
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
संत निवृत्तीनाथ महाराज अभंग सार्थ गाथा
विश्वीं विश्वपती असे पैं लक्ष्मीनाथ अभंग क्र.१५१
विश्वीं विश्वपती असे पैं लक्ष्मीनाथ । आपणचि समर्थ सर्वांरूपी ॥
तें रूप गोकुळीं नंदाचिये कुळीं । यशोदे जवळी बाळकृष्ण ॥
सर्वघटी नांदे एकरूपसत्ता । आपणचि तत्त्वतां सर्वांरूपी ॥
निवृत्तीचें पार कृष्णचि पै सार । गोकुळीं अवतार नंदाघरीं ॥
अर्थ: लक्ष्मीचा पती असलेला परमात्माच ह्या विश्वाचा आधिपती असुन तोच सर्वरुपानी समर्थ आहे. तोच परमात्मा गोकुळात, नंदाच्या कुळात यशोदेचा बाळ कृष्ण आहे. आपणच जगताच्या सर्व रुपात अंशात्मक असल्याने त्याच्या रुपाने जगात एकत्मता आहे. निवृत्तिनाथ म्हणतात, गोकुळात नंदाघरी अवतरलेल्या कृष्णाचे नाम हे माझे सार आहे व तेच मला पार करणार आहे.
जेथें नाहीं वेदु नाहीं पै शाखा अभंग क्र.१५२
जेथें नाहीं वेदु नाहीं पै शाखा । द्वैताचा हा लेखा हरपला ॥
तें रूप वोळलें नंदायशोदे सार । वसुदेवबिढार भाग्ययोगें ॥
नमाये पुरत ब्रह्मांडाउभवणी । त्यालागीं गौळणी खेळविती ॥
निवृत्ति ब्रह्मसार सेवितुसे सोपें । नामें पुण्यपापें हरपती ॥
अर्थ: जेथे चारी वेदांना व श्रुती, स्मृती सारखा त्यांच्या शाखाना त्याचे वर्णन जमले नाही. ते वर्णन करण्याची त्यांची शक्तीच हरपली.ते साररुप परब्रह्म वसुदेवाच्या कुटुंबात जन्मले व नंद यशोदेला पुत्र म्हणुन मिळाले. ज्याने ब्रह्मांडे निर्मिले त्याचे माप करण्यास सगळी मापे थोकडी आहेत त्याला त्या गौवळणी सहज अंगावर खेळवतात. निवृतिनाथ म्हणतात, हे त्या कृष्णनामाचे सहज सोपे सार असुन त्याच्या नामामुळे पाप पुण्य दोन्ही हरपतात.
हा पुरुष कीं नारी नव्हे तो रूपस अभंग क्र.१५३
हा पुरुष कीं नारी नव्हे तो रूपस । शेखी जगदीश जगद्रूप ॥
तें हें कृष्णरूप यशोदेकडीये । नंदाघरीं होये बाळरूप ॥
ज्यातें नेणें वेद नेणती त्या श्रुती । त्या गोपिका भोगिती कामरूपें ॥
निवृत्तिचें ब्रह्म कृष्णनामें खेळे । असंख्य गोवळें ब्रह्मरूप ॥
अर्थ: त्या अरुप परमात्माला पुरूष किंवा स्त्री कसे म्हणता येईल तोच ह्या जगाचा जगदिश बनुन आला आहे. त्याच कृष्णरुपात तो नंदाच्या घरी बाळ होऊन यशोदेच्या कडेवर बसला आहे. ज्याला ओळखायला वेद व श्रुती कमी पडतात त्याचा वावर त्या गोपिका नित्य भोगतात. निवृतिनाथ म्हणतात, माझे बपरब्रह्म कृष्णनाम घेऊन त्या गोपाळांबरोबर खेळता खेळता त्यांना ब्रह्मरुप प्रदान करते.
ध्यानाची धारणा उन्मनीचे बीज अभंग क्र.१५४
ध्यानाची धारणा उन्मनीचे बीज । लक्षितां सहज नये हातां ॥
तें हें कृष्णनाम सखे नंदघरी । गौळियां माझारी ब्रह्म खेळे ॥
न दिसे पाहतां शेषादिका गति । यशोदे श्रीपति बाळ झाला ॥
गुंतलें मायाजाळीं अनंत रचनें । तो चतुरानना खुणें न संपडे ॥
नकळे हा निर्धारू तो देवकी वो देवी । शेखीं तो अनुभवीं भुलविला ॥
निवृत्ति रचना कृष्णनामें सार । नंदाचें बिढार ब्रह्म झालें ॥
अर्थ: ध्यानाची धारणा व योग्यांच्या उन्मनी अवस्थेचे बीज जरी त्यांचे लक्ष असले तरी ते त्यांना सहज सापडत नाही.तेच परब्रह्म कृष्णनाम धारण करुन गौळ्यांबरोबर खेळत आहे. ज्यांची गती व त्याचे स्वरुप त्याच्या जवळ असणारे शेषादिक जाणु शकले नाहीत तोच यशोदेचा बाळ श्रीपती झाला आहे. ज्याने मायाधीन होऊन ह्या विश्वाची निर्मीती केली त्या ब्रह्मदेवाला हे त्याचे स्वरुप सापडले नाही. कारागृहात व बाहेर अनेक चमत्कार दाखवुन ही त्याचे स्वरुप देवकी व वसुदेवाला समजले नाही ते त्याला पाहुनच भुलले. निवृतीनाथ म्हणतात त्याच्यामुळे त्या नंदाचा सर्व परिवारच ब्रह्मरुप झाला त्या कृष्णनामाला मी सार म्हणुन वाङमयात रचले आहे.
चतुरानन घन अनंत उपजती अभंग क्र.१५५
चतुरानन घन अनंत उपजती । देवो देवी किती तयामाजि ॥
तेंचि हें सांवळें अंकुरलें ब्रह्म । गोपसंगे सम वर्ते रया ॥
निगमा नाठवे वेदाचां द्योतुकु । तो चतुर्भुज देखु नंदाघरीं ॥
निवृत्ती म्हणे शंखचक्रांकितमूर्ति । आपण श्रीपति क्रीडतसे ॥
अर्थ: त्याच्या स्वरुपात कित्येक देव देवता नव्हे नव्हे ब्रह्मदेव ही उपजतो. तेच ब्रह्मस्वरुप सावळे सुंदर रुप घेऊन त्या गोपाळांबरोबर समानतेची वर्तणुक करताना दिसते. तेच परब्रह्म वेदांचे द्योतक असुन ही वेदांने ते समजत नाही. तोच चतुर्भुज परमात्मा नंदाचा कृष्ण झाला आहे. निवृतिनाथ म्हणतात, शंखचक्रांकित असलेला लक्ष्मीचा मालक गोकुळात नवनविन क्रिडा करतो आहे.
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
संत
वारकरी संत
संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
निवृत्तीनाथ महाराज सार्थ अभंग गाथा
सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर महाराज सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर महाराज अभंग गाथा
ज्ञानेश्वर महाराज अभंग गाथा
ज्ञानेश्वर महाराज सार्थ अभंग गाथा
संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
ई-संपादक
धनंजय विश्वासराव मोरे
(B.A./D.J./D.I.T.)
आवृती पहिली दिनांक : २६/०९/२०१५
मु. मंगलवाडी पोस्ट. भर ता. रिसोड जिल्हा वाशिम ४४४५०६