भाग 1 आळंदी वल्लभ संत ज्ञानेश्वर महाराज

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

वन्दे पूर्णब्रह्मपरानन्दमीशं आलन्दिवल्लभम् – प्रथम पुष्प
प्रथम पुष्प
आजपासून आपले परमाराध्य भगवान सद्गुरु श्री ज्ञानेश्वर माउली व भगवान श्रीकृष्णचंद्र प्रभू यांच्या जन्मोत्सवास सुरुवात होत आहे. या पावन सप्ताह-पर्वकालामध्ये आपण सर्वजण मिळून दररोज सद्गुरु श्री माउलींचे गुणवर्णन करून हा सप्ताह अानंदाने साजरा करू या.


सद्गुरु श्री माउली हे साक्षात् भगवान श्रीकृष्णांचे परिपूर्णतम अवतार होत ! माउलींसारखे माउलीच !! अनुपमेय, अद्वितीय, अद्भुत, अलौकिक आणि अपरंपार करुणामय !!
भगवान सद्गुरु श्री ज्ञानेश्वर माउलींचा जन्म आणि भगवान श्रीकृष्णांचा जन्म हा अचूक सारख्याच योगांवर झालेला आहे. फरक एवढाच की, श्रीभगवंतांचा जन्म बुधवारी झाला आणि श्री माउलींचा जन्म गुरुवारी. बरोबरच आहे ना, त्यांना अवघ्या जगाचे गुरुपद भूषवायचे होते म्हणूनच तर ते गुरुवारी प्रकट झाले !


सद्गुरु श्री माउलींचे पूर्ण कृपांकित, थोर सत्पुरुष श्रीसंत मामासाहेब देशपांडे महाराज माउलींना अतीव प्रेमादराने “करुणाब्रह्म” म्हणत असत. खरोखरीच त्यांच्या करुणेला ना अंत ना पार !
आपले भाग्य थोर म्हणून आपल्याला त्यांच्या नामाची, त्यांचेच स्वरूप असणा-या त्यांच्या चिन्मय वाङ्मयाची आणि त्यांच्या सेवेची गोडी त्यांच्याच कृपेने लागलेली आहे. आणि त्याच प्रेमादराने आपण भगवान सद्गुरु श्री माउलींची ही नाम-गुण-कीर्तनरूप सेवा आरंभिलेली आहे. ही सेवा ते नक्कीच गोड मानून घेतील व आपल्याला अमोघ कृपामृताचे दान करतील अशा दृढ विश्वासाने त्यांच्याच नामात आपण मग्न होऊया !

महाराज ज्ञानेश्वरमाउली । महाराज ज्ञानेश्वरमाउली ।
[ http://rohanupalekar.blogspot.in ]
सद्गुरु श्री माउलींनी संजीवन समाधी घेतल्यानंतर श्री नामदेवरायांना त्यांची तीव्रतेने आठवण येऊ लागली. म्हणून त्यांनी भगवान पंढरीनाथांची कळवळून प्रार्थना केली की, माझ्या जीवीचे जीवन श्री ज्ञानदेवांची पुन्हा भेट घडवा. त्यावर देव म्हणतात कसे,

देव म्हणे नाम्या पाहे ।
ज्ञानदेव मीच आहे ॥१॥
तो आणि मी नाहीं दुजा ।
ज्ञानदेव आत्मा माझा ॥२॥
माझ्या ठायी ठेवी हेत ।
सोड खंत खंडी द्वैत ॥१२२६.३॥

“अरे नाम्या, मीच तर ज्ञानदेव होऊन आलो होतो ना, त्यात आणि माझ्यात काहीच भेद नाही. तोच माझा आत्मा आहे. तेव्हा आता ज्ञानदेव दिसत नाही ही मनातली खंत काढून टाक आणि आमच्यामध्ये द्वैत न मानता माझ्याच ठायी आता ज्ञानदेवाला पाहा !”
देवांच्या या बोलण्यावर नामदेवराय त्यांना निक्षून सांगतात,
नामदेव म्हणे देवा ।
ब्रह्मज्ञान पोटी ठेवा ॥

“देवा, तुमचे ब्रह्मज्ञान तुम्हांलाच लखलाभ. आम्हांला संतभेटीतच जास्त गोडी आहे. काहीही करा पण आता ज्ञानदेव डोळा दाखवा, बास !”

ज्ञानदेव माझें सौख्यसरोवर ।
त्यांत जलचर स्वस्थ होतों ॥

माझा ज्ञानोबा सौख्याचे साक्षात् सरोवर आहे; ज्यात माझ्यासारखा दमला-भागला जलचर स्वस्थ होतो, अंतर्बाह्य सुखरूप होतो. देवा, त्यांची प्रेम-आवडी तुम्हांला काय सांगू ? ज्ञानदेवांचे दर्शन झाल्याशिवाय मी आता पुन्हा पंढरीला येणारच नाही, काय ते तुम्ही पाहा, पण मला आता माझा ज्ञानदेव डोळा दाखवाच !

लाडक्या नामयाची ही तळमळ पाहून देवही गहिवरले व त्यांनी गरुडाला पाठवून श्री ज्ञानदेवांना बोलावून घेतले. नामदेवांनी त्यांचे चरण घट्ट धरून त्यांवर प्रेमाश्रूंचा अभिषेक केला आणि त्यांचे ते दिव्य रूप हृदयगाभा-यात कायमचे साठवून ठेवले.

या हृद्य प्रसंगाचे वर्णन करणारे २४ अभंग श्री नामदेवरायांच्या गाथ्यात आहेत. ते अभंग नुसते वाचतानाही आपले हृदय प्रेमावेगाने भरून येते व तो आवेग कधी डोळ्यांमधून वाहू लागतो तेच कळत नाही. त्या प्रेमाश्रूंचे मोल अद्भुतच असते, कारण त्यांना तर माउलींच्या करुणाकृपेची अनोखी ओल असते !


लेखक – रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष – 8888904481

रोहन उपळेकर लिखित :- संत ज्ञानेश्वर महाराज विशेष चरित्र

संत ज्ञानेश्वर महाराज समग्र

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *