संत नामदेव महाराज चरित्र प्रस्तावना भाग १

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

*🌼॥#संत_शिरोमणी॥ ॥#श्री_नामदेव_महाराज_चरित्र ॥🌼🚩*

*#प्रस्तावना*

संतकृपा झाली।इमारत फळा आली||१||
ज्ञानदेवे रचिला पाया।उभारीले देवालया||२||
नामा तयाचा किंकर|तेणे केला हा विस्तार||२||
जनार्दन एकनाथ|खांब दिला भागवत||४||
तुका झालासे कळस|भजन करा सावकाश||५||
बहिणी म्हणे फडकती ध्वजा। निरूपण केले वोजा||६||


     या अभंगात वर्णन केल्या प्रमाणे ज्या भागवतधर्मरूपी मंदिराचा पाया संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी. घातला व जगद्गुरू श्री तुकाराम महाराज हे कळसस्थानी शोभतात त्या विश्वबंधुत्व व राष्ट्रीय ऐक्याचा पुरस्कारका मानवतावादी भागवतधर्माच्या प्रचार व प्रसाराचे बहुमोल कार्य ज्यांनी केले ते म्हणजे श्री संत नामदेव महाराज.  त्यांचे हे चरित्र वाचकांचे हाती देतांना अतिशय आनंद होत आहे.



श्री नामदेव महाराजांचा जन्म कार्तिक शु.-११ शके ११९२ (दि.२६/१०/१२७०) रोजी पंढरपूरात झाला. प्रत्यक्ष पांडूरंग परमात्मा त्यांच्या हातचा नैवेद्य सेवन करीत. याचा पुढे त्यांना काहीसा अहंकार झाला. म्हणून प्रत्यक्ष पांडूरंगाने त्यांना श्रीक्षेत्र आळंदी देवाची येथिल श्री संत ज्ञानेश्वर महाराज आदि भावंडांची जन्मभूमी, लिलाभूमी, वास्तव्यभूमी असणाऱ्या सिध्दबेटात होणाऱ्या संत संमेलनासाठी पाठवले. मुक्ताईंचे आज्ञेनुसार गोरोबा काकांनी संतांची परीक्षा करुन यांनी नामदेवांना कच्चे ठरवले. देवांनी औंढ्यास पाठविले. तेथे विसोबा खेचर यांनी नामदेवांना सर्वात्मकपणाचे ज्ञान दिले.

    ज्ञानदेवांच्या आवाहनानुसार निवृत्तीनाथ, सोपानदेव इत्यादी संतमंडळीसोबत नामदेव महाराज तीर्थयात्रेस गेले. ते त्यांचे विस्तृत वर्णण त्यांनी ‘तीर्थावळीचे अभंग’ या प्रकरणात केले आहे. तीर्थयात्रेहून आल्यानंतर श्री ज्ञानेश्वर महाराजांनी कार्तिक कृ.१३ शके १२१५ ला श्री क्षेत्र आळंदीला संजीवन समाधी घेतली, त्या प्रसंगाचे अत्यंत भावस्पर्शी वर्णण नामदेवांनी केले आहे. म्हणूण नामदेवराय हेच खऱ्या अर्थाने आधसंतचरित्रकार ठरतात.



     ‘नाचू कीर्तनाचे रंगी / ज्ञानदीप लाऊ जगी।।’ या प्रमाणे नामदेव महाराजांनी कीर्तनातून ज्ञानदानाचे कार्य करून विश्वोध्दार केला. ज्ञानदेवांच्या समाधीनंतर नामदेव महाराज गुजरातेत व्दारकेस गेले, तेथून पुढे राजस्थानातून उत्तरप्रदेशातून मथुरा, प्रयाग, काशीहून पंजाबात पोहोचले. तेथे अमृतसर जिल्ह्यातील भूतबिंड येथे बोहोरदास शिष्य भेटला. पुढे ते ‘घुमान’ येथे गेले. तेथे बराच काळ वास्तव्य केले व सर्वत्र फिरुन भक्तीमार्गाचा प्रचार प्रसार केला.

     पुढे वयाच्या ८० व्या वर्षी आषाढ वद्य १३ श. १२७२ (इ.स१३५०) ला श्री क्षेत्र पंढरपूर येथे ‘पंढरीचा वास चंद्रभागे स्नान | आणिक दर्शन विठोबाचे ॥ हेचि घडो मज जन्मजन्मांतरी । मागणे श्रीहरि नाही दुजे ||’ या अभंगावर अंतिम कीर्तन करुन महाव्दारात समाधिस्त झाले.



      अशा या संत नामदेवरायांची केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर पंजाब, राजस्थान, गुजरात इत्यादी प्रदेशात मंदिरे असून शिख समाजातही त्यांना अत्यंत आदराचे स्थान आहे. ‘गुरू ग्रंथसाहेब’ या पवित्र ग्रंथात त्यांची ६१ हिंदी पदे समाविष्ट आहेत. अशा प्रकारे नामदेव महाराज हे महाराष्ट्र व पंजाबला जोडणारा सांस्कृतिक दुवा ठरले आहेत.


      अशा या महान संताचे चरित्र सुलभ, सोप्या, गद्य मराठीत सर्वाना उपलब्ध व्हावे अशी मित्रमंडळीत चर्चा सुरु असतांना त्यांचे प्रमाणभूत चरित्र कुठे उपलब्ध असेल याबाबत चर्चा झाली. चौकशीअंती कळले की ह.भ.प.वे.शा.सं.वारकरी रत्न, श्री संत वासुदेव महाराज यांनी श्री नामदेव महाराजांचे चरित्र लिहीले आहे. श्री संत वासुदेव महाराज हे वारकरी सांप्रदायात थोर संत होऊन गेले.त्यांनी ज्ञानेश्वरदास या नावाने श्री ज्ञानेश्वर महाराज, जगदगुरु श्री तुकाराम महाराज इत्यादी संतांची चरित्रे लिहून बहूमोल कार्य केले. त्यांनी लिहीलेल्या ३७ ग्रंथापैकीच एक म्हणजे श्री नामदेव महाराज चरित्र. संतचरित्राच्या दृष्टीने वारकरी सांप्रदायात यांनी लिहीलेले ग्रंथ प्रमाणभूत मानली जातात, म्हणून अशा या श्री संत वासुदेव महाराजांनी लिहीलेल्या २१ अध्यायी ओवीबध्द पोथींचे (वांथाचे) सुलभ गद्य रुपांतर करण्याचे निश्चित झाले.



      योगायोगाने त्याचवेळी श्री संत वासुदेव महाराज कृत ‘श्री गजानन महाराजांचे संपूर्ण चरित्र’ या २१ अध्यायी ओवीबद्ध पोथीचा सौ. निवेदिता राजेश सावरकर उर्फ सौ.इंद्रायणी ज्ञानेशप्रसाद पाटील यांनी केलेला सुलभ, संक्षिप्त गद्यानुवाद पाहण्यात आला म्हणून त्यांचेकडूनच हाही अनुवाद करून घ्यावा असे ठरले. त्यानुसार प्रा.डॉ.गोपाल झामरे व प्रा.डॉ.सुनील पांडे यांचेमार्फत त्यांचेशी संपर्क केला असता त्यांनी अत्यानंदाने हे संतकार्य करण्याचे मान्य करून अल्पावधीतच हा ग्रंथ तयार करून दिला. याबद्दल त्यांचा आभारी आहे. ‘अर्धक्षण घडता संताची संगती । तेणे होय शांती महापापा ।।’ या उक्तीप्रमाणे अशा काही लोकांच्या संपर्कामुळे मला  या मोठ्या कार्यामध्ये एक अल्पसा वाटा उचलून सहभागी होता आलं असा मी भाग्यवंत. माझी आई श्रीमती सुमनताई व वडील वै.श्री.सखाराम बाभुळकर यांचीच ही पुण्याई. सातत्याने प्रोत्साहन देणारा मित्रपरिवार तसेच सौ. कविता हूरपडे, सौ. ज्योती तुपकरी, सौ. सुनिता चिंचोले, श्री सचिन  शेगोकार, श्री प्रदिप उकळकर या गणगोताची सोबत त्यामुळे हे शक्य झाले.



       ग्रंथाचे आकर्षक मुखपृष्ठ तयार करून दिल्याबद्दल श्री नवनीत गजानन जवंजाळ यांचे आभार. ग्रंथ प्रकाशनासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मनापासून आभार.


‘संत संगतीचे काय सांगू सुख ।
आपणा पारिखें नाहीं तया||१||
साधू थोर जाणा साधू थोर जाणा।
साधू थोर जाणा कलियुीं ||२||
इहलोकीं तोचि सर्वाभूती सम |
शरीराचा भ्रम नेणे कदा ||३||
नामा म्हणे गाय दूध एक सरे ।
साधू निरंतर वर्ते तैसा ||४||’


‘प्रा.डॉ.श्री अनिल सखाराम बाभुळकर,
#क्रमश…..
|#मूळ_पद्यलेखक
श्री संत वासुदेवजी महाराज (ज्ञानेश्वरदास)
#संक्षिप्त_गद्यानुवाद
सौ. इंद्रायणी ज्ञानेशप्रसाद पाटील

संत नामदेव संपूर्ण चरित्र

संत नामदेव संपूर्ण, अभंग, चरित्र, समाधी

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

No comments yet

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *