संत चोखामेळा म. चरित्र ४२

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

 संत चोखामेळा  भाग- ४२.

संत चोखामेळा चरित्र सर्व भाग पहा

धर्मसभेतील प्रवचन आटोपुन आज असं कां होतेय याचा तपास लावण्याच्या निश्चयाने नामदेव मुक्कामा च्या ठीकाणी परतले,पण सोबतची मंडळी जेवण्यासाठी खोळंबली म्हणुन त्यांच्या सोबत जेवायला बसले.त्यांच्या सोबत चर्चा सुरु असल्यामुळे थोडावेळ  विसर पडला.पण निवांत झाल्यावर अभंगाची जुळवणी करुन कागदावर लिहिले जाणारे शब्द वेगळेच होते.त्यांनी ठरविलेला अभंग लिहायला घेतला पण कागदावर मात्र शब्द उमटले…. “चोखा माझा जीव चोखा माझा भाव। कुळधर्म देव चोखा माझा।
काय त्याची भक्ती,काय त्याची शक्ती।मी हि आलो व्यक्ती तयासाठी।।

आपण हे काय लिहिलय हे कळल्यावर नामदेव चमकले,अस्वस्थ झाले.इतके दिवसांनंतर अचानक आजच चोखोबांची आठवण कां यावी?चोखोबा मंगळवेढ्या ला जाऊन ५-६ मास होऊन तिथे रमलेले व असल्याची खबर मिळाली होती. वैशाख संपल्यावर जेष्ठ पोर्णिमेला नामदेव पंढरपूरला परतणार होते.आज चोखोबासंदर्भातला अभंग उमटल्यावर नामदेव अस्वस्थ होऊन हूरहूर लागली होती.त्यामुळे त्यांनी समाधी लावली आणि त्याचं मन चरकलं.कांहीतरी अघटीत घडले होते.संकटात होते,आर्त स्वरांत विठूरायाला हाक मारत होते.तिथे नामदेवांची आत्यंतिक गरज आहे हे लक्षात येताच,कागदावर उमटलेला चोखोबा संदर्भातील अभंगरचना म्हणजे कांहीतरी घडलेल्या घटनाचा संबंध त्यांच्याशी होता हे निश्चित.मग मात्र त्यांनी अजिबात वेळ न दवडता,एका घोडेस्वाराला विनंती करुन तडक पंढरपूर गाठले.

नामदेव कधी येतात याकडे विठ्ठलाचे चित्त लागले होते.नुकताच राम जन्म आटोपला होता.दोन वर्षासाठी चोखोबा मंगळवेढ्याला आणि नामदेव तीर्थाटनाला!फक्त जनाई होती त्याच्या मागे लकडा लावायला असं सर्व सुरळीत चालु असतांना एक दिवस सकाळी त्याच्या पायाखालची वीट थरारली.स्वतः परमेश्वर असुनही नियती,विधिलिखिता पुढे त्याचे आज पर्यंत कांहीच चालले नाही.जर चालले असते तर,रामजन्मात वनवास भोगला नसतां किंवा कृष्णाव तारामधे बंदीवासातला जन्म टाळतां आला असतां.नियतीचा लेख वाचायला आणि समजुन घ्यायला जमले नसल्या मुळे आदीमायेलाच शरण गेल्यावरच हा गुंता सुटु शकेल असे वाटुन तो रुख्मिणी महाली गेला तर ती हुंदके देत रडत असलेली दिसली.

गहिवरल्या स्वरात रुख्मिणी म्हणाली,नाथ! ईश्वर म्हणुन आपली जगावर सत्ता असली तरी,तुम्ही कोणाच ही विधिलिखीत बदलुं शकत नाही. स्वामी! तुमचा लाडका भक्त,अतिशय प्रिय असणार्‍या चोखोबाचा दुर्देवी अंत झाला.समाजातल्या वर्णाश्रमाने जिवंत पणी त्याला तुमच्यापासुन लांब ठेवलाच, पण मृत्युनेही डाव साधला.गांवकुसीची भिंत अंगावर कोसळुन त्याला मरण आले.जिंवंतपणी तर उपेक्षा होतीच, मृत्युनेही उपेक्षाच केली.परतु मृत्युनंतरची त्याची उपेक्षा थांबवायचीय!आयुष्यभर अपमान,अन्याय,तिरस्कार सोसणार्‍या, तुमची निःस्सीम भक्ती करणार्‍या चोखाला निदान मृत्युनंतर तरी सन्मान, त्याला साजेशी जागा मिळाली पाहिजे. जोपर्यंत तुमचं अस्तित्व जगांत आहे तो पर्यंत चोखोबाचीही स्मृती,नांव चिरंतर राहिलं पाहिजे. मृत्युनंतर आपल्या लाडका भक्त चोखोबाला उचित सन्मान,न्याय मिळवुन द्यायचाच हे त्या पांडुरंगाने निश्चित केले. फक्त प्रतिक्षा होती नामदेवांची.

नामदेव पंढरपूरच्या वेशीजवळ उतरल्यावर आपल्या थकलेले शरीर व मरगलेल्या मनाकडे दुर्लक्ष करुन, फाटलेले काळीज घेऊन ते घरी न जातां सरळ विठ्ठलमंदिरांत पोहोचले तेव्हा शेजारती सुरु होती.सर्व सामसुम झाल्या वर त्यांनी गर्भागार गाठले.बेभानपणे त्यांनी विठोबाच्या पायाला मिठी मारली. दोघांच्याही डोळ्यांना अश्रूंच्या धारा लागल्या.आवेश ओसरल्यावर,पांडुरंग म्हणाला!नामया!आपल्या चोखोबाच्या कुडीतुन त्याचा आत्मा मुक्त झाला. कायss? कसे? ते तर मंगळवेढ्या ला गेले होते.मग असे कुणाला न सांगता कळवतां,कुणालाही न भेटतां जाऊच कसे शकले?आणि तूं प्रत्यक्ष हजर असतांना?अरे पंढरीया! तूं भक्तवत्सल, पाठीराखा,सर्वसाक्षी आहेस ना?मग तुझ्या परोक्ष कसं घडलं?नामदेव विलाप करत होते.त्यांच्याजवळ आपलं कुणीही नसतांना आकस्मिक गेले हीच भावना नामदेवांना कुरतडत होती.विठ्ठलालाही तेवढेच दुःख झाले होते.नामया!चोखाने अस्पृश्य म्हणुन जीवंतपणी यातना भोगल्याच आणि मृत्युही यातनामयच आला.नामया मी सर्वसाक्षी परमेश्वर आहे खरा,पण माझ्या या सर्वसाक्षीपणावर नियतीने प्रत्येकवेळी मात केली.चोखोबा चा आत्मा कधीच माझ्यात समर्पित झाला.ज्या सन्मानापासुन,हक्कापासुन, न्यायापासुन जन्मभर चोखोबा आणि त्यांची भक्ती वंचित राहिली ते सर्व आतां चोखोबाला मिळवुन द्यायचय!!

क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.

संत चोखामेळा चरित्र सर्व भाग पहा

संत व दिव्य व्यक्तींचे प्रेरणादायी चरित्र

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *