भाग 2 आळंदी वल्लभ संत ज्ञानेश्वर महाराज चरित्र

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

वन्दे पूर्णब्रह्मपरानन्दमीशं आलन्दिवल्लभम् – द्वितीय पुष्प

द्वितीय पुष्प

भगवान सद्गुरु श्री माउलींचा अवतार श्रावण कृष्ण अष्टमी, शके ११९७ अर्थात् १५ ऑगस्ट १२७५ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास, आळंदी येथील सिद्धबेटावर झाला, असे सर्वत्र मानले जाते. श्री माउलींचे आणि भगवान श्रीगोपालकृष्णांचे जन्माचे सगळे योग सारखे आहेत. दोघांची जन्मवेळ एक, जन्ममास एक, जन्मनक्षत्र एक आणि जन्मतिथीही एकच आहे.


प्रचलित मान्यतेनुसार १५ ऑगस्ट मानले जाते, पण संतांच्या अभंगांमधील उल्लेख पाहून एक संशोधक श्री.एकनाथ पाटील यांनी “बापरखुमादेविवरु” मासिकाच्या श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज, चरित्र, कार्य आणि तत्त्वज्ञान विशेषांकात लिहिलेल्या लेखानुसार ती तारीख २२ ऑगस्ट येते. २२ ऑगस्टच्या मध्यरात्री १२.३० च्या सुमारास ( म्हणजे उजाडता २३ ऑगस्ट ) सद्गुरु श्री माउलींचा जन्म झाला. आधुनिक संगणकीय पद्धतीने केलेल्या ज्योतिषशास्त्रीय गणितानुसार हीच तारीख योग्य आहे. त्यांनी त्या लेखात याबद्दल सविस्तर चर्चाही केलेली आहे.


आळंदीतील सिद्धबेटाच्या या पावन भूमीवर, महासिद्धांनाही बोध करणारे महायोगिराज, साक्षात् श्रीकृष्णचंद्र महाप्रभू जन्माला आले, हे किती औचित्यपूर्ण आहे ! सद्गुरु श्री माउलींचे सारे चरित्र आणि कार्य औरच आहे. म्हणूनच आज साडेसातशे वर्षे उलटली तरी त्या दिव्य चरित्राची मोहिनी किंचितही कमी झालेली नाही; उलट दिवसेंदिवस वाढतच आहे.
[  http://rohanupalekar.blogspot.in ]
श्रीसंत तुकाराम महाराज भगवान सद्गुरु श्री माउलींचा यथार्थ गौरव करताना म्हणतात,


जयाचिये द्वारीं सोन्याचा पिंपळ ।
अंगी ऐसें बळ रेडा बोले ॥१॥
करील तें काय नोहे महाराज ।
परि पाहे बीज शुद्ध अंगीं ॥२॥
जेणे हे घातली मुक्तीची गवांदी ।
मेळविली मांदी वैष्णवांची ॥३॥
तुका म्हणे तेथे सुखा काय उणे ।
राहें समाधाने चित्ताचिया ॥४॥


“ज्यांच्या द्वारी सुवर्णाचा पिंपळ शोभून दिसतो व ज्यांच्या अंगी रेड्याच्या मुखातून वेद वदविण्याचे जगावेगळे आणि अत्यंत विलक्षण सामर्थ्य आहे, त्या महायोगिराज सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराजांना जगात अशक्य असे काहीच नाही. शरण आलेल्या भक्ताच्या ठायी जर शुद्ध श्रद्धा व प्रेमभाव असेल, तर माउली त्याच्यासाठी काहीही करतात, त्याचे सर्व बाजूंनी कोटकल्याणच करतात.

अहो, त्यांनी तर वैष्णवांची मांदियाळी एकत्र करून, दुर्मिळ अशा मोक्षाचे मुक्तद्वार अन्नछत्रच घातलेले आहे. श्री तुकोबाराय म्हणतात की, त्यांच्या चरणीं सुखाला कसलेही उणे नाही, भरभरून सुख तेथे वाहात आहे. हा प्रपंच अनित्य असून सुखरहितही आहे, पण हे श्रीचरण मात्र शाश्वत सुखाने ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून त्याच श्रीचरणीं आता आपण समाधानाने कायमचे पडून राहू या. त्यातच आपले खरे हित आहे !”
लेखक – रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष – 8888904481

रोहन उपळेकर लिखित :- संत ज्ञानेश्वर महाराज विशेष चरित्र

संत ज्ञानेश्वर महाराज समग्र

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *