सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ११ वा ओवी ३०१ ते ३२५ पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, ,

301-11
हो कां महातेजाचिया महार्णवीं । बुडोनि गेली सृष्टी आघवी । कीं युगांतविजूंच्या पालवीं । झांकलें गगन ॥301॥
असे वाटते जणूं काय या तुझ्या महा तेजाच्या समुद्रांत सर्व सृष्टि बुडून गेली आहे किंवा कल्पांतसमयीच्या विजांच्या वस्रांनी सर्व आकाश झांकून टाकले आहे
302-11.
नातरी संहारतेजाचिया ज्वाळा । तोडोनि माचू बांधला अंतराळां । आतां दिव्य ज्ञानाचिया डोळां । पाहवेना । 302
किंवा सर्व सृष्टिचा प्रलयकारीं संहार करणार्‍या ज्वाळा तोडून जणूं काय आकाशांत माळाच बांधला; म्हणूनच आतां ह्या माझ्या दिव्यदृष्टिनेहि तें तेज पाहवत नाही.
303-11
उजाळु अधिकाधिक बहुवसु । धडाडीत आहे अतिदाहसु । पडत दिव्यचक्षुंसही त्रासु । न्याहाळितां ॥303॥
तें तेज अधिकाधिक फार वाढून अत्यंत दाहक होत आहे व तें पाहतांना माझ्या दिव्यचक्षुलाहि त्रास होत आहे.
304-11
हो कां जे महाप्रळयींचा भडाडु । होता काळाग्निरुद्राचिया ठायीं गूढु । तो तृतीयनयनाचा मढू । फुटला जैसा ॥304॥
असे वाटते की महाप्रलयांतील महातेजाचा भडका, काळाग्निरूद्राच्या ठिकाणी जो गुप्त होता, तो तृतीय नेत्ररूप तेजाचा सांठाच जणुं काय बाहेर पडला.
305-11
तैसें पसरलेनि प्रकाशें । सैंघ पांचवनिया ज्वाळांचे वळसे । पडतां ब्रह्मकटाह कोळिसे । होत आहाती ॥305॥
अशा त्या सर्वत्र पसरलेल्या तेजाने संपूर्ण पांचही अग्नीच्या (गार्हपत्य, आहवनीय, दाक्षिणाग्नि, सम्य आणि आवसथ्य असे पांच अग्नि) ज्वाळांचे वेढे पडल्यामुळे सर्व ब्रह्मांडाचे कोळसे होत आहेत.


306-11
ऐसा अद्भुत तेजोराशी । जन्मा नवल म्यां देखिलासी । नाहीं व्याप्ती आणि कांतीसी । पारु जी तुझिये ॥306॥
याप्रमाणे जणुं काय तेजाची राशीच असा अत्यंत आश्चर्यकारक, जन्मापासून आजच पाहत आहे. या तुझ्या व्याप्तीला व कान्तीला मर्यादाच नाही.
त्वमक्षरं परमं वेदितव्यं त्वमस्य विश्वस्य परं निधानम् ।
त्वमव्ययः शाश्वतधर्मगोप्ता सनातनस्त्वं पुरुषो मतो मे॥11.8॥

अर्थ वेदांकडून जाणण्याला योग्य असे अविनाशी ब्रह्म तू आहेस. या विश्वाचा अखेरचा आश्रय तू आहेस. अव्यय व शाश्वत अशा धर्माचा रक्षण करणारा आणि सनातन असा पुरुष तू आहेस असे मला वाटते.॥11-18॥
307-11
देवा तूं अक्षर । औटाविये मात्रेसि पर । श्रुती जयाचें घर । गिंवसीत आहाती ॥307॥
देवा ! वेद ज्या तुझ्या ठिकाणाचा शोध करीत आहे, तो तूं अविनाशी असून ओंकाराच्या साडेतीन मात्रेच्या पलीकडे आहेस – म्हणजे ॐ कारालाहि तूं अगम्य आहेस.
308-11
जें आकाराचें आयतन । जें विश्वनिक्षेपैकनिधान । तें अव्यय तूं गहन । अविनाश जी ॥308॥
तूं सर्व आकारांचा आश्रय आहेस म्हणजे सर्व नामरूपें तुझ्यावरच भासतात. संपूर्ण विश्व सांठविण्याचें एकमेव, नाश न पावणारे असे अविनाशी व अपार असें स्थान तूंच आहेस.
309-11
तूं धर्माचा वोलावा । अनादिसिद्ध तूं नित्य नवा । जाणें मी सदतिसावा । पुरुष विशेष तूं ॥309॥
तूं धर्माचे जीवन असून, तू अनादि, स्वतःसिध्द व नित्य नूतन आहेस. प्रकृतिजन्य छत्तीस तत्वांच्या पलीकडे सदतिसावा विशेष पुरुष म्हणून जो सांगितला आहे, तो तूं आहेस, हें मी आतां जाणलें.
(सांख्यशास्राच्या मतें पुरूष सोडून, कार्यप्रपंच म्हणून जी चोविस तत्वें सांगितली आहेत, त्यांचा थोडा विस्तार करून, माउलिंनी छत्तीस तत्वे मानली आहेत. ती छत्तीस तत्वे पुढें तेराव्या अध्यायांत क्षेत्रांचें वर्णन करतांना सांगितली आहेत. आणि सांख्यांत जसा चोविस तत्वांव्यतिरिक्त पंचविसावा पुरूष मानला आहे, तसा येथे छत्तीस तत्वाव्यतिरिक्त सदतिसावा पुरूष म्हणून, विश्वरूपाला मानले आहे. या प्रतिपादनानें भगवंताचीं सगुण व निर्गुन हीं दोन्हीं रूपें छत्तीस तत्वांच्या पलिकडे असल्यामुळे ती त्रिगुणात्मक मायारहित किंवा अविद्यारहित आहेत, असें सुचविलें आहे.)
अनादिमध्यान्तमनन्तवीर्यं अनन्तबाहुं शशिसूर्यनेत्रम् ।
पश्यामि त्वां दीप्तहुताशवक्त्रं स्वतेजसा विश्वमिदं तपन्तम्॥11.19॥

अर्थ ज्याला आदि नाही, मध्य नाही व अंत नाही, ज्याच्या पराक्रमाला अंत नाही, ज्याचे बाहु अनंत आहेत, चंद्र, सूर्य ज्याचे नेत्र आहेत, दीप्तिमान अग्नी ज्याचे मुख आहे व आपल्या तेजाने जो या विश्वाला जणुकाय गिळून टाकत आहे असा तुला मी पहात आहे.॥11=19॥
310-11
तूं आदिमध्यांतरहितु । स्वसामर्थ्यें तूं अनंतु । विश्वबाहु अपरिमितु । विश्वचरण तूं ॥310॥
तुला आदि, मध्य, अंत नाहीत. स्वतःच्या सामर्थ्याच्या दृष्टीने तूं अनंत आहेस – म्हणजे तुझें सामर्थ्य अपरिमित आहे. सर्वत्र अपरिमित असे तुझे बाहु व चरण आहेत.


311-11
पैं चंद्र चंडांशु डोळां । दावितासि कोपप्रसाद लीळा । एकां रुससी तमाचिया डोळां । एकां पाळितोसि कृपादृष्टी 311॥
तूं आपल्या सूर्य व चंद्र या डोळ्यांनी कोप व अनुग्रह अशी लिला दाखवतोस. सूर्यरूपी क्रुध्द (तीक्ष्ण) डोळ्यांने रूसून नाश करतोस, तर चंद्ररूपी डोळ्याने कोणावर कृपा करून त्यांचें संरक्षण करतोस.
312-11
जी एवंविधा तूंतें । मी देखतसें हें निरुतें । पेटलें प्रळयाग्नीचें उजितें । तैसें वक्त्र हें तुझें ॥312॥
भगवंता ! याप्रमाणेच खरोखर मी तुला पाहत आहे. जणुं काय प्रलयांतील पेटलेल्या अग्नीचा लखलखाटच, असें हें तुझें मुख दिसत आहे.
313-11
वणिवेनि पेटले पर्वत । कवळूनि ज्वाळांचे उभड उठत । तैसी चाटीत दाढा दांत । जीभ लोळे ॥313॥
जंगलांत लागलेल्या अग्नीने पर्वत पेटून जशा सर्व ज्वाळा मिळून त्यांचा एकच भडका उठावा, त्याप्रमाणे दांत व दाढा चाटीत जीभ तोंडात सारखी फिरत आहे.
314-11
इये वदनींचिया उबा । आणि जी सर्वांगकांतीचिया प्रभा । विश्व तातलें अति क्षोभा । जात आहे ॥314॥
या तुझ्या मुखांतील ज्वाळांच्या उष्णतेने आणि तुझ्या सर्वांगाच्या अद्भूत तेजाने संपूर्ण विश्व होरपळून गेलें असून अत्यंत व्याकूळ होत आहे.
द्यावापृथिव्योरिदमन्तरं हि व्याप्तं त्वयैकेन दिशश्च सर्वाः ।
दृष्ट्वाऽद्भुतं रूपमुग्रं तवेदं लोकत्रयं प्रव्यथितं महात्मन्॥11.20

अर्थ स्वर्ग व पृथ्वी यांच्यामधील हा सर्व प्रदेश तू एकट्याने व्यापला आहेस. सर्व दिशाही तू एकट्याने व्यापल्या आहेस. हे विश्वरूपा, हे तुझे अद्भुत व उग्र रूप पाहून त्रैलोक्य भयाने व्याकुळ झाले आहे.॥11-20॥
(विश्वरूपाची भीती व ती वाटण्याचे अर्जुनानाच्या मते कारण =)
315-11
कां जे द्यौर्लोक आणि पाताळ । पृथिवी आणि अंतराळ । अथवा दशदिशा समाकुळ । दिशाचक्र ॥315॥
कारण स्वर्ग, पाताळ पृथ्वी आणि अंतराळ अथवा दशदिशासहित संपूर्ण दिङ्मंडळ,


316-11
हें आघवेंचि तुंवा एकें । भरलें देखत आहे कौतुकें । परि गगनाहीसट भयानकें । आप्लविजे जेवीं॥316॥
आकाशासहित हें संपूर्ण विश्व बुडवून टाकावे, त्याप्रमाणे तूं आपल्या एका भयंकर मुखांत सहज भरलें आहेस असे मी आश्चर्यचकित होऊन पाहत आहे.
317-11
नातरी अद्भुतरसाचिया कल्लोळीं । जाहली चवदाही भुवनांसि कडियाळीं । तैसें आश्चर्यचि मग मी आकळीं । काय एक ?॥317॥
किंवा अद्भुतरसाच्या कल्लोळांनी चवदाहि भुवनाला जसा वेढा दिला तसेच मीहि एक काय तें आश्चर्यच अनुभवित आहे. (एका आश्चर्याशिवाय मला कांही दिसत नाही असा अर्थ).
318-11
नावरे व्याप्ती हे असाधारण । न साहवे रूपाचें उग्रपण । सुख दूरी गेलें परि प्राण । विपायें धरीजे ॥318॥
कि️ तुझा हा असामान्य व्यापकपणा आकलन होत नाही व तुझ्या रूपाचें उग्रपणहि सहन करवत नाही. सुख होणे तर दूरच राहिलें; पण जगाला प्राण धारण करणें देखील कठीण झालें आहे.
319-11
देवा ऐसें देखोनि तूंतें । नेणों कैसें आलें भयाचें भरितें । आतां दुःखकल्लोळीं झळंबतें । तिन्हीं भुवनें ॥319॥
देवा !! तुझ्या अशा विश्वस्वरूपाला पाहून अशी भयंकर भीति कां वाटत आहे हें सांगवत नाही; पण हें संपूर्ण त्रिभुवन या दुःखाच्या लाटांमध्ये गटांगळ्या खात आहे.
320-11
एऱ्हवीं तुज महात्मयाचें देखणें । तरि भयदुःखासि कां मेळवणें? । परि हें सुख नव्हेचि जेणें गुणें । तें जाणवत आहे मज ॥320॥
खरोखर पाहतां, तुज महात्म्याच्या दर्शनाने भीतिरूप दुःखाची प्राप्ति कां व्हावी? पण ज्या गुणामुळे याविश्वरूपदर्शनाचें सुख होत नाही, तो गुण मलाहि कळून येत आहे.


321-11
जंव तुझें रूप नोहे दिठें । तंव जगासि संसारिक गोमटें । आतां देखिलासि तरी विषयविटें । उपनला त्रासु ॥321॥
जोपर्यंत तुझें हें विश्वरूप दृष्टीस पडत नाही, तोपर्यंत जीवांना संसारसुखच गोड वाटतें आणि आतां तुझ्या विश्वरूपदर्शनाने विषयसुखाचा वीट येऊन विषयांचा कंटाळा उत्पन्न झाला आहे.
322-11
तेवींचि तुज देखिलियासाठीं । काय सहसा तुज देवों येईल मिठी । आणि नेदीं तरी शोकसंकटीं । राहों केवीं?॥322॥
त्याचप्रमाणे तुझ्या भयंकर रूपाला पाहिल्यानंतर एकदम तुला प्रेमाने मिठी मारतां येईल काय? आणि प्रेमाने मिठी मारतां येणार नाही, तर त्यावांचून विरहशोकसंकटात तरी कसे राहायचें !
323-11
म्हणौनि मागां सरों तंव संसारु । आडवीत येतसे अनिवारु । आणि पुढां तूं तंव अनावरु । न येसि घेवों ॥323
म्हणून तुजपासून मागें सरावें, तर हा अनिवार संसार मागें फिरूं देत नाही आणि समोर तुझे अनिवार स्वरूप आकलन करतिं येत नाही.
324-11
ऐसा माझारलिया सांकडां । बापुड्या त्रैलोक्याचा होतसे हुरडा । हा ध्वनि जी फुडा । चोजवला मज । 324॥
याप्रमाणे संसारांचें भय आणि विश्वरूपाचें भय या दोन संकटाच्या कात्रींत सांपडलेल्या बिचार्‍या त्रैलोक्याचा होरपळा होत आहे, असा आशय स्पष्ट मला कळला आहे.
325-11
जैसा आरंबळला आगीं । तो समुद्रा ये निवावयालागीं । तंव कल्लोळपाणियाचिया तरंगीं । आगळा बिहे ॥325॥
ज्याप्रमाणे अग्नीने होरपळलेला मनुष्य, शरीराचा दाह नाहीसा करण्याकरितां, समुद्रावर जातो आणि त्या समुद्रावर उठणार्‍या भयंकर लाटांना पाहून, तो अत्यंत भितो,

, ,
1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *