संत निवृत्तीनाथ महाराज अभंग सार्थ गाथा १९१ ते १९५

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

संत निवृत्तीनाथ महाराज अभंग सार्थ गाथा

सार निःसार निवडूनि टाकीन अभंग क्र.१९१

सार निःसार निवडूनि टाकीन । सर्व हा होईन आत्माराम ॥१ ॥
राम सर्वा घटीं बिंबलासे आम्हां । पूर्ण ते पूर्णिमा सोळाकळी ॥२ ॥
न देखों दूजें हरिविण आज । आणिकाचें काज नाहीं तेथें ॥३ ॥
निवृत्ति गौरव गुरुमुखें घेत । आपणचि होत समरसें ॥४ ॥

अर्थ: ज्ञान प्राप्त झाल्यावर मी सार व निसार निवडुन घेऊन त्या आत्मारामाचा होऊन जाईन.जसा चंद्र प्रतीपदा ते पोर्णीमा मध्ये 16 कला दाखवत आपली प्रतीमा बिंबवत असतो तसा तो आत्माराम सर्व मध्ये अंशात्मक रुपात सर्वत्र बिंबत असतो.मला हरिभक्ती शिवाय कोणतेच काम राहिले नसुन मला त्या हरि शिवाय दुसरे काही दिसत नाही. निवृत्तिनाथ म्हणतात, मी माझ्या श्री गुरु गहिनीनाथांकडुन त्या आत्मारामाचा गौरव ऐकला आहे व मी त्याच्याशी समरस झालो आहे.

पृथ्वी श्रीराम आकाश हें धाम अभंग क्र.१९२

पृथ्वी श्रीराम आकाश हें धाम । आपण विश्राम स्थूलरूपें ॥१ ॥
सूक्ष्मस्थूल राम साधक परम । नाम सर्वोत्तम सर्वारूपीं ॥२ ॥
आकार विकार सम सारिखाचि हरि । बाह्यअभ्यंतरीं आपणचि ॥३ ॥
निवृत्ति निष्टंक ज्ञान तें सम्यक् । गयनि विवेक सिद्ध पंथ ॥४ ॥

अर्थ: आत्माराम रुप पृथ्वी व गृह रुप आकाशात स्थुल रुप घेऊन आपण विश्राम करतो. नामाची साधना हे सर्वोत्तम साधन असुन सुक्ष्म किंवा स्थुल रुपात त्या रामनामाचे साधन करणे उत्तम आहे.सर्वत्र आकार विकाराने भरलेला तो व्यापक परमात्मा सर्व ठायी सम असुन अंतर्बाह्य तोच सर्वत्र भरला आहे. निवृत्तिनाथ म्हणतात, ज्या सिद्धांत ज्ञाना मुळे सम्यक झालेले श्री गुरु गहिनीनाथ विवेक पंथांचे वारकरी झाले आहेत.

हरिविण न दिसे जनवन आम्हा अभंग क्र.१९३

हरिविण न दिसे जनवन आम्हा । नित्य तें पूर्णिमा सोळाकळी ॥१॥
चन्द्रसूर्यरश्मी न देंखों तारांगणें । अवघा हरि होणें हेंचि घेवो ॥२॥
न देखो हे पृथ्वी आकाश पोकळीं । भरलासे गोपाळीं दुमदुमीत ॥३ ॥
निवृत्ति निष्काम सर्व आत्माराम । गयनीचा धाम गूजगम्य ॥४ ॥

अर्थ: पोर्णिमेचा पुर्ण चंद्र अंगात 16 कळा घेऊन त्या सर्वाना जसा व्यापुन असतो तसे हे जन वन सर्वकाही हरिने व्यापले आहे. त्याच्या शिवाय आम्हाला काही दिसत नाही. संपूर्ण जगत व्यापलेल्या हरिमुळे आम्ही चंद्र सुर्य रश्मी तारांगणे पाहात नाही तिथे ही त्या हरिलाच पाहतो. आकाश व पृथ्वी ह्यातील पोकळी पासुन पृथ्वीला ही आम्ही हरिरुपात पाहतो.निवृत्तिनाथ म्हणतात श्री गुरु गहिनीनाथ त्यांच्या गुह्य स्थानातील निरंजनी घरात राहतात व त्या मुळे मी निष्काम होऊन त्याला पाहायचा प्रयत्न करतो.

स्वरूप साजणी निद्रिस्त निजलें अभंग क्र.१९४

स्वरूप साजणी निद्रिस्त निजलें । भलें चेतविलें गुरुरायें ॥१ ॥
सावध सावध स्मरेरे गोविंद । मी अवघा परमानंद दुमदुमि ॥२ ॥
निद्रेचिया भुलीं स्वरूपविसरू । प्रकाशला थोरु आत्मारम ॥३ ॥
निवृतिदेवो आनंद झालया । लवति बाहिया स्वस्वरूपीं ॥४॥

अर्थ: आत्मस्वरुप मैत्रिणी मला श्री गुरु गहिनीनाथानी आत्मस्वरुपाची ओळख करवुन मला माया पटलातुन जागे केले. त्यांनी मला सावध हो सावध हो म्हणत त्या गोविंदाचे स्मरण करत सर्व जगतात भरुन उरलेला परमानंद प्राप्त करुन दिला. अज्ञानाच्या निद्रेत मला स्वरुपाची भुल पडली पण आत्मज्ञानाचा प्रका़श पडला व मी सावध झालो. निवृत्तिनाथ म्हणतात, दोन्ही बाह्या स्वस्वरुप आनंदाने स्पुरुन आल्या आहेत त्या मुळे त्या आत्मारामाला आलिंगन देऊन मी आनंद प्राप्त करत आहे.

एक तत्व सांगति वेदादिक बडिवार अभंग क्र.१९५

एक तत्व सांगति वेदादिक बडिवार । ब्रह्म कर्म आचार भजनालागी॥१॥
अदिमध्य अवसान सत्व रज तम । प्रकृति सर्वत्र संपत्ति आकारला ॥२॥
सोहं पै अनंतु सेविता साचार । गुरुमार्गे साचार भजन केले ॥३॥
देवी नादें रसना धर्मी नांदे भावो । एकतत्वीं देवो क्षरला असे ॥४॥
आदिअंत हरपला नाही तेथे कल्पना । देहीं दीप भाना विठ्ठलचरणीं ॥५॥
याचेनि परिपाठे नासतिल पापें । एक नाम सोपे हरिचे जाणा ॥६॥
निवृत्ति साम्यता सर्वाघटी दिसतु । विठ्ठल हेचि मातु नित्य नेम ॥७॥

अर्थ: वेदादिक मोठ्या आभिमानाने एक तत्वाची महती गातात तेच ब्रह्मकर्म व भजनासाठी ही लागु होते. तो परमात्मा प्रकृतीसह प्रगटल्यामुळे तिन्ही गुणानी युक्त जगत असार असले तरी सार वाटते पण त्याला आदि मध्य अंत नाही. गुरुमार्गे केलेल्या भजना मुळे मीच ब्रह्म ही अनुभुती साचार होऊन मला भोगता आली. जिभेवर दैवी संपत्ती व भावाला धर्म केला की एक तत्व असणारा आत्माराम साधकाच्या ठायी क्षरला जातो. ज्या ठिकाणी आदिअंत हरपतो कल्पना निमते त्या विठ्ठल चरणावर एकरुप झाले की देहाचा दीप होऊन आत्मप्रकाश प्राप्त होतो. ह्याच्या एक नामाच्या उच्चारणाने पाप संपुन जाते. निवृत्तिनाथ म्हणतात, मी विठ्ठल नामाचा नेम केल्याने मला सर्वा ठायी साम्यता दिसते.

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

संत
वारकरी संत
संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
निवृत्तीनाथ महाराज सार्थ अभंग गाथा
सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर महाराज सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर महाराज अभंग गाथा
ज्ञानेश्वर महाराज अभंग गाथा
ज्ञानेश्वर महाराज सार्थ अभंग गाथा
संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
ई-संपादक
धनंजय विश्वासराव मोरे
(B.A./D.J./D.I.T.)
आवृती पहिली दिनांक : २६/०९/२०१५
मु. मंगलवाडी पोस्ट. भर ता. रिसोड जिल्हा वाशिम ४४४५०६

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *