संत निवृत्तीनाथ महाराज अभंग सार्थ गाथा २१६ ते २२०

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

संत निवृत्तीनाथ महाराज अभंग सार्थ गाथा

प्रपंच टवाळ वृक्षाचें फळ अभंग क्र.२१६

प्रपंच टवाळ वृक्षाचें फळ । उपटिलें मूळ कल्पनेचें ॥१॥
गेली ते वासना निमाली भावना । चुकलें बंधना यमपाश ॥२॥
उपजत मूळ खुंटलें तें जाळ । मायेचें पडळ हरपलें ॥३॥
निवृत्तिस्वानंद नित्यता आनंद । जग हा गोविन्द आम्हां पुरे ॥४ ॥

अर्थ: शंके मुळे वाढणाऱ्या मायारुप प्रपंच वृक्षाचे अविद्या फळ आहे. पण मी शंकारुप प्रपंच मुळालाच उपटुन टाकले आहे. त्या मुळे इच्छारुप वासना गेली व प्रपंच निष्ठारुप भावना निमाली व यमराजाच्या फासबंधनातुन मुक्तता लाभली.मुळमायेचे उपजत पडल राहिले नाही त्यामुळे मायेचे मुळच उखडले गेले. निवृत्तिनाथ म्हणतात, जग हे गोविंद आहे हे स्विकारल्यामुळे आम्ही त्या योगे नित्य स्वानंद भोगत आहोत.

कल्पना कोंडूनि मन हें मारिलें अभंग क्र.२१७

कल्पना कोंडूनि मन हें मारिलें । जीवन चोरिले सत्रावीचें ॥१॥
साजीव सोलीव निवृत्तिची ठेव । कृष्ण हाचि देव ह्रदयीं पूजी ॥२॥
विलास विकृति नाहीपै आवाप्ति । साधनाची युक्ति हारपली ॥३॥
निवृत्ति कारण योगियांचे ह्रदयीं । सर्व हरि पाही दिसे आम्हां ॥४॥

अर्थ: शंकारुपी कल्पनेला मी मनासकट काढुन टाकल्या मुळे लिंगदेहाची सतरावी जीवनकला तोच आत्मा आहे. तोच आत्माराम चोरला. साजीव सोलीव असणारा कृष्ण तोच माझा ठेवा आहे. त्याचीच पूजा मी हृदयात करतो. त्यासाठी कोणत्याही साधनाची गरज राहात नाही त्या मुळे विलास विकृती यांची व्याप्ती उरली नाही.निवृत्तिनाथ म्हणतात, जो परमात्मा योग्यांचे कारण आहे तोच मला जगात सर्वत्र दिसतो.

नामरूप सोय नाहीं जया रूपा अभंग क्र.२१८

नामरूप सोय नाहीं जया रूपा । तेंथिलये कृपा खेळों आम्हीं ॥१ ॥
आम्हां हेंचि रूप अद्वैत स्वरूप । नाहीं तेथें किं लाभ कल्पनेचा ॥२॥
ध्येय ध्यान खुंटे प्रपंच आटे । नाम हें वैकुंठा नेतु असे ॥३॥
निवृत्ति साधन वृत्तिच संपन्न । नाम हें जीवन अच्युताचें ॥४॥

अर्थ: त्याला नामा नाही रुप नाही जो निर्गुण आहे त्या ब्रह्मस्वरुपाच्या कृपेमुळे आम्ही जगतात खेळताना दिसतो.आमच्या साठी हे अद्वैत स्वरुपच महत्वाचे आहे.त्यामुळे मनाला कल्पनेप्रमाणे जाता येत नाही. ह्या नामाचा जप केला ध्येय ध्यान हे जागीच मुरडुन जाते व वैकुंठाची वाट सोपी होते.निवृत्तिनाथ म्हणतात, त्या नामसाधनेचा परिपाठ ठेवला तर आपले जीवनच अच्युतमय होते.

कल्पितें कल्पिलें चित्त आकळिलें अभंग क्र.२१९

कल्पितें कल्पिलें चित्त आकळिलें । तन्मय घोळिलें चैतन्याचें ॥१॥
सांग माये कैसें कल्पिलें कायसे । सर्व ह्रषीकेश दिसे आम्हां ॥२॥
निवृत्ति समरस सर्व ह्रषीकेश । ब्रह्मींचा समरस कल्पने माजी ॥३॥

अर्थ: मायिक संसाराच्या कल्पनेपासुन आपले मन काढुन घेतले की आत्मारामरुप चैतन्याचा प्रवेश मनात होतो. हे माये तु ह्या संसाराबद्दल काय कल्पना केली आहेस.पण आता तो हृषीकेशच आम्हाला सर्वत्र दिसत आहे. निवृत्तिनाथ म्हणतात, आमची कल्पनाच ब्रह्नस्वरुपाशी समरस झाल्याने आम्ही सर्वभावे त्या हृषीकेशाशी समरस झालो.

नाहीं जनीं विजनीं विज्ञानीं अभंग क्र.२२०

नाहीं जनीं विजनीं विज्ञानीं । निर्गुण काहाणीं आम्हां घरीं ॥१॥
सुलभ हरि दुर्लभ हरि । नांदे माजघरी आमचीये ॥२॥
आनंदे सोहळा उन्मनीचि कळा । नामचि जिव्हाळा जिव्हे सदा ॥३॥
निवृत्ति देवीं धरिली निर्गुणीं । शांति हे संपूर्णी हरीप्रेमें ॥४॥

अर्थ: ज्या गोष्टी जनामध्ये वनामध्ये व प्रपंचाच्या ज्ञानात नाहीत त्या निर्गुण कहाण्या आमच्या घरात आहेत. जरी तो परमात्मा सुलभ मानला किंवा दुर्लभ मानला कसाही मानला तरी तो आम्हा सोबत आमच्या घरी आहे. आमच्या जिव्हेला त्याच्या नामाचा छंद लागल्या मुळे आम्ही सतत आनंदी व उन्मनी अवस्थेत सुख भोगत आहोत. निवृत्तिनाथ म्हणतात, त्या निर्गुण हरिला प्रेमाने आम्ही हृदयात धरल्यामुळे आम्हाला सतत शांती प्राप्त होते.

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

संत
वारकरी संत
संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
निवृत्तीनाथ महाराज सार्थ अभंग गाथा
सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर महाराज सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर महाराज अभंग गाथा
ज्ञानेश्वर महाराज अभंग गाथा
ज्ञानेश्वर महाराज सार्थ अभंग गाथा
संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
ई-संपादक
धनंजय विश्वासराव मोरे
(B.A./D.J./D.I.T.)
आवृती पहिली दिनांक : २६/०९/२०१५
मु. मंगलवाडी पोस्ट. भर ता. रिसोड जिल्हा वाशिम ४४४५०६

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *