संत निवृत्तीनाथ महाराज अभंग सार्थ गाथा १७१ ते १७५

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

संत निवृत्तीनाथ महाराज अभंग सार्थ गाथा

कांसवीचीं पिलीं करुणा भाकी अभंग क्र.१७१

कांसवीचीं पिलीं करुणा भाकी । परि सांपडलीं निकीं चरणसोय ॥
कामधेनु घरीं हरि माझा गोपाळ । मज काळवेळ नाठवें तैसी ॥
चातका चिंतिता जरी नपवे जीवन । तरीच शोकें प्राण तृषा हेतु ॥
निवृत्ति स्वानंदु कामधेनु गुरु । नामाचा उच्चार तेणें छंदें ॥

अर्थ: कासवीला स्तन नसतात त्यामुळे कासवीच्या पिलानी त्याच्या चरणकमलांची याचना केली व दृष्टीतुन प्रेमपान्हा पाजायचे वरदान कासवीला मिळाले.त्यामुळे त्या हरिचरणांवर शरणागती केली तर तीच कामधेनु त्या भक्ताघरी येऊन राहते मग तो निवांत काळवेळातीत होऊन हरिभजनात लीन होऊ शकतो. चातक पक्षी जमिनीवरचे पाणी पित नाही पावसाचे पाणी पितो व तो पडलाच नाही तर शोक ग्रस्त होऊन तृषार्थ होऊन त्याचे चिंतन करतो. निवृतिनाथ म्हणतात सतत स्वानंदात राहणारी माझी गुरुमाऊली माझी कामधेनु झाल्यामुळे मी सतत नामस्मरणाचा छंद जोपासत आहे.

आदिनाथ उमाबीज प्रकटिलें अभंग क्र.१७२

आदिनाथ उमाबीज प्रकटिलें । मछिंद्रा लाधली सहजस्थितीं ॥
तेचि प्रेममुद्रा गोरक्षा दिधली । पूर्ण कृपा केली गयनिनाथा ॥
वैराग्यें तापला सप्रेमें निवाला । ठेवा जो लाधला शांतिसुख ॥
निर्द्वद्व निःशंक विचरतां मही । सुखानंद ह्रदयीं स्थिर जाला ॥
विरक्तीचें पात्र अन्वयाचें मुख । देऊनि सम्यक अनन्यता ॥
निवृत्ति गयनी कृपा केली असे पूर्ण । कूळ हें पावन कृष्णनामें ॥

अर्थ: आदिनाथ शंकराकडुन पार्वती ज्ञान ऐकत असताना त्या क्षिरसागरात सहजस्थितीत असणाऱ्या मछिंद्रनाथाना लाभ झाला.तीच प्रेमनाममुद्रा मछिंद्रनाथानी गोरक्षनाथांना दिली व गोरक्नाथांकडुन ती कृपा गहिनीनाथांना ती प्राप्त झाली.ज्यांच्या कडे धगधगीत वैराग्य आहे. व त्यांच्या हृदयात प्रेम आहे त्यांना शांती सुखाचा ठेवा प्राप्त होतो. ज्याच्या कडे कोणते ही द्वैत नाही व त्याला कोणतीही त्याच्या स्वरुपाबद्दल शंका नाही व जो सतत पृथ्वीवर फिरत राहुन जनांवर कृपा करतो त्याच्या हृदयात तो सुखानंद परमात्मा वास करतो. जो पुर्ण विरक्त आहे व वेदांना शरण जाऊन जो वेदोक्त मुखाने करतो त्याला तो परमात्मा सम्यक व अन्यन ज्ञान प्रदान करतो. निवृतीनाथ म्हणतात, श्री गुरु गहिनीनाथांनी कृपा करुन हे गुह्य ज्ञान मला दिल्याने माझे कुळ पावन झाले आहे.

चेतवि चेतवि सावधान जिवीं अभंग क्र.१७३

चेतवि चेतवि सावधान जिवीं । प्रकृति मांडवी लग्न वोजा ॥
मातृका मायानिवेदन हरि । प्रपंचबोहरि रामनामें ॥
निवृत्तिदेवीं अद्वैत परणिली शक्ति । निरंतर मुक्ति हरि नामें ॥

अर्थ: हे जीवा अज्ञानाच्या झोपेतुन जागा हो ज्ञानचेतना घे हे सावधान मंगलाष्टक आहे. अविद्येच्या मंडपात माये बरोबर तुझे लग्न लागले आहे. मातृका म्हणजे मायेचे पूजन असते शक्तीची रुपे आहेत किंवा शक्ती म्हणजेच माया तिची रुपे आहेत अश्या ह्या मायिक मातृकांचे पुजन करुन त्या प्रपंचा सह रामनाम घेत त्यालाच देऊन टाक. निवृत्तीनाथ म्हणतात ती माया देऊन टाकल्यामुळे मुक्ती नावाची कन्या प्राप्त होते व तिच्याशी परिणय केला म्हणजे शक्तीरुप निरंतर मुक्ती प्राप्त होते.

हरि आत्मा होय परात्पर आलें अभंग क्र.१७४

हरि आत्मा होय परात्पर आलें । नाम हें क्षरलें वेदमतें ॥
वेदांतसिद्धांत नाहीं आनुहेत । सर्वभूतीं हेत हरि आहे ॥
हरिवि न दिसे गुरु सांगतसे । हरि हा प्रकाशे सर्व रुपीं ॥
निवृत्तिनें कोंदले सद्‌गुरूंनीं दिधलें । हरिधन भलें आम्हां माजी ॥

अर्थ: आत्मतत्व हेच हरिरुप आहे व आत्मा व हरि हे परात्पर आहेत त्याच हरिचे नाम ही त्याच्या रुपा सारखे अनंत स्वरुप आहे असे वेद सांगतात. सर्वामध्ये तो हरि आहे हा वेदाचा एकमेव हेतु व सिध्दांत आहे. श्री गुरुनी सांगितल्या प्रमाणे तो हरिच मला सर्व पदार्थात दिसतो व तोच हरि ज्ञानप्रकाश बनुन आला आहे. निवृतिनाथ म्हणतात, श्री गुरु गहिनीनाथांनी हे ज्ञान दिल्यामुळे तेच आमचे नामधन आम्हामध्ये भरले आहे.

सुमनाची लता वृक्षीं उपजली अभंग क्र.१७५

सुमनाची लता वृक्षीं उपजली । ते कोणे घातली भोगावया ॥
तैसा हा पसारा जगडंबर खरा । माजि येरझारा शून्यखेपा ॥
नाहीं त्यासि छाया नाहीं त्यासी माया । हा वृक्ष छेदावया विंदान करी ॥
निवृत्तिराज म्हणे गुरुविण न तुटे । प्रपंच सपाटे ब्रह्मीं नेम ॥

अर्थ: फुलांच्या वेली शेजारील झाडाचा आधार घेऊन वाढतात मग त्या वेलींच्या फुलांचा सुगंध कोण भोगतो. त्यानुसार जगताचा पसारा हा खरा नाही मायेच्या आधिन आहे म्हणुन मिथ्या आहे. व जीव जन्म व मृत्युच्या येरझारा त्यामध्ये घालत असतो. त्या मायीक वृक्षाकडुन कृपेची छाया मिळु शकत नाही. म्हणुन हा मायिक वृक्ष तोडण्याचा प्रयत्न काहीनी केला. निवृतीनाथ म्हणतात हा मायिक वृक्ष कोणत्याही उपायाने साधनाने तुटत नाही गुरुकृपा झाली की जीवाला ब्रह्मावस्था प्राप्त होते व तो सहज स्थितीत जातो तरी प्रपंच पसारा उतरत नाही.

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

संत
वारकरी संत
संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
निवृत्तीनाथ महाराज सार्थ अभंग गाथा
सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर महाराज सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर महाराज अभंग गाथा
ज्ञानेश्वर महाराज अभंग गाथा
ज्ञानेश्वर महाराज सार्थ अभंग गाथा
संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
ई-संपादक
धनंजय विश्वासराव मोरे
(B.A./D.J./D.I.T.)
आवृती पहिली दिनांक : २६/०९/२०१५
मु. मंगलवाडी पोस्ट. भर ता. रिसोड जिल्हा वाशिम ४४४५०६

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *