संत चोखामेळा म. चरित्र १३

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

संत चोखामेळा  भाग – १३.

संत चोखामेळा चरित्र सर्व भाग पहा

इथे सगळ्या संतांची एकच चुल, सर्वांनी मिळून स्वयंपाक करायचा,सर्वा साठी एकच जेवण असायचे.फावल्या वेळेत विठ्ठलाची भजनं नामस्मरण करीत तल्लीन व्हायचे.प्रत्येक जणं अभंगरचना, तीही अगदी रसाळ,प्रांजल व पारदर्शी, भाषा अगदी सोपी सहज कळेल अशी करत असे.चोखोबा हे सारं निरिक्षण करीत होते.संतमंडळींच्या संगतीत त्यांची भाषा स्वच्छ,शुध्द झाली.एक दिवस सर्व बसले असतां,नामदेवांनी नाममहात्म्य सांगायला सुरुवात केली नी मग गोरोबा, नरहरी सोनार,सेना न्हावी आणि जनाबाईने गोड आवाजांत अभंग म्हटले. हे सर्व ऐकतांना चोखोबा तल्लीन झाले, भान हरपले.नामदेव त्यांना भावसमाधी तुन जागे करत म्हणाले,तुम्हीही सांगा कांही तरी!जनाबाईनेही आग्रह केल्यावर उत्तेजित चोखोबांच्या मनांत खळबळ निर्माण झाली.अनेक कल्पना,भावना, शब्द आतुन उसळी मारुन बाहेर येण्यास धडपडतय असं व्हायला लागलं

मनाची तयारी करुन चोखोबा नामदेवांजवळ येऊन त्यांच्या पायावर डोकं ठेवल.त्यांना उठवत नामदेव म्हणाले,चोखोबा! मनातल्या भावना कोंडुन ठेवु नका,शब्दात बांधुन त्यांना बाहेर येऊ द्या.चोखोबांना धाडस आलं. क्षणभर डोळे मिटले.विठुरायाच्या सावळ्या मूर्तीला मिटल्या डोळ्यासमोर आणुन मनोमन नमस्कार केला.मनांत उमटलेला भावनांचा कल्लोळ शब्द रचनेत बांधत तोंडातुन शब्द उमटले…..

“नामापरता मंत्र।नाही त्रिभुवनी।
पाप ताप नयनी।पडे चित्ता।
सुलभ सोपे हे। विठोबाचे नाम।

सकळ साधनांचे मूळ बीज।चोखा म्हणे मज।कांहीच ना कळे!विठ्ठलाचे बळे नाम घेतो ।। चोखोबांच्या तोंडुन निघालेला अभंग सगळीजणं स्तब्ध होऊन लक्ष  पुर्वक ऐकत होते.नामदेवांना प्रश्न पडला पंढरपूरला पहिल्यांदि भेटलेला,प्रश्नांच्या वादळांत आणि विचारांच्या गोंधळांत सांपडलेला हाच कां तो चोखोबा?इतक्या सगळ्यासमोर आत्मविश्वासाने विठ्ठल नामाचा महिमा ओवीबध्द करुन तेवढ्याच आत्मनिर्भयतेने सांगणारा चोखा म्हणजे विठ्ठलभक्तीच्या सामर्थ्या चा एक प्रांजल आणि सक्षम रुप होतं. चोखोबाचे अभंग संपले.दुसर्‍याच क्षणी, वाss चोखोबा!पहिल्याच प्रयत्नात एवढी प्रगल्भता? असे उद्गार काढत मंडळींनी टाळ्या वाजवल्या.अश्या कौतुकाची,जिव्हाळ्याची,शाबासकीची त्यांना संवय नव्हती.पोळलेल्या मनावर व शरीरांच्या जखमावर चंदनाचा शिडकाव व्हावा अशी गत त्यांची झाली. आपण नुसते क्षुद्र चोखा नाही तर आपणही कुणीतरी आहोत.आपला जन्म कांहीतरी करण्यासाठी आहे.कांहीतरी ठळक अस्तित्व आपल्याला आहे आणि नसेल तर ते मिळवायला हवय,अशा विलक्षण विचारांनी,भावनांनी चोखोबाला वेढुन टाकले होते.

आतां चोखा क्षुद्र राहिला नव्हता. संतांच्या मांदियाळीत  प्रवेश झाला होता. विठ्ठलभक्तीच्या लोकराज्याच्या भूमीवर चोखोबाच्या आयुष्याला नाट्यमय वळणातुन निर्माण होणार्‍या महानाट्या ची ही नांदी होती.सर्वांची जेवण झाल्या वर गप्पा मारत बसली असतां,अचानक सच्चिदानंद भटांनी वार्ता आणली, आपल्या गुरुस्थानी असलेले,सगळ्यांचे लाडके ज्ञानेश्वर माऊली आपल्या भावंडा सहित तीन दिवसांच्या मुक्कामी उद्या पंढरपूरास येत असुन आषाढी एकादशी ला चंद्रभागेत स्नान व विठ्ठलदर्शन करुन पुढे जाणार आहे.चोखोबांनी आपल्या मनाच्या गाभार्‍यात विठ्ठलाशेजारी त्यांना जागा दिली होती.आपल्या ज्ञानाने सर्वांना नामोहरण करणार्‍या तेजाने सहस्र सूर्यासारखं ज्यांचं अस्तित्व आहे त्या माऊलीला ते भेटणार होते. ही चारही भावंडे म्हणजे चार वेदच! संताच्या सहवासात त्यांना आत्मभान आलं आणि श्रेष्ठ भक्तांच्या बिरुदावली जवळ चोखोबा हळुहळु मार्गस्थ झाले.

पांडुरंगांनी नामदेवांच्या मदतीने हे सारं घडवुन आणले होते. आज सार्‍या पंढरपुरांत सणाचे, उत्सवाचे वातावरण,प्रत्येक दारांंत रांगोळी रेखाटली होती.घरांघरातुन ज्ञानेश्वरांच्या ओव्या ऐकायला येत होत्या. पंढरपूरचं सारं वातावरणच ज्ञानेश्वरमय झाले होते.चोखोबाच्या शरीराचा कण न् कण ज्ञानेश्वरांच्या भेटीसाठी आसुसला होता.आणि ज्ञानोबामाऊली आले!दरवाज्या तुन येत असलेले साक्षात ज्ञानसूर्य!नामदेवांच्या एका हातात ज्ञानोबा व दुसर्‍या हातात निवृत्ती,पाठोपाठ सोपान देव व परकरी पोरं आदिमाया मुक्ताई दिसले मात्र, चोखोबांच्या सार्‍या शरीराला,जाणीवांना संवेदनांना जणूं डोळे फुटले.समोरच्याच्या ह्रदयाचा ठाव घेणारे,सगळ्यांना सामावुन घेणारे,तरीही दिलासा देणारे लोभसवाणं व्यक्तीमत्व… चोखोबा नखशिखांत न्याहाळत होते.जो तो पाया पडायला धडपडत होता,पण ते कोणालाही चरणावर मस्तक ठेऊ देत नव्हते.

क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.

संत चोखामेळा चरित्र सर्व भाग पहा

संत व दिव्य व्यक्तींचे प्रेरणादायी चरित्र

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *