संत एकनाथांचे सहस्त्र भोजन

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

बाळासाहेब हांडे संग्रहित सर्व साहित्य पहा
गुलकंद 29/01/2021
एकनाथांचे सहस्त्रभोजन

पैठणात एक वृद्ध स्त्री रहात होती. नवरा हयात असताना
त्या स्त्री ने सहस्त्रभोजनाचा संकल्प सोडला होता. परंतु काही कारणाने तो पूर्ण होऊ शकला नाही. तिच्या मनाला मोठी रुखरुख लागून राहिली होती. ती दररोज नाथांचे वाड्यात प्रवचन ऐकावयाला येत असे.
एक दिवस प्रवचनात नाथ बोलून गेले की एका विद्वान पंडीतास जेवू घातले तर सहस्त्र भोजनाचे पुण्य लाभते. ते वाक्य तिच्या लक्षात राहिले. आणि तिला तिच्या संकल्पाची आठवण झाली.


एके दिवशी नाथांचे प्रवचन संपल्यावर ती वृद्ध स्त्री नाथांच्या जवळ येऊन त्यांना नमस्कार करून म्हणाली, “आपण माझे घरी भोजनास यावे अशी विनंती करायला मी आले आहे, महाराज मी सहस्त्र भोजनाचा संकल्प केला होता, पण यजमान नाहीत त्यामुळे तो आता काही पूर्ण होईल असे मला वाटत नाही.’
नाथ म्हणाले आपण शुद्ध मनाने निर्हेतुक पणे संकल्प सोडला असेल तर त्याची काळजी श्रीहरिला ! मी येईन बरे ! आपल्या मदतीसाठी मी माझ्या मुलास – हरिपंडीतास पाठवून देतो.
त्या वृद्ध स्त्रीने नाथांना आमंत्रण दिले कारण नाथ विद्वान होते, पंडीत होते, ब्रह्मवेत्ते होते.


नाथांनी भोजनाचे आमंत्रण स्वीकारले आणि रात्री स्वतःच्या मुलास- हरिपंडीतास सांगितले की त्या बाई वृद्ध आहेत, तेंव्हा तूच त्यांच्या घरी जाऊन स्वयंपाकाची सिद्धता कर.
हरिपंडीत काशीस जाऊन शिकून पंडीत होऊन परतला होता. पण काही कारणांनी तो वडीलांवर नाराज होता. त्यातले एक कारण म्हणजे नाथ वाड्यात जे प्रवचन करीत असत ते प्राकृत भाषेत करीत असत कारण बहुजनास तीच भाषा समजते. प्राकृत भाषेत प्रवचन करायला हरिपंडीचा विरोध होता.
दुसरे कारण म्हणजे नाथ कोणताही भेदाभेद मानत नव्हते. हा ब्राह्मण, हा हरिजन, तो अस्पृश्य असं मानत नव्हते. हरीजनांच्या, अस्पृश्यांच्या घरी भोजनास जात होते. नाथांचे एकच सांगणे होते, आपण सर्व एकाच परमेश्वराची लेकरं आहोत. हा उच्च तो हीन हे ठरविण्याचा अधिकार आपल्याला नाही.


हरिपंडीतास हे मान्य नाही, हे नाथ जाणून होते. म्हणून त्यांनी हरिपंडीताचा अभिमान दूर करण्याचे ठरविले.
दुसरे दिवशी पहाटेस लवकर उठून हरिपंडीत त्या वृद्ध स्त्रीच्या घरी स्वयंपाक करण्यास गेला.
मध्यानीस स्वयंपाकाची सिद्धता झाल्यावर देवाला नैवेद्य दाखवून नाथांना बोलावण्यास घरी गेला.
त्याचे बरोबर नाथ त्या वृद्ध स्त्री च्या घरी आले. त्या स्त्रीने नाथांना बसावयास पाट मांडला. हरिपंडिताने पत्रावळ मांडली. त्या वृद्ध स्त्री ने आग्रह करून नाथांना जेवावयास वाढले.


जेवण झाल्यावर नाथांनी हरिपंडितास सांगितले की,
आता पत्रावळ उचलून बाहेर नेऊन ठेव. हरिपंडिताने नाथांची पत्रावळ बाहेर नेऊन ठेवली आणि परत घरात आला आणि पाहिले तर नाथ जेवले तिथे पुन्हा दुसरी पत्रावळ दिसली. जवळ जाऊन पाहिले तर नुकतेच कोणीतरी जेऊन गेले आहे. हरिपंडितास आश्चर्य वाटले. आताच तर आपण पत्रावळ उचलून बाहेर नेऊन ठेवली होती. हरिपंडिताने ती दुसरी ही पत्रावळ उचलून बाहेर नेऊन ठेवली आणि घरात आला तर तिसरी पत्रावळ दिसली.ती ही बाहेर नेऊन ठवली तर चौथी पत्रावळ हजर.


हरिपंडीताने अशा हजार पत्रावळी उचलुन बाहेर ठेवल्या. नाथ विस्मयचकित होऊन पहात राहिले. त्या वृद्ध स्त्रीस ही आश्चर्य वाटले. जेवायला तर नाथ महाराज एकटेच बसले होते. पण भोजन घेऊन गेलेल्यांच्या पत्रावळी एक हजार कशा झाल्या ? त्या वृद्ध स्त्रीस सहस्त्र भोजन घातल्याचा आनंद झाला. हरिपंडीतास वडीलांचा अधिकार कळून आला. क्षणात नतमस्तक होउन त्याने वडिलांचे पाय धरले आणि म्हणाला,-“तात, मी चुकलो. आपला अधिकार खूप मोठा आहे हे आज समजले. काशीस जाऊन कोणी मोठा होत नसतो.”


नाथांनी खाली वाकून मुलाला पोटाशी धरले.
हरपंडीताचा गर्व हरण झाला. वृथा अभिमान दूर झाला. नाथांच्या डोळ्यात पाणी आले. गहिवरून नाथ
म्हणाले, “श्रीहरी, आपण सहस्त्र वेळा येऊन भोजन घेतलेत आणि मज पामरास
एकदाही दर्शन दिले नाहीत,
माझे कडून काही प्रमाद घडला का ?”


द्वारकेची मूर्ती एकनाथा घरी
पाणी वाहे कावडीने ।
श्रीखंड्या चंदन उगाळुनी । वस्त्र गंगातीरी धुतसे ।
पांडुरंग हरी । वासुदेव हरी

प्रफुल्ल यशवंत अत्रे
29 जानेवारी 2021

बाळासाहेब हांडे संग्रहित सर्व साहित्य पहा

संत एकनाथ महाराज संपूर्ण

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *