केली किंवा निंदा केली तरी तो त्याची उलट निंदा किंवा स्तुति न करतां जेणेंकरून त्यांस ज्ञान होईल असेंच वर्तन ठेवतों. ॥ २८९ ॥

येनायं नटनेनात्र बुध्यते कार्यमेव तत् ।
अज्ञप्रबोधान्नैवान्यत्कार्यमस्त्यत्र तद्विदः ॥ २९० ॥
जेणेंकरून अज्ञान्याला बोध होईल तसेंच आचरण ज्ञान्याने ठेवावें. कारण, ज्ञान झाल्यावर ह्या लोकीं अज्ञजनांस उपदेश करण्यावांचून दुसरें कर्तव्यच नाहीं. ॥ २९० ॥

कृतकृत्यतया तृप्तः प्राप्तप्राप्यतया पुनः ।
तृप्यन्नेवं स्वमनसा मन्यतेऽसौ निरन्तरम् ॥ २९१ ॥
याप्रमाणें आपली कृतकृत्यता व प्राप्यप्राप्यता स्मरून निरंतर मनांत तृप्त असतो. तो असें म्हणतो. ॥ २९१ ॥

धन्योऽहं धन्योऽहं नित्यं स्वात्मानमञ्जसा वेद्मि ।
धन्योऽहं धन्योऽहं ब्रह्मानन्दो विभाति मे स्पष्टम् ॥ २९२ ॥
आर्या-
मी धन्य धन्य झालों, आत्मा प्रत्यक्ष जाणिला म्यां कीं ॥
ब्रह्मानंद कसा हा भासे मज सम दुजा न या लोकीं ॥ १ ॥ ॥ २९२ ॥

धन्योऽहं धन्योऽहं दुःखं सांसारिकं न वीक्षेऽद्य ।
धन्योऽहं धन्योऽहं स्वस्याज्ञानं पलायितं क्वापि ॥ २९३ ॥
मी धन्य धन्य मोठा, संसारिक दुःख मन दिसत नाहीं ॥
अज्ञान पळुनि गेलें, त्याचा गंधहि न राहिला कांहीं ॥ २ ॥ ॥ २९३ ॥

धन्योऽहं धन्योऽहं कर्तव्यं मे न विद्यते किञ्चित् ।
धन्योऽहं धन्योऽहं प्राप्तव्यं सर्वमद्य संपन्नम् ॥ २९४ ॥
मी धन्य धन्य मोठा, कांहीं कर्तव्य नाहिं मज उरलें ॥
प्राप्तव्य पदरीं आलें सद्‌गुरुचें चरण घट्ट मी धरिले ॥ ३ ॥ ॥ २९४ ॥

धन्योऽहं धन्योऽहं तृप्तिर्मे कोपमा भवेल्लोके ।
धन्योऽहं धन्योऽहं धन्यो धन्यः पुनः पुनः ॥ २९५ ॥
मी धन्य धन्य मोठा, माझ्या तृप्तीस नाहि हो उपमा ॥
कोठवरी वर्णावी, आतां मी पावलों स्वसुखधामा ॥ ४ ॥ ॥ २९५ ॥

अहो पुण्यमहो पुण्यं फलितं फलितं दृढम् ।
अस्य पुण्यस्य सम्पत्तेरहो वयमहो वयम् ॥ २९६ ॥
बहु जन्मिं पुण्य केलें, त्याचें फळ पक्व आजिं मज मिळलें ॥
सद्‌गुरुराजकृपेनें, माझे आनंदरूप मज कळलें ॥ ५ ॥ ॥ २९६ ॥

अहो शास्त्रमहो शास्त्रमहो गुरुरहो गुरुः ।
अहो ज्ञानमहो ज्ञानमहो सुखमहो सुखम् ॥ २९७ ॥
सच्छास्त्र सद्‌गुरूचा, वर्णूं मी, या मुखें किती महिमा ॥
ज्ञान अमोलिक किति हें, आनंदाब्धीस या नसे सीमा ॥ ६ ॥ ॥ २९७ ॥

तृप्तिदीपमिमं नित्यं येऽनुसन्दधते बुधाः ।
ब्रह्मानन्दे निमज्जन्तस्ते तृप्यन्ति निरन्तरम् ॥ २९८ ॥
इति तृप्तिदीपोनाम सप्तमः परिच्छेदः ॥ ७ ॥
हा तृप्तिदीप हातीं, घेउनि जो नर अहर्निशीं पाही ॥
ब्रह्मानंदसमुद्रीं, नित्यचि तो मग्न होउनी राही ॥ ७ ॥ ॥ २९८ ॥
तृप्तिदीप समाप्त

सार्थ पंचदशी सूची
, ,
1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *