सार्थ अमृतानुभव अध्याय १ ला, ओवी ५६ ते ६४

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

विवेचन
श्री प्रमोदजी कुलकर्णी औरंगाबाद
7588811378

अमृतानुभव – प्रस्तावना
श्री श्री गुरवे नम:
अमृतानुभव अध्याय पहिला
ओवी ५६ ते ६४

चांदाचिया दोंदावरी । होत चांदणियाची विखुरी। काय उणे दिप्तीवरी । गिवसो पा दिपु ।। ओ 56

अर्थ — चंद्रापासून निघालेले चांदणे त्याच्या पोटावर पसरलेले असते . दिव्यापासून निघालेल्या प्रकाशानेच दिवा दिसतो पण त्या प्रकाशात काही कमतरता होत नाही.

शब्दार्थ दोंदावरी = पोटावर, दीप्ती = प्रकाश

विवेचन — येथे माऊलींची काव्य कल्पना दिसून येते. नभांगणात चंद्राच्या अंगावर जणू चांदणे पसरले आहे. चंद्र प्रकाशात चांदणे आपणांस दिसते. चंद्र व चंद्रप्रकाश यांचे अतूट नातं आहे. दिवा लावल्यावर त्याचा प्रकाश सर्वत्र पसरतो. त्या प्रकाशात आपणांस दिवा दिसू शकतो. दिवा लावलेला नसेल तर आपणांस दिवा सुद्धा दिसत नाही. दिवा लावल्याशिवाय उजेड नाही तो पर्यंत आपण दिवा पाहू शकत नाही पण त्यामुळे दिव्याचे महत्त्व कमी होत नाही. कारण दिवा नसेल तर काय पेटवणार ? व कश्याचा प्रकाश पडणार ? प्रकाश दिव्यात सामावलेला आहे. दिवा पेटला की त्याचे अस्तित्व लक्षांत येते .

आपल्याही देह रुपी दिव्यात चैतन्य वसले आहे. श्रीगुरुकृपेने ते जागृत होते, प्रज्वलित होते. त्या उजेडात जगाचे ज्ञान दिसू लागते. ते तेज स्वतःला तसेच संपुर्ण जगाला ज्ञानमय प्रकाश देते. पहा निवृत्तीनाथ महाराजांनी पेटवलेल्या श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या चैतन्य दिव्याच्या उजेडात त्यांना गीतेचा भावार्थ उमगला. त्या ज्ञानेश्वरीच्या प्रकाशात त्यांचे जीवन तर उजळून निघालेच पण आज शेकडो वर्षे झाली पण एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे हजारो जीवांना मार्गदर्शन करीत आहे. दिवा आणि दिव्याचा प्रकाश यांच्यासारखे आपल्यात देह व चैतन्य यांचा संबंध आहे. त्याचे वर्म जाणून घेणे हेच आत्मज्ञान आहे. चैतन्याची ही अनुभूती येणे गुरुकृपा आहे. असा अनुभव सर्वांना यावा यासाठी माऊलींचा हा ग्रंथ मार्गदर्शन करतो.

मोतीयाची किळ । होय मोतीयापरी पांगुळ । आगळे निर्मळ । रूपा ये की ।। ओ 57

अर्थ
— मोत्याला झाकून ठेवणारे पाणीच त्याला एक प्रकारची झळाळी, तेज, चमक देत असते.

शब्दार्थ किळ = तेज, चमक ,पांगुळ = झाकणारे

विवेचन — मोत्याची किंमत ठरते ती त्याला असणारी चमक त्यावर असणारे तेज ज्याला सामान्यपणे पाणी म्हणतात त्यावरून. जेव्हढे मोत्यावरील पाणी जास्त तेवढी त्याची किंमत जास्त. मोत्याला ही झळाळी किंवा तेज प्राप्त होते ते सुद्धा त्या शिंपल्यात किती व कसे पाणी होते त्यानुसार त्याची प्रत ठरते. त्याचप्रमाणे मानवी देहाच्या कुपीत प्राण रूपाने परमात्मन शक्ती असते. त्या शक्तीला जो जाणून घेतो, तेवढा तो जास्त नावाजला जातो. त्याला समाजात मान्यता मिळते. लोक त्याला सत्पुरुष म्हणतात. त्यांच्या शब्दाला विशेष महत्त्व प्राप्त होते. अनेक संत, महात्मे यांची चरित्रे वाचली तर लक्षात येते ह्या मंडळींकडे कोणताही धनसंग्रह नव्हता. त्यांची श्रीमंती ही त्यांच्या कडे असलेल्या संपत्ती वरून नव्हती, तर त्यांच्या ठिकाणी असलेल्या शक्ती, ज्ञानाचे तेज यामुळे होती. समाज त्यांचा प्रत्येक शब्द आज्ञा म्हणून स्वीकार करीत होता. कोणतेही राजपद नाही, श्रीमंती नाही,

अधिकार नाही, बल नाही तरीही त्यांना देवत्व प्राप्त झाले. ही सारी त्यांचे ठिकाणी असलेल्या चैतन्य शक्तीचा प्रभाव होता. प.प. श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज, प. प. श्री लोकनाथ तीर्थ स्वामी महाराज यासारखे महात्मे, श्री तुकाराम महाराज, गजानन महाराज, साईबाबा या संतांचे जवळ पैसा, अधिकार, सत्ता काही नसूनही ह्या शक्तीमुळे त्यांना देवत्व प्राप्त झाले. आजही त्यांची वचने आपण पाळण्याचा प्रयत्न करतो. त्यांची पूजा करतो. त्यांची शक्ती, त्यांचे चैतन्य हीच त्यांची श्रीमती, त्यांचे तेज आहे. खरं तर आपल्या प्रत्येकात ती शक्ती वास करीत असते, पण तिचा उपयोग आपण करून घेत नाही. इतकेच काय पण साधी तिची ओळख सुद्धा आपण करून घेत नाही तर तिचे साहाय्य, तिचा उपयोग आम्हाला कसा मिळणार? त्यासाठी संत, महात्मे यांना शरण गेले पाहिजे. त्यांची मनोभावे सेवा केली पाहिजे. त्यांची शिकवण, त्यांनी दिलेली साधना अंगिकारली पाहिजे. जेंव्हा अश्या श्रीगुरूंची कृपा प्राप्त होते, तेंव्हा ही अंतस्थ शक्ती जागृत होते. माता कुंडलीनीचा ऊर्ध्व प्रवास सुरु होतो. अनेकविध अनुभव येऊ लागतात. साधन अवस्थेत अनेक क्रिया होतात. चित्त शांत होते. एकप्रकारची प्रसन्नता अनुभवास येते. हि सारी त्या चैतन्याची प्रभा आहे. ज्यावेळी अशक्यप्राय गोष्टी आपोआप घडतात तेंव्हा कळते जीवापेक्षा सुद्धा जास्त महत्त्वाची, किंबहुना देहाला चालना देणारी ही शक्ती जास्त तेजोमय, प्रभावी आहे. जगातील श्रेष्ठ अशी सुपर पावर आहे. शक्तिपात साधनेत तर ह्या शक्तील विशेष महत्त्व दिले जाते. जसजशी साधना तीव्र होते, ही शक्ती अंतः प्रवाही होते . ज्ञानाचा साक्षात्कार होतो. प. पु. गुळवणी महाराज, दत्तमहाराज कवीश्वर, नारायण काका ढेकणे महाराज यासारखे अनेक विभूती आजही आपणांस दिसतात. त्यांच्या शक्ती संचयाचा आविष्कार अनुभवास येतो. त्यांचे चरणीं आपण नतमस्तक होतो.

मात्राचीया त्रिपुटीया । प्रणव काय केला चिरटीया। कीं णकार तीरे घटिया । भेदावला काई।। ओ 58

अर्थ
— ओंकार लिहितांना तो तीन भागात लिहिला जातो पण त्याचा उच्चार मात्र एकच होतो. ण लिहितांना सुद्धा U, I, _ अश्या तीन भागात लिहिला जातो पण त्याचा उच्चार एकच ण असा होतो.

शब्दार्थ त्रिपुटीया = तीन भाग, भेदावला = विभागला गेला, चिरटीया =उच्चारला

विवेचन — शिव-शक्ती एकच आहेत हे सागतांना ज्ञानेश्वर महाराज आणिक एक दृष्टान्त देतात. अनेक सगुण रूपे सांगून झाल्यावर माऊली वाङ् मयीन दाखला देतात. येथे त्यांच्या भाषा प्रभुत्वाचा परिचय आपणांस होतो. ते म्हणतात ओंकार लिहितांना तीन वेळा लेखणी उचलावी लागते याचाच अर्थ तो तीन भागांत विभागला गेला आहे पण त्याचा उच्चार करतांना एकत्रित ओंकार होतो. तसेच ‘ण’ चे सुद्धा आहे. ‘ण’ लिहितानाही तो तिन भागात लिहिला जातो U, I, _ पण उच्चार एकच ‘ण’ होतो. ज्ञानी जनांना सर्वत्र प्राणशक्ती, चैतन्यशक्तीचा साक्षात्कार होत असतो. माऊली त्यामुळेच अनेक जड, अक्षर, जीवित व मानवी जीवनातील अनेक उदाहरणे देऊन चैतन्याचे महत्त्व समजावून सांगत आहेत. अक्षर ज्ञानाने , ग्रंथाच्या पठणाने ज्ञान होते हे खरे आहे, पण ते अर्ध सत्य म्हणावे लागेल. ग्रंथ तर सर्वांना उपलब्ध आहेत. मग सर्व ज्ञानी का होत नाही?

विचारांती लक्षांत येते ग्रंथ वाचण्यासाठी, ते ग्रंथ आत्मसात करण्यासाठी आणि संग्रहित ज्ञानाचा योग्यवेळी वापर करता येणे यासाठी त्या चैतन्यशक्तीवर अवलंबून राहावे लागते. म्हणूनच अक्षर ज्ञान सुद्धा शेवटी त्या मूलाधार स्थित चैतन्यावर अवलंबून आहे. वर्गात सर्वांना एकच पुस्तक असते, शिक्षक एकच असतात, परीक्षेत विचारलेला प्रश्न सुद्धा सर्वांना सारखाच असतो. तरीही काहींना पूर्ण गुण मिळतात तर काहींना अजिबात गुण मिळत नाही. का होते असे? कारण प्रत्येकाच चैतन्यशक्ती वापराचे परिमाण भिन्न आहे. श्रीगुरूंच्या मार्गदर्शनाखाली आपणही त्या चैतन्याचा अभ्यास करून जीवन सार्थकी लावले पाहिजे. साधना मिळाली, गुरुकृपा झाली म्हणजे सर्वकाही झाले असे होत नाही. त्यासाठी साधनेतील सातत्य, निष्ठा, समर्पण, श्रीगुरूंचे बद्दलचा विश्वास असला पाहिजे. प्रयत्नाशिवाय काहीही मिळत नाही. येथे तर अत्यंत श्रेष्ठ असे आत्म ज्ञान मिळवायचे आहे, मग साधन करावयास नको का? योग तपस्वी काका महाराज ढेकणे तर म्हणतात,”साधन नाही तर भोजन नाही” असा नियम करा. देहाला अन्नाची जितकी गरज आहे तितकीच किंबहुना त्याही पेक्षा जास्त चैतन्याला साधनेची गरज आहे.

अहो ऐक्याचे मुद्दल न ढळे । आणि साजिरेपणाचा लाभु मिळे । तरी सप्तरंगाची मुकुळे । तुरंवु का पाणी ।। ओ59

अर्थ — संपुर्ण चैतन्याची पुंजी धन म्हणजे त्यांचे एकसंघपणा. पण त्या एकसंघतेला थोडाही धक्का न लावता विविधता अनुभवता आली तर याचा आनंद का घेऊ नये. समुद्र त्याच्या असंख्य तरंगांची सुमने उधळीत असतो व त्याचा आनंद ( सुवास) लुटत असतो.

शब्दार्थ — मुकुळे = सुमने,कळ्या, तुरवू = सुवास

विवेचन — समुद्रावर असंख्य तरंग उमटत असतात. माऊलींची सौंदर्य दृष्टी पहा. माऊली त्या तरंगांना, लाटांना कळ्या म्हणतात. जश्या झाडावर कळ्या उमलतात आणि गळून पडतात तश्याच लाटा सुद्धा उमटतात आणि काही सागरातच विरून जातात तर काही काठावर येऊन थडकतात. समुद्राचे सौंदर्य खुलते ते त्यात उमटणाऱ्या लाटांमुळे, त्यावर उठणाऱ्या तरंगांमुळे हे खरे असले तरीही समुद्राचे एकसंघपण हे त्याही पेक्षा मोठे आहे. त्याच्या सर्वदूर पसरलेल्या विशालपणामुळे त्याचे सौंदर्य अधिकच खुलून येते. अनेक लहान मोठया लाटांना समुद्र आपल्यात सामावून घेत असतो. विश्वव्यापी चैतन्याचे सुद्धा तसेच आहे. प्रत्येक ठिकाणी ते निरनिराळ्या रुपात प्रकट होते. असे असले तरी ते त्याचे एकसंघपण सोडत नाही. ते प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या रुपात असले तरी ते विशाल सर्वत्र पसरलेल्या चैतन्यापासून दूर करता येत नाही.

तेच त्याच्या सौंदर्याचे कारणही आहे. ते तसे नसते तर आपण सारे एकसारखे दिसलो असतो आणि तसे झाले असते तर जगातील सौंदर्य नाहीसे झाले असते. पहा आपण प्राणी संग्रहालयात गेलो. तेथे जर सर्व प्राणी एकसारखेच असतील तर आपणांस मजा येईल का? पण जर तेथे विविध प्रकारचे प्राणी असतील तर? आपले कुतूहल जागे होते . अरे तो पहा, तेथे वाघ आहे, पलीकडे हत्ती आहे आणि तो पहा उंट. काय पाहू, कसे पाहू असे आपणांस होऊन जाते. त्या सर्व प्राण्यांना मिळून प्राणी संग्रहालय होते. ते प्रेक्षणीय होते ते तेथील प्राण्यांच्या विविधतेमुळे. प्राणशक्ती एकच आहे पण प्रत्येक देहाची उंची, रंग, देहयष्टी, ठेवण सारे काही भिन्न, एका सारखे दुसरे नाही. त्यामुळे जग सुंदर भासते. त्याचवेळी एकाच प्राणसूत्रात ते एकसंघ सुध्दा आहे. जो प्राण वायू स्वरूपात मी घेतो, तोच तुम्हीही घेता त्याअर्थाने आपल्यात काही भेद नाही.

म्हणूनि भूतेशु आणि भवानी । न करुनी सिनानी । मी रिघालो नमनी । ते हे ऐसा ।। ओ 60

अर्थ
— म्हणूनच शिव-शक्ती यांना वेगवेगळे न समजता त्यांच्या एकतेत स्वतःला मिसळवून मी त्यांस नमन करतो.

शब्दार्थ भूतेशु = शिव, देह , सिनानी = परस्परांपासून वेगळे

विवेचन — येथे ओवीची सुरवात करताना माऊली ‘म्हणोनि’ अशी करतात. याचा अर्थ स्पष्टपणे दिसून येतो की समजून उमजून, शिव आणि शक्ती म्हणजे काय हे आत्ता पर्यंतच्या विवेचनावरून आपण लक्षांत घेतले असेल. शिव-शक्ती ह्या भिन्न नाहीत. त्यांचे एकत्व आपल्या लक्षांत आले असेल. त्याचा अनुभव घेतला असेल असा ज्ञानेश्वर महाराजांना विश्वास आहे. माऊली म्हणतात मी तर तो अनुभव घेतला आहे त्यामुळे त्या शिव- शक्तीत स्वतः मी मिसळून गेलो आहे. त्या एकात्म भावाने मी नमन करतो. हा स्वतःनी स्वतःला केलेला नमस्कार आहे, ही आत्म प्रौढी नाही. हा नमस्कार त्या अंतस्थ चैतन्याला आहे.

ज्ञानेश्वर महाराज एक श्रेष्ठ स्थानावर जाऊन पोहचले आहेत. त्यांचे श्रीगुरु निवृत्तीनाथ महाराज यांना नाथपंथाची शक्तिपात दीक्षा परम गुरू श्री गोरक्षनाथ महाराजकडून प्राप्त झाली . स्वतः फारसे प्रकाशात न येता, आपला शिष्य श्री ज्ञानेश्वर यांना संपूर्ण शक्ती प्रवाहाने परिपुर्ण केले. अतिशय उत्तम असे अनुभव संपन्न ज्ञान दिले. त्यानंतर माउलींनी ज्ञानेश्वरी सारखा टिकात्मक ग्रंथ लिहिला. त्यानंतर गुरू आज्ञेने केलेलं हे अमृताचे अनुभव ते कथन करताहेत. साधनेचे तेज, आत्मसन्मान, व आत्मविश्वास ह्या ओवीत स्पष्ट जाणवतो. त्यांचे ठिकाणी आता फक्त शिव-शक्तीचे मिलन झालेले नाही तर ते स्वतः त्या चैतन्यात विलीन झाले आहे. संपूर्ण समर्पण भावनेने त्या चैतन्याची अनुभूती घेऊन अंतस्थ शक्तीला ते नमन करीत आहेत. हे नमन म्हणजे केवळ हात जोडणे नाही तर त्या शक्तीशी त्यांचे असलेले अनुसंधान आहे. हा नमस्कार त्या गुरुशक्तीला आहे. निरंतर साधनेला आहे.


का दर्पणाचेनि त्यागे । प्रतिबिंब बिंबी रिघे । का बुडी दिजे तरंगे । वायूंचा ठेला ।। ओ 61

अर्थ — आरसा समोर नसला तर आपले प्रतिबिंब आपल्यातच विरून जाते. वाऱ्याने उठणारे समुद्रावरील तरंग वारा थांबल्यावर समुद्रातच विरून जातात.

शब्दार्थ दर्पणाचेनि = अरश्यामुळे

विवेचन — समोर आरसा असेल तर आपले प्रतिबिंब त्यात दिसते. पण आरसा काढून घेतला तर त्यात दिसणारे प्रतिबिंब कोठे जाते? ते आपल्या मूळ रुपात विरून जाते. किंवा आपण त्या आरश्यासमोरून दूर झालो तरीही आरश्यातील प्रतिबिंब मूळ रूपा बरोबर जाते. समुद्रात अनेक लाटा, तरंग उत्पन्न होतात. पण त्या पुन्हा समुद्रातच विलीन होतात. आपले अस्तित्व सुद्धा , आपला देह हे सुद्धा त्या चैतन्याचे प्रतिबिंब आहे. ते ह्या शरीरात आहे तो पर्यंत देह आहे. हे चैतन्य चैतन्यात विलीन झाले की देहाचेसुद्धा विघटन होते. एखाद्या व्यक्तीचे देहावसन झाले की सारे शोकाकुल होतात. ती व्यक्ती गेली असे म्हणतात.

कोठे गेले त्याचे शरीर? ते तर तेथेच काल होते तसेच आत्ताही आहे. मग नक्की काय गेले? त्या व्यक्तीची खरी ओळख काय होती? येथे स्पष्ट होते, ती व्यक्ती म्हणजे त्याचा देह नव्हता ते तर त्याच्या ठिकाणी असलेल्या चैतन्याचे प्रतिबिंब होते. आपल्या सर्वांची खरी ओळख चैतन्यच आहे. आपली सर्वांची जी नावे आहेत ती आपल्या देहाची नसून त्या चैतन्याची आहेत. जश्या समुद्राच्या लाटा समुद्रातच विलीन होतात, तसेच चैतन्य चैतन्यात विलीन झाले की लाटांप्रमाणे आपले अस्तित्व चैतन्यातच विलीन होते.

नातरी निद जात खेवो । पावे आपुला ठावो । तैसी बुद्धित्यागे देवी देवो । वंदली मिया ।। ओ 62

अर्थ — निद्रा संपली व जग अली की परत आपण आपल्यातच येतो तसे जगाचे प्रतिबिंब दाखवणाऱ्या माझ्या मन बुद्धीचा त्याग करून जगाच्या एकात्मतेत विलीन होऊन इ ह्या देव देवतेला वसंदन करतो .

शब्दार्थ खेवो = त्या क्षणी

विवेचन — आपण झोपतो तेंव्हा जगाशी आपला संपर्क तुटतो .निद्राकाळात आपण सर्वकाही विसरून जातो. झोपेत स्वप्न पडतात. तेही एक वेगळे जग आहे पण तो सारा भ्रमाचा खेळ असतो. निद्रेतून जाग येते तेंव्हा लक्षांत येते , आपल्या सभोवताली असलेले जग जसे होते तसेच आहे. मग आपण पुन्हा आपल्या विश्वात परत येतो. आपले मन ह्या जगात पुन्हा घुटमळत राहते. बुद्धी तर्क वितर्काच्या आधारे जगाचे व जगातील घटनांचे विश्लेषण करत राहते. मन संसारात गुरफटून जाते. त्या मनाला बेधुंद करणारी बुद्धी व मन माणसाला त्याच्या मूळ तत्वापासून दूर घेऊन जाते. चैतन्याला शरण जायचे असेल, ‘मी’ चा शोध घ्यायचा असेल तर मन स्थिर करून बुद्धी भेद करणारे तर्क वितर्क दूर सारले पाहिजे. हे कसे शक्य व्हावे? खूप अवघड असेल असे वाटते. पण गीतेच्या सहाव्या अध्यायात वर्णन केलेला पंथराज अवलंबला तर हे सहज शक्य आहे. अर्थात त्यासाठी समर्थ श्रीगुरु लाभले पाहिजे. त्यांनी शक्तिपात केला असता हा मार्ग आपल्या साठी खुला होतो.

मग हे साधन खूप अवघड असेल असे आपणांस वाटेल पण ते चैतन्य स्वतः सहाय्यभूत होते. त्यासाठी जप, तंत्र, मंत्र, पूजा सामग्री, धन याची काहीही गरज नसते. खरं तर ते चैतन्य प्रत्येक श्वासासोबत शरीरात प्रवेश करते. केवळ प्रवेश करून थांबत नाही तर तेथील मालिन्य, चित्तातील भ्रम दूर सारून चित्त शुद्ध करते. मन प्रसन्न होते. अनामिक आनंद प्राप्ती होते. ‘ठेविले अनंते तैसेचि राहावे, चित्ती असू द्यावे नव्हे हो चित्ती राहते समाधान’. माऊली हा अनुभव सांगतात, तोच हा अमृताचा अनुभव आहे. देहभाव विसरून आपले मूळ रूप चैतन्य त्याला समर्पित भावाने, मन , बुद्धीचा त्याग करून बसायचे. डोळे मिटवे, शरीर ढिले सोडावे, श्वासावर लक्ष ठेवावे. ते चैतन्य देईल ते अनुभव घेत जावे. त्याच समर्पण भावाने द्वैत सोडून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात , अश्या चराचरात व्यापलेल्या सर्व चैतन्यमयी देव देवतांना नमन करतो. प.पु. काका महाराज सुद्धा प्रत्येक प्रवाचनापूर्वी म्हणत माझ्या समोर बसलेल्या सर्व चैतन्यरूपी देव देवतांना माझे नमस्कार आहेत. संतांचे हृदय किती विशाल असते याची जाणीव होते.

सांडूनि मिठपणाचा लाभु । मिठे सिधुत्वाचा घेतला लाभु । तेवि देऊनी शंभू । शांभवी झालो ।। ओ 63

अर्थ
— मिठाने आपल्या मिठपणाचा लोभ सोडला आणि सागराच्या अथांग गहराईच्या कणाकणात मिसळून जाऊन समुद्र होण्याचा लाभ मिळवला. मी सुद्धा माझा अहंभाव सोडून चैतन्यात विलीन होऊन मीच शंभु- शांभवी होऊन परमात्मा झालो.

शब्दार्थ सिंधुत्व = सागर, शंभु = परमात्मा, दैवत, शांभवी = परमात्मन,दैवत स्वरूप

विवेचन — सागराच्या पाण्यात मिठाने स्वतःचे अस्तित्व विरून जाऊन, स्वत्वाचा लोभ सोडून दिला. त्यामुळे ते सागरात सामावले गेले. सागर मिथमय झाला,पण त्याचवेळी मीठ मात्र सगरासारखे विशाल, अधांग झाले. मिठाने खरं तर स्वतः ला समर्पित केले आणि तेच विशाल झाले मोठे झाले.येथे विनम्रपणे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मी सुध्दा स्वतःचे अस्तित्व विसरून त्या गुरुदर्शीत चैतन्याचे ठिकाणी लिन झालो, त्या चैतन्यात मिसळून गेलो. खरं म्हणजे मी स्वतःला समर्पित केले आणि काय आश्चर्य मीच त्या चैतन्याचा होऊन गेलो .चैतन्याइतकाच विशाल सर्वव्यापी झालो. मी फक्त माझ्यातील अहंभाव दिला आणि त्या बदल्यात मी स्वतः शांभवी झालो, चैतन्य झालो. येथे खूप मोठे गुपित माऊली आपल्याला सांगत आहेत. अध्यात्म मार्गात प्रगती करायची असेल तर काय करायला पाहिजे? एका चरणात ते गुपित माऊली सांगतेय.

“तेवि अहं देऊनी शंभु ” साधकाने परमेश्वराला फक्त अहं देऊन टाकला पाहिजे. हे फक्त असले, विनामूल्य असले तरी ते देणे सोपे नाही. हेच तर आमचे सुटत नाही. अहो, दान धर्म केला तरी आम्ही त्याची जाहिरात करतो. अनेक मंदिरात मोठं मोठे बोर्ड लावून कोणी किती देणगी दिली त्याची नावे लिहिली जातात. जे परमेश्वर कृपेने प्राप्त झाले, ते त्याला देणारे आपण कोण आहोत? खरा देव परमात्मा आपल्याच आहे. आत वसला आहे. हा चैतन्य देव दिसत नाही पण जाणवतो. त्याची ओळख होते ती श्रीगुरूच्यामुळे. श्रीगुरु आपली बहिर्मुखी असणारी चैतन्य शक्ती अंतर्मुखी करतात. यालाच योगमार्गी शक्तिपात दीक्षा म्हणतात. ह्या देवाला काय द्यायला पाहिजे? उत्तम देय म्हणजे ‘अहं’ म्हणजेच स्वत्व, अहंकार . हा अहंकार, अहं श्रीगुरुचरणी अर्पण केला की देवभाव संपतो. शंभूपण संपून उरतो तो फक्त शंभवी भाग. हा अनुभवायचा विषय आहे. प्रत्येकाला येणारा अनुभव वेगवेगळा असू शकतो. शब्दांत ते सांगणे शक्य नाही. मनुष्य सर्वकाही द्यायला तयार होतो पण मीपणा अहंकार द्यायला मात्र फार अवघड होते. त्याचा त्याग केल्याशिवाय परिपूर्णता येणार नाही.

शिवशक्ती समावेशे । नमन केले म्या ऐसें । रंभागर्भ आकाशे । रिघाला ऐसा ।। ओ 64

अर्थ — माझ्यातील शिवशक्तीचे एकत्रीकरण झाले, त्या चैतन्य जीवनात राहून मी नमन केले तेंव्हा ‘मी’ नाहीसा झालो. कापूर जाळून गेल्यावर आकाशात विलीन होतो नाहीसा होतो, तसा मी चैतन्यात मिसळून गेलो.

शब्दार्थ रंभागर्भ = कपूर, रिघाला = विरून गेला

विवेचन — एकदा कुंडलिनी शक्ती श्री गुरू संकल्पाने जागृत झाली की शिव-शक्तीचे मिलन केल्याशिवाय ती थांबत नाही. पण त्यासाठी गुरू आज्ञेचे पालन करून त्यांनी सांगितले ते साधन नियमित केले पाहिजे. मग ते अमृतासमान आनंदाचे रसपान कार्य येते. जेंव्हा साधक साधनेसाठी बसतो, शक्ती ऊर्ध्वगामी होते, त्याचा देहभाव संपून जातो. देहाच्या सुख-दुःख ह्या संकल्पनेच्या पुढे जातो. त्याच्या ठिकाणी उरतो तो फक्त साक्षीभाव. निर्विकल्प, शांतता सहज प्राप्त होते. ज्याप्रमाणे कापुरास अग्नी स्पर्श होताच कापूर जलीन जातो,

त्याचे काहीही शेष राहत नांगी राख सुद्धा राहत नाही, त्याप्रमाणे साधन सिद्ध झाल्यावर चैतन्यावर साचलेली कर्माची पुटे गळून पडतात. कोणतेही भोग शिल्लक राहात नाही. चैतन्य ज्याला मुळांत जडत्व नाही ते विश्व चैतन्यात विलीन होते. माऊली म्हणते हावंग मुक्तीचा सोहळा आहे. माऊली म्हणते मी त्या चैतन्य साधनेत पूर्णपणे सामावून गेलो आहे. माझे मन, प्राण, इंद्रिये सारे एकवटली आहेत. मनाचे खेळ, बुद्धीचे तर्क, भावनांची आंदोलने थांबली आहेत. हा मुक्तीचा सोहळा ते अनुभवताहेत. त्या परब्रह्म परमात्मन शक्तीत मी माझे मीपण विसरून एकरूप झालो. कर्मफल काहीही शेष राहिले नाही व अत्यंत मुक्त अवस्था प्राप्त करून त्या चैतन्याला मी नमन केले आहे. कारण माझी न-मन अशी स्थिती झाली आहे. मनाचा लय होणे हेच खरे न-मन आहे.

सार्थ अमृतानुभव
अध्याय पहिला
ओवी ५६ ते ६४ समाप्त

सार्थ अमृतानुभव सूची :- प्रमोद कुलकर्णी

वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ अमृतानुभव
96 कुळी मराठा
संत ज्ञानेश्वर महाराज
WARKARI ROJNISHI
www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
sartha amrutanubhav
AMRUTANUBH
ANUBHAWAMRUT
SANT SNYANESHWAR AMRUTANUBHAV
SARTHA DNYANESHWARI

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *