संत चोखामेळा म. चरित्र ४३

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

 संत चोखामेळा  भाग- ४३.

संत चोखामेळा चरित्र सर्व भाग पहा

नामदेवा!चोखोबांचा मृत्यु जरी मंगळवेढ्यात झाला असला तरी,त्यांची खरी जागा पंढरपुरातच आहे.तेव्हा तूं तिथे जाऊन त्याचे पार्थिव शरीर जरी नाही मिळाले तरी,अस्थि गोळा करुन घेऊन ये.तुझ्या सांगण्यावरुन त्याने “पंढरपूर हीच आपली कर्मभूमी” मानली. ती त्यांची धर्मभूमी व्हावी.माझ्या दर्शनार्थ चोखोबा तासनतास महाद्वारी तिष्ठत रहायचे.त्याच महाद्वाराच्या पायरीशी त्यांच्या अस्थिला स्थान मिळावं.जीथं त्यांच्या चरणमुद्रा उमटल्या तीथं चिरंतर नाममुद्रा राहाव्या.आणि मृत्योपतरांत कां होईना माझ्याजवळ स्थान मिळावे.पण देवा! तिथे ६०-७० मजुर गाडले गेलेले असतांना,नेमक्या चोखोबांच्या अस्थी कशा ओळखायच्या?नामया!चोखोबाची भक्ती पराकोटीची होती.त्यांच्या श्वास उश्वासात,पंचेद्रियांत,रक्तात,विचार, उच्चार,देहाच्या अनुरेणुतुन विठ्ठल आणि फक्त विठ्ठल हे नाम त्यांच्या अस्थीमधे असणारच नव्हे आहेच.तीथे अस्थींचा कितीही मोठा ढिग असला तरी,नेमक्या अस्थी ओळखणे कठीण नाही.ढीगातील प्रत्येक अस्थी उचलून कानाला लाव.ज्या अस्थीमधुन विठ्ठल विठ्ठल नाद ऐकु येईल नेमक्या तेवढ्याच अस्थी इथे घेऊन ये. जा…नामया..जा त्या अस्थी तुझ्या प्रतिक्षेत आणि मी अस्थीच्या…

भावभिजल्या अवस्थेत विठ्ठलाच्या चरणावर मस्तक ठेवुन तातडीने जवळच राहणारा पुजारी श्रीधर पंतांना सारा वृतांत सांगुन व कर्ममेळाला तातडीने बोलवुन घेण्यास सांगीतले.वार्ता वार्‍यासारखी पंढरपूरांत पसरली. कर्ममेळा,श्रीधरपंत व इतर दोघा चोघांना घेऊन नामदेवांनी मंगळवेढ्याची वाट धरली.दिवसाच्या दुसर्‍या प्रहरी कुठेही न थांबतां सारे मंगळवेढ्यात पोहोचले. तिथली परिस्थिती अतिशय भिषण होती.नुसता हाहाःकार माजला होता. आक्रोश,किंकाळ्यांनी आकाश छेदत होते.मृत्युमुखी पडलेल्या त्या जीवांना अत्यंत यातनामय मृत्यु आला होता.शरीरे छिन्नभिन्न होऊन रक्तामासाचा नुसता चिखल झाला होता.दगडांच्या आघाताने बहुतेकांच्या शरीरावरचे मांस अलग होऊन अस्थी उघड्या पडल्या होत्या.ही दुर्देवी घटना घडुन चार दिवस उलटले होते.सरदारांच्या सैनिकांनी मातीच्या ढीगार्‍यातुन शोधुन शोधुन मिळालेल्या अस्थी दूर मोकळ्या जागेत विखरुन ठेवल्या होत्या.‌ नामदेवांनी आपल्या सोबत आणलेल्या लोकांना चोखोबांच्या अस्थी कश्या ओळखायच्या हे सांगीतले होते. वडीलांच्या आकस्मिक मृत्युने धक्का बसलेला कर्ममेळा कांहीसा सावरल्यावर शून्य मनाने तो व नामदेवादी लोकं अश्रू भरल्या नयनाने चोखोबाच्या अस्थी शोधु लागले.बर्‍याच अस्थी शोधुन झाल्या,पण  नामदेव निराश व्हायला लागले,तोच एक अस्थी कानाला लावल्याबरोबर चमकले.चोखोबा आपल्या शेजारी बसुन विठ्ठल

‌  विठ्ठल विठ्ठल म्हणत असल्याचा भास झाला.खात्री पटावी म्हणुन श्रीधरपंताजवळ ती अस्थी दिली तर त्यांनाही व नंतर कर्ममेळालाही नाद ऐकु आला.आपल्या वडीलांचा आवाज त्याने ओळखला.आणि मग मात्र विठ्ठल विठ्ठल या मंत्राने भारलेल्या अस्थी भराभर सांपडायला लागल्या.अंथरलेल्या उपरण्यावर विठ्ठल नामाच्या अस्थींचा ढीग जमा झाला.गाठोडे बांधुन सर्वजण पंढरपूरच्या वाटेला लागले.काम संपल्या वर मात्र उसणे आणलेले नामदेवांचे अवसान गळले. वैशाखाच्या उन्हात भूक तहानेने जीव कासावीस झाला.शरीराने अहसहकार पुकारला.शेवटी एका झाडाखाली विश्रांतीसाठी थोडावेळ थांबले.थोडे बरे वाटल्यावर नामदेवांनी अस्थीची महायात्रा गावाबाहेरच्या अस्पृश्य वस्तीतुन मिरवत मंदिराच्या महाद्वारा पर्यंत नेण्याची व्यवस्था करण्याचा आदेश श्रीधरपंतांना दिला.विटेवर उभा असलेला पांडुरंग प्रतिक्षा करीत होता चोखोबांच्या अस्थी घेऊन येणार्‍या नामदेवांची!!

कांही काळ विश्रांती व घासभर भाकरतुकडा खाल्ल्यावर नामदेवांना तरतरी आली.चोखोबांच्या अस्थी घेऊन कधी पंढरपूरांत पोहचतो,पांडुरंग किती आतुरतेने वाट बघत असेल,अस्थी डोळा भर पाहण्यास किती उत्सुक असेल ही कल्पना असल्यामुळे झटक्यात उठुन चोखोबांच्या आठवणींचे अनंत वर्तुळे,पहिल्या भेटीत गोंधळलेले चोखोबा ते अगदी परवा परवापर्यंत तृप्त कृतार्थ,अनंत रुपे,प्रामाणिकता,प्रांजलता उत्कट भक्ती अशा अनेक आठवणींचे गाठोडे घेऊन पंढरपूरी पोहोचले. पुढे गेलेल्या मंडळींनी महायात्रेची चोख व्यवस्था केली होती. चोखोबांच्या दुःखद मृत्युची बातमी पंढरपूरातील घरां घरांत पोहचली असल्यामुळे,अस्थीचे दर्शन  घेण्यास लोकांनी एकच गर्दी केली अस्थी घेऊन नामदेव दृष्टीक्षेपात आलेले दिसतांच विठ्ठलाचा गजर सुरु झाला. कर्ममेळाने आणलेल्या कलशात अस्थी ओतुन उपरण्याने कलशाचे तोंड बांधले.

क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.

संत चोखामेळा चरित्र सर्व भाग पहा

संत व दिव्य व्यक्तींचे प्रेरणादायी चरित्र

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *