संत निवृत्तीनाथ महाराज अभंग सार्थ गाथा २११ ते २१५

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

संत निवृत्तीनाथ महाराज अभंग सार्थ गाथा

विश्रामीचा श्रम आश्रम पैं नेम अभंग क्र.२११

विश्रामीचा श्रम आश्रम पैं नेम । जप हा परम आत्मलिंगीं ॥१॥
निवृत्ति घन दाट कृष्णरूपें आम्हा । अखंड पूर्णिमा नंदाघरीं ॥२॥
निवृत्तिचित्ताची गेली लगबग । केला अनुराग कृष्णरूपीं ॥३॥
निवृत्ति धारणा कृष्णनाम सार । सर्वत्र आचार हरिहरि ॥४॥

अर्थ: ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ व संन्यास ह्या चारी आश्रमात झालेला श्रम आत्मलिंगाच्या जपाने निवृत होतो व शाश्वत आराम प्राप्त होतो.मला ते आत्मलिंग सर्वत्र कृष्णरुपाने ओतप्रोत भरल्याचे दिसत आहे. जसा पौर्णिमेच्या पूर्णचंद्रासारखा त्याच्या उदय नंदाघरी झाला आहे. त्याला तशा रुपात पाहण्याने माझ्या चित्ताची लगबग निवृत झाली व ता कृष्णरुपाचा मी अनुराग केला. निवृत्तिनाथ म्हणतात, ते कृष्णनामाची धारणा मला झाल्यामुळे तो हरिरुपाने सर्वत्र मला जाणवत आहे.

तिहींचे त्रिगुणें रजतममिश्रित अभंग क्र.२१२

तिहींचे त्रिगुणें रजतममिश्रित । त्यामाजि त्वरित जन्म माझा ॥१॥
सर्व पुण्य चोख आचरलों आम्हीं । तरिच ये जन्मीं भक्ति आम्हां ॥२॥
शांति क्षमा दया निवृत्ति माउली । अखंड साउली कांसवदृष्टि ॥३॥
निवृत्ति म्हणे तेंचि गा जीवन मोल । भिवरा विठ्ठल दैवत आम्हां ॥४॥

अर्थ: माझा जन्म सत्व, रज, तम ह्या तिन्ही गुणांच्या मुळे त्याच्या इच्छेने लवकर झाला. आम्ही निष्काम पुण्याई मुळे ह्या जन्मी भक्ती करायला आधिकारी झालो.कासवी जशी प्रेमपान्हा नजरेतुन पाजुन पिले जगवते तसे शांती दया क्षमा देऊन त्याने मला जगवले. निवृत्तिनाथ म्हणतात, त्या भिवरे काठच्या विठुमाऊली मुळे आमच्या जीवनाला मोल आले.

चातकाचें ध्यान मेघाचें जीवन अभंग क्र.२१३

चातकाचें ध्यान मेघाचें जीवन । आम्हां नारायण तैसा सखा ॥१॥
चकोरा अमृत चंद्र जिववितें । भक्तांसि दुभतें हरि आम्हां ॥२॥
विश्रांतीसी स्थळ वैकुंठ सफळ । दुभतें गोपाळ कामधेनु ॥३॥
आशापाश नाहीं कर्तव्या कांही । चिंतामणि डोहीं एकविध ॥४॥
समिरासगट गति पावली विश्रांति । नामरूप जाति भेदशून्य ॥५॥
नामाची हे धणी तेचि हो पर्वणी । तृप्तातृप्त कृष्णीं होतु आम्हां ॥६॥
सांडिले पैं द्वैत दिधलें पै अद्वैत । हरीविण रितें न दिसे आम्हां ॥७॥
निवृत्ति परिवार मुक्तलाग अरुवार । रत्नांचा सागर नामें वोळे ॥८॥

अर्थ: चातक पक्षी जसा मेघांची आतुर होऊन वाट पाहतो तसेच आतुर आहे होऊन आम्ही नारायणाचे ध्यान करतो. चकोराला चंद्राकडुन जसे अमृत मिळते तसे तो आम्हा भक्तांसाठी दुभत असतो. ते गोपाळनाम कामधेनु चे दुभते मिळाले की वैकुंठीची विश्रांती आम्हाला लाभते. तो चिंतामणी होऊन आम्हा बरोबर एकविध झाल्यामुळे आमचे आशापाश तुटले आहेत व त्याच्या शिवाय कोणतेही कर्तव्यं उरले नाही. आमच्या जीवनदायी वायुच्या गतीलाही त्याच्यामुळे विश्रांती मिळते. त्यामुळे नाम, रुप व जातीचे भेद मावळले. त्याचे नामरुपाचे अमोघ धनाची पर्वणी आम्ही साधली त्यामुळे त्या श्रीकृष्णाने आम्हाला तृप्त केले.आम्ही द्वैत सांडुन अद्वैत साधल्यामुळे तो हरिच सर्व व्यापला आहे रिता ठाव नाही ही अनुभुती प्राप्त झाली.निवृत्तिनाथ म्हणतात, आम्ही मुक्त होण्यासाठी मनात हळुवार प्रवेश करुन नामसागरातील रत्ने मिळवली.

साधक बाधक न बाधी जनक अभंग क्र.२१४

साधक बाधक न बाधी जनक । सर्व हरि एक आम्हां असे ॥१॥
हरिविण नाहीं हरिविण नाहीं । हरि हेंचि पाही एकरूप ॥२॥
हरि माझा जन हरि माझें धन । हरि हा निर्गुण सर्वांठायीं ॥३॥
निवृत्ति हरिलीळा दिनकाळ फळला । निमिशोनिमिषकळा हरिजाणे ॥४॥

अर्थ: तो हरि आमचा झाल्या पासुन अनुकुल प्रतिकुल साधक बाधकता आम्हाला बांधु शकत नाही. हरिविण दुसरे काही आम्ही पाहात नाही तोच हरि एकत्वाने आम्ही पाहतो. सर्वाठायी निर्गुण असणारा तो हरी माझे जन ही आहे व धन ही आहे. निवृत्तिनाथ म्हणतात, त्या हरिलीलेने प्रत्येक क्षणची कळा हरिमय झाली.

त्रैलोक्य पावन जनीं जनार्दन अभंग क्र.२१५

त्रैलोक्य पावन जनीं जनार्दन । त्यामाजि परिपूर्ण आत्मज्योति ॥१॥
नाहीं आम्हां काळ नाहीं आम्हा वेळ । अखंड सोज्वळ हरि दिसे ॥२॥
ब्रह्म सनातन ब्रह्मीचे अंकुर । भक्तिपुरस्कार भूतें रया ॥३॥
निवृत्ति म्हणे दीन दुबळ मी एक । मनोमय चोख आम्हां गोड ॥४॥

अर्थ: स्वर्ग, मृत्यू व पाताळ ह्या तिन्ही लोकांत तो जनार्दन परिपूर्ण आत्मज्योत घेऊन त्रैलोकाला पावन करतो.आम्हाला काळ वेळेचे बंधन नाही अखंडपणे त्या सोज्वळ हरिचे सानिध्य असते. जे भक्त जीवदशेत त्याचा पुरस्कार करतात ते ब्रह्मदशेचे कोंब होतात.निवृत्तिनाथ म्हणतात मी एक दीन दुबळा आपले मनोगत सांगतो आहे. ते मनात घर करुन राहिलेले स्वरुप शाश्वत आहे व ते आम्हाला आवडते.

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

संत
वारकरी संत
संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
निवृत्तीनाथ महाराज सार्थ अभंग गाथा
सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर महाराज सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर महाराज अभंग गाथा
ज्ञानेश्वर महाराज अभंग गाथा
ज्ञानेश्वर महाराज सार्थ अभंग गाथा
संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
ई-संपादक
धनंजय विश्वासराव मोरे
(B.A./D.J./D.I.T.)
आवृती पहिली दिनांक : २६/०९/२०१५
मु. मंगलवाडी पोस्ट. भर ता. रिसोड जिल्हा वाशिम ४४४५०६

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *