सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १५ वा ओवी ३७६ ते ४०० पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, , , , , , ,

376-15
पैं रुखु डोलतु देखावा । तरी वारा वाजतु मानावा । रुखु नसे तेथें पांडवा । नाहीं तो गा? ॥ 376 ॥
पण अर्जुना, असे पहा कीं, वृक्ष हलत असला म्हणजेच वारा वहात असल्यामुळे आहे असे म्हणावें? आणि जेथे वृक्षच नसेल तेथे वारा नाहींच असें कां समजावयाचें? 76
377-15
कां आरिसा समोर ठेविजे । आणि आपणपें तेथ देखिजे । तरी तेधवांचि जालें मानिजे । काय आधीं नाहीं? ॥ 377 ॥
किंवा, आरसा समोर ठेवून आपण आपलें रूप त्यांत पाहिले, म्हणजे मूळरूपही तेव्हांच झालें असें कां समजावयाचे? ते आधीं नव्हतें कां? 77
378-15
कां परता केलिया आरिसा । लोपु जाला तया आभासा । तरी आपणपें नाहीं ऐसा । निश्चयो करावा? ॥ 378 ॥
किंवा आरसा परत नेला, आणि त्यांतील आभासाचा लोप झाला म्हणजे आपलाच लोप झाला असा कां निश्चय करावयाचा? 78
379-15
शब्द तरी आकाशाचा । परी कपाळीं पिटे मेघाचा । कां चंद्रीं वेगु अभ्राचा । अरोपिजे ॥ 379 ॥
वस्तुतः शब्द हा आकाशाच गुण आहे,पण ( मेघांचा ) गडगडाट झाला म्हणजे तो ध्वनि मेघांचा आहे असे सर्व लोक म्हणतात, किवा अभ्रांच्या गतीचा आरोप चंद्रावर करून चंद्रच चालतो आहे असे म्हणतात. 79
380-15
तैसें होइजे जाइजे देहें । तें आत्मसत्ते अविक्रिये । निष्टंकिती गा मोहें । आंधळे ते ॥ 380 ॥
उत्पन्न होणे किवा नष्ट होणे हे वस्तुतः देहाचे धर्म आहेत, पण, ज्यांची विचारशक्ति लोपली आहे असे अज्ञजन मोहाने, ते धर्म, अविक्रिय व सत्तास्वरूप जो आत्मा त्याचेच आहेत असा निश्चय करितात. 380


381-15
येथ आत्मा आत्मयाच्या ठायीं । देखिजे देहींचा धर्मु देहीं । ऐसें देखणें तें पाहीं । आन आहाती ॥ 381 ॥
ह्या व्यवहारांत ( होणें जाणें ) आत्म्याचा कांहीही संबंध नसून, तो स्वसत्तेनेच असंगत्वाने स्थित आहे; व हे केवल देहधर्म होत, अशी ज्यांची दृष्टि ( निश्चय ) आहे ते निराळेच अगर विरळा आहेत. 81
382-15
ज्ञानें कां जयाचे डोळे । देखोनि न राहती देहींचे खोळे । सूर्यरश्मी आणियाळे । ग्रीष्मीं जैसें ॥ 382 ॥
ग्रीष्म ऋतूतील सूर्याचे तीक्ष्ण किरण मेघांतून पार निघून खालील पृथ्वीतलापर्यंत जसे पोंचतात, त्याप्रमाणे ज्यांची दृष्टि ( बुद्धि ) ज्ञानामुळे पांचभौतिक देहखोळ पाहून तेथेच कुंठित होत नाही. 82
383-15
तैसे विवेकाचेनि पैसें । जयांची स्फूर्ती स्वरूपीं बैसे । ते ज्ञानिये देखती ऐसें । आत्मयातें ॥ 383 ॥
तर, वरील दृष्टांताप्रमाणंविवेकाच्या प्रकाशने ती दृष्टि देहाच्या पलीकडील जी आत्मवस्तु तेथवर पोचू शकते, असे जे ज्ञानी, ते, आत्म्याला असा पहातात. 83
384-15
जैसें तारांगणीं भरलें । गगन समुद्रीं बिंबलें । परी तें तुटोनि नाहीं पडिलें । ऐसें निवडे ॥ 384 ॥
जसे अनंत नक्षत्रयुक्त आकाश समुद्रात प्रतिबिंबित झाले असतां, तें कांहीं वरून तुटून पडलें नाहीं असेंच सर्व मानतात. 84
385-15
गगन गगनींचि आहे । हें आभासे तें वाये । तैसा आत्मा देखती देहें । गंवसिलाही ॥ 385 ॥
व आकाश होते तसेच आपल्या ठिकाणी आहे, हा दिसणारा केवळ मिथ्याभ्यास आहे असे म्हणतात; त्याचप्रमाणे देहस्थ वाटणारा आत्माही वस्तुतः देहस्थ नाहीं (तो स्वस्वरूपस्थित आहे) अशी ज्ञान्यांची दृष्टि असते 85

386-15
खळाळाच्या लगबगीं । फेडूनि खळाळाच्या भागीं । देखिजे चंद्रिका कां उगी । चंद्रीं जेवीं ॥ 386 ॥
पाण्याच्या खळाळीची चंचलता, त्यांत प्रतिफलित झालेल्या चंद्राचीही आहे असे जरी दिसले तरी, ती चंद्राची नसून केवळ पाण्याची आहे, चंद्र अचलच आहे असे जसे मानतात, 86
387-15
कां नाडरचि भरे शोषें । सूर्यु तो जैसा तैसाचि असे । देह होतां जातां तैसें । देखती मातें ॥ 387 ॥
डबक्यांतील सूर्याचे प्रतिबिंब दिसणे अगर लोपणे हा केवळ त्यांत पाणी असणे अगर नसणे ह्याचा खेळ होय; सूर्याचा त्याच्याशीं कांहीही संबंध नसून तो स्वस्थानीं जसाच्या तसाच असतो, तसाच देहाच्या होण्याजाण्याने मला कांहीही विकार होत नाही असे जे ज्ञानी पाहातात. 87
388-15
घटु मठु घडले । तेचि पाठीं मोडले । परी आकाश तें संचलें । असतचि असे ॥ 388 ॥
घट, मठ घडले आणि मागून मोडले तरी तेथील आकाश असते तसेच स्थित असतें. (विकार पावत नाही.) 88
389-15
तैसें अखंडे आत्मसत्ते । अज्ञानदृष्टि कल्पितें । हें देहचि होतें जातें । जाणती फुडें ॥ 389 ॥
तसेच, अखंड जी आत्मसत्ता तिच्या आधारावर अज्ञान्यांनी कल्पिलेले हे देहच होतात जातात, त्याने (वरील आकाशाच्या दष्टांताप्रमाणे आत्मसत्तेत वर कांहीही विकार नाही असे ते स्पष्ट जाणतात. 89
390-15
चैतन्य चढे ना वोहटे । चेष्टवी ना चेष्टे । ऐसें आत्मज्ञानें चोखटें । जाणती ते ॥ 390 ॥
ज्यांना यथार्थ आत्मबोध झाला आहे त्यांच्या दृष्टीने, शुद्ध चैतन्यस्वरूप आत्मा कधी वाढतही नाही, किंवा घटतही नाही; तसाच तो कांहीं चेष्टा करीतहि नाहीं किंवा करवीतही नाही. 390

391-15
आणि ज्ञानही आपैतें होईल । प्रज्ञा परमाणुही उगाणा घेईल । सकळ शास्त्रांचें येईल । सर्वस्व हातां ॥ 391 ॥
इतर ज्ञानाची गोष्ट घेतली तर, ते स्वाधीन होणे शक्य आहे, इतकें की, त्यायोगे पृथ्वीचे परमाणूही मोजतां येतील आणि सकल शास्त्रसार करतलामलकवत् ग्रहण होईल, 91
392-15
परी ते व्युत्पत्ति ऐसी । जरी विरक्ति न रिगे मानसीं । तरी सर्वात्मका मजसीं । नव्हेचि भेटी ॥ 392 ॥
परंतु इतका व्युत्पन्न व ज्ञानसंपन्न होऊनही, जर अत:करणांत वैराग्याचा प्रवेश नसेल तर, सर्वात्मक जो मी, त्या माझी भेट (ज्ञान) त्याला होणारच नाहीं. 92
393-15
पैं तोंड भरो कां विचारा । आणि अंतःकरणीं विषयांसि थारा । तरी नातुडें धनुर्धरा । त्रिशुद्धी मी ॥ 393 ॥
आणखीही असे की, सर्व शास्त्रे मुखोद्गत असूनही अंत:करणांत विषयलालसा असेल, तरीही, अर्जुना, माझी त्याला कालत्रयी प्राप्ति होणार नाही. 93
394-15
हां गा वोसणतयाच्या ग्रंथीं । काई तुटती संसारगुंती? । कीं परिवसिलिया पोथी । वाचिली होय? ॥ 394 ॥
अरे, झोंपेत बरळल्या गेलेल्या ग्रंथांतील वाक्यांनी कोणी संसारमुक्त झाला आहे काय? किंवा पोथीचे नुसते रक्षण अगर तिची पूजा करून ती वाचल्याचे श्रेय येतें काय? 94
395-15
नाना बांधोनियां डोळे । घ्राणीं लाविजती मुक्ताफळें । तरी तयांचें काय कळे । मोल मान? ॥ 395 ॥
किंवा डोळे बांधुन परीक्षेसाठीं मोती नाकास लाविले तर त्यांचे मुल्य अगर महत्व कळेल काय? 95

396-15
तै सा चित्तीं अहंते ठावो । आणि जिभे सकळशास्त्रांचा सरावो । ऐसेनि कोडी एक जन्म जावो । परी न पविजे मातें ॥ 396 ॥
त्याप्रमाणे, चित्तांत अहंकाराचे बिऱ्हाड, (पक्के ठाण) आणि जिव्हेवर सर्व शास्त्रे खेळती, असे कोट्यवधी जन्म गेले तरी मत्प्राप्ति होणें नाहीं. 96
397-15
जो एक मी कां समस्तीं । व्यापकु असें भूतजातीं । ऐक तिये व्याप्ती । रूप करूं ॥ 397 ॥
एक असणारा जो मी, त्या माझी, सर्व भूतांत कधी व्याप्ति आहे तिची तुला फोड करून सांगू. 97
यदादित्यगतं तेजो जगद्भासयतेऽखिलम् ।
यच्चन्द्रमसि यच्चाग्नौ तत्तेजो विद्धि मामकम् ॥15. 12॥

398-15
तरी सूर्यासकट आघवी । हे विश्वरचना जे दावी । ते दीप्ति माझी जाणावी । आद्यंतीं आहे ॥ 398 ॥
सूर्य आणि ही सर्व विश्वरचना ज्या प्रकाशानें दिसते तो सर्व प्रकाश माझा आहे असे समज. तोच विश्वरचनेच्या आधी व नंतरही आहेच. 98
399-15
जल शोषूनि गेलिया सविता । ओलांश पुरवीतसे जे माघौता । ते चंद्रीं पंडुसुता । ज्यो{त्}स्ना माझी ॥ 399 ॥
अर्जुना, सूर्य, जळ शोषण करून गेल्यावर, तेथे, मागाहून ओलावा पुरविणारी जी चंद्रप्रभा, ती माझी होय. 99
400-15
आणि दहन-पाचनसिद्धी । करीतसे जें निरवधी । ते हुताशीं तेजोवृद्धी । माझीचि गा ॥ 400 ॥
आणि, दहन किंवा पाचन करण्याची जी अग्नीच्या ठिकाणची अमर्याद शक्ति, तेंही माझेच तेज होय. 400
गामाविश्य च भूतानि धारयाम्यहमोजसा ।
पुष्णामि चौषधीः सर्वाः सोमो भूत्वा रसात्मकः ॥15. 13॥

, , , , , , ,

Sartha Dnyaneshwari Chapter 15th Complete
Sartha Dnyaneshwari Adhyay Pandharawa Sampurn
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय पंधरावा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 15 वा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १५ वा संपूर्ण

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *