संत निवृत्तीनाथ महाराज अभंग सार्थ गाथा १६६ ते १७०

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

संत निवृत्तीनाथ महाराज अभंग सार्थ गाथा

धन्य हा खेचर धन्य हा सोपान अभंग क्र.१६६

धन्य हा खेचर धन्य हा सोपान । भक्तीचें जीवन जनक हेतु ॥
धन्य याचें कूळ पवित्र कुशळ । नित्य या गोपाळ जवळी असे ॥
याचेनि स्मरणें नासती दारुणें । कैवल्य पावणें ब्रह्मामाजी ॥
निवृत्ति म्हणे परब्रह्म हें साकार । तेथील अंकूर उमटले ॥

अर्थ: सतत केलेल्या भक्ती मुळे त्या भक्तीचे जनकत्वच प्राप्त करुन कृतकृत्य झालेले सोपानदेव व विसोबा खेचर आहेत. ज्यांच्या जवळ तो गोपाळ नामरुपाने सतत असतो त्याचे कुळ पवित्र व कुशळ असते. या संतांचे जे सतत चिंतन करतात त्यांचे दारुण पाप नष्ट होते व ते भगवंताच्या कैवल्यास प्राप्त होतात. निवृतिनाथ म्हणतात, हे संत म्हणजे त्या सगुण साकार परब्रह्माचे अंकुर आहेत.

कमळाच्या स्कंधी गुणी गुढारलें अभंग क्र.१६७

कमळाच्या स्कंधी गुणी गुढारलें । वरी आकारलें फूल तया ॥
सुमनाचेनि वासें भ्रमर भुलले । मार्ग पैं विसरले इंद्रियांचा ॥
तैसेहे संत विठ्ठलीं तृप्त । नित्य पैं निवांत हरि चरणीं ॥
नाठवे हें दिन नाठवे निशी । अखंड आम्हांसि हरिराजा ॥
तल्लिन प्रेमाचे कल्लोळ अमृताचे । डिंगर हरिचे राजहंस ॥
टाहो करूं थोर विठ्ठल कीर्तनें । नामाच्या सुमनें हरि पुजूं ॥
निवृत्ति निवांत तल्लीन पै झाला । प्रपंच आबोला हरिसंगें ॥

अर्थ: कमळाच्या देठ सकट कमळाची कळी ही देठच वाटते व नंतर कमळ फुलले की ते देठवर नसल्यासारखे वाटते त्या फुलामुळे ते देठ दिसत नाही. कमलदलाच्या सुंगंधामुळे ते भ्रमर येवढे मोहित होतात की त्यांच्या इंद्रियाद्वारे लाकुड पोखरण्याचा गुणधर्म विसरतात.तसेच हे संत त्या विठ्ठल नामात तृप्त होतात व त्या विठ्ठल चरणकमलांवर निवांत होतात. त्या हरिनामामुळे ते रात्र व दिवस ही विसरतात. ज्ञान व अज्ञान हा निरक्षीर विवेक असणारे हे विठ्ठलाचे जणु राजहंसच आहेत त्या मुळे ते त्या नामामृत प्रेमाने तल्लिन होतात.हे संत विठ्ठलनामाचा टाहो करुन कीर्तन करतात व त्याच विठ्ठलाच्या नामाने त्याचीच पूजा बांधतात. निवृतिनाथ म्हणतात, मी त्या नामचिंतनामुळे प्रपंचाचा निरास करुन त्या नामघोषात निवांतपणे तल्लिन झालो.

गयनी गव्हार कृपेचा उद्धार अभंग क्र.१६८

गयनी गव्हार कृपेचा उद्धार । वरुषला उदार अमृतमय ॥
तोंची बोध साचा मुक्ताईसी लाटा । चालिले वैकुंठा समारंभे ॥
कुंचे गरुडटके टाळ श्रुति हरि । चालिलें गजरीं हरिसंगे ॥
निवृत्ति वैष्णव सोपान खेचर । करिताती गजर हरिनामें ॥

अर्थ: माझे श्री गुरु गहिनीनाथांनी माझ्यावर उदार अमृतमय कृपेचा वर्षाव केला आहे. तोच प्रेमवर्षाव मी नित्यमुक्त मुक्ताईवर केल्यांने ती वैकुठांतील समारंभ येथेच भोगत आहे. टाळ, विणा व गरुडटके घेऊन ते हरिनामाचा उच्चार करत हरि बरोबर चालतात. निवृतिनाथ म्हणतात, हे वैष्णव असलेले सोपानदेव विसोबा खेचरादी सर्वजण विठ्ठलनामाचा गजर करतात.

शांति क्षमा दया सर्वभावें करुणा अभंग क्र.१६९

शांति क्षमा दया सर्वभावें करुणा । तोचि नारायणा आवडे दासु ॥
तोचि एक साधु बोलिजे पैं जनीं । निरंतर ध्यानीं कृष्णमूर्ति ॥
जीवशिव एक सर्वत्र चैतन्य । ऐसे जया कारुण्य तोचि धन्य ॥
तोचि एक भक्तु हरि हरि म्हणे । नित्य नारायणें तारिजे त्यासि ॥
येउनि जनीं सदा पैं तो विदेही । तारकू सबाहीं सप्रेमळु ॥
निवृत्ति सांगतु भक्तीचा महिमा । करी शांति क्षमा तो विरळा असे ॥

अर्थ: ज्याच्याकडे दया, क्षमा, शांती व करुणा भाव आहे असा भक्त भगवंताचा आवडता दास असतो. ज्याच्या ध्यान्यात सतत ती कृष्णमूर्ती असते त्याला लोकांनी साधु म्हंटले पाहिजे.जाच्या कडे जीव व शीवाकडे सम्यक दृष्टीने पाहण्याची दृष्टी आहे व जो करुणेचा झरा आहे तोच घक्त धन्यत्वाला पोहचतो. जो भक्त सतत हरि नामाचा घोष करतो त्यालाच तो नारायण तारत असतो. जे महात्मे जनामध्ये विदेही अवस्थेत वावरुन त्यांना प्रेम देतात तेच जगाचे तारक होतात. निवृतिनाथ म्हणतात, जो सतत हरिनामाचा गजर करतो व शांती क्षमा आपल्या अंगी बाणवतो मी त्याच भक्तांचा महिमा सांगत आहे.

प्रकृतीचा पैठा कल्पना माजिठा अभंग क्र.१७०

प्रकृतीचा पैठा कल्पना माजिठा । न पवे तो वैकुंठा कर्मजाड्य ॥
अहिंसेचें स्वरूप हेंचि हरिरूप । न म्हणे हरि आप सर्व आहे ॥
नाहीं त्यांसि जय नुद्धरे सर्वथा । हरिवीण व्यथा कोण वारी ॥
निवृत्ति म्हणे धरी गुरुचरणसोये । तेणें मार्गें पाहे हरि सोपा ॥

अर्थ: मी व माझे ह्या देह कल्पनेनुसार मार्गाक्रमण करणारा कधीच वैकुंठाला प्राप्त होत नाही. तो अभक्त नुसते अहिंसेचे तत्व मानतो पण सर्व जग हे हरिने ओतप्रोत आहे हे मानत नाही त्याला कधी ही जय व यश प्राप्त होत नाही. कारण हरिच सर्वसामर्थ्यशाली आहे व तोच तारणारा आहे. निवृतिनाथ म्हणतात, ज्यांने गुरुचरणाचा आश्रय धरला त्याच्यासाठी हरिप्राप्तीचा मार्ग सोपा आहे.

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

संत
वारकरी संत
संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
निवृत्तीनाथ महाराज सार्थ अभंग गाथा
सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर महाराज सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर महाराज अभंग गाथा
ज्ञानेश्वर महाराज अभंग गाथा
ज्ञानेश्वर महाराज सार्थ अभंग गाथा
संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
ई-संपादक
धनंजय विश्वासराव मोरे
(B.A./D.J./D.I.T.)
आवृती पहिली दिनांक : २६/०९/२०१५
मु. मंगलवाडी पोस्ट. भर ता. रिसोड जिल्हा वाशिम ४४४५०६

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *