226-8
तरि प्रयाणाचिया अवसरें । वात श्लेष्मां श्लेष्मां । तेणें अंतःकरणीं आंधारें । कोंदले ठाके ॥226॥
मरणसमयी कफवातादि दोषांच्या भरानें अंतःकरणांत अंधार होऊन जातो,
227-8
सर्वेंद्रियां लांकुड पडे । स्मृती भ्रमामाजीं बुडे । मन होय वेडें । कोंडे प्राण ॥227॥
सर्व इंद्रियांची गति कुंठित होते; स्मृतीला भ्रम उत्पन्न होतो; मन वेडावून प्राण घोटाळतो
228-8
अग्नीचें अग्निपण जाये । मग तो धूमचि अवघा होये । तेणें चेतना गिंवसिली ठाये । शरीरींची ॥228॥
अग्नीचें अग्निपण जाते व त्याचा चोहोंकडे धूरच होतो, त्यामुळे शरीरांतील ज्ञान दिपून जाते.
229-8
जैसें चंद्राआड आभाळ । सदट दाटे सजळ । मग गडद ना उजाळ । ऐसें झांवळें होये ॥229॥
ज्याप्रमाणे चंद्राच्या आड दाट व पाण्याने भरलेलें ढग आल्यावर धड अंधार ना प्रकाश अशी झांजड पडते,
230-8
कां मरे ना सावध । ऐसें जीवितासि पडे स्तब्ध । आयुष्य मरणाची मर्याद- । वेळु ठाकी ॥230॥
त्याचप्रमाणे, तो मरतही नाही व सावधही नसतो. अशा रीतीने शरीर नुसते पडलेले असते, व आयुष्य हें मरणाची वेळ पहात असते.
231-8
ऐसी मनबुद्धिकरणीं । सभोंवतीं धूमाकुळाची कोंडणी । तेथ जन्में जोडलिये वाहणी । युगचि बुडे ॥231 ॥
अशा प्रकारे बुद्धि व इंद्रिये यांच्या सभोवती धूर अतिशय कोंडतो, त्या वेळेस जन्मभर मिळविलेले सर्व लाभ नाश पावतात.
232-8
हां गा हातींचें जे वेळीं जाये । ते वेळीं आणिका लाभाची गोठी कें आहे । म्हणऊनि प्रयाणीं तंव होये । येतुली दशा ॥232॥
हे पहा, हातचे गेल्यावर मग पुनः लाभ होण्याची गोष्ट कशाला पाहिजे? म्हणून मरणसमयी अशी दशा प्राप्त होते.
233-8
ऐसी देहाआंतु स्थिति । बाहेरि कृष्णपक्षु वरि राती । आणि सा मासही वोडवती । दक्षिणायन ॥233॥
याप्रमाणे देहांतील आंतली स्थिती असुन बाहेर कृष्णपक्षाचा पंधरवडा असतो, व त्यांत रात्र आणि दक्षिणायनांतील सहा महिन्यांपैकी एक महिना हीं प्राप्त होतात.
234-8
इये पुनरावृतीचीं घराणीं । आघवीं एकवटती जयाचिया प्रयाणीं । तो स्वरूपसिद्धीची काहाणी । कैसेनि आइके ॥234॥
हे सर्व जन्ममरणाच्या फेऱ्यांत पाडणारे योग ज्यांच्या मरणसमयी एके ठिकाणी येतात, त्यांच्या कानी मोक्षप्राप्तीची गोष्ट कोठून पडणार?
235-8
ऐसा जयाचा देह पडे । तया योगी म्हणोनि चंद्रवरी जाणें घडे । मग तेथूनि मागुता बहुडे । संसारा ये ॥235॥
अशा वेळेवर ज्यांचे देहावसान होते, त्याला तो योगी असल्यामुळे चंद्रलोकापर्यंत जाता येते. मग तेथुन परतून तो फिरून जन्ममरणाच्या फेऱ्यांत पडतो.
236-8
आम्हीं अकाळ जो पांडवा । म्हणितला तो हा जाणावा । आणि हाचि धूम्रमार्ग गांवा । पुनरावृत्तीचिया ॥236॥
हे पांडवा, आम्ही मरणास अयोग्य काळ म्हणून जो म्हटला, तो हाच असे समज, जन्ममरणाच्या गांवास नेणारा धूम्रमार्ग हाच;
237-8
येर तो अर्चिरादि मार्गु । तो वसता आणि असलगु । साविया स्वस्थु चांगु । निवृतीवरी ॥237॥
याच्याशिवीय दुसरा जो अर्चिरादि मार्ग, तो भरवस्तीचा, सोपा, अति उत्तम व अगदीं सुलभ असून मोक्षापर्यत गेलेला आहे.
शुक्लकृष्णे गती ह्येते जगतः शाश्वते मते ।
एकया यात्यनावृत्तिमन्यया वर्तते पुनः ॥8. 26॥
238-8
ऐसिया अनादि या दोन्ही वाटा । एकी उजू एकी अव्हांटा । म्हणवूनि बुद्धिपूर्वक सुभटा । दाविलिया तुज ॥238॥
असे हे दोन मार्ग -एक सरळ आणि दुसरा वाकडा – अनादि कालापासून चालत आलेले आहेत. म्हणून, हे महावीरा, ते तुला बुद्धिपुरस्सर दाखविले.
239-8
कां जे मार्गामार्ग देखावे । साच लटिकें वोळखावें । हिताहित जाणावें । हिताचिलागीं ॥239 ॥
कां की, त्या मार्गापैकी चांगला कोणता व वाईट कोणता हे तुला दिसावे; आणि खरे खोटे ओळखून, आपले हित साधून घेण्याकरिता (त्वां) हित व अहित यांचाही विचार करावा.
240-8
पाहे पां नाव देखतां बरवी । कोणी आड घाली काय अथावीं । कां सुपंथ जाणोनियां अडवीं । रिगवत असे ॥240॥
हे पहा, उत्तम अशी नाव पाहिल्यावरही अथांग डोहांत कोणी उडी घालील काय? किंवा राजमार्ग टाकून आडमार्गाला जाईल काय?
241-8
जो विष अमृत वोळखे ।तो अमृत काय सांडू शके ।तेविं जो उजू वाट देखे ।तो अव्हांटा न वचे ॥ 241॥
जो विष आणि अमृत ही दोन्ही ओळखतो, तो अमृत टाकील का? त्याचप्रमाणे, जो सरळ मार्ग पाहतो, तो आडमार्गाला जाणार नाही.
242-8
म्हणोनि फुडें ।पारखावें खरें कुडें ।पारखिलें तरे न पडे ।अवसरें कहीं ॥ 242॥
म्हणून प्रथम खऱ्या -खोट्याची पारख करावी. ती पारख झाली म्हणजे मग तो संकटात पडत नाही
243-8
एऱ्हवीं देहांतीं थोर विषम ।या मार्गाचें आहे संभ्रम ।जन्में अभ्यासिलियाचें हन काम ।जाईल वायां ॥ 243॥
बाकी मरण समयी ह्या मार्गाची प्राप्ति होण्याला मोठमोठ्या संकटांची मोठी भीतिच आहे. अंतकाली याची प्राप्ति व्हावी म्हणून जन्मभर जरी अभ्यास केला तरी ते सर्व व्यर्थ होते.
244-8
जरी अर्चिरादि मार्गु चुकलियां ।अवचटें धूम्रपंथें पडिलियां ।तरी संसारपांतीं जुंतलियां ।भंवतचि असावें ॥ 244॥
जर अर्चिरादि मार्ग चुकला आणि तो योगी अकस्मात् धूम्रमार्गात पडला, तर जन्ममरणाच्या फेऱ्यांत गुंतून फिरत असतो.
245-8
हे सायास देखोनि मोठे ।आतां कैसेनि पां एकवेळ फिटे ।म्हणोनि योगमार्गु गोमटे ।शोधिले दोन्ही ॥ 245॥
अशी ही मोठाली संकटे पाहून, ती कशाने दुर होतील म्हणून, दोन्ही योगमार्गाचे चांगले स्पष्टीकरण केले.
246-8
तंव एकें बह्मत्वा जाइजे ।आणि एकें पुनरावृत्ते येइजे ।परि दैवगत्या जो लाहिजे ।देहांतीं जेणें ॥ 246॥
तेंव्हा, एका मार्गाने योगी मोक्षाला जातो, आणि दुसऱ्या मार्गाने जन्ममरणाच्या फेऱ्यांत पडतो, परंतु देहावसानाच्या वेळेस दैवगतीने ज्याला जो प्राप्त होईल तो खरा.
नैते सृती पार्थ जानन् योगी मुह्याति कश्चने ।
तस्मात्सर्वेषु कालेषु योगसुक्तो भवार्जुन ॥8. 27॥
247-8
ते वेळी म्हणितलें हें नव्हे ।वायां अवचटें काय पावे ।देह त्यजुनि वस्तु होआवें ।मार्गेचि कीं ॥ 247॥
अकस्मात् कोणत्या वेळेस काय प्राप्त होईल याचा कांही नेम आहे? म्हणून ही गोष्ट राहूं दे. तर देहांती ब्रह्मप्राप्ती करून घेण्यास मार्गच कशाला हवा?
248-8
तरी आतां देह असो अथवा जावो ।आम्ही तों केवळ वस्तूचि आहों ।कां जे दोरीं सर्पत्व वावो ।दोराचिकडुनी ॥ 248॥
तर देह मग राहो अथवा जावो, आम्ही केवळ ब्रह्मच आहो असे ज्ञानी समजतात. कारण, दोरीवरील सर्पाचा भास जसा दोरीचे सत्यत्व भासल्यावर दोरीचे ज्ञानासह व्यर्थ होतो;
249-8
मज तरंगपण असे कीं नसे ।ऐसें हें उदकासी कहीं प्रतिभासे ।तें भलतेव्हां जैसें तैसें ।उदकचि कीं ॥ 249॥
आपल्यावर लाटा येतात कींवा नाहींतशा होतात, याचा पाण्याला कधी भास होतो काय? कारण ते केव्हांही पाहिजे तरी पाणीच्या पाणीच कायम असते,
250-8
तरंगाकारें न जन्मेचि ।ना तरंगलोपें न निमेचि ।ते विदेही जे देहेंचि ।वस्तु जाहले ॥ 250॥
तें पाणी लाटा उत्पन्न झाल्यामुळे जन्म पावत नाही, कींवा लाटा नाहींतशा झाल्यावर ते नाश पावत नाही, त्याप्रमाणे, देहांत राहून जे देहासुद्धा ब्रह्म झाले,