संत चोखामेळा म. चरित्र ३६

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

 संत चोखामेळा  भाग- ३६.

संत चोखामेळा चरित्र सर्व भाग पहा

चोखोबा कांगावा करत सोयरावर ओरडत म्हणाले,अग देव चोखाच्या घरी आला ही गोष्ट बडव्यांना कळेल आणि परत बक्षीस म्हणुन आसुडांचे फटके बसतील. त्यांच्या प्रत्येक शब्दातील मनो व्यथा प्रगट होत होती.ही गोष्ट षटकर्णी होणारच होती,कारण विष्णू गुरव तिथून जात असतांना ऐकले.बोलण्यातील तिव्रता पाहुन गुरवला राग आला आणि पुढे होऊन चोखोबाच्या मुस्काटात मारली  अरे!देवावर कशाला हात उगारलास? चोखोबाला वेड लागले असावे असे वाटुन तो निघुन गेला.चोखोबाने बघीतले तर देवही नाही.देव पोटभर जेवला नाही याचे त्याला अतोनात दुःख झाले.कित्येक दिवस त्यांनी सोयराशी अबोला धरला.

विष्णुगुरवने ही गोष्ट बंडा गुरवला सांगीतली.संध्याकाळी सायंआरती करण्यास विष्णु गुरव मंदिरात गेल्यावर, पंचारती करण्यासाठी हात पुढे केला तर, हाताची बोटे चिकटली असुन उजवा हात कडक झालेला.घाबरुन देवाची विनवणी करत देवाच्या पायावर डोक टेकवण्या साठी खाली वाकला तर,देवाच्या पिताबरावर चांगला मोठा दह्याचा डाग पडलेला दिसला.आपण तर देवाची स्वच्छ आंघोळ घालुन स्वच्छ पितांबर घातले होते,मग हा दह्याचा डाग?तेवढ्या त बंड्या गुरव आला.हा संचित होऊन बसलेला व हात लाकडासारखा झालेला दाखवला,पण त्याची मस्करी करुन त्याला विचारापासुन परावृत्त करण्याचा प्रयत्न केला.पण त्याला आठवले,जेव्हा आपण चोखोबाला मारायला गेलो,तर त्याच्या म्हणण्यानुसार देवाला लागले, म्हणजे खरच मी देवाला….विष्णु हबकला.देवाच्या पायाशी बसुन हुंदके देत म्हणाला देवा! तुझा खरा भक्त चोखोबा!मला माफ कर.मी त्याची माफी मागतो पण माझा हात पुर्ववत कर देवा! आणि काय आश्चर्य हात पुर्ववत झाला.

कार्तिक शुध्द दशमीला रात्रभर राबुन दीपमाळेच्या सर्व हातावर तेलवाती  टाकुन पणत्या ठेवुन झाल्या.रात्रीच्या तिसर्‍या प्रहरी शुचिर्भूत होऊन त्यांनी बनवलेल्या विठोबाच्या मूर्तीची मनोभावे पुजा व आभार मानुन विठ्ठलनामाचा जय घोष करीत सगळ्या पणत्या पेटवल्या. क्षणार्धात सारा आसमंत प्रकाशाने उजळुन निघाला.चंद्रभागेच्या पाण्यावर उठणार्‍या तरंगामध्ये पणत्यांची लक्षा वधी प्रतिबिंबे हिंदकळुन परावर्तित झाली दोन्ही काठ लख्ख उजळून निघाले. कार्तिक एकादशीनिमित्य अवघं पंढरपूर स्नानासाठी चंद्रभागेच्या काठावर जमलं होत.पुजारी विठ्ठलमंदिराची सजावट करीत होते.

आज विठ्ठलाच्या महापुजेसाठी यादवांचा सरदार येणार होता.यवनीराज्य असलं तरी या सरदाचे पंढरपूरला संरक्षण होते.असा सर्व गोंधळ चालु असतांना एकाएकी आकाश उजळुन निघाले.खरंतर सूर्य उगवायला बराच अवकाश होता.आश्चर्याने लोकांनी चंद्रभागेकडे बघीतले तर,चंद्रभागेच पाणी तर लखलखत होतच पण पलिकड च्या तीरावर अंगभर पणत्यांचं प्रकाश मंडल लेवुन लखलखणार्‍या दोन दीप माळा उभ्या दिसल्या.पुजा बांधण्याआधी च सावळीमूर्तीच्या चेहर्‍यावर विलक्षण हास्य विलसत होते.काय नव्हते त्या हास्यात?समाधान,विजयाचा कैफ, लाडक्या भक्ताबद्दलचा ओसंडुन वाहणारा अभिमान,संकल्प सिध्दीस गेल्याबद्दलचा आनंद आणि चिकाटीने पुर्ण केल्याबद्दलचे कौतुक..

क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.

संत चोखामेळा चरित्र सर्व भाग पहा

संत व दिव्य व्यक्तींचे प्रेरणादायी चरित्र

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *