सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ९ वा ओवी ५०१ ते ५३५ पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, ,

501-9
म्हणोनि मृत्युलोकीं सुखाची कहाणी । ऐकिजेल कवणाचां श्रवणीं । कैंची सुखनिद्रा आंथरुणीं । इंगळाचां ॥501॥
म्हणुन मृत्युलोकात खर्‍या सुखाची कथा कोणाच्या कानांनी ऐकली जाईल?निखार्‍याच्या (इंगळ म्हणजे विंचू किंवा विस्तव) अंथरुणावर मनमोकळेपणाने (निश्चिंत)झोप घेता येईल काय.
502-9
जिये लोकीचा चंद्र क्षयरोगी । जेथ उदयो होय अस्तालागीं । दुःख लेऊनि सुखाची आंगी । सळित जगातें ॥502॥
ज्या लोकीचा चंद्र क्षयरोगाने ग्रासलेला आहे.जेथे अस्ताला जाण्यासाठीच सुर्याचा उदय होत असतो, दुःखच सुखाचा अंगरखा घालून नाटक करुन जगाला छळण्याचे काम करत असते.(म्हणजे विषयात सुख भासते पण अनुभवास येत नाही)
503-9
जेथ मंगळाचां अंकुरीं । सवेंचि अमंगळाची पडे पोरी । मृत्यु उदराचिया परिवरीं । गर्भु गिंवसी ॥503॥
जेथे मांगल्याच्या अंकुराबरोबरच अमंगलाची कीड आहे.आणि आईच्या पोटातील गुप्त गर्भाशयात सुद्धा मृत्यु गर्भाला गाठतो.
504-9
जें नाहीं तयांतें चिंतवी । तंव तेंचि नेइजे गंधर्वीं । गेलियाची कवणे गांवीं । शुद्धी न लभे ॥504॥
जेवत नाही त्याचे चिंतन मृत्युलोक करायला लावतो,मग तिच गोष्ट गंधर्व हिरावून नेतात.पण कोठे नेतात याचा पत्ताही लागत नाही.
505-9
अगा गिंवसितां आघवा वाटी । परतलें पाउलचि नाहीं किरीटी । सैंघ निमालियांचियाचि गोठी । तिंये पुराणें जेथिंचीं ॥505॥
अरे अर्जुना, सगळ्या मार्गानी शोध घेतला तरी,मृत्युच्या मुखात गेलेल्यांचे एकही पाऊल परत फिरलेले दिसत नाही.जेथील पुराणे म्हणजे असंख्य जन मेलेल्यांच्या गोष्टींनी भरलेली आहेत.

506-9
जेथींचिये अनित्यतेची थोरी । करितया ब्रह्मयाचें आयुष्यवेरी । कैसें नाहीं होणें अवधारीं । निपटूनियां 506॥
जेथील नाशवंताचे वर्णन जरी कोणी ब्रम्हदेवाच्या आयुष्या एवढ्या दिर्घकाळपर्यंत करीत बसला तरी सर्वार्थाने कळनार नाही.
507-9
ऐसी लोकींची जिये नांदणूक । तेथ जन्मले आथि जे लोक । तयांचिये निश्चिंतीचे कौतुक । दिसत असे ॥507॥
अशा तर्‍हेने या लोकीची क्षणभंगुर स्थिती आहे,तेथे जन्मलेल्या लोकांनी निश्चिंत राहावे.ही नवलाईची गोष्ट आहे.
508-9
पैं दृष्टादृष्टीचिये जोडी । लागीं भांडवल न सुटे कवडी । जेथ सर्वस्वें हानि तेथ कोडी । वेंचिती गा ॥508॥
अरे ऐहिक(क्षणिक)पारलौकीक लाभासाठी भांडवलातील एक कवडी सुद्धा ज्यांच्या हातुन सुटत नाही पंरतु (ते) जेथे सर्वस्वाचा नाश आहे,तेथे कोट्यावधी रुपये खर्च करतात.
509-9
जो बहुवें विषयविलासें गुफें । तो म्हणती उवायें पडिला सापें । जोअभिलाषभारें दडपे । तयातें सज्ञान म्हणती ॥509॥
जो विषयविलासात गुंतुन राहिला आहे.तो सध्या सुखात आहे असे म्हणतात.जो वासनेच्या भाराने दडपुन गेला आहे,त्याला ज्ञानी म्हणतात.
510-9
जयाचें आयुष्य धाकुटें होय । बळ प्रज्ञा जिरौनि जाय । तयाचे नमस्कारिती पाय । वडिल म्हणुनि ॥510॥
ज्याचे आयुष्य थोडे उरले आहे,बळ बुद्बी कमी झाली आहे,त्यालाच वडील समजुन त्याच्याच पायावर लोटांगणे घालतात.

511-9
जंव जंव बाळ बळिया वाढे । तंव तंव भोजें नाचती कोडें । आयुष्य निमालें आंतुलियेकडे । ते ग्लानीचि नाहीं 511॥
जसे जसे मुल वाढते तसतसे आईबाप कौतुकाने नाचतात. परंतु त्याची वाढ होत असताना आयुष्याची दोरी कुमकुवत होते.या बद्दल त्यांना खेद माहितच नसतो.
512-9
जन्मलिया दिवसदिवसें । हों लागे काळाचियाचि ऐसें । कीं वाढती करिती उल्हासें । उभविती गुढिया ॥512॥
मुल जन्मल्यावर,ते दिवसेंदिवस तो काळाचा घास होऊ लागते.तरीही हौसेने वाढदिवस साजरा करतात व गुढ्या उभारतात.
513-9
अगा मर हा बोलु न साहती । आणि मेलिया तरी रडती । परि असतें जात न गणिती । गहिंसपणें ॥513॥
अरे अर्जुना कोणी तुं मर हा शब्द सहन करीत नाहीत.मेल्यावर तरी रडतात,पण आपले आयुष्य कमी कमी होत चालले आहे.हे त्यांना मुर्खपणाने समजत नाही,
514-9
दर्दुर सापें गिळिजतु आहे उभा । कीं तो मासिया वेटाळी जिभा । तैसे प्राणिये कवणा । वाढविती तृष्णा ॥514॥
सापाकडुन उभा गिळला जात असताना देखील बेडुक उडत असलेल्या माशीला पकडण्यासाठी जीभ बाहेर काढुन वेटाळीत असतो.अशाप्रकारे कोणत्या लोभासाठी हे प्राणी(विषयाची)ताहन वाढवित असतात कोण जाणे?
515-9
अहा कटा हें वोखटें । मृत्युलोकींचें उफराटें । एथ अर्जुना जरी अवचटें । जन्मलासी तूं ॥515॥
अरेरे!हे वाईट आहे! मृत्युलोकातील सर्वच न्याय उफराटा आहे.अर्जुना ज्या अर्थी तु येथे दैवयोगाने जन्मला आहे.

516-9
तरि झडझडोनि वहिला निघ । इये भक्तीचिये वाटे लाग । जिया पावसी अव्यंग । निजधाम माझें ॥516॥
तरी या मृत्युलोकाच्या राहाटीतुन सर्व झटकुन मोकळा हो,आणि या भक्तिच्या मार्गाला असा लाग की,त्यायोगे तुला माझ्या निर्दोष स्वरुपाच्या पदाचा लाभ घडेल.
मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरु ।
मामेवैष्यसि युक्त्वैवमात्मानं मत्परायणः॥9.34॥

॥इति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे राजविद्याराजगुह्य योगोनाम नवमोऽध्यायः॥9॥
। ॐ श्रीसच्चिदानन्दार्पणमस्तु ।

517-9
तूं मन हें मीचि करीं । माझां भजनीं प्रेम धरीं । सर्वत्र नमस्कारीं । मज एकातें ॥517॥
तु आपले मन मद्रुप कर,माझ्या भजनाबद्दल प्रेम बाळग,सर्व ठिकानी माझे अस्तित्व जाणुन मला वंदन कर.
518-9
माझेनि अनुसंधानें देख । संकल्पु जाळणें निःशेख । मद्याजी चोख । याचि नांव ॥518॥
माझ्या अखंड ध्यानाने सर्व संकल्प पुर्णपणे जाळतो,त्याला स्पष्टपणे मद्दाची(यजनकर्ता) असे नांव द्दावे.
519-9
ऐसा मियां आथिला होसी । तेथ माझियाचि स्वरुपा पावसी । हें अंतःकरणींचें तुजपासीं । बोलिजत असे ॥519॥
तूं जेव्हा माझ्या ध्यासाने संप्पन्न होशील,तेव्हाच माझ्या स्वरुपाला पावशील ही माझ्या अंतःकरणातील गुप्त गोष्ट तुला मी सांगत आहे
520-9
अगा आवघिया चोरिया आपुलें । जें सर्वस्व आम्ही असे ठेविलें । तें पावोनि सुख संचले । होऊनि ठासी ॥520॥
अरे आम्ही आमचे सर्वस्व पुर्ण चातुर्याने राखुन ठेविले आहे.ते लाभुन तु सुखाने ओतप्रोत भरुन जाशील.

521-9
ऐसें सांवळेनिपरब्रह्में । भक्तकामकल्पद्रुमें । बोलिलें आत्मारामें । संजयो म्हणे ॥521॥
अशा प्रमाने भक्तांची इच्छा पुर्ण करणार्‍या ब्रम्हस्वरुप सावळ्यां श्रीकृष्णांनी अर्जुनास बोध केला,असे संजय बोलले.
522-9
अहो ऐकिजत असे कीं अवधारा । तंव इया बोला निवांत म्हातारा । जैसा म्हैसा नुठी कां पुरा । तैसा उगाचि असे ॥522॥
ज्ञानेश्वर महाराज जणास (श्रोत्यांना) सांगतात. ऐका,म्हातारा धृतराष्ट्र हे बोल ऐकत शांत राहिला.एखादा आळशी,ऐदी पाण्यात बसल्यावर रेडा जसा हालत नाही.तसा तो मुकाट्याने बसला.
523-9
तेथ संजयें माथा तुकिला । अहा अमृताचा पाऊस वर्षला । कीं हा एथ असतुचि गेला । सेजिया गांवा ॥523॥
तेव्हा संजयाने मान डोलावली व स्वःताशी म्हणाला,हा हा हा ! आज अमृताची वृष्टी झाली.
पण हा म्हातारा येथे असुन शेजारच्या गावी गेल्यासारखा आहे.
524-9
तऱ्ही दातारु हा आमुचा । म्हणोनि हें बोलतां मैळेल वाचा । काइ झालें ययाचा । स्वभावोचि ऐसा ॥524॥
परंतु हा आमचा अन्नदाता आहे.स्पष्ट बोलुन वाचेला दोष लागेल.याला इलाज नाही कारण याचा स्वभावच असा आहे.
525-9
परि बाप भाग्य माझें । जे वृत्तांतु सांगावयाचेनि व्याजें । कैसा रक्षिलों मुनिराजें । श्रीव्यासदेवें ॥525॥
परंतु धन्य माझे भाग्य की,महामुनी श्री व्यासमहाराजांनी रणवृतांत सांगण्याच्या निमित्ताने मला निर्भय राखले आहे.

526-9
येतुलें हें वाडें सायासें । जंव बोलत असे दृढें मानसें । तंव न धरवेचि आपुलिया ऐसें । सात्विकें केलें ॥526॥
अशा रितीने मोठ्या प्रयासाने मन घट्ट करुन संजय मनातल्या मनात बोलत आहे,तोच अष्टसात्विकभाव आवरुन धरवेनात व त्याला सावरता येईनात.(अशी अवस्था अष्ट सात्विक भावांनी केली)
527-9
चित्त चाकाटलें आटु घेत । वाचा पांगुळली जेथिंची तेथ । आपादकंचुकित । रोमांच आले ॥527॥
त्याच्या चित्ताला(मनाला)चकीत झाले,चक्कर आली,जीभ लुळी पडली,व सर्वांगावर रोमांचा उभे राहिले.
528-9
अर्धोन्मीलित डोळे । वर्षताति आनंदजळें । आंतुलिया सुखोर्मीचेनि बळें । बाहेरि कांपे ॥528॥
अर्धे उघडलेले डोळे आनंदाश्रुचा वर्षाव करु लागले.व अंतर्यामी उसळनार्‍या आंनदाच्या लाटाच्या प्रभावाने शरिर थरथर कापु लागले.
529-9
पै आघवांचि रोममूळीं । आली स्वेदकणिका निर्मळी । लेइला मोतियांचीं कडियाळीं । आवडे तैसा॥529॥
सर्व रोमांच्या मुळाशी निर्मळ घामाचे थेंब आले,त्यामुळे त्याने अंगावर मोत्याच्या जाळीचा अंगरखाच घातला आहे.असा तो दिसु लागला.
530-9
ऐसा महासुखाचेनि आर्तिंरसे । जेथ आटणी होईल जीवदशे । तेथे निरोविलें व्यासें । तें नेदीच हों॥530॥
अशाप्रकारे महासुखाच्या उत्कर्षाने, जेथे जिवाचे भान विरुन गेल्यामुळे रणवृत्तांत सांगण्याची श्रीव्यासांनी केलेली आज्ञा ती पुर्णपणे पाळली जाईना.

531-9
आणि कृष्णार्जुनाचें बोलणें । घों करी आलें श्रवणें । कीं देहस्मृतीचा तेणें । वापसा केला॥531॥
आणि त्यावर कृष्णार्जुनाचे बोलणे धो धो आवाज करीत संजयाच्या कानी आले.त्याने संजयाला पून्हा भानावर आणले.व रणवृत्तांत सांगण्यास प्रवृत्त केले
532-9.
तेव्हां नेत्रींचें जळ विसर्जी । सर्वांगींचा स्वेदु परिमार्जी । तेवींचि अवधान म्हणे हो जी । धृतराष्ट्रातें ॥532॥
तेंव्हा डोळ्यातील आंनदाश्रु पुसुन,अंगावरील घामही पुसला आणि तो धृतराष्ट्राला म्हणाला महाराज आता लक्ष द्दा.
533-9
आतां कृष्णवाक्यबीजा निवाडु । आणि संजय सात्विकाचा बिवडु । म्हणोनि श्रोतया होईल सुरवाडु । प्रमेयपिकाचा ॥533॥
आता श्रीकृष्णाच्या वेचक वाक्यांची उत्तम बिजे आणि त्यास संजय ही अष्टसात्विक भावरुपी पिकाच्या दुसर्‍या पेरणीकरिता तयार झालेली जमीन.त्यामुळे श्रोत्यांना सिद्धांतरुपी पिकाची सुगीच होईल.यात तिळमाञ शंका नाही.
534-9
अहो अळुमाळु अवधान देयावें । येतुलेनि आनंदाचेराशी वर बैसावें । बापश्रवणेंद्रिया दैवें । घातली माळ॥534॥
श्रोते हो, या कथानकाकडे लक्ष द्दावे व एवढ्यानेच आंनदाच्या राशीवर बसावे.तुमच्या कानाच्या भाग्याने तुम्हास माळ घातली आहे.
535-9
म्हणोनि विभूतींचा ठावो । अर्जुना दावील सिद्धांचा रावो । तो ऐका म्हणे ज्ञानदेवो । निवृत्तीचा ॥535॥
तेव्हा आज सिद्धराज श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाला,ईश्वरी विभुतीचे स्थान निरुपण करतील.ते आपण श्रवण करा,अशी या निवृत्तिनाथांचे शिष्य ज्ञानदेवांची विनंती आहे.
॥ इति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे
राजविद्याराजगुह्ययोगोनाम नवमोऽध्यायः॥9॥
॥ भग्वद्गीतगीता श्लोक :- 34 ॥ ॥ ज्ञानेश्वरी ओव्या :- 535 ॥
। ॐ श्रीसच्चिदानन्दार्पणमस्तु ।

, ,
1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *