संत चोखामेळा म. चरित्र ३

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

संत चोखामेळा भाग  – ३.

संत चोखामेळा चरित्र सर्व भाग पहा

कांही दिवसांनी सावित्रीने एका गोड मुलीस जन्म दिला.चोखोबाचा पायगुण म्हणुन तो आणखीणच लाडाचा झाला.घरी दारीद्र्य,गरीबी असली तरी, तो आई वडीलांच्या छत्र छायेत व कोड कौतुकात चोखाचे बालपण समृध्द आणि सुनिश्चितेत जात होते.चोखाची बहिण निर्मळा हळूहळु मोठी होत आईच्या कामात व चोखा बापाच्या कामात मदत  करुं लागले.गावकीच्या कामकाजात सुदामा मदतीला चोखोला मदतीला नेऊ लागला.विशेषतः रस्ते झाडायला.चोखा झाडण्याचे कामसुध्दा मन लावुन स्वच्छ तेही सकाळी लवकर करीत असे,ब्राम्हण आळी झाडायला त्याला मनापासुन आवडे.कारण सकाळी सकाळी ब्राम्हण आळीतल्या घरांतुन अभंग,देवाची गाणी, मंत्र ऐकायला त्याला फार आवडयचं.

चोखाचं रस्ता स्वच्छ करण्याचं काम पाहुन,कुळकर्ण्याची माई,कृष्णाजीपंतां ची शारदावहिनी,आबाजी कुळकर्ण्यांची सुभद्राताई यांना चोखोबाचे भारी कौतुक वाटे.त्या त्याला कांही खायला दिले की, तो आधाशासारखा एकटा न खाता आपल्या धाकट्या बहिणीसाठी राखुन ठेवतो हे  त्यांना फारच कौतुकास्पद वाटायचे.मग त्या ब्राम्हणस्रीया बहिणी साठी वेगळं देऊ लागल्या.पुढे पुढे तर सणावाराचे गोडधोड त्याच्यासाठी राखुन ठेवु लागल्या.आपल्या मेहनतीनं,प्रामाणि कपणानं व अभिजात लाघवीपणान चोखाने ब्राम्हणस्रीयांच्या मनांत एक आपुलकीची जागा निर्माण केली तेही बालवयातच!आपल्या मुलाचे दुरुन कां होईना कौतुकाचे बोल कानावर पडले की सावित्रीचा उर अभिमानाने भरुन यायचा. आणि मग त्या ब्राम्हणाचे शब्द आठवे, तुमच्या घराण्याचे नांव मोठे करणारा मुलगा होईल.आपल्या अंगभूत स्वभाव वैशिष्ट्यांनी तेजाळत चोखोबा मोठा होत होता.

अशातच एक दिवस मंगळवेढ्या च्या सरदाराचा सुदामाला सांगावा आला. मेहुणपूरच्या सरपंचाने सुदामाच्या प्रामाणिकपणा,कामावरची निष्ठा तत्परता कळवली होती.तसेच त्याला जंगल पांदीतले,ओहोळ ओढ्यातील रस्ते वाटा माहित होत्या.म्हणुनच मंगळवेढ्या च्या सरदाराने निरोप्या म्हणुन एक वर्षा साठी नेमणुक केली.पगार,कपडालत्ता, धान्य शिवाय राहायला खोपटं मिळणार! याहीपेक्षा आनंदाची गोष्ट म्हणजे मंगळ वेढ्यापासुन पंढरपूर जवळ असल्याने दरवर्षी वारी करतां येणार होती.दोघांनी सामानसुमान बांधुन झोपडीला शेवटचा नमस्कार केला व बैलगाडी निघाली. दुसर्‍या मोठ्या गावाला जायला मिळत असल्याचा आनंद दोन्ही मुलांना झाला.

मजल दर मजल करीत कुटुंब मंगळवेढ्याला पोहोचल्यावर,सरदाराने नेमणुक केलेल्या कामावर दुसर्‍या दिवशीपासुन सुदामा रुजु झाला.चोखा एकटाच रस्ता झाडण्याच्या कामावर जाऊ लागला.त्याचा सरळ,नम्र स्वभाव  नीटनेटके काम करण्याची पध्दत यामुळे इथेही आपुलकी,जिव्हाळा निर्माण झाला यवनांच्या स्वार्‍या थंडावल्या व वर्षही संपल्यामुळे सुदाम सरदाराच्या कामातुन मोकळा झाल्यामुळे,आतां सुदामा व चोखामेळा गावकीच्या कामात लागले. सगळीजण मंगळवेढ्यात रमल्याने त्यांच्या आयुष्याला स्थैर्य प्राप्त झाले.एक

प्रकारची निश्चिंतता लाभली.

मंगळवेढ्यात एक विठ्ठलमंदिर होते.मंदिराची आंतली स्वच्छता म्हादा गुरव तर मंदिराच्या अंगण,परिसराची स्वच्छता चोखाने आपल्या अंगावर घेतली होती.त्याचं मन लावुन काम करणं वेळेवर पोहचणं,नीटनेटके काम करणें, मंदिराचा आवार आरशासारखा लख्ख ठेवणं गुरवाला फार आवडायचं.तो चोखाशी बोलायचा.त्याला विठोबाचा अंगारा,तीर्थ द्यायचा.चोखोबाची विठ्ठलावर असलेली श्रध्दा पाहुन गुरवला खुप कौतुक वाटायचे.गुरवाकडुन भजनं ऐकतां एकतां चोखोबाचा शीण जायचा. १२-१३ वर्षाचा चोखा सकाळी आंघोळ करुन फाटके असले तरी,स्वच्छ कपडे घालुन,कपाळाववर गंध रेखुन, विठोबाच्या प्रतिमेला नमस्कार करुन रस्ते झाडण्याच्या कामावर रुजु व्हायचा. सगळ्या आळी,पेठ्या,गल्ल्या झाडुन झाले की,बरोबरीचे मित्र चावडीजवळच्या वडाच्या झाडाखाली गंजिफा खेळायला जायचे आणि हा थेट विठ्ठल मंदिर गाठुन संध्याकाळपर्यंत मन लावुन आवार झाडणे,उगवलेलं तण,कांटे,कांचा, बोचणारे खडे गोळा करायचा ते अगदी दिवस मावळेपर्यंत.मधे फक्त थोडा वेळ जेवायला जायचा.संध्याकाळचे जेवणं आटोपली की,गप्पा,भजनं,विठ्ठलाचे नामस्मरण करत चोखा झोपी जात.असा चोखोबाचा दिनक्रम ठरलेला होता.

क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.

संत चोखामेळा चरित्र सर्व भाग पहा

संत व दिव्य व्यक्तींचे प्रेरणादायी चरित्र

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *