ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.260

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-८ वे, उपदेश अभंग २६०

दीप दीपिका शशी तारा । होतु का कोटिवरी रे । परी न सरे निशी नुगवे दिवसु । दिनकर नाथे जियोपरी रे ॥ नद्धरिजे नुद्धरिजे नुद्धरिजे गोपाळवीण नुद्धरिजे ॥

नगर भ्रमंता जन्म जावो । परी प्रवेशु एक्या द्वारें रे । तैसा यात्रियो भजिजो पुजिजो परी उकलु नंदकुमरु रे । सर्वावयवीं शरिर सांग । परी विरहित एका जिवे रे ।

तैसा धिक तो श्रोता धिक तो वक्ता जो वाळिला विठ्ठल देवें रे ॥ गळित शिर हे कलेवर रे । उदकेंवीण सरिता भयंकर रे । रविशशीवीण अंबर तैसें ।

हरिवीण जिणें तें असार रे ॥ अंत:करणी रूक्मिणीरमणु । परि त्या श्वपचाहि बंधन न घडे न घडे रे । येरू यति होका भलतैसा ।

परि तो भवागडीहूनि न सुटे न सुटे न सुटे रे ॥ शिखिपक्षीं पत्रीं डोळे । जेवी अकाळ जळदपटल रे । तैसीं गोकुळपाळकबाळेविण ।

कर्मे सकळ विफळ रे ॥ यम नियम प्राणायाम प्रताहार । हे सकळ उपाय परी अपाय रे । जंव तमाळनीळ घनसांवळा । हृदयी ठाण मांडुनि न राहे रे ॥

मी उत्तम पैल हीनु । भूती द्वेषाद्वेष ठेलें रे । केलेंनि कमें उफकां निपजे सुख तें दुरी ठेलें रे ॥ आतां असोत हे भेदाभेद । आम्ही असों एक्या बोधें रे । बापरखुमादेविवर विठ्ठल निवृत्ति मुनिराय प्रसादें रे ॥

अर्थ:-

लहान मोठे दिवे, चांदण्या, चंद्र असे कोट्यवधी जरी आकांशात उदयाला आले तरी त्या योगाने रात्रीचा नाश होत नाही व दिवसही उगवत नाही. पण तोच जर एक सूर्य उदयाला आला तर मात्र रात्र नाहीशी होऊन दिवस येतो.

त्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णाच्या कृपेशिवाय इतर देवतेचा कांही एक उपयोग नाही. कारण त्या गोपाळाच्या कृपेशिवाय जीवाचा उद्धार केंव्हाही होणार नाही. एखांद्या शहराला चहुकडून तट असून आंत जाण्यास एकच दार आहे.

ते दार सोडून इतर सर्व शहर फिरत राहिला तर त्याला त्या शहरातून बाहेर पडता येणार नाही. त्याच प्रमाणे एक श्रीकृष्ण परमात्मा सोडून इतर देव देवतांचे भजन पुजन जरी केले तरी त्यांपासून संसारदुःख निवृत्ती होणार नाही.

एखाद्याचे शरीर सर्व अवयवांनी परिपूर्ण आहे. पण त्यांत जर जीव नसल तर ते सर्व व्यर्थ आहे. त्याप्रमाणे श्रीविठ्ठलाचे स्मरण सोडून श्रवण करणारा श्रोता व तसेच करणारा वक्ता हे ही व्यर्थच होत.

डोके नसलेले कलेवर, पाण्यावीण कोरडी नदी हे भयंकर आहेत. चंद्रसुर्याविण जसे आकाश तसेच त्या हरिविण जिवन आहे. अंतःकरणात रक्मिणीचा पती असेल तर कसलेच बंधन पडत नाही.

व जरी उच्च यातीत जन्मला व मुखी हरिनाम नसेल तर तो ह्या संसाराच्या भानगडीतुन बाहेर पडत नाही. मोरपिसाऱ्यावर बरेच डोळे असतात पण त्यानी पाहता येत नाही. जसे अवकाळीचे मेघपटल काही कामाचे नाहीत.

तसेच केलेल्या कर्माला त्या गोपाळ नामाचे वलय नसेल तर ते फोल ठरते. यम नियम प्राणायाम प्रत्याहार हे सगळे त्याच्या प्राप्तीचे उपाय अपाय ठरतात.जेंव्हा तो घननिळ कृष्ण त्या हृदयात स्थापित नसतो. मी उत्तम

व बाकी हीन ही भावना मनात ठेऊन भूतमात्रांचा द्वेष करुन केलेली कर्मे निर्फळ होतात. व सुख दुर जाते. निवृत्तीनाथांच्या प्रसादाने माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठलाचा बोध घेतला तर सर्व भेदाभेद गळुन पडतात असे माऊली सांगतात.

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *