संत चोखामेळा म. चरित्र २२

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

संत चोखामेळा  भाग  –  २२.

संत चोखामेळा चरित्र सर्व भाग पहा

आतांपर्यंत आपल्या कुशीत बाळ निजलय ही जाणीव सोयराला नव्हती, पण आपण आईच्या कुशीत असल्याची जाणीव त्या कोवळ्या जिवाला नक्कीच होती.कुशीत वळवळणार्‍या बाळाला पाहुन ती अंतर्बाह्य थरारली.तीला आठवली ती कालची वादळी रात्र, तो घोंगावणारा वारा,तो प्रलयंकारी पाऊस, भयान अंधार,पोटातुन येणार्‍या त्या जीव घेण्या कळा,मारलेल्या किंकाळ्या, केलेला देवाचा धावा,असहाय्य एकटे पणा,ती हरपणारी शुध्द आणि शुध्द हरपण्यापुर्वी आलेली निर्मळा!निर्मळा? खरच कुठाय निर्मळा?धनी कुठाय? निर्मळा तर एकटीच दिसली.असेल बाहेर काम करत.एवढ्या विचारानेही तिला थकवा आला.कांही वेळ गेला,बाहेर कांहीच चाहुल लागेना.तिला प्रचंड भूक लागली होती.तिने निर्मळा म्हणुन आवाज दिला पण प्रत्युत्तर आले नाही. तशीच हात टेकत सावकाश उठली.कशी तरी चुलीजवळ जाऊन कालचे अन्न खाल्ले.प्रसुतीवेदनाने शिणलेले शरीर, अन्न पोटात गेल्याने थोडे बरे वाटले.ती कशीतरी अंथरुणापर्यंत आली व तीला झोप लागली.दरवाजा उघडण्याच्या आवाजाने तीला जाग आली,बघते तो काय?दारांत चोखोबा व निर्मळा!श्रांत, क्लांत निजलेली सोयरा,कुशीत पहुडलेले बाळ!चोखोबा व निर्मळा सोयराकडे धावले.सोयरा कशी आहेस?भागीरथी काकी आली होती कां? खुप त्रास झाला कां ग?लवकर येतो म्हणुन गेलो पण, पावसाने वाट अडवली.निर्मळेकडे पोहचायलाच मध्यरात्र झाली.तिथे जराही न थांबतां निर्मळाला घेऊन तडक निघालो पण येतांनाही नदी नाले वैरी बनुन वाट अडवली.येईस्तोवर उजाडलेच बघ!मुलगाच झाला ना ग गोपालकृष्णा सारखा?सोयरा चोखाचे बोलणे ऐकुन भांबावुन गेली.तीला कांहीच कळेना, उलगडा होईना!रात्री निर्मळा आलेली बघीतल्यावर तीची शुध्द गेली.सकाळी शुध्द आली तेव्हा बाळ कुशीत,पण घरांत तर कुणीच नव्हतं.सोयराचे बोलणं ऐकुन  चोखोबा व निर्मळा गोंधळले.कारण ते दोघे तर सध्याच आले होते.

निर्मळाने तिला आंघोळ,जेऊ घातल्यावर सोयरा शांत झोपली.जाग आली तेव्हा उन्ह उतरले होते.एवढ्यात सोयरा सोयरा अशा हाका मारत भागीरथी आली.सोयराच्या कुशीत बाळ बघुन तीला आश्चर्याचा धक्काच बसला. रात्रीच्या वादळ वार्‍याने कशी अडकुन पडली व आतां आली हे सांगतांना म्हणाली,भटा ब्राम्हणांचे आशिर्वाद कधीच वाया जात नाही.यावरुन सोयरा ला आठवले,लग्नाला ३-४ वर्षे उलटली तरी कुस उजवत नाही म्हणुन सतत हसमुख असणारी सोयरा उदास एकटीच बसली असतां,एक ब्राम्हण तिच्या दारी  येऊन भिक्षा मागु लागला,पण आपण क्षुद्र जातीचे असल्यामुळे घरांत अन्न असुनही देण्याचे धाडस होत नव्हते.पण तो ब्राम्हण कांहीच ऐकायला तयार नव्हता.तिथेच बसकण मारत निर्वाणी च्या स्वरांत म्हणाला, माई!मी दोन दिवसांचा उपाशी आहे,खुप लांबुन चालत आल्यामुळे आतां एक पाऊलही चालवत नाही.तूं अन्न दिले नाही व उपासाने माझा मृत्यु झाला तर पातक तुझ्या माथी लागेल.सोयरा घाबरली. इकडे आड न् तिकडे विहिर! अन्न द्यावे तर पाप नाही दिले तर शाप!काय करावे तिला कळेना.शेवटी मनाचा हिय्या करुन दहीभात आणुन म्हणाली,पाप लागणार नाही असा आशिर्वाद द्या.माई! भूकेलेल्याला अन्न दिल्याने पाप न लागता पुण्यच लागेल.मनापासुन आशिर्वाद देत म्हणाला,पुत्रवती भव! आणि तृप्त मनाने निघुन गेला.

भागीरथीच्या म्हणण्यानुसार ती व सून गंगा आताच आल्यात,निर्मळा आपल्यासोबत होती.मग?विचार करुन चोखोबाच्या डोक्याचा भुगा झाला,आणि एकदम या सगळ्या महानाट्याचा अर्थ लक्षात आला नी डोळ्यांना धारा लागल्या अनन्यभावे हात जोडत भरल्या मनाने म्हणाला,विठूराया तूं धन्य आहेस.सार्‍या जगाने लाथाडले,त्याला तूं जवळ केलेस. माझ्या माघारी सोयराचे बाळांतपणही केलेस.खरा भक्तवत्सल,पाठीराखा आहे. सोयराss अग! प्रत्यक्ष भगवंताने तुझे बाळांतपण केले.मी करंटा,माझी भक्ती कमी पडली,आपल्या घरी प्रत्यक्ष विठोबा येऊनही मला दर्शन नाही झाले.खरोखर तूं भाग्यवान आहेस.त्याहीपेक्षा आपला हा बाळ!प्रत्यक्ष पंढरीराया,माझा विठूराया घरी आला.सार्‍या घराचं सोनं झालं.

क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.

संत चोखामेळा चरित्र सर्व भाग पहा

संत व दिव्य व्यक्तींचे प्रेरणादायी चरित्र

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *