संत चोखामेळा म. चरित्र २०

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

संत चोखामेळा  भाग  –  २०.

संत चोखामेळा चरित्र सर्व भाग पहा

चोखोबा थोडे गांगरले.इतक्या महान विभूतींसमोर वैकुंठनगरीचे आपण  वर्णन करायचे? संकोच्याने त्यांनी सर्वां वर नजर टाकली तर सगळ्यांच्याच डोळ्यात अपेक्षा,आर्जव आणि विश्वास दिसला.चोखोबांनी नमस्कार करुन खड्या आवाजांत गायला सुरुवात केली.

“टाळी वाजवावी गुढी उभारावी।वाट हे चालावी पंढरीची।
खटनट यावे शुध्द होऊन जावे।दवंडी पिटी भावे चोखामेळा ।।
विठ्ठल विठ्ठल गजरी।अवघी दुमदुमली पंढरी।
होतो नामाचा गजर।दिंड्या पताकाचा भार ।।
निवृत्ती,ज्ञानदेव,सोपान।अपार वैष्णव ते जाण।
हरी किर्तनाची दाटी।तेथे चोखा घाली मिठी।
पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी।प्रत्यक्ष चक्रपाणी उभा असे।।” किंचित कापरा,पण भरीव आवाज, स्वरांतुन शब्द उत्स्फुर्तपणे अभिव्यक्त होणे,अंतरीची तळमळ,पंढरपूरला रहायला मिळालेली सार्थकता,त्यातच दवंडी पिटवण्याच्या आपल्या परंपरागत व्यवसायाचा खुबीने केलेला उल्लेख, कोणत्या गोष्टींमुळे ती पावन झाली याचे वर्म,या सगळ्यांचा अंतर्भाव करुन चोखोबांनी रचलेला हा अभंग एखाद्या जाणकाराच्या तोडीचा होता.यातील शब्द वैभव,चपलख,शब्दरचना,प्रतित होणारा नेमका भाव या सगळ्याचा परिणाम म्हणजे नामदेवादी संतमंडळीत चोखोबा एकदमच मोठे झाले.

चोखोबांचे दैनंदिन कामकाज नेमके नेटके चालु असतांनाच त्यांच्या घरांत एक आनंदाची बातमी कळली,सोयराला दिवस गेल्याची!वंशाचा दिवा सोयराच्या पोटांत वाढत होता.पंढरपूर व परिसरा मधे चोखोबाचे नांव आदराने घेतले जाऊ  लागले.अस्पृश्य जातीत असुनही उत्कट विठ्ठलभक्तीनं एक वेगळाच स्तर प्राप्त झाला.चोखोबाचे रोजचे बोलणे ऐकुन सुदामालाही विठ्ठलभक्तीची गोडी लागली वारी तर त्यांच्या घरांत होतीच.मानसिक समाधान आणि निश्चिंतताचे दान विठ्ठला ने आपल्या पदरांत घातल या समर्पित भावनेने सुदामा विठ्ठलभक्तीत रंगुन गेले. एके दिवशी संध्याकाळी चोखोबा स्वरचित विठ्ठलभजन गात अंगणांत बसलेले सुदामा समर्पित भावनेने विठ्ठल चरणी विलीन झाले.विठ्ठलभजन गात असतांनाच त्यांचे प्राण शरीराच्या कुडीतुन कधी निघुन गेला,कुणालाच कळलं नाही.अगदी शेजारी टाळ वाजवत बसलेल्या सावित्रीलासुध्दा….

सुदामाच्या अश्या अचानक जाण्याने तिघांवर जणुं आभाळच कोसळले.वास्तविक सुदामा थकला होता म्हातारा झाला होता.कसलेही कामकाज होत नव्हते.पण त्याचं शांत अस्तित्व घरादाराला धीर देणारे होते.त्यावर काळ हेच औषध होते.दैनंदिन कामकाजात स्वतःला गुंतवुन हे डोंगराएवढे दुःख पचवलं होतं.सोयरा,चोखोबा आणि सावित्रीने पण!तिचं तर सौभाग्य हरपलं होतं.आयुष्याचा जोडीदार अर्ध्या वाटेवर च हात सोडुन निघुन गेला होता.अति उत्साहाने नातवाची वाट बघत,लाडक्या सुनेचे कोडकौतुक करणारी,चोखोबाचा मोठेपणा अत्यंत स्वाभिमानाने मिरवणारी सावित्री या धक्क्याने पार कोलमडुन गेली होती.नातवाचं तोंड बघुन मरणाची इच्छा धरणारी सावित्री आतांच मरणाची भाषा बोलुं लागली. सुदामा गेल्यानंतर कांही दिवसांतच तापाचे निमित्य होऊन नातवाचं तोंड न बघतांच सुदामापाठोपाठ ती पंचतत्वात विलीन झाली.हा धक्का पचवणं मात्र चोखोबा सोयराला अतिशय अवघड गेलं. चोखोबांचा जीव वडीलांपेक्षा आईवर जास्त होता.एकदम कोसळलेल्या या दोन धक्क्यांनी चोखोबा स्वैरभैर झाले.

चोखोबांची भूक तहान हरपली. घरांत चैन पडेना.कामात लक्ष लागेना. स्वैरभैर घायाळ झालेले चोखोबा सावरल्या गेले ते नामदेवांमुळेच,संतपरि वारामुळेच!अत्यंत प्रेमाणे नामदेवांनी त्यांना मिठीत घेतले मात्र,आणि आतां पर्यंत घरांतील कर्ता,खंबीर पुरुष अशा भूमिकेतुन सगळ्यांना धीर देणारे चोखा नामदेवांंच्या मिठीत लहान मुलासारखे स्फुंदुन स्फुंदुन,हुंदक्यावर हुंदके देऊन रडुं लागले.त्यांना पोटभर रडु दिले. दिलासा देत मूकपणे त्यांच्या पाठीवर हात फिरवत राहिले.नामदेवांच्या प्रेमळ स्पर्शाने दुःखाचा वेग ओसरला,भार हलका झाला.आई वडील जरी सोडुन गेले तरी नामदेव व इतर संत परिवार आपल्याला आई वडीलांइतकेच आधार वड आहेत या विश्वासाने चोखोबा सावरले आणि पोटुशी असलेल्या बायको कडे आपणच लक्ष दिले पाहिजे या जबाबदारीची जाणीव झाली आणि परत ते दैनंदिन कामकाजाला लागले, चोखोबाला पंढरपूरात आणुन स्थिर स्थावर केल्यावरही पांडुरंगाचे काम अजुन संपलेले नव्हते.

क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.

संत चोखामेळा चरित्र सर्व भाग पहा

संत व दिव्य व्यक्तींचे प्रेरणादायी चरित्र

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *