सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा ओवी ३७६ ते ४०० पहा.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
, ,

376-13
तियेकडोनि येतसे वारा । देखोनि धांवे सामोरा । आड पडे म्हणे घरा । बीजें कीजो ॥376॥
गुरूच्या देशाकडून जो वारा येत असेल, त्या वार्‍याला पाहून त्याला सामोरा धावून जातो व त्याच्या मार्गात आडवा पडून म्हणतो, “आपण माझ्या घरी यावे”.
377-13
साचा प्रेमाचिया भुली । तया दिशेसीचि आवडे बोली । जीवु थानपती करूनि घाली । गुरुगृहीं जो ॥377॥
सद्गुरूविषयीच्या खर्‍या प्रेमाने जो वेडा झाल्यामुळे ज्याला त्या दिशेशीच बोलणे आवडते व जो आपल्या जीवाला गुरूच्या घरात मिरासदार करून ठेवतो.
378-13
परी गुरुआज्ञा धरिलें । देह गांवीं असे एकलें । वांसरुवा लाविलें । दावें जैसें ॥378॥
परंतु वासरास दोरीने बांधून ठेवल्यामुळे त्यास गाईकडे जाण्याची इच्छा असूनही जसे हलता येत नाही, त्याप्रमाणे गुरूची आज्ञा हेच कोणी एक दावे, त्याने देहास बांधून टाकल्यामुळे, त्याला एकट्याला आपल्या गावी राहाणे पडून गुरूच्या गावाकडे धाव घेता येत नाही.
379-13
म्हणे कैं हें बिरडें फिटेल । कैं तो स्वामी भेटेल । युगाहूनि वडील । निमिष मानी ॥379॥
जो म्हणतो, ही गुरुआज्ञारूपी दाव्याची गाठ केव्हा सुटेल व केव्हा तो गुरु भेटेल? तो (गुरूच्या वियोगात जाणार्‍या) निमिषाला युगाहून मोठे मानतो.
380-13
ऐसेया गुरुग्रामींचें आलें । कां स्वयें गुरूंनींचि धाडिलें । तरी गतायुष्या जोडलें । आयुष्य जैसें ॥380॥
अशात जर कोणी गुरूच्या गावचे आले अथवा स्वत: गुरूनेच पाठवले तर जसे मरावयास टेकलेल्या पुरुषास आयुष्य प्राप्त व्हावे.


381-13
कां सुकतया अंकुरा- । वरी पडलिया पीयूषधारा । नाना अल्पोदकींचा सागरा । आला मासा ॥381॥
अथवा सुकणार्‍या अंकुरावर जशा अमृताच्या धारा पडाव्यात अथवा थोड्याशा पाण्यातला मासा जसा समुद्रात यावा.
382-13
नातरी रंकें निधान देखिलें । कां आंधळिया डोळे उघडले । भणंगाचिया आंगा आलें । इंद्रपद ॥382॥
अथवा दरिद्री पुरुषाला जसा द्रव्याचा ठेवा सापडावा किंवा आंधळ्याला जशी पुन्हा दृष्टी यावी, अथवा भिकार्‍याला जसे इंद्रपद मिळावे.
383-13
तैसें गुरुकुळाचेनि नांवें । महासुखें अति थोरावे । जें कोडेंही पोटाळवें । आकाश कां ॥383॥
त्याप्रमाणे गुरुकुळाच्या निमित्ताने मोठा आनंद झाल्यामुळे ज्याला आपण इतके वाढलो असे वाटते की आकाशाला आपण सहजच कवटाळू.
384-13
पैं गुरुकुळीं ऐसी । आवडी जया देखसी । जाण ज्ञान तयापासीं । पाइकी करी ॥384॥
ज्या पुरुषाच्या ठिकाणी गुरुकुळासंबंधाने असे प्रेम तू पहाशील त्याच्यापाशी ज्ञान चाकरी करते असे समज.
385-13
आणि अभ्यंतरीलियेकडे । प्रेमाचेनि पवाडे । श्रीगुरूंचें रूपडें । उपासी ध्यानीं ॥385॥
आणि आतल्या बाजूकडे (अंत:करणात) प्रेमाच्या जोराने श्रीगुरुमूर्तीची ध्यानाने उपासना करतो.


386-13
हृदयशुद्धीचिया आवारीं । आराध्यु तो निश्चल ध्रुव करी । मग सर्व भावेंसी परिवारीं । आपण होय ॥386॥
अंत:करणाची शुद्धता हेच कोणी एक आवार, त्या आवारामधे आराधना करण्याला योग्य जो गुरू, त्याची प्राणप्रतिष्ठा करतो व मग काया, वाचा, मनाने श्रीगुरूचा लवाजमा आपण बनतो.
387-13
कां चैतन्यांचिये पोवळी- माजीं आनंदाचिया राउळीं । श्रीगुरुलिंगा ढाळी । ध्यानामृत ॥387॥
अथवा ज्ञानाच्या आवारात असणार्‍या आनंदाच्या देवळामधे गुरुरूपी लिंगाला ध्यानरूपी अमृताचा अभिषेक करतो.
388-13
उदयिजतां बोधार्का । बुद्धीची डाल सात्त्विका । भरोनियां त्र्यंबका । लाखोली वाहे ॥388॥
बोधरूपी सूर्य उगवताच बुद्धिरूपी टोपलीत अष्टसात्विकभाव भरून तो त्यांची लाखोली श्रीगुरुरूपी शंकराला वहातो.
389-13
काळशुद्धी त्रिकाळीं । जीवदशा धूप जाळीं । न्यानदीपें वोंवाळी । निरंतर ॥389॥
पवित्र काल ह्याच कोणी शिवपूजनाच्या तीन वेळा, त्यात जीवपणरूपी धूप जाळून ज्ञानरूपी दिव्याने निरंतर ओवाळतो.
390-13
सामरस्याची रससोय । अखंड अर्पितु जाय । आपण भराडा होय । गुरु तो लिंग ॥390॥
गुरूला ऐक्यभावरूपी नैवेद्य नेहेमी अर्पित रहातो व आपण पूजा करणारा गोसावी होऊन गुरूला शंकराची पिंडी करतो.


391-13
नातरी जीवाचिये सेजे । गुरु कांतु करूनि भुंजे । ऐसीं प्रेमाचेनि भोजें । बुद्धी वाहे ॥391॥
अथवा जीवरूपी शय्येवर गुरूला पती करून भोगतो, अशी प्रेमाची आवड त्याची बुद्धी बाळगते.
392-13
कोणेएके अवसरीं । अनुरागु भरे अंतरीं । कीं तया नाम करी । क्षीराब्धी ॥392॥
कोणा एका वेळी मनात गुरूविषयी प्रेम भरले की त्याला (त्या प्रेमाला) क्षीरसमुद्र असे नाव देतो.
393-13
तेथ ध्येयध्यान बहु सुख । तेंचि शेषतुका निर्दोख । वरी जलशयन देख । भावी गुरु ॥393॥
त्या प्रेमरूपी क्षीरसागरामधे ध्येय जे गुरू, त्यांच्या ध्यानापासून होणारे जे अपार सुख, ते (सुखच) शेषरूपी शुद्ध गादी समजतो व त्यावर (श्रीविष्णूप्रमाणे) जलशयन करणारे श्रीगुरू आहेत असे समजतो.
394-13
मग वोळगती पाय । ते लक्ष्मी आपण होय । गरुड होऊनि उभा राहे । आपणचि ॥394॥
श्रीगुरूरूपी विष्णूच्या पायांची सेवा करणारी लक्ष्मी आपणच होतो व आपणच गरुड होऊन पुढे उभा रहातो.
395-13
नाभीं आपणचि जन्मे । ऐसें गुरुमूर्तिप्रेमें । अनुभवी मनोधर्में । ध्यानसुख ॥395॥
आपणच श्रीगुरुरूपी विष्णूच्या नाभीकमळात जन्म घेतो म्हणजे ब्रह्मदेव होतो. गुरुमूर्तीच्या प्रेमाने असे ध्यानसुख अंत:करणात अनुभवतो.


396-13
एखादेनि वेळें । गुरु माय करी भावबळें । मग स्तन्यसुखें लोळे । अंकावरी ॥396॥
एखादेवेळी आपल्या भावाच्या बळाने गुरूला आई मानतो व मग आपण त्या आईच्या मांडीवर स्तनपानाच्या सुखाने लोळतो.
397-13
नातरी गा किरीटी । चैतन्यतरुतळवटीं । गुरु धेनु आपण पाठीं । वत्स होय ॥397॥
अथवा अर्जुना, चैतन्यरूपी झाडाच्या खाली गुरूला गाय कल्पून आपण तिच्या पाठीमागे असणारे वासरू होतो.
398-13
गुरुकृपास्नेहसलिलीं । आपण होय मासोळी । कोणे एके वेळीं । हेंचि भावीं ॥398॥
गुरूच्या प्रेमरूपी जळात आपण मासोळी बनतो. कोणा एका वेळेला हीच कल्पना करतो.
399-13
गुरुकृपामृताचे वडप । आपण सेवावृत्तीचें होय रोप । ऐसेसे संकल्प । विये मन ॥399॥
माझे श्रीगुरू कृपारूप अमृताची दृष्टी असून त्याखाली मी, सेवावृत्तिरूप रोप आहे; याप्रमाणे त्याचे मन अनेक प्रकारचे संकल्प करीत असते.
400-13
चक्षुपक्षेवीण । पिलूं होय आपण । कैसें पैं अपारपण । आवडीचें ॥400॥
डोळे उघडले नाहीत व पंख फुटले नाहीत असे (पक्ष्याचे) पिल्लू आपणच होतो. त्याच्या प्रेमाचे अमर्यादपण असे आहे.

, ,
✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading