सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा ओवी ३०१ ते ३२५ पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, ,

301-13
म्हणौनि मनपण जैं मोडे । तैं इंद्रिय आधींचि उबडें । सूत्रधारेंवीण साइखडें । वावो जैसें ॥13-301॥
म्हणून (ज्यावेळी) मनाचा मनपणा नाहीसा होईल त्यावेळी अगोदरच इंद्रियांची कर्मे रहातात. (म्हणजे इंद्रियांची कर्मे करण्याची शक्ती बंद पडते). ज्याप्रमाणे सुताच्या दोरीने हालणारी बाहुली सूत्रधाराशिवाय व्यर्थ असते
302-13
उगमींचि वाळूनि जाये । तें वोघीं कैचें वाहे । जीवु गेलिया आहे । चेष्टा देहीं? ॥13-302॥
हे पाणी उगमाच्या ठिकाणीच वाळून गेले आहे ते (नदीच्या) ओघामधे कोठून वाहील? (शरीरातून) जीव गेल्यानंतर त्या देहाच्या ठिकाणी हालचाल आहे काय?
303-13
तैसें मन हें पांडवा । मूळ या इंद्रियभावा । हेंचि राहटे आघवां । द्वारीं इहीं ॥13-303॥
अर्जुना, त्याप्रमाणे मन हे सर्व या इंद्रियांच्या व्यापारात मूळ आहे व हेच या सर्व इंद्रियांच्या द्वाराने वागत असते.
304-13
परी जिये वेळीं जैसें । जें होऊनि आंतु असे । बाहेरी ये तैसें । व्यापाररूपें ॥13-304॥
परंतु ज्यावेळेला जसे ज्या वासनेच्या रूपाने मन आत होऊन असते, तसेच ते इंद्रियांच्या व्यापाररूपाने बाहेर येते.
305-13
यालागी साचोकारें । मनीं अहिंसा थांवे थोरें । पिकली द्रुती आदरें । बोभात निघे ॥13-305॥
ज्याप्रमाणे पक्व झालेला सुगंध मोठ्या उत्साहाने गाजावाजा करीत बाहेर येतो, त्याप्रमाणे मनात अहिंसा चांगली बळावली म्हणजे तीच इंद्रियव्यापारातून दिसून येते.


306-13
म्हणौनि इंद्रियें तेचि संपदा । वेचितां हीं उदावादा । अहिंसेचा धंदा । करितें आहाती ॥13-306॥
म्हणून (ही सर्व) इंद्रिये (मनात) असलेल्या त्याच अहिंसारूप संपत्तीच्या भांडवलाचा खर्च करीत असतात. (म्हणजे अहिंसेचा इंद्रियांकडून अव्याहत खर्च होऊन सुद्धा अहिंसारूप भांडवल संपत नाही).
307-13
समुद्रीं दाटे भरितें । तैं समुद्रचि भरी तरियांते । तैसें स्वसंपत्ती चित्तें । इंद्रियां केलें ॥13-307॥
समुद्रास पूर्ण भरती आली म्हणजे जसा तो समुद्रच आपल्या भरतीच्या पाण्याने खाड्या भरून टाकतो त्याप्रमाणे (चित्तात अहिंसेची दाट भरती झाली म्हणजे) चित्तच या सर्व इंद्रियांना आपल्या अहिंसारूप जलसंपत्तीने भरून टाकते.
308-13
हें बहु असो पंडितु । धरुनि बाळकाचा हातु । वोळी लिही व्यक्तु । आपणचि ॥13-308॥
फार बोलणे राहू दे. पंतोजी आपणच स्पष्ट अक्षरांच्या ओळी लिहितो.
309-13
तैसें दयाळुत्व आपुलें । मनें हातापायां आणिलें । मग तेथ उपजविलें । अहिंसेतें ॥13-309॥
त्याप्रमाणे मनाने आपले दयालुत्व हातापायास आणिले व मग तेथे (म्हणजे हातापायांचे ठिकाणी) मनानेच अहिंसेला उत्पन्न केले.
310-13
याकारणें किरीटी । इंद्रियांचिया गोठी । मनाचिये राहाटी । रूप केलें ॥13-310॥
म्हणून अर्जुना, इंद्रियांच्या अहिंसेच्या वर्णनाने मनाच्याच अहिंसेच्या वागणूकीचे स्पष्ट वर्णन केले.


311-13
ऐसा मनें देहें वाचा । सर्व संन्यासु दंडाचा । जाहला ठायीं जयाचा । देखशील ॥13-311॥
याप्रमाणे मनाने, देहाने, वाचेने सर्व हिंसेचा त्याग झालेला ज्याच्या ठिकाणी तुला दिसेल
312-13
तो जाण वेल्हाळ । ज्ञानाचें वेळाउळ । हें असो निखळ । ज्ञानचि तो ॥13-312॥
तो पुरुष ज्ञानाचे विस्तृत मंदिर आहे असे समज. हे राहू दे. तो पुरुष म्हणजे केवळ ज्ञानाची मूर्ती होय.
313-13
जे अहिंसा कानें ऐकिजे । ग्रंथाधारें निरूपिजे । ते पाहावी हें उपजे । तैं तोचि पाहावा ॥13-313॥
जी अहिंसा आपण कानाने ऐकतो अथवा ज्या ग्रंथाचा आधार घेऊन आपण निरूपण (वर्णन) करतो, ती अहिंसा पहावी अशी इच्छा जेव्हा उत्पन्न होईल, तेव्हा त्या पुरुषालाच पहावे.
314-13
ऐसें म्हणितलें देवें । तें बोलें एकें सांगावें । परी फांकला हें उपसाहावें । तुम्हीं मज ॥13-314॥
व्याख्यान लांबल्याबद्दल परिहार =
(ज्ञानेश्वर महाराज श्रोत्यांच्या जवळ परिहार देतात) असे जे देव म्हणाले ते मी वास्तविक एका शब्दाने सांगावे, परंतु माझ्या सांगण्याचा फार विस्तार झाला, याबद्दल मला आपण क्षमा करावी.
315-13
म्हणाल हिरवें चारीं गुरूं । विसरे मागील मोहर धरूं । कां वारेलगें पांखिरूं । गगनीं भरे ॥13-315॥
कदाचित आपण असे म्हणाल की हिरव्या चार्‍यात (गाय, म्हैस वगैरे) जनावर सुटले असता ते जसे चार्‍याच्या लोभाने पुन्हा मागे घराच्या वाटेस लागण्याचे विसरते अथवा वार्‍‍याच्या वेगाने पक्षी जसा आकाशात आपल्या घरट्यापासून दूर दूर उडत जातो.


316-13
तैसिया प्रेमाचिया स्फूर्ती । फावलिया रसवृत्तीं । वाहविला मती । आकळेना ॥13-316॥
त्याप्रमाणे आवडीच्या योगाने स्फुरण येऊन वेगवेगळ्या रसांचा स्वाद मिळाल्याने माझी बुद्धी वहावत गेली, ती आवरत नाही.
317-13
तरि तैसें नोहे अवधारा । कारण असें विस्तारा । एऱ्हवीं पद तरी अक्षरां । तिहींचेंचि ॥13-317॥
विस्तार का केला?
तर ऐका, महाराज, तसे नाही विस्तार करण्याला कारण आहे. नाही तर अहिंसा हे पद तीन अक्षरांचेच आहे.
318-13
अहिंसा म्हणतां थोडी । परी ते तैंचि होय उघडी । जैं लोटिजती कोडी । मतांचिया ॥13-318॥
अहिंसा म्हणावयास थोडी आहे. परंतु जेव्हा कोट्यवधी मतांचा विचार करून त्यांचे खंडण करावे तेव्हा महाराज ती स्पष्ट होते.
319-13
एऱ्हवीं प्राप्तें मतांतरें । थातंबूनि आंगभरें । बोलिजैल ते न सरे । तुम्हांपाशीं ॥13-319॥
एरवी प्राप्त झालेल्या अन्य मतांचे निरसन न करता अंगच्या जोराने तुमच्या पुढे बोललो तर ते चालणार नाही.
320-13
रत्नपारखियांच्या गांवीं । जाईल गंडकी तरी सोडावी । काश्मीरीं न करावी । मिडगण जेवीं ॥13-320॥
रत्न पारखणार्‍या लोकांच्या गावात (गंडकी कसोटीचा शालिग्रामासारखा दगड) रत्न म्हणून विकली जाईल असे वाटत असेल तर ती गाठोड्यातून सोडून बाहेर काढावी व सरस्वतीची स्तुती कितीही केली तरी ती पुरी होणार नाही म्हणून तिची स्तुती करू नये.


321-13
काइसा वासु कापुरा । मंद जेथ अवधारा । पिठाचा विकरा । तिये सातें? ॥13-321॥
ऐका जेथे (ज्या बाजारात) कापराला वास मंद आहे असे म्हणतात त्या बाजारात (कापूर म्हणून) पिठाची विक्री कशी होईल?
322-13
म्हणौनि इये सभे । बोलकेपणाचेनि क्षोभें । लाग सरूं न लभे । बोला प्रभु ॥13-322॥
म्हणून महाराज या सभेमधे (नुसत्या) बोलकेपणाच्या आवेशाने बोलण्याला जवळीक (पसंती) मिळणार नाही.
323-13
सामान्या आणि विशेषा । सकळै कीजेल देखा । तरी कानाचेया मुखा- । कडे न्याल ना तुम्ही ॥13-323॥
सर्व साधारण अशी अहिंसेची कल्पना व निरनिराळ्या मतांप्रमाणे अहिंसेसंबंधी विशेष कल्पना, यांचा कालवा करून जर मी बोललो तर ते व्याख्यान आपल्या कानाच्या मुखाकडे नेणार नाही.
324-13
शंकेचेनि गदळें । जैं शुद्ध प्रमेय मैळे । तैं मागुतिया पाउलीं पळे । अवधान येतें ॥13-324॥
शंकारूपी कचर्‍याने जेव्हा स्वच्छ सिद्धांत मळला जातो, तेव्हा त्या सिद्धांताकडे येत असलेले तुमचे लक्ष मागल्या पाऊलीच पळेल.
325-13
कां करूनि बाबुळियेची बुंथी । जळें जियें ठाती । तयांची वास पाहाती । हंसु काई? ॥13-325॥
किंवा ज्या पाण्यांत शेवाळाच्या गुंडाळ्या (दाठ शेवाळें) झाल्या आहेत त्या पाण्याकडे हंस कधी दृष्टी देतात काय?

, ,
1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *