संत चोखामेळा म. चरित्र ५

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

संत चोखामेळा भाग  –  ५.

संत चोखामेळा चरित्र सर्व भाग पहा

रोज कामं आटोपुन संध्याकाळी घरी येणारा चोखोबा गेल्या दोन दिवसा पासुन लवकर घरी येऊन परसदारी माती मळुन कांही तरी करीत बसे.सावित्री सहसा मेललं ढोर उचलायला किंवा सोलण्याच्या कामगिरीवर त्याला पाठवित नसे. पण आज नाईलाजाने वडीलांच्या मदतीला कोणीच नसल्यामुळे धाक दपट्या दाखवुन,मातीचे काम अर्धवट टाकायला सांगुन श्रीपती पाटलाकडे पाठवले होते.शित्या मांग ढोरं सोलुन झाल्यावर चामडं घेऊन जाणार होता. हा पोरगा गेल्या दोन दिवसापासुन मातीचे काय करतो म्हणुन सावित्री बघायला गेली,तर तिला काय दिसले?चोखाने अर्धवट बनवलेली विठ्ठलाची मूर्ती! कौतुकाने मूर्तीकडे बघतच राहीली.

रात्रीचे जेवणं आटोपल्यावर चोखा परसदारी जाऊन अर्धवट मूर्तीचे राहिलेले काम पूर्ण करुन सुंदरशी विठ्ठलाची मूर्ती तयार केली. चोखा आतां मोठा झाला तरी त्याच्या दिनक्रमात बदल झाला नाही त्यांच्या भोवतालची  कांही लोकं वारकरी होते. ते नित्यनेमाने पंढरपुरची वारी करायचे, तिथुन परतले की,तिथल्या नव नवीन वार्ता सांगायचे.त्या सगळ्याचा सार एकच असायचा की, कांही पुण्य मिळवायचे असेल ,कांही चांगले ऐकायचे असेल तर पंढरपूरला गेले की,जीवनाचे सोने होते.कल्याण होते. अश्या गोष्टी ऐकल्या की,चोखाला पंढरपुरची अतिशय ओढ लागे.मनाने एकच ध्यास घेतला,पंढरपूरला जायचच…त्यांनी जाण्याचे निश्चित केल्यावर सावित्रीला काळजी वाटु लागली.पण सुदामाने तिची समजुत काढल्यावर व तिच्या अनेक सुचनांचे पालन करण्याचे आश्वासन घेउन तीने चोखाला पंढरपूरला  जायची अनुमती दिली.निघाले चोखा पंढरपूरला.आपल्या आयुष्याला प्रकाशाकडे नेणारे पंढरपूर… तिथे त्यांचा विठ्ठल होता.विद्वानांचे बोल, संतांची संगत,विठ्ठलाची भक्ती होती. पंढरपूरच्या रस्त्यावर कांही लोक जात होती तर कांही परतत होती.चोखांना एका गोष्टीचे नवल वाटे,पंढरपूरहुन परतलेल्या लोकांच्या पायावर जाणारे लोकं डोकं ठेवुन नमस्कार करीत होते. एकमेकांना उरभेट देत होते.कुणीच कुणाचा विटाळ मानत नव्हते.ना जात ना धर्म,ही गोष्ट चोखासाठी नवीन होती. गावात हाडत हुडत शिविगाळ ऐकुन घेण्याची संवय असलेल्या चोखोंनी इतरांचे बघुन,पंढरपूरहुन येणार्‍या एका वारकर्‍याच्या पायावर डोके तर ठेवले पण त्यांना प्रचंड भिती वाटत होती,पण त्या वारकर्‍याने चोखोबांना उठवुन छातीशी कवटाळले तेव्हा,नखशिखांत शहारत चोखा म्हणाले,अहोss अहोss  महाराज हे काय करताहात?मी हीन जातीचा… अरे बाबा या पंढरीत कुणी हीन नाही ना कुणी ब्राम्हण,मराठा,वैश्य! या भागवत झेंड्याखाली आपण सगळे सारखेच. आपली सगळ्यांची एकच जात  वारकरी!एकच धर्म,विठ्ठलाची  भक्ती आणि आपल्या सगळ्यांचे एकच दैवत तो विठोबा!तेव्हा कोणताही संकोच, कोणत्याही जाती धर्माचा विधिनिषेध न मानतां त्या वारकर्‍याने त्यांना परत मिठीत घेतले.

चोखांच्या ह्रदयाचे स्पंदनं वाढली,सर्वांगाला कंप सुटला,कंठ दाटुन आला,डोळ्यातुन अनिर्बंध अश्रू वाहू लागले.त्या वृध्द वारकर्‍याच्या मिठीत, कुशीत शिरुन चोखा एखाद्या लहान मुलासारखा ढसाढसा रडु लागले. गदगदुन रडणार्‍या चोखांच्या मस्तकावर त्या वारकर्‍याच्या अश्रूंनी जणुं मनातील किल्मिषे,सगळ्या शंका,तक्रारी धुवुन निघाल्यात.उरलेली थोडीफार मलीनता वाहणार्‍या अश्रूंनी पवित्र झाली. वारकर्‍याच्या मिठीत असल्याचे भान आल्याबरोबर चटका बसल्यासारखा एकाएकी दूर झाल्याने,वारकर्‍याने कारण विचारल्यावर,चोखा फाडफाड गालात मारुन घेत म्हणाले,माझ्याकडुन फार मोठे पाप घडले,मी शिवलो तुम्हाला. माझ्यामुळे तुमच्या भावकीतले लोक छळ करतील,बहिष्कार टाकतील. वारकर्‍याने त्यांचे हात धरत म्हणाला,अरे या विठ्ठलाच्या राज्यात जातीचा प्रश्नच येत नाही.इथे सगळे सारखेच!या भागवत धर्माच्या झेंड्याखाली एक नवीन राज्य उदयास येतय!भक्तीचं राज्य आणि  आपण वारकरी.सगळे वारकरी त्या राज्याचे सरदार आहोत.इथे लहान मोठे, जात,धर्म,शिवाशिव,विटाळ कांहीही नाही.ज्ञानेश्वर माऊलीनं मानव जातीवर केलेले फार मोठे उपकार आहे.अरे!तू ही वारकरीचच ना?मग आपण सगळेच भागवतधर्मी.तेव्हा पाप वगैरे मनांतुन काढुन निःशंक मनाने पंढरपूरला जा.तो सावळा आहेच तिथे.चोखांनी सविस्तर माहिती विचारल्यावर,वारकरी म्हणाला, तिथे नामदेव आहेत ते जास्त सविस्तर माहिती देतील.मला जेवढी माहिती आहे तेवढी सांगतो.

क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.

संत चोखामेळा चरित्र सर्व भाग पहा

संत व दिव्य व्यक्तींचे प्रेरणादायी चरित्र

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *