संत ज्ञानेश्वर महाराज संक्षिप्त चरित्र

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

माझा मराठाचि बोलू कौतुके। परि अमृतातेहि पैजासी जिंके। ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।।, संत ज्ञानेश्वर माऊलींचा उल्लेख झाला आणि या ओळी आठवल्या नाहीत, असे कधी होत नाही.

जगत्कल्याणासाठी ‘आता विश्वात्मके देवे’चे पसायदान मागणारे संत ज्ञानेश्वर महाराज
माझा मराठाचि बोलू कौतुके। परि अमृतातेहि पैजासी जिंके। ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।।, संत ज्ञानेश्वर माऊलींचा उल्लेख झाला आणि या ओळी आठवल्या नाहीत, असे कधी होत नाही. मराठी भाषेचा अभिमान, भागवत संप्रदायाचे प्रवर्तक, वारकरी संप्रदायाचे दैवत, योगी, तत्त्वज्ञ, संतकवी अशा अनेकविध गोष्टींसाठी ओळखल्या जाणाऱ्या संत ज्ञानेश्वर माऊलींची आज जयंती आहे. श्रावण वद्य अष्टमीला संत ज्ञानेश्वरांचा जन्म झाला. संत ज्ञानेश्वरांच्या जन्मवर्षाबाबत मात्र एकवाक्यता दिसून येत नाही. ज्ञानेश्वरांचे कार्य अगदी अफाट आहे. जीवनाच्या अवघ्या २० वर्षांमध्ये ज्ञानेश्वरांनी केलेले कार्य व्यापक आहे. माऊलींनी केवळ १६ व्या वर्षी भगवद्गीतेवरील भाष्यग्रंथ ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला. विशेष योगायोग म्हणजे श्रीकृष्ण आणि संत ज्ञानेश्वर माऊली या दोघांचाही जन्म श्रावण वद्य अष्टमीला झाला आहे. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या जयंतीनिमित्त व्यापक, विस्तृत कार्याचा घेतलेला हा थोडक्यात आढावा…

श्रीज्ञानदेवांचे संक्षिप्त चरित्र.

महाराष्ट्र ही संतांची भूमी. येथील ज्ञानदेव, नामदेव, एकनाथ, रामदास व तुकाराम हे संतपंचक प्रसिद्ध आहे. त्यात ज्ञानदेव आद्य संत. ‘हे विश्वचि माझे घर’ म्हणून त्यांनी विश्वाला गवसणी घातली. ज्ञानेश्वरीसारखा लोकोत्तर ग्रंथ निर्माण केला. त्यामुळे त्यांना माउलीपद प्राप्र झाले.

वास्तविक विचार केला तर एवढा मोठा तत्त्वज्ञानावरचा ग्रंथ निर्माण केला, पण वय किती तरी १६. आणि कृतकार्य झाले असे समजून २१ व्या वर्षी संजीवन समाधीही घेतली. यापेक्षा मोठा चमत्कार तो कोणता ? त्यांनी मराठी सारस्वताचे झाड महाराष्ट्राच्या भूमीवर लावले. त्याचा वेलु गगनावरी गेला आहे. ती उंची अजून कोणत्याही ग्रंथाने गाठलेली नाही.

आपल्याकडे प्रामाणिक इतिहास लेखनाची पद्धत नाही. त्यामुळे पूर्वासूरींच्या काळाविषयी आपल्याला इतर समकालीनांनी केलेले उल्लेख व त्या ग्रंथातील वचने यांच्या आधारेच करावे लागते. श्रीज्ञानदेवांचे अभंगात्मक चरित्र नामदेव महाराजांनी लिहीले आहे, म्हणून आपल्याला त्यांच्याबद्दल थोडीफार तरी माहिती मिळू शकते.

ऐसें युगीं परी कळीं | आणि महाराष्ट्रमंडळीं|
श्रीगोदावरीच्या कूलीं | दक्षिणलिंगीं ||१८- १८०३||

त्रिभुवनैकपवित्र | अनादि पंचक्रोश क्षेत्र|
जेथ जगाचें जीवनसूत्र | श्रीमहालया असे ||१८- १८०४||

तेथ यदुवंशविलासु | जो सकळकळानिवासु|
न्यायातें पोषी क्षितीशु | श्रीरामचंद्रु ||१८- १८०५||

तेथ महेशान्वयसंभूतें | श्रीनिवृत्तिनाथसुतें|
केलें ज्ञानदेवें गीते | देशीकार लेणें ||१८- १८०६||

असं श्रीज्ञानदेवांनी आपल्या ज्ञानेश्वरी ग्रंथाच्या शेवटी म्हटलेलें आहे. त्रैलोक्यामधे जे एक पवित्र पाचकोसाचे अनादि क्षेत्र आहे व जेथे (ज्या नेवाशात) जगातील सर्व जीवांची चालक श्रीमहालया (श्रीमोहिनीराज) आहे ॥१८-१८०३॥ तेथे यदुवंशाची शोभा व सर्व कलांचे रहाण्याचे ठिकाण, जो पृथ्वीपती श्रीरामचंद्र, तो न्यायाने राज्य करीत होता. ॥१८-१८०४॥ तेथे (त्या नेवाशामधे) आदिनाथ शंकर यांच्या परंपरेत उत्पन्न झालेला श्रीनिवृत्तिनाथसुत (शिष्य) जो ज्ञानदेव, त्याने गीतेवर देशी भाषेचा (मराठी टीकेचा) अलंकार चढवला. ॥१८-१८०५॥

ज्ञानदेवांच्या या वचनावरून रामचंद्र यादव व संत ज्ञानदेव हे समकालीन होते असे ठरते.

श्रीज्ञानेश्वर महाराजांच्या पूर्वजांकडे आपेगावचे कुलकर्णी पद होते. ज्ञानदेवांचे पणजे त्र्यंबक पंत हे कर्तबगार व भगवद्भक्त होते. त्यांना गोरक्षनाथांचा प्रत्यक्ष अनुग्रह झाला होता. त्यांची आपेगाव येथे समाधी आहे, असा उल्लेख नामदेवांनी केला आहे.
त्र्यंबक पंतांचे पुत्र गोविंदपंत. गोविंदपंत व त्यांची पत्नी निराबाई यांना गोरक्षनाथांचे शिष्य गहिनीनाथ यांचा अनुग्रह झाला होता. गोविंदपंतांचे पुत्र विठ्ठलपंत. विठ्ठलपंत हे ज्ञानेश्वर महाराजांचे वडील. विठ्ठलपंत बाळपणापासूनच वैराग्यशील होते. सातव्या वर्षी उपनयन संस्कार होऊन गाय़त्रीमंत्राची दीक्षा मिळाल्यावर त्यांनी पैठण येथे वेदाध्ययन केले व वडिलांची आज्ञा घेऊन तीर्थाटनास गेले. द्वारका, पिंडारक, प्रभास, नाशिक अशी यात्रा करत ते आळंदीला आले. आळंदीला सिधोपंत कुलकर्णी हे सदाचारी ब्राह्मण रहात होते. चोवीस गावांचे कुलकर्णीपण त्यांच्याकडे होते. त्यांना रुक्मिणी नावाची उपवर कन्या होती. ते आपल्या मुलीसाठी वरसंशोधन करीतच होते. त्याचवेळी आळंदीस आलेले विठ्ठलपंत त्यांच्या दृष्टीस पडले. ज्ञान-वैराग्यबलाचे तेज त्यांच्या मुखावर पाहून त्यांनी त्यांच्याजवळच त्यांच्या कुलशीलाची चौकशी केली व त्यांच्याशीच रुक्मिणीचा विवाह करण्याचे निश्चित केले.

‘रुक्मिणीला विठ्ठपंतांनाच दे’ असा सिधोपंतांनाही दृष्टांत झाला व ‘रुक्मिणीशी विवाह कर, तिच्या पोटी दिव्य संतती जन्मास येऊन तुझ्या कुळाचा उद्धार होईल’ असा विठ्ठलपंतांनाही आदेश झाला. त्यानुसार त्यांचा रुक्मिणीशी विवाह झाला. विवाहानंतर सर्व मंडळी पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनास गेली. तेथून विठ्ठलपंत दक्षिणेकडे यात्रेला निघाले व तीर्थयात्रा करून पुन्हा आळंदीला आले. नंतर पत्नीसह आपेगावला येऊन संसार करू लागले. कालक्रमानुसार विठ्ठलपंतांचे मातापिता स्वर्गवासी झाले. विठ्ठलपंतही सदासर्वदा ईशचिंतनात निमग्न राहू लागले. सिधोपंतांना हे कळताच ते दोघांना आळंदीला घेऊन आले. पण विठ्ठलपंतांचे मन संसारात रमेना. ते नित्य रुक्मिणीबाईंच्या मागे काशीला जाऊन संन्यास घेण्याची भाषा बोलू लागले.

एकदा विठ्ठलपंतांनी गंगेवर स्नानाला जातो असे रुक्मिणीला सांगितले. तेव्हा त्यांनी सहज ‘जा’ म्हणून सांगितले. तर पडत्या फळाची आज्ञा समजून विठ्ठलपंत काशीला आले. तेथे रामानंदांना आपण दारापुत्रादिपाशरहित आहोत असे खोटेच सांगून त्यांच्याकडून त्यांनी अनुग्रह घेतला. त्यांचे खरे वैराग्य पाहून रामानंदांनीही त्यांना संन्यासदीक्षा दिली. कोणी विठ्ठलपंतांचे गुरु श्रीपादस्वामी होते असेही म्हणतात. कर्णोपकर्णी ही बातमी रुक्मिणीबाईंना कळली. नवर्‍याने संन्यास घेतला तर आपणही आपले आयुष्य सार्थकी लावावे या हेतूने त्यांनीही आपला निराळा जीवनमार्ग स्वीकारला. उष:काली उठून इंद्रायणीत स्नान करावे, मध्याह्नकालापर्यंत अश्वत्थवृक्षाला प्रदक्षिणा घालाव्या मुखाने नामजप करावा असा त्यांनी आपला जीवनक्रम आखून घेतला. अशी बारा वर्षे त्यांनी तीव्र अनुष्ठान केले.

एक दिवस रामानंद आपल्या शिष्यांच्या बरोबर रामेश्वराच्या यात्रेस चालले असता आळंदीला आले. तेथे मारुतीमंदिरात उतरलेल्या रामानंदांना रुक्मिणीबाईंनी वंदन केले. तेव्हा ‘पुत्रवती भव’ असा त्यांनी त्यांना आशीर्वाद दिला. त्यावेळी रुक्मिणीबाईंनी सर्व परिस्थिती त्यांना सांगितली. तेव्हा त्यांना कळून आले की आपण ज्याला संन्यास देऊन ज्यांचे चैतन्याश्रम असे नाव ठेवले तेच रुक्मिणीचे पती आहेत. रामानंद पुन्हा कशीला गेले व त्यांनी विठ्ठलपंतांना गृहस्थाश्रमाचा स्वीकार करून स्वपत्नीचा अंगिकार करण्याची आज्ञा केली. त्यानुसार विठ्ठलपंत पुन्हा गृहस्थाश्रमी बनले व आळंदीत संसार करू लागले.

परंतु आधी संन्यास घेऊन नंतर पुन्हा गृहस्थाश्रम स्वीकारणे ही गोष्ट शास्त्रसंमत नसल्यामुळे समाजाच्या दृष्टीने निंदनीय ठरली. त्यामुळे पुढे त्यांच्या पोटी जन्मास आलेल्या निवृत्तिनाथ, ज्ञानदेव, सोपानदेव व मुक्ताबाई या अपत्यांनाही समाजाच्या रोषास पात्र व्हावे लागले.

पांगारकरांनी लिहीलेल्या चरित्रात त्यांचे जन्मशक पुढीलप्रमाणे दिले आहेत.

शकामधे ७८ वर्षे मिळवली की इ. स. चे वर्ष मिळते.
१) निवृत्तिनाथ – शके ११९५ = इ. स. १२७३ श्रीमुख संवत्सर माघ वद्य प्रतिपदा. प्रात:काळ
२) ज्ञानदेव – शके ११९७ = इ. स. १२७५ युवा संवत्सर श्रावण कृष्ण अष्टमी मध्यरात्र
३) सोपानदेव – शके ११९९ = इ. स. १२७७ ईश्वर संवत्सर कार्तिक शुद्ध पौर्णिमा प्रहर रात्र
४) मुक्ताई – शके १२०१ = इ. स. १२७९ प्रमाथिनाम संवत्सर अश्विन शुद्ध प्रतिपदा मध्याह्न

असे जन्मशक व तिथी भिंगारकर, पांगारकर व महाराष्ट्र सारस्वतकार भावे यांनी दिले आहेत. मामा दांडेकरांचे मत याहून भिन्न आहे. त्यांनी पाच वर्षे अलिकडचे जन्मशक मानलेले आहेत.

सर्व समाजाने विठ्ठलपंतांना वाळीत टाकलेले होते. नित्य उपहास, छळ, निंदा, कुत्सित बोलणी याला सर्व कुटुंबाला सामोरे जावे लागत होते. मुल मोठी होऊ लागली तशी विठ्ठलपंतांना त्यांच्या उपनयनाची काळजी वाटू लागली. संन्यासाश्रम स्वीकारून नंतर पुन्हा गृहस्थ बनलेल्या विठ्ठलपंतांच्या संततीला मौंजीबंधनाचा अधिकार आहे की नाही याबद्दल शास्त्राधार सापडत नव्हता. आळंदीचे लोक उपनयनाबाबत मौन बाळगून होते. शेवटी काही अनुष्ठान करण्याच्या हेतूने पती-पत्नी आपल्या मुलांसह नाशिकला त्र्यंबकेश्वरी आली. तिथे मुलांसह ब्रह्मगिरीस प्रदक्षिणा करण्याचा त्यांचा नेम होता. एके दिवशी प्रदक्षिणा करत असता अचानक वाघ समोर आला. त्यावेळी निवृत्तिनाथ वाट चुकले व भलतीकडे पळत सुटले.

ते अंजनी पर्वताच्या गुहेत शिरले. तिथे गहिनीनाथ तप करत बसले होते. निवृत्तिनाथांची आपल्या गुरूंशी भेट घडवून आणण्य़ासाठीच नियतीने रचलेली ती लीला होती. गहिनीनाथांनी त्यांना दीक्षा दिली व योगमार्ग शिकवला व आपल्या नाथसंप्रदायात सामावून घेतले. त्यांनी निवृत्तिनाथांना श्रीकृष्णाची उपासना दिली व नामस्मरणाचा प्रसार करण्याची आज्ञा दिली. काही दिवसांनी निवृत्तीनाथ परत आले. नंतर त्यांनी ज्ञानदेवांना उपदेश केला. अशा प्रकारे ज्ञानेश्वर महाराज वयाच्या आठव्या वर्षीच गुरूपदेशाने कृतार्थ झाले. आदिनाथ शंकर हे या नाथ संप्रदायाचे आदिगुरु होत. गुरुपरंपरेने आलेले अद्वयानंद सुख गहिनीनाथांकडून निवृत्तींना व पुढे ते ज्ञानदेवांना प्राप्त झाले.

आपल्या मुलांच्या मुंजी झाल्या नाहीत तर मुलांच्या नशिबीही वनवास येईल या काळजीपोटी विठ्ठलपंत ब्राह्मणसमाजाला मुलांच्या मुंजी करण्याविषयी विनवू लागले. पण संन्यास घेतल्यानंतर गृहस्थाश्रम स्वीकारून झालेल्या मुलांच्या मौंजीबंधनाविषयी शास्त्रात काही आधार नव्हता. विठ्ठलपंत त्यासाठी प्रायश्चित्तही घेण्यास तयार होते. पण ‘अशा मुलांच्या मुंजीविषयी शास्त्राची अनुज्ञा नाही आणि एवढ्या घोर अपराधासाठी देहांत-प्रायश्चित्ताशिवाय दुसरी शिक्षा नाही’ हा ब्रह्मवृंदाचा निर्णय ऐकून विठ्ठलपंतानी त्या निर्णयाचा मान राखला व सर्व मोह सोडून प्रयागक्षेत्री येऊन विठ्ठलपंत व रुक्मिणीबाई यांनी त्रिवेणी संगमात देहाचे विसर्जन केले.

आता अनाथ बनलेली ही चौघे भावंडे आपल्या जीवनाची लढाई आपणच लढत होती. निवृत्तिनाथ जेमतेम १० वर्षांचे व त्यांच्यापेक्षा सगळीभावंडे लहान. निवृत्तिनाथ व ज्ञानदेवांनी कोरान्न भिक्षा मागावी, सोपानांनी छोट्या मुक्ताईला सांभाळावे, असा दिनक्रम मुक्ताईंनी सांगितला आहे. आई वडिलांनी देहान्त प्रायश्चित्त घेऊन सुद्धा मौंजीबंधनाचा प्रश्न तसाच शिल्लक राहिला होता. निवृत्तिनाथ निजानंदात मग्न असत. त्यांना आपली मुंज झालीच पाहिजे असे वाटतच नव्हते. ज्ञानदेवांचा जन्म वर्णाश्रमधर्माच्या रक्षणासाठी होता. ते लक्षात घेऊन ज्ञानदेव निवृत्तिनाथांच्या कडे उपनयन संस्काराचा आग्रह धरत होते. आळंदीच्या ब्राह्मणांनी या मुलांना पैठणला शुद्धिपत्र आणण्यासाठी पाठवले. पैठणला येऊन त्यांनी ब्रह्मवृंदासमोर आळंदीच्या ब्राह्मणांनी दिलेले पत्र ठेवले. पैठणकरांनी स्मृतिग्रंथ पाहिले, पण त्यांना सुद्धा संन्याशाच्या मुलांच्या उपनयन संस्काराबद्दल काही आधार सापडला नाही.

तेव्हा त्यांनी या मुलांना सांगितले की “धर्मशास्त्रात संन्याशाच्या मुलांच्या मौंजीबंधनाचा विधी सांगितलेला नाही. प्रायश्चित्ताने तुम्हाला पावन करून घेता येत नाही. तेव्हा तुम्ही भगवद्भक्तीत जीवन व्यतीत करा. लग्न कार्य करून संसार वाढवू नका. अनन्यभक्तीने भजन केलेत की तुम्ही शुद्ध व्हाल.” सभेचा हा निर्णय ऐकून चारही भावंडे आनंदली. त्यांचा आनंद पाहून सर्व ब्राह्मणमंडळी आश्चर्यचकित झाली. त्यांनी त्या मुलांना त्यांच्या नावांचे अर्थ विचारले. प्रवृत्तीशी काहीही संबंध नाही तो निवृत्ती. सर्व काही जाणणारा तो ज्ञानदेव. भगवंताचे भजन कसे करावे याचे दिग्दर्शन करणे, लोकांना वैकुंठप्राप्तीचा सोपान दाखवणे म्हणून सोपान. आणि मुक्तीचे दार उघडणारी ती मुक्ताई.

लहान मुलांच्या तोंडून या मोठ्या गोष्टी ऐकल्यावर अनेकजण त्यांची चेष्टा करू लागले. त्याच वेळी बाहेर रस्त्यावर एक रेडा होता. काही लोक म्हणाले की याचेही नाव ज्ञानदेव आहे. सगळ्यांचा आत्मा एक आहे तर हा रेडाही वेदवचन बोलायला हवा. हा सर्व संवाद ऐकून ज्ञानदेव रेड्याजवळ गेले. त्यांनी त्याच्या मस्तकावर हात ठेवला. त्याबरोबर रेडा वेदातील ऋचा म्हणू लागला. आता मात्र लोकांची खात्री पटली की ज्ञानदेव खरेच विष्णूचा अवतार आहेत. चमत्काराशिवाय नमस्कार नाही हेच खरे. ते पाहून त्यावेळच्या हेमाडपंत, बोपदेव वगैरे विद्वानांनी त्यांना शके १२०९ मध्ये माघशुद्ध पंचमीस एक शुद्धिपत्र दिले.

आता या भावंडांना अमाप प्रसिद्धी मिळाली. पैठणहून ही भावंडे मोहिनीराजाचे जिथे मंदिर आहे तिथे नेवासे या गावी आली. तेथे पटांगणावर एका खांबाला टेकून ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरी सांगितली. आता त्या ठिकाणी ज्या ठिकाणी खांबाला टेकून ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरी सांगितली तिथे मंदिर बांधण्यात आले आहे. तिथेच त्यांनी निवृत्तिनाथांच्या आज्ञेवरून ‘अमृतानुभव’ हा आपला स्वतंत्र ग्रंथ निर्माण केला. चांगदेवांना पत्रातून ६५ ओव्यांमधे उपदेश केला.

नेवासे, आपेगाव, आळंदी व पैठण ही चार गावे ज्ञानदेवांच्या चरित्राशी निगडित आहेत.

जगाच्या सुखोन्नत्तीसाठी सदैव प्रयत्न करीत असलेली ही भावंडे तीर्थयात्रेला निघाली. नामदेव त्यांच्याबरोबर होते. त्यावेळी ज्ञानदेवांनी अभंगरचना केली. सप्तपुर्‍यांचे दर्शन घेऊन मंडळी पुन्हा पंढरपुरास आली. तेथे ज्ञानदेवांनी इहलोकीचे कार्य समाप्त झाले, तेव्हा आता समाधीच्या परवानगीची मागणी विठ्ठलाकडे केली.

ज्ञानदेव समाधी घेणार असे कळल्यावर निवृत्तिनाथांसह सर्वांनाच अत्यंत दु:ख झाले. ज्ञानदेवांनी इ. स. १२९६ मधे कार्तिक वद्य त्रयोदशीस संजीवन समाधी घेतली. त्यानंतर वर्षभरात सर्वच भावंडांनी आपली जीवनयात्रा संपवली.

वयाच्या २१ व्या वर्षी मराठी सारस्वताचे भांडार समृद्ध करून ज्ञानदेवांनी जगावर मोठे उपकार करून ठेवले आहेत. त्यांच्या पावन आत्म्यास वंदन करून त्यांच्याकडे मी आशीर्वाद मागते की त्यांनी आम्हांला त्यांचा ज्ञानेश्वरी हा ग्रंथ समजावून द्यावा.

सौ. मनीषा अभ्यंकर

संदर्भ ग्रंथ –
१) सार्थ ज्ञानेश्वरी – सोनोपंत दांडेकर.
२) ज्ञानेश्वर महाराजांचे चरित्र – ल. रा. पांगारकर.
३) ज्ञानेश्वर दर्शन – वाङ्मयोपासक मंडळ अहमदनगर
४) महाराष्ट्र सारस्वत – कै. वि. ल. भावे
५) महाकैवल्यतेजा – इ साहित्य प्रतिष्ठान
६) ज्ञानदेव व नामदेव – डॉ. शं. दा. पेंडसे
७) श्री ज्ञानेश्वर – तत्त्वदर्शी आणि कवी – स्वामी शिवतत्त्वानंद – रामकृष्ण मठाचे प्रकाशन
९) लघुग्रंथत्रयी – शिरीष शांताराम कवडे – वामनराज प्रकाशन
१०) लघुग्रंथसप्तक – शिरीष शांताराम कवडे – वामनराज प्रकाशन

वारकरी संतांचे चरित्र पहा

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *