संत चोखामेळा म. चरित्र १४

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

संत चोखामेळा  भाग  –  १४.

संत चोखामेळा चरित्र सर्व भाग पहा

चोखोबा संकोचुन एकटेच एका बाजुला उभे असलेले नामदेवांना दिसले. त्यांनी चोखोबांना हाताशी धरुन ज्ञानदेवां जवळ आणुन त्यांची माहिती सांगीतली. चोखोबांना त्यांच्याजवळ जाण्याचे धाडस होत नव्हते व लांब राहणेही जमत नव्हते.जीव गुदमरल्याने हुंदके देऊन लहान मुलासारखे रडुं लागलेले पाहुन सार्‍यांनाच वाईट वाटले.नामदेवांनी त्यांचा हात धरुन ज्ञानेश्वरांजवळ आणल्याबरोबर चोखोबा ज्ञानोबांच्या पायाशी कोसळले.ज्ञानेश्वरांना त्यांची अवस्था बघवेना,चोखोबाला खांद्याला धरुन उठवले व अत्यंत आपुलकीने मिठीत घेतले.अंगात दाह होतांना शीतल चंदनाचा शिडकावा व्हावा तसं त्यांना वाटले.ज्ञानेश्वर कितीतरी वेळ मूकपणे अगदी आवेग संपेपर्यंत त्यांच्या पाठीवर हात फिरवत राहिले.कांही वेळाने चोखा शांत,श्रांत,क्लांत झाले.ज्ञानेश्वर म्हणाले, स्वतःला कमी लेखुन वारकर्‍यांची प्रतिष्ठा कमी करु नका चोखोबा!भागवतधर्म सगळ्यात श्रेष्ठ धर्म आहे कारण तो भक्ती आणि मानवता या दोन पायावर अधिष्ठित आहे आणि या दोन अधिष्ठांना कोणत्याही जाती धर्मातच काय पण जगात कोठेही आव्हान नाही.तेव्हा स्वतः ला कमी लेखायला लावणारी जाती धर्माची,स्पृश्य-अस्पृश्यची ही जळमटं कोळीष्टकं मनातुन काढुन टाका.पसायदा नांत आम्ही  हेच सांगीतलं आहे.

“वर्षत सकल मंडळी
ईश्वर निष्ठांची मांदियाळी।
अनवरत भूमंडळी।भेटतू भूता।।”

चोखोबा! निदान संतसमागमी असतांना,आपण बहिष्कृत,अस्पृश्य आहोत हे विसरुन जा.आपण क्षणांत सारा समाज बदलू शकत नाही पण आपल्यापुरतं तरी ईश्वरभक्तीत जातपात धर्म आणु नये.समाज म्हणजे तरी काय? समंजस माणसांचा जमाव!समविचारांची अनेक समंजस माणसं एकत्रीत आली की,जातीभेद, स्पृश्य-अस्पृश्यतेपासुन खूप दूर असलेला इश्वरभक्तीचा समाज बनेल आणि आपल्याला असाच भागवत धर्म मानणारा समाज बनवायचा आहे. ज्ञानेश्वरांचा शब्द न् शब्द तिथला प्रत्येक जणं कानांत साठवित,ह्रदयाच्या कुपीत जपून ठेवत होता.चोखोबा त्या वातावरणांत रंगुन गेले त्यांच्यातील एक झाले.

आषाढी एकादशीला सर्व संतासह महाद्वारातुन विठ्ठलाचे दर्शन घेतले.संध्या काळी रसाळ वाणीत अनेक कथा उदाहरणे देऊन नामदेवांचे किर्तन झाले. किर्तन संपले आणि धो धो पावसाला सुरुवात झाली.पण महाद्वारी बसलेल्या चोखोबांना भान नव्हते,जणूं समाधीच लागली होती.नरहरी सोनारांनी त्यांचा हात धरुन जवळपास ओढतच आंत आणले.दुसर्‍या दिवशी या जिव्हाळ्या च्या गोतावळ्यांतुन,वातावरणातुन घरी परतायचे म्हणुन चोखांना वाईट वाटत होते.त्याचबरोबर इथली सारी हकिकत आईला,सोयराला सांगायला उत्सुकही होते.नामदेव जवळ येऊन म्हणाले, ज्ञानदेवादी भावंडे पहाटेच पुढच्या प्रवासाला निघुन गेले.त्यांनी संदेश दिला की, सगळ्यांनी आपापल्या कुवतीप्रमाणे भागवतधर्म वाढवायचा आहे,तुमच्या साठी विशेष सांगीतले आहे,”जन्म जरी परमेश्वराधिन असला तरी कर्म माणसा च्या हाती आहेत.मिळालेला जन्म सत्कारणी लागला.बोलणे संपले आणि विठुरायाचा गजर सुरु झाला.

चोखोबांना निरोप देतांना नामदेव म्हणाले,मनांतील भावना कोंडुन न ठेवता अभंग रचना करुन बाहेर येऊ देत. पंढरपूर हीच तुमची कर्मभूमी आहे एवढं लक्षांत असु द्यात.चोखोबांनी त्यांना नमस्कार करुन पाठ फिरवुन झपाझप चालु लागले.मंगळवेढ्याच्या वाटेवर चालतांना आईला व सोयराला काय काय सांगायचे ते मनसुबे मनात बांधत होते, निरोप घेतेवेळी नामदेवांनी उच्चारलेले शब्द राहुन राहुन कानात घुमत होते. चोखोबा!पंढरपूर हीच तुमची कर्मभूमी! माझी कर्मभूमी?म्हणजे नक्की काय? त्यांना नेमकं काय सांगायचे,सुचवायचे होते?

म्हणजे आतां मी काय करायच? मनाच्या कोर्‍या पाटीवर “वारकरी”अक्षरं लिहुन भागवत धर्माचा नुकताच पुरस्कार केलेल्या चोखोबाच्या मनात नामदेवांच्या शेवटच्या वाक्यानं पुन्हा प्रश्नाचं वादळ उभं राहिलं. माझी कर्मभूमी पढरपूर तर मंगळवेढ्याला नीट बसलेली घडी परत विस्कटावी कां?घरचे तयार होतील का? नामदेवांनी त्यांच्या डोक्यात बारीकशी अळी सोडल्याने त्या अळीचा अजगर होऊन त्यांची विचारशक्तीच गिळंंकृत करुं पाहत होता.पायाखालची वाट सरावाची असल्यामुळे विचाराच्या तंद्रीत अचुक मंगळवेढ्यात घरी येऊन पोहचले. निवांत झाल्यावर,सुदामा,सावित्री, निर्मळा,सोयरा पंढरपूरचे अनुभव ऐकायला उत्सुकतेने चोखोबाभोवती बसले आणि त्यांनी बांध फुटल्यागत धबधब्यासारखे,उत्सफुर्त सुचलेली अभंग रचना..सगळं सगळं सांगत होते.

क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.

संत चोखामेळा चरित्र सर्व भाग पहा

संत व दिव्य व्यक्तींचे प्रेरणादायी चरित्र

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *