सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा ओवी १०२६ ते १०५० पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, , , , , , ,

1026-13
अनंतें काळें किरीटी । जिया मिळती इया सृष्टी । तिया रिगती ययाच्या पोटीं । कल्पांतसमयीं ॥1026॥
अर्जुना, अनंतकालापासून ज्या ह्या सृष्ट्या उत्पन्न होतात, त्या कल्पांताच्या वेळेस ह्याच्या पोटात प्रवेश करतात.
1027-13
हा महद्ब्रह्मगोसावी । ब्रह्मगोळ लाघवी । अपारपणें मवी । प्रपंचातें ॥1027॥
हा पुरुष प्रकृतीचा धनी आहे, हा ब्रह्मांडाचा सूत्रधार आहे व आपल्या अनंतत्वाने तो या मर्यादित प्रपंचाला मोजून टाकतो, (म्हणजे याच्या व्याप्तीचा विचार केला असता संसाराचा बाध होतो).
1028-13
पैं या देहामाझारीं । परमात्मा ऐसी जे परी । बोलिजे तें अवधारीं । ययातेंचि ॥1028॥
आणि या देहामधे परमात्मा आहे अशा प्रकारचे जे बोलतात ते यालाच असे समज.
1029-13
अगा प्रकृतिपरौता । एकु आथी पंडुसुता । ऐसा प्रवादु तो तत्त्वता । पुरुषु हा पैं ॥1029॥
अरे अर्जुना, प्रकृतीपलीकडे कोणी एक आहे, अशी जी वदंता आहे (असे जे लोक म्हणतात) तो वस्तुत: हाच पुरुष आहे.
य एवं वेत्ति पुरुषं प्रकृतिं च गुणैः सह ।
सर्वथा वर्तमानोऽपि न स भूयोऽभिजायते ॥13.23॥

भावार्थ :- पुरुष आणि प्रकृती, यांना जो जो (या त्यांच्या) गुणांसह याप्रमाणे (म्हणजे पुरुष हा प्रकृती व तत्कार्य गुण याहून भिन्न आहे असे) जाणतो, तो सर्व कर्मे करीत असला तरी पुन्हा कधीही जन्म पावत नाही.
1030-13
जो निखळपणें येणें । पुरुषते यया जाणे । आणि गुणांचें करणें । प्रकृतीचें तें ॥1030॥
अशा या शुद्धपणाने या पुरुषाला जो जाणतो गुणांचे करणे ते प्रकृतीचे आहे असे जाणतो.

1031-13
हें रूप हे छाया । पैल जळ हे माया । ऐसा निवाडु धनंजया । जेवीं कीजे ॥13-1031॥
हा देह व ही त्याची छाया, पलीकडे दिसते ते खरे पाणी आहे व येथे जे पाण्यासारखे दिसत आहे ते खोटे (मृगजल) आहे, अर्जुना, याप्रमाणे जशी निवड करावी.
1032-13
तेणें पाडें अर्जुना । प्रकृतिपुरुषविवंचना । जयाचिया मना गोचर जाहली ॥1032॥
त्याप्रमाणे अर्जुना, प्रकृती व पुरुष यांच्या स्वरुपाचा यथार्थ विचार ज्याच्या मनाला कळला आहे. ।
1033-13
तो शरीराचेनि मेळें । करूं कां कर्में सकळें । परी आकाश धुई न मैळे । तैसा असे ॥1033॥
तो शरीराच्या संगतीने सर्व कर्मे करीना का? परंतु आकाश जसे धुराने मळत नाही तसा तो आहे. सर्व कर्मे करीत असताना तो त्या कर्मांकडून लिप्त होत नाही.
1034-13
आथिलेनि देहें । जो न घेपे देहमोहें । देह गेलिया नोहे पुनरपि तो ॥1034॥
देह असताना जो त्या देहाच्या मोहाने भुलला जात नाही, तो देह पडल्यावर पुन: जन्म पावत नाही.
1035-13
ऐसा तया एकु । प्रकृतिपुरुषविवेकु । उपकारु अलौकिकु । करी पैं गा ॥1035॥
हा प्रकृतीपुरुषविचार, त्या मनुष्यावर असा एक लोकोत्तर उपकार करतो.

1036-13
परी हाचि अंतरीं । विवेक भानूचिया परी । उदैजे तें अवधारीं । उपाय बहु त ॥1036॥
परंतु हाच विचार अंत:करणात सूर्याप्रमाणे प्रकाशित होण्यास पुष्कळ उपाय आहेत ते ऐक.
ध्यानेनात्मनि पश्यन्ति केचिदात्मानमात्मना ।
अन्ये सांख्येन योगेन कर्मयोगेन चापरे ॥13.24॥

क्ष्लोक भावार्थ:- कित्येक आपल्या ठिकाणी आत्मानात्म्याच्या सरभेसळीत, आपणास आपल्या शुद्ध आत्मस्वरूपास, आत्मध्यानाच्या योगाने आत्मानात्मविचाराने निवडून पहातात. दुसरे कोणी सांख्ययोगाने आणि काही कर्मयोगाने जाणतात.
आत्मस्वरूपाला जाणण्याचे मार्ग
1037-13
कोणी एकु सुभटा॥विचाराचा आगिटां । आत्मानात्मकिटा । पुटें देउनी ॥1037॥
हे चांगल्या योद्ध्या, अर्जुना, कित्येक पुरुष विचाररूप अग्नीत आत्मानात्ममिश्रणरूपी हिणकस सोन्यास पुटे देऊन,
1038-13
छत्तीसही वानी भेद । तोडोनियां निर्विवाद । निवडिती शुद्ध । आपणपें ॥1038॥
छत्तीसही अनात्मरूप प्रकारचे भेद नि:संशय जाळून म्हणजे विचाराने त्यांचे निरसन करून आपला शुद्ध आत्मभाव निवडतात.
1039-13
तया आपणपयाच्या पोटीं । आत्मध्यानाचिया दिठी । देखती गा किरीटी । आपणपेंचि ॥1039॥
आत्मभावाच्या पोटात स्वरूपात आत्मध्यानरूपी दृष्टीने अर्जुना, ते आपण आपल्यालाच पहातात.
1040-13
आणिक पैं दैवबगें । चित्त देती सांख्ययोगें । एक ते अंगलगें । कर्माचेनी ॥1040॥
आणि कित्येक लोक दैववशात सांख्ययोगाच्या द्वारे (आत्म्याकडे) चित्त देतात, आणखी कित्येक कर्मयोगाचा आश्रय करून (आत्म्यास) पहातात.
अन्ये त्वेवमजानंन्तः श्रुत्वाऽन्येभ्य उपासते ।
तेऽपि चातितरंत्येव मृत्युं श्रुतिपरायणाः ॥13.25॥

भावार्थ:- दुसरे कोणी याप्रमाणे (आत्म्याला) न जाणणारे दुसर्‍यांपासून (म्हणजे आचार्यादिकांपासून) श्रवण करून उपासना करतात. श्रवण केलेल्या गोष्टी प्रमाण मानणारे असे ते देखील मृत्यूला तरून जातात.म्हणजे त्यांना मोक्ष प्राप्त होतो. ॥13-25॥
(पुढे आपण आत्मस्वरुप जानुन घेऊ)

1041-13
येणे येणे प्रकारे । निस्तरती साचोकारे । हें भव भेउरे । आघवेचि ॥1041॥
याहून कित्येक दुसरे – स्वत: आत्म्याला न जाणणारे – या प्रकारांनीच सर्व संसारभय खरोखर निस्तरतात. (चांगल्या तर्‍हेने तरून जातात).
1042-13
परी ते करिती ऐसे । अभिमानु दवडूनि देशे । एकाचिया विश्वासे । टेकती बोला ॥1042॥
परंतु ते असे करतात की अभिमान देशोधडी करून एकाच्या (गुरूच्या) उपदेशावर विश्वासाने अवलंबून रहातात.
1043-13
जे हिताहित देखती । हानि कणवा घेपती । पुसोनि शिणु हरिती । देती सुख ॥1043॥
जे गुरू हिताहित पहातात, जे शिष्याच्या हानीच्या बाबतीत दयेने व्यापले जातात व शिष्याला दु:ख कशाने होते हे विचारून त्याचे दु:ख हरण करतात आणि सुख देतात,
1044-13
तयांचेनि मुखें जें निघे । तेतुलें आदरें चांगें । ऐकोनियां आंगें । मनें होती ॥1044॥
त्यांच्या (गुरूंच्या) मुखातून जेवढे निघेल, तेवढे चांगल्या आदराने ऐकून अंगाने व मनाने ते तसेच होतात.
1045-13
तया ऐकणेयाचि नांवें । ठेविती गा आघवें । तया अक्षरांसीं जीवें । लोण करिती ॥1045॥
आपल्या सर्व कर्तव्यास, ऐकण्याचेच नाव ठेवतात. ऐकणे हेच एक आपले जन्मास येऊन कर्तव्य आहे असे समजतात. आणि त्या गुरुमुखातल्या अक्षरांवरून आपला जीव ओवाळून टाकतात.

1046-13
तेही अंतीं कपिध्वजा । इया मरणार्णवसमाजा- । पासूनि निघती वोजा । गोमटिया ॥1046॥
हे कपिध्वजा, ते देखील या मरणरूपी समुद्राच्या समुदायापासून (जन्ममरणपरंपरेपासून) चांगल्या रीतीने बाहेर पडतात.
1047-13
ऐसेसे हे उपाये । बहुवस एथें पाहें । जाणावया होये । एकी वस्तु ॥1047॥
एक परमात्मा जाणावयाला येथे असे हे पुष्कळ उपाय आहेत, पहा.
1048-13
आतां पुरे हे बहुत । पैं सर्वार्थाचें मथित । सिद्धांतनवनीत । देऊं तुज ॥1048॥
आता याविषयी बोलणे पुरे. आतापर्यंत सांगितलेले सर्व अभिप्राय घुसळून काढलेले सिद्धांतरूप लोणी तुला देतो. आतापर्यंत सांगितलेल्या सर्व अर्थाचे तात्पर्य सांगतो.
1049-13
येतुलेनि पंडुसुता । अनुभव लाहाणा आयिता । येर तंव तुज होतां । सायास नाहीं ॥1049॥
अर्जुना, एवढ्याने तुला आयता अनुभव मिळणार आहे. मग इतर (म्हणजे ब्रह्मानुभवानंतर होणारा विलक्षण आनंद, शांती वगैरे) होण्याला तर तुला श्रम पडणार नाहीत.
1050-13
म्हणौनि ते बुद्धि रचूं । मतवाद हे खांचूं । सोलीव निर्वचूं । फलितार्थुची ॥1050॥
म्हणून त्या सिद्धांताची व्यवस्थित मांडणी बुद्धीने करू व इतर मतांच्या दुराग्रहाचे खंडन करू व स्वच्छ गर्भित अर्थच विस्ताराने सांगू.
यावत्संजायते किंचित्सत्त्वं स्थावरजंगमम् ।
क्षेत्रक्षेत्रज्ञसंयोगात्तद्विद्धि भरतर्षभ ॥13.26॥

क्ष्लोक अर्थ:- हे भरतश्रेष्ठा, जो जो स्थावर अथवा जंगम पदार्थ उत्पन्न होतो, तो तो क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांच्या संयोगापासून होतो असे जाण.

, , , , , , ,
1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *