संत निवृत्तीनाथ महाराज अभंग सार्थ गाथा २०६ ते २१०

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

संत निवृत्तीनाथ महाराज अभंग सार्थ गाथा

बुद्धि बोध नाहीं क्षमारूप सर्व अभंग क्र.२०६

बुद्धि बोध नाहीं क्षमारूप सर्व । तेथे देहभाव अर्पियेला ॥१॥
नाही काळ वेळ नाहीं तो नियम । सर्व यम नेम बुडोनि ठेले ॥२॥
हरिरूप सर्व गयनि प्रसादे । ते सर्व हा गोविन्द आम्हां दिसे ॥३॥
निवृत्ति सफळ गयनि वोळला । सर्वकाळ जाहला हरिरूप ॥४॥

अर्थ: त्याचा अंगीकार केला की बुध्दीला त्याच्या शिवाय बोध नसतो व द्वैतभावच राहात नाही म्हणून सर्वत्र क्षमा तो देऊ लागतो म्हणजेच देहभाव त्याला अर्पण झाला असे समजते. त्याच्याशी एकरुप झाले की मग काळ वेळ यांची गणती गौण होते. सर्व यमनियम, नेम तोच होऊन जातात.गहिनीनाथांच्या कृपेने ती अवस्था लाभल्या मुळे मी हरिरुप झालो सर्वत्र गोविंदच दिसु लागला. निवृत्तिनाथ म्हणतात, गहिनीनाथांच्या सफळ अनुग्रहामुळे सर्व काळ माझ्या साठी हरिरुप पावते झाले.

व्योमामाजि तारा असंख्य लोपति अभंग क्र.२०७

व्योमामाजि तारा असंख्य लोपति । तैसे लक्ष्मीपती माजी विरो ॥१॥
धन्य दिवस नित्य सेवूं श्रीरामास । जनवनसमरस पूर्णबोधें ॥२॥
तारा ग्रह दि त्या माजि उन्मन । प्रपंचाचें भान दुरी ठेलें ॥३॥
निवृत्ति निमग्न नाम सेविताहे । ब्रह्मपण होय सदोदीत ॥४॥

अर्थ: अवकाशात निखऴलेला तारा जसा लुप्त होतो तसे सर्व काही त्या हरिरुपात लोप पावते. जसा जसा तो श्रीराम अंतःकरणात नामरुपाने स्थापित झाला की सर्व जन वन समरस असल्याचा बोध होतो. तसे केल्याने प्रपंचाचे भानच राहात नाही. जसे दिवसा तारे सुर्य प्रकाशामुळे दिसत नाहीत. निवृत्तिनाथ म्हणतात, मी सतत नामचिंतनात निमग्न असल्यामुळे सतत ब्रह्मपणाचे सुख सेवन करत आहे.

खुंटलें तें मन तोडियेली गति अभंग क्र.२०८

खुंटलें तें मन तोडियेली गति । वेळु तो पुढती मोडियला ॥१॥
जाहालें उन्मन विरालें तें मन । श्रीरामचरण पुरे आम्हां ॥२॥
गेलें मन रामीं निष्काम कल्पना । बुडाली वासना तिये डोही ॥३॥
धन्य ते चरण नित्यता स्मरण । अखंडसंपन्न प्रेम देतु ॥४॥
अमृत कुपिका अमृताचा झरा । पटु येकसरा वाहातुसे ॥५॥
निवृत्तीची वृत्ति प्रेमेंचि डुल्लत । नमनेम निश्चित रामपायीं ॥६॥

अर्थ: आम्ही आत्मारामशी जोडलो गेल्याने मनाची धाव खुंटली त्याची गती निमाली व वेळेचे बंधन ही राहिले नाही.त्या श्रीराम चरणाला विनटल्यापासुन मन उन्मन झाले. मनात राम बसल्यावर कल्पना निष्काम झाली व वा़सना ठायीच बुडुन गेली. त्या रामचरणाचे नित्य स्मरण केल्याने धन्यता मिळाली व अखंड प्रेमाचा झरा हृदयात वाहु लागला. रामनामामुळे अमृताची कुपीका हाती आली व तो अमृत झरा प्रेमपाटातुन सतत वाहता झाला.निवृत्तिनाथ म्हणतात मी रामनामाच्या मुळे प्रेमाने डुल्लत आहे त्यामुळे त्या श्रीराम पायावर मी विनटलो आहे.

सौजन्य समाधान सर्व जनार्दन अभंग क्र.२०९

सौजन्य समाधान सर्व जनार्दन । आम्हां रूपेंधन इतुके पुरें ॥१॥
गोपाळ माधव कृष्णरूपें सर्व । ब्रह्मपद देव सकळ आम्हां ॥२॥
द्वैतभाव भावो अद्वैत उपावो । सर्व ब्रह्म देवो एक ध्यावो ॥३॥
निवृत्तीचा भावो सर्व आत्मा रावो । हरि हा अनुभवो वेदमतें ॥४॥

अर्थ: जगतातील सर्व रुपे आम्ही जनार्दन रुपातच पाहतो त्यामुळे आम्हाला समाधान लाभते व सर्वांबरोबर आम्ही सौजन्याने पाहतो हेच आमचे धन पुरेसे आहे. कधी तो गोपाळ तर की माधव तर कधी कृष्ण होतो पण आम्ही त्याच्यात ब्रह्मपणच पाहातो. आमच्या द्वैतभावाचा पूर्ण निरास होऊन आम्ही अद्वैतात त्याला एकत्वाने ब्रह्मस्वरुपात जाणतो. निवृत्तिनाथ म्हणतात, माझा भाव त्याच्याशी एकरुप झाल्याने तो आत्माराम सर्वत्र एकरुपात मी पाहतो व वेदांचा ही त्या हरिरुपाबद्दलच तेच मत आहे.

मातेचें बाळक पित्याचें जनक अभंग क्र.२१०

मातेचें बाळक पित्याचें जनक । गोत हें सम्यक हरि आम्हां ॥१॥
मुकुंद केशव हाचि नित्य भाव । हरि रूप सावेव कृष्ण सखा ॥२॥
पूर्वज परंपरा तें धन अपारा । दिनाचा सोयिरा केशिराज ॥३॥
निवृत्तीचे गोत कृष्ण नामें तृप्त । आनंदाचें चित्त कृष्णनामें ॥४॥

अर्थ: पिता मुलांचा जन्म देणारा व माता त्या बालकाचे पालनपोषण करणारी असते ती दोघ ही हरिरुप असुन सर्व गोत्रज आम्हाला हरिरुपच भासतात. मुकुंद, केशव जरी म्हंटले तरी तो आम्हाला हरिरुपच आहे. त्याच हरिरुपात तो कृष्ण म्हणुन ही दिसतो.आमच्या पुर्वजांची परंपरा हेच आमचे अपार धन असुन केशीराजाचे चिंतन हीच आमची परंपरा आहे. निवृत्तिनाथ म्हणतात, कृष्णनामाने तृप्त झालेले आमचे गोत्रज आहेत त्यामुळे कृष्णनामाचा आनंद चित्तात भरुन उरला आहे.

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

संत
वारकरी संत
संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
निवृत्तीनाथ महाराज सार्थ अभंग गाथा
सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर महाराज सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर महाराज अभंग गाथा
ज्ञानेश्वर महाराज अभंग गाथा
ज्ञानेश्वर महाराज सार्थ अभंग गाथा
संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
ई-संपादक
धनंजय विश्वासराव मोरे
(B.A./D.J./D.I.T.)
आवृती पहिली दिनांक : २६/०९/२०१५
मु. मंगलवाडी पोस्ट. भर ता. रिसोड जिल्हा वाशिम ४४४५०६

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *