संत निवृत्तीनाथ महाराज अभंग सार्थ गाथा १६१ ते १६५

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

संत निवृत्तीनाथ महाराज अभंग सार्थ गाथा

जेथें न रिघे ठाव लक्षितां लक्षणे अभंग क्र.१६१

जेथें न रिघे ठाव लक्षितां लक्षणे । सूर्य तारांगण हरपती ॥
तें रूप रूपस कृष्णब्रह्मनाम । गौळिया सप्रेम वोळलेंसे ॥
जेथें लय लक्ष हरपोन सोये । द्वैत तें न साहे सोहंबुद्धि ॥
निवृत्ति मान्यता सेवितु साकार । आपण आपार गोपवेषे ॥

अर्थ: त्या परब्रह्माचे लक्षित लक्षण पाहिले तर त्याचा ठाव घेता येत नाही. त्याच्या स्वरुपात अनेक सुर्य तारांगणे हरपतात. ते मोठ्या प्रेमाने गौळियांना भेटणारे ते सुंदर रुप म्हणजे कृष्णरुप आहे. त्याच्या रुपात लक्षचा लय होऊन हरपुन जाते व सोहं ब्रह्म ही उपाधी ही द्वैत वाटायला लागते व जीव शिवाचे ऐक्य होते. निवृतिनाथ म्हणतात, ज्या गोपाळ वेशाचा आधार घेऊन ते परब्रह्म आले आहे. त्यांची मी अपार सेवा करतो.

मी पणे सगळा वेदु हरपला अभंग क्र.१६२

मी पणे सगळा वेदु हरपला । शास्त्रांचा खुंटला अनुवाद ॥
तें रूप सुंदर कृष्ण नाम सोपार । निरालंब गोचर गोकुळींचे ॥
सेविता योगियां सुलभ दुर्गम । गौळियां सुगम नाम घेतां ॥
निवृत्ति निकट कृष्णनामसार । पापाचा संचार नाम छेदी ॥

अर्थ: ज्याचे वर्णन करायला मी पणा न सोडलेले वेद गेले ते तिथेच हरपले तर शास्त्रांना त्याचे वर्णन करता आले नाही.तेच परब्रह्म सुंदर व देखणे सगुण रुप घेऊन कृष्णनाम धारण करुन गोकुळात अवतरले आहे. सर्वत्र व्यापक व सोपे असणारे ते परब्रह्म योग्यांना समजायला अवघड होते व सगुण कृष्णरुपाच्या नामा मुळे त्या गौळ्यांना सोपे झाले आहे. निवृत्तिनाथ म्हणतात, त्या कृष्णनामाच्या प्रभावाने पापाचा समुळ नाश होतो त्याच नामाचा मी निकट आश्रय केला आहे.

हरिदास संगे हरिदास खेळे अभंग क्र.१६३

हरिदास संगे हरिदास खेळे । ब्रह्मादिक सोहळे भोगिताती ॥
संतमुनिदेवसनकादिक सर्व । तिहीं मनोभाव अर्पियेला ॥
पुंडलिकफळ वोळले सकळ । शंकर सोज्वळ प्रेमें डुले ॥
निवृत्ति लोळत चरणरजीं लाटा । माजि त्या वैकुंठा आत्मलिंगीं ॥

अर्थ: हरिच्या दासा सोबत घालवलले वेळ हरिदासासाठी जे ब्रह्मादिक सोहळे भोगतात तसाच असतो. हरिदास म्हणजे त्याचे नाम घेणारे संत मुनी देव सनकादिक ज्यांनी आपल्या सर्व इच्छा त्याच्या पायाशी अर्पित केल्या आहेत.त्याच मुळे संत पुंडलिकाच्या कृपेमुळे ते सगुण परब्रह्मचे प्रेम आपल्याला प्राप्त झाले आहे. तेच प्रेम मिळाल्यामुळे महादेव शंकर ही डोलत असतात.निवृतिनाथ म्हणतात, त्या आत्मलिंग असणाऱ्या श्री विठ्ठलाच्या चरणरजांच्या लाटात मी लोळत पडलो आहे.

सोपान संवगडा स्वानंद ज्ञानदेव अभंग क्र.१६४

सोपान संवगडा स्वानंद ज्ञानदेव । मुक्ताईचा भाव विठ्ठलराज ॥ 
दिंडी टाळघोळ गाती विठ्ठल नाम । खेचरासी प्रेम विठ्ठलाचें ॥
नरहरि विठा नारा ते गोणाई । प्रेम भरित डोहीं वोसंडती ॥
निवृत्ति प्रगट ज्ञानदेवा सांगे । पुंडलिकसंगे हरि खेळे ॥

अर्थ: सोपे नाम जपणारा सोपान, नित्य स्वानंद स्वरुप प्राप्त करणारे ज्ञानदेव व श्री विठ्ठलावर प्रचंड भाव असणारी मुक्ताई सोबत आहे. विसोबा खेचरासही त्या विठ्ठलाचे प्रेम लाभल्यामुळे हे सर्व टाळ दिंडी घेऊन त्या विठ्ठलाचे नाम घोळवत आहेत. नरहरी सोनार, विठा, नारा ही नामदेवांची मुले व गोणाई हे सुध्दा त्या विठ्ठला नाम डोहात प्रेमभरित झाले आहेत. निवृतिनाथ ज्ञानदेवाला स्पष्ट सांगतात हे ज्ञानराजा तो पुंडलिक श्री विठ्ठलाबरोबर खेळत आहे.

वोळलें दुभतें सर्वांसि पुरतें अभंग क्र.१६५

वोळलें दुभतें सर्वांसि पुरतें । प्रेमाचें भरतें वैष्णवासी ॥
वोळतील चरणीं वैष्णव गोमटे । पुंडलिकपेठें हरि आला ॥
सोपान खेंचर ज्ञानदेव लाठा । देताती वैकुंठा क्षेम सदा ॥
निवृत्तीनें ह्रदयीं पूजिलें तें रूप । प्रत्यक्ष स्वरूप विठ्ठलराज ॥

अर्थ: सर्व इच्छा प्राप्त करणारी श्री विठ्ठल नाम कामधेनु सर्व वैष्णवांना मिळाल्याने त्यांना प्रेमाचे भरते आले आहे. संत पुंडलिकामुळे पंढरीपेठेत तो श्री विठ्ठल आल्याने त्याच्या चरणकमलांचा लाभ वैष्णव घेत आहेत. सोपानदेव, विसोबा खेचर व सर्वात मोठा वैष्णव ज्ञानराज हे त्या वैकुंठपीठाला श्री विठ्ठलाला क्षेम देत आहेत. निवृतिनाथ म्हणतात, ज्या रुपाला मी हृदयात पूजले तेच रुप श्री विठ्ठल बनुन प्रत्यक्ष स्वरुपात अवतरले.

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

संत
वारकरी संत
संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
निवृत्तीनाथ महाराज सार्थ अभंग गाथा
सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर महाराज सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर महाराज अभंग गाथा
ज्ञानेश्वर महाराज अभंग गाथा
ज्ञानेश्वर महाराज सार्थ अभंग गाथा
संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
ई-संपादक
धनंजय विश्वासराव मोरे
(B.A./D.J./D.I.T.)
आवृती पहिली दिनांक : २६/०९/२०१५
मु. मंगलवाडी पोस्ट. भर ता. रिसोड जिल्हा वाशिम ४४४५०६

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *