संत चोखामेळा म. चरित्र ३०

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

 संत चोखामेळा  भाग- ३०.

संत चोखामेळा चरित्र सर्व भाग पहा

गोविंदभटाच्या आज्ञेने केरबाने बळकट दोरीने चोखोबांना फळीस बांधले.आणि शंकरभट व नागेश बडव्या स आसुड बैलाच्या पाठीवर मारण्यास सांगीतले.आसुडाचा सपकारा मारला. सपss या आवाजासरशी सगळ्यांचे काळीज चिरत गेले.विठ्ठलमंदिरांच्या भिंती थरारल्या,वारा स्तब्ध झाला. चंद्रभागा वाहायची थांबली.प्रतिध्वनी गाभार्‍यात उमटले.सपसपसप शंकरभट व नागेश बडवे आसुडा मागुन आसुड, फटक्यामागुन फटके बैलांच्या पाठीवर मारत होते.बैलांच्या पाठी रक्ताळल्या, पाय जमीनिला खिळल्यागत,इतके भयंकर फटकारे बसुनही बैल तसुभरही हलले नाही.काय चाललय कुणालाच कळेना.वाळवंटांत जमलेले शेकडों डोळे बघत होते.डोळ्यात प्राण आणुन अत्यंत दुःखी अंतकरणाने नामदेवादी संतमंडळी चोखोबाला होणारी शिक्षा बघत होते. इतका मार खाऊन बैल तसुभरही हलले नाहीत म्हणुन नामदेवांनी उर्ध्व दृष्टी लावली.काय दिसले त्यांना?दोन्ही बैलांच्या समोर निळे वलय पसरले होते आणि त्या वलयात प्रत्यक्ष पांडुरंग कमरे वरचे दोन्ही हात काढुन बैलाची शिवळ धरलेली दिसले.मस्तवाल व माजलेले बैल मान खाली घालुन दीनपणे स्तब्ध उभे होते.

नामदेवांनी मनोमन त्या सावळ्या मूर्तीला वंदन केले.नामदेवांना जे दिसले ते फळीवर झोपलेल्या चोखोबालाही दिसले.आपली श्रध्दा,विश्वास,भक्ती सार्थ ठरल्याचा अभिमान त्यांच्या मुद्रेवर चमकत होता.फळीवर बांधलेल्या दोर्‍या आपोआप सुटल्या,मंदिरांतील घंटा जोरजोरांत वाजायला लागल्या.सगळ्या लोकांनी विठ्ठलाचा व चोखोबांचा जयघोष केला हे पाहुन गोविंदभट संतापाने पिसाळले.डोळ्यातुन ठीणग्या उडाल्या,अंगाचा नुसता तिळपापड झाला चिडक्या आवाजांत शकरभटाला म्हणाले बैल हलले नाही तर काय झाले?पायाशी पडलेल्या चोखोबाला फटके मारुन सोलुन काढा.शंकरभट आसुडाचे फटकारे चोखोबांना मारु लागले.चोखोबा दुःखाने,वेदनेने आर्त किंकाळ्यांनी अवघे वाळवंट भरुन गेले.सहनशक्तीचा अंत झाल्यावर,टाहो फोडुन विठ्ठलाचा धावा करुं लागले.त्याही अवस्थेत धावा करत त्यांच्या तोंडुन अभंग बाहेर पडला. चोखोबांच्या स्वरांतील आर्तता, अपार करुणा,वेदनेने भरलेल्या आकाश फाडुन जाणार्‍या किंकाळ्या आणि घायाळ होऊन केलेला देवाचा धावा ऐकल्यावर मात्र नामदेवांना राहवले नाही त्यांच्यासह सर्व संतमंडळींनी आणखी न मारण्याची विणवणी केली.लोकांतील चुळबुळ व अस्वस्थता पाहुन,जर मारणे असेच सुरु ठेवले तर लोकक्षोम वाढु शकेल हा विचार करुन,गोविंदभटाने मारणे थांबवण्याचा इशारा केला.वेदनेने तडफडणार्‍या चोखोबांना वाळवंटांत तसेच टाकुन सारेजन निघुन गेले,पण जाता जाता खणखणीत आवाजातील अभंग त्यांच्या कानी पडला.


“चोखामेळा संत भला।तेणे देव भुलविला
भक्ति आहे ज्याची मोठी।त्याला पावतो संकटी।।
चोखामेळ्याची करणी।तेणे देव केला ऋणी।।
लागा विठ्ठल चरणी।म्हणे नामयाची जनीजनाबाई अत्यंत तल्लीन होऊन अभंग गात होती.वेदनेने कळवणार्‍या चोखोबांना नामदेवांनी आधार देऊन उठवले.सगळ्यांनी आधार देऊन खोपटात आणले.आसुडाच्या फटक्यांनी सोललेली पाठ सोयराने गरम पाण्याने हळुवार शेकुन जखमांना तेल हळद लावली.शुध्दीवर आल्यावर सारे संत मंडळी आपल्या भोवती दुःखी चेहर्‍याने बसलेली पाहुन त्यांना भरुन आले. डोळ्यांत पाणी आणुन कापर्‍या आवाजांत नामदेवांना म्हणाले,देवा! पांडुरंगाची शपथ!मी रत्नहार चोरला नाही,मंदिरांत गेलो नाही.स्पर्शही केला नाही.मी जर चोरला असता तर राजरोस पणे गळ्यात घातला असतां कां? देवा! तुमचा विश्वास आहे ना?गुरुमाऊली तुमच्या नजरेत जर मी चोर असेल तर मला जगायचा अधिकार नाही.खरचं मी रत्नहार चोरला नाही….चोरला नाही.. असे पुनः पुनः म्हणत चोखोबा स्फुंदुन स्फुंदुन रडु लागले.त्यांचा आकांत पाहुन सर्वांच्या डोळ्यांत अश्रू उभे राहिले. नामदेवांनी त्यांचे हात हाती घेत म्हणाले, तुम्ही कधीच चोरी करुं शकत नाही यावर माझा पूर्ण विश्वास आहे.चोखोबा!तुमच्या श्रध्देची,भक्तीची,विश्वासाची तो पांडुरंग परीक्षा घेतो आहे.आवडत्या भक्तांची कसोटी घेणे त्याचा लाडका छंद आहे. त्याच्या दृष्टीने कुठल्याही जाती धर्माचा, जर तो भगवद्भक्त,वारकरी असेल तर त्याला प्रिय व पवित्रच असतो.चोखोबा! पुंडलकानं स्थापन केलेला हा भागवत धर्म,प्रत्यक्ष ज्ञानेश्वर माऊलीनं पुनरुज्जीवित केला.ज्ञानेश्वर माऊली व त्यांची भावंडे ब्राम्हण!पण भागवतधर्माचे दुर्दैव की,एका ब्राम्हणाने त्याचं पुनरुत्थापन केल्यावर फारच कमी ब्राम्हणांनी स्विकारला.सगळ्या जाती धर्माला एकत्र आणणारा हा धर्म ब्राम्हांणांनी नाकारला आणि बहुजन समाजाने स्विकारला.

क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.

संत चोखामेळा चरित्र सर्व भाग पहा

संत व दिव्य व्यक्तींचे प्रेरणादायी चरित्र

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *