संत निवृत्तीनाथ महाराज अभंग सार्थ गाथा १९६ ते २००

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

संत निवृत्तीनाथ महाराज अभंग सार्थ गाथा

मनाची वासना मनेंचि नेमावी अभंग क्र.१९६

मनाची वासना मनेंचि नेमावी । सर्वत्र धरावी विठ्ठल सोय ॥१॥
आपेंआप निवेल आपेंआप होईल । विठ्ठलचि दिसेल सर्वरूपी ॥२॥
साधितां मार्ग गुढ वासना अवघड । गुरुमार्गी सुघड उपरती ॥३॥
निवृत्ति वासना उपरति नयना । चराचर खुणा हरि नांदे ॥४॥

अर्थ: मनातील वाईट इच्छा मनातच संपवुन सर्वत्र भरुन असलेल्या विठ्ठलाला मनात धरले की मन वासनारहित होते. हे सर्व करायला सोपे आहे फक्त विठ्ठलाचे स्मरण केले की वासना आपोआप निमतील व विठ्ठल मनात आपोआप स्थापित होईल काही गुढ इच्छा परमार्थ करताना त्रास देतात पण गुरुमार्गी वैराग्य साधना केली की त्या निघुन जातात. निवृत्तिनाथ म्हणतात, माझ्या डोळ्यांना तर चराचरात व्यापक असलेला हरि पाहायची वासना लागली आहे.

एक देव आहे हा भाव पैं सोपा अभंग क्र.१९७

एक देव आहे हा भाव पैं सोपा । द्वैतरूप बापा पडसी नरकीं ॥१॥
द्वैत सांडी अद्वैत धरी । एक घरोघरी हरी नांदे ॥२॥
सबाह्य कोंदलें परिपूर्ण विश्वीं । तोचि अर्जुनासि दुष्ट जाला ॥३॥
गयनि प्रसादें निवृत्ति बोधु । अवघाचि गोविंदु अवध्य रूपीं ॥४॥

अर्थ: जर एकात्म देव आहे तत्व मानले नाही व त्यात द्वैत पाहिले तर नरकाला जावे लागेल. तेंव्हा आपल्यामध्ये असलेले द्वैत टाकले की सर्व घरा मध्ये तो हरिच राहत आहे ही भावना दृढ होते. अर्जुनाचा साह्यकारी म्हणुन दिसणारी तो श्रीकृष्ण सर्व विश्वात ओतप्रोत भरला आहे. निवृत्तिनाथ म्हणतात, श्री गुरु गहिनीनाथांच्या कृपे मुळे सर्व रुपात त्या गोविंदाला मी पाहात आहे.

दिननिशीं नाहीं अवघा दीपक अभंग क्र.१९८

दिननिशीं नाहीं अवघा दीपक । एक रूपें त्रैलोक्य बिंबलेसे ॥१॥
तें रूप सांगतां नये पैं भावितां । गुरुगम्य हाता एक तत्त्वें ॥२॥
सांडावे पैं कोहं धरावें पै सोहं । अनेकत्व बहु एकतत्त्वी ॥३॥
निवृत्ति साचार वैकुंठीचे घर । देह हें मंदीर आत्मयाचें ॥४॥

अर्थ: त्या ब्रह्मदिपकाच्या जवळ दिवस रात्र हा भेद नाही तो सतत प्रकाश देतो.तोच ज्ञान प्रकाशाने एकरुपाने त्र्यैलोकात व्यापुन आहे.गुरुच्या शिकवणीवर विश्वास ठेवला तर तो अनुभवता येतो अन्यथा त्याचे वर्णन अशक्य आहे. स्वतःतील कोहमचा मी सोडुन सोहं शिवाचा अंगिकार केला तर अनेकत्वामध्ये एकत्व साधता येते. निवृत्तिनाथ म्हणतात, सकळ वैकुंठ साचार होऊन त्याचे ह्या देहातच घर करुन त्या मंदिरात आत्मारामाची स्थापना करता येते.

द्वैताचीये प्रभे नसोन उरला अभंग क्र.१९९

द्वैताचीये प्रभे नसोन उरला । निराकार संचला एकरूपें ॥१॥
तें हें सांवळें स्वरूप डोळस । बाळरूप मीस घेतलेंसे ॥२॥
तिहीं लोकीं दुर्लभ न कळे जीवशिवीं । तो आपणचि लाघवी मावरूपें ॥३॥
निवृत्तीचें सार जीवशिवबिढार । गुरूनें निर्धार सांगितला ॥४॥

अर्थ: द्वैताच्या प्रभावातही ही तो निर्गुण परमात्मा भासमान होऊन उरला आहे. व निराकार असुन ही सर्व जगताच्या रुपातुन व्यापुन राहिला आहे. त्या निर्गुण रुपाने श्रीकृष्ण रुपी सगुण बालकत्व घेऊन अवतार घेतला आहे. तिन्ही लोक व जीव शिवाला न कळणारा परमात्मा आपल्या मायारुपाने सगुण लाघवी बाल स्वरुपात आला आहे. निवृत्तिनाथ म्हणतात, जीव शिव चे सार ओझे खांद्यावर घेऊन मार्ग चालावा असे श्री गुरु गहिनी निश्चयात्मक सांगतात.

निजतेज बीज नाठवे हा देह अभंग क्र.२००

निजतेज बीज नाठवे हा देह । हरपला मोह संदेहेसी ॥१॥
काय करूं कैसें कोठे गेला हरि । देहीं देहमापारीं हरि जाला ॥२॥
विदेह पैं गंगा पारुषली चित्तीं । चिद्रूपीं पैं वृत्ति बुडोनि ठेली ॥३॥
गुरुलागिम भेटी निवृत्ति तटाक । देखिलें सम्यक्‍ समरसें ॥४॥
चित्तवृत्ति धृति यज्ञ दान कळा । समाधि सोहळा विष्णुरूप ॥५॥
ज्ञानगाये हरिनामामृत । निवृत्ति त्वरित घरभरी ॥६॥

अर्थ: आत्मारामाचे निजतेजाचे बीज देहात रुजले की मोह संदेह हरपून जातात. काय करु हा हरि कोठे गेला म्हणुन शोध सुरु केला तर तो हरि ह्या देहात देह म्हणुन सापडला. विदेही अवस्थेतील गंगा आत्मारामरुपी चित्त सागराला मिळाली व त्या एकत्वाच्या ठिकाणी सर्व वृत्ती तदाकार होऊन त्या गंगासागरात बुडाल्या. श्री गुरु गहिनीनाथ तलाव असुन मी त्या तलावाचा तट असुन तो तट व तलाव सम्यक दिसले की तलाव पूर्ण होऊन साकार होतो. चित्त, वृत्ती, धृती, यज्ञ दान ह्या कलानी समाधीस्थ होऊन त्या विष्णुरुपाशी एकरुप होता येते. निवृत्तिनाथ म्हणतात, सतत त्याचे नाम ज्ञान पुर्वक गायन केल्यामुळे तो हरि वृत्ती रहित होऊन माझ्यात संपुर्ण भरुन राहिला आहे.

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

संत
वारकरी संत
संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
निवृत्तीनाथ महाराज सार्थ अभंग गाथा
सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर महाराज सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर महाराज अभंग गाथा
ज्ञानेश्वर महाराज अभंग गाथा
ज्ञानेश्वर महाराज सार्थ अभंग गाथा
संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
ई-संपादक
धनंजय विश्वासराव मोरे
(B.A./D.J./D.I.T.)
आवृती पहिली दिनांक : २६/०९/२०१५
मु. मंगलवाडी पोस्ट. भर ता. रिसोड जिल्हा वाशिम ४४४५०६

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *