सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १५ वा ओवी ४२६ ते ४५० पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, , , , , , ,

426-15
ना शरीरपरातें सेवितां । संसारगौरवचि ऐकतां । देहीं जयांची अहंता । बुडोनि ठेली ॥ 426 ॥
अथवा, देहात्मबुद्धिवानांची सेवा करून, संसाराचे कोडकौतुक, ऐकून, ज्यांचा अहंकार देहाच्या ठिकाणींच दृढ झाला आहे. 26
427-15
ते स्वर्गसंसारालागीं । धांवतां कर्ममार्गीं । दुःखाच्या सेलभागीं । विभागी होती ॥ 427 ॥
ते, स्वर्गातील किंवा संसारांतील विषयसुखासाठी कर्ममार्गाच्या मार्गे लागून अखेर शेलक्या म्हणजे गाळीव किंवा सुखलेशरहित दुःखाचे वांटेकरी होतात.27
428-15
परी हेंही होणें अर्जुना । मजचिस्तव तया अज्ञाना । जैसा जागताचि हेतु स्वप्ना । निद्रेतें होय ॥428॥
पण ह्या अज्ञानी जीवांना ही स्थिति प्राप्त होण्यालाही, मुळांत कारण ज्ञान स्वरूप जो मी, तोच होय; जसा जागा पुरुषच स्वप्नाला व निर्देला हेतु म्हणजे आधार असतो. 28
429-15
पैं अभ्रें दिवसु हरपला । तोहि दिवसेंचि जाणों आला । तेवीं मी नेणोनि विषयो देखिला । मजचिस्तव भूतीं ॥ 429 ॥
सूर्य मेघांनी आच्छादिला आहे हेही सूर्याच्या सत्तेने (प्रकाशाने) जाणतां आलें; तसे मला नेणणे व विषय जाणणें हा प्राण्यांचा व्यवहारही माझ्या सत्तेवरच होतो. 29
430-15
एवं निद्रा कां जागणिया । प्रबोधुचि हेतु धनंजया । तेवीं ज्ञाना अज्ञाना जीवां यां । मीचि मूळ ॥430॥
अर्जुना, निजलेला मनुष्यच जर जागा होतो तर, ह्या दोन्ही अवस्थांना हेतुभूत असणारी ” नित्यजागृति ” (प्रबोधता ) मुळांत असतेच, त्याप्रमाणे या जीवांच्या जाणण्याच्या किंवा नेणण्याच्या दोन्ही व्यवहारांना केवल असा मीच मूळहेतु आहे. 30

431-15
जैसें सर्पत्वा कां दोरा । दोरुचि मूळ धनुर्धरा । तैसा ज्ञाना अज्ञानाचिया संसारा । मियांचि सिद्धु ॥ 431 ॥
सर्पभास होवो, की दोरीचे ज्ञान होवो, दोन्ही ज्ञाने जशी एका दोरीच्या सत्तेवरच होतात त्याप्रमाणे, व्यवहार ज्ञानाचा घडो की अज्ञानाचा घडो, तो, ज्ञानस्वरूप जो मी त्या माझ्याच आधारावर होतो.
432-15
म्हणौनि जैसा असें तैसया । मातें नेणोनि धनंजया । वेदु जाणों गेला तंव तया । जालिया शाखा ॥ 432 ॥
म्हणून माझे यथार्थ ज्ञान न झाल्यामुळे, वेद तें जाणण्याचा उद्योग करू लागला, तेव्हां त्याच्या शाखा झाल्या (भाग झाले) 32
433-15
तरी तिहीं शाखाभेदीं । मीचि जाणिजे त्रिशुद्धी । जैसा पूर्वापरा नदी । समुद्रचि ठी ॥ 433 ॥
तरी, त्याच्या त्या तिन्हीं शाखांनी (ऋक्, यजु,साम) खरोखर माझेच स्वरूप वर्णिले आहे; उदा. अशी नदी पूर्ववाहिनी असो की पश्चिमवाहिनी असो; अखेर मिळणार समुद्रालाच. 33
434-15
आणि महासिद्धांतापासीं । श्रुति हारपतीं शब्देंसीं । जैसिया सगंधा आकाशीं । वातलहरी ॥ 434 ॥
आणि, पृथ्वीचा गंध घेऊन वाहणाऱ्या वाऱ्याच्या, लहरी ज्याप्रमाणे आकाशाच्या पोटांत मावळतात, त्याप्रमाणे, माझे वर्णन करीत महासिद्धांत प्रमेयापाशी (लक्ष्यार्थापाशी) येतांच त्यांची वाणी कुंठित होऊन त्या मौनावल्या. 34
435-15
तैसें समस्तही श्रुतिजात । ठाके लाजिले ऐसें निवांत । तें मीचि करीं यथावत । प्रकटोनियां ॥ 435 ॥
तसेच, माझ्या वर्णनांत सर्व श्रुति लज्जित (असमर्थ) होऊन त्यांनी मौन धरिलें तें योग्यच होय, हे स्वप्रकाशत्वाने प्रगट होऊन मला दाखवावें लागते. (स्वप्रकाशत्व म्हणजे वेद्य न होतां अपरोक्षत्व असणे; मग अवेद्यरूप श्रुतींना वर्णिता आले नाही तर नवल काय? ) 35

436-15
पाठीं श्रुतिसकट अशेष । जग हारपे जेथ निःशेष । तें निजज्ञानही चोख । जाणता मीचि ॥ 436 ॥
आणि, सर्व श्रुतींसह जग जेथे पार लय पावतें तें शुद्ध आत्मज्ञान जाणणाराही मीच आहे. 36
437-15
जैसें निदेलिया जागिजे । तेव्हां स्वप्नींचे कीर नाहीं दुजें । परी एकत्वही देखों पाविजे । आपलेंचि ॥ 437 ॥
निद्रिस्त पुरुष जागा झाल्यावर स्वप्नांतील सर्व द्वैतव्यवहार तर जागृतींत नसतोच, पण, स्वप्नांतही दुसरें कांहीही नसून आपण एकटेच होतो असा निश्चय होतों 37
438-15
तैसें आपलें अद्वयपण । मी जाणतसें दुजेनवीण । तयाही बोधाकारण । जाणता मीचि ॥ 438 ॥
तसाच माझा एकीएकपणा, दुजेपणाचा स्पर्शही होऊ न देतां मी जाणतों आणि ह्याही स्वरूपबोधाला कारण ज्ञानरूप जो मी तोच.38
439-15
मग आगी लागलिया कापुरा । ना काजळी ना वैश्वानरा । उरणें नाहीं वीरा । जयापरी ॥ 439 ॥
अर्जुना, कापूर जळल्यावर जशी मागे काजळी रहात नाही व अग्नीही रहात नाही. 39
440-15
तेवीं समूळ अविद्या खाये । तें ज्ञानही जैं बुडोनि जाये । तऱ्ही नाहीं कीर नोहे । आणि न साहे असणेंही ॥ 440 ॥
त्याप्रमाणे समूळ अविद्येचा ग्रास करणारें जे ज्ञान, ते ज्ञानही जेव्हां लय पावतें वेळीं, “कांहीं नाहीं” असा अत्यंताभाव तर नाहीच, पण म्हणून “आहे ” असे म्हणाल तर “नाहीं” ह्याच्या अपेक्षेनें रूढ असलेले “आहे ” हें पद तरी, केवल अस्तिता=सत्तारूप असलेल्या वस्तूबद्दल कसे सहन होईल? 440

441-15
पैं विश्व घेऊनि गेला मागेंसीं । तया चोरातें कवण कें गिंवसी? । जे कोणी एकी दशा ऐसी । शुद्ध ते मी ॥ 441 ॥
(अज्ञान किंवा मूलाविद्या हें जगताचे उपादान कारण आहे; त्याचे नाशक असे एकच साधन म्हणजे अंतःकरणवृत्तिस्थ शुद्ध शास्त्रीय ब्रह्मज्ञान होय; ह्याच्या उदयाने उपादानकारण जे अज्ञान त्याचा ग्रास होत असल्याने तत्कार्य जे जगत् याचा कोठे मागमूसही उरत नाही; तसेच अज्ञाननाश झाल्यावर हें ब्रह्मज्ञान पुढे कांहीं कर्तव्य उरले नाही म्हणून स्वभावत: आपलें मूलस्वरूप में सामान्यज्ञान त्यांत लय पावते, तेव्हां त्याला शुद्ध ब्रह्मता आली. ह्या दोन्ही अभिप्रायांनी महाराज म्हणतात, असा जो अलौकिक चोर, की ज्याने सर्व विश्व त्यांतील वाटांसह चोरून नेऊन त्या चोरीचा कांहीं मागमूसही ठेविला नाही त्या चोराचा कोण व कसा पत्ता लावणार? अशा ह्या लोकोत्तर चोराचे जें मूलस्थान हेच माझे शुद्धस्वरूप होय. 41
442-15
ऐसी जडाजडव्याप्ती । रूप करितां कैवल्यपती । ठी केली निरुपहितीं । आपुल्या रूपीं ॥ 442 ॥
कैवल्यपति भगवान् श्रीकृष्ण, ह्यांनी स्थावरजंगमांमध्ये असलेल्या आपल्या ओतप्रोत व्याप्तीन्हे निरूपण करीत करीत ह्याप्रकारें आपल्या निरुपाधिक स्वरूपाच्या मुक्कामापर्यंत येऊन पोचले. 42
443-15
तो आघवाचि बोधु सहसा । अर्जुनीं उमटला कैसा । व्योमींचा चंद्रोदयो जैसा । क्षीरार्णवीं ॥ 443 ॥
आकाशांतील चंद्राचे क्षीरार्णवांत जसें स्पष्ट प्रतिबिंब व्हावें तसा या सर्व बोधाचा अर्जुनाच्या चित्तावर एकदम ठसा उमटला. 43
444-15
कां प्रतिभिंती चोखटे । समोरील चित्र उमटे । तैसा अर्जुनें आणि वैकुंठें । नांदतसे बोधु ॥ 444 ॥
एका भिंतीवरील चित्र, समोरच्या आरशा सारख्या शुद्ध भितींत तंतोतंत उमटून, जसे दोन ठिकाणी नांदते असे दिसतें, त्याप्रमाणे श्रीकृष्ण भगवान् ह्यांच्या ठिकाणचा एकच बोध, शुद्ध भित्तिस्थान असलेल्या अर्जुनाच्या अंतःकरणांत जसाच्या तसा उमटलेला दिसत होता. 44
445-15
तरी बाप वस्तुस्वभावो । फावे तंव तंव गोडिये थांवो । म्हणौनि अनुभवियांचा रावो । अर्जुन म्हणे ॥ 445 ॥
पण, महाराज, वस्तुमहिमाच असा आहे ! जशी ती अनुभवाला चढावी (अनुभव दृढ व्हावा) तशी तिजविषयींची गोडी वाढते, म्हणून, अशा जातीच्या भाग्यवंतांतील श्रेष्ठ अर्जुन म्हणाला. 45

446-15
जी व्यापकपण बोलतां । निरुपाधिक जें आतां । स्वरूप प्रसंगता । बोलिले देवो ॥ 446 ॥
देवा, आपलें व्यापकपण सांगतां सांगतां, प्रसंगानुरोधानेंच, शेवटी आपल्या शुद्ध निरुपाधिक स्वरूपाचे जें वर्णन केले, 46
447-15
ते एक वेळ अव्यंगवाणें । कीजो कां मजकारणें । तेथ द्वारकेचा नाथु म्हणे । भलें केलें ॥ 447 ॥
ते पुन्हा एक वेळ माझ्यासाठी संपूर्णतया सांगावें अशी इच्छा आहे ! हे ऐकून देव म्हणाले, अर्जुना, शाबास शाबास ! 47
448-15
पैं अर्जुना आम्हांहि वाडेंकोडें । अखंडा बोलों आवडे । परी काय कीजे न जोडे । पुसतें ऐसें ॥ 448 ॥
खरें सांगू कां? (पै) अर्जुना, आम्हालाही ह्या गोष्टीची फार आवड आहे! तिच्याच अखंड गोष्टी कराव्या असे वाटते; पण काय करावें? कोणी विचारणाराच भेटत नाहीं रें. 48
449-15
आजि मनोरथांसि फळ । जोडलासि तूं केवळ । जे तोंड भरूनि निखळ । आलासि पुसों ॥ 449 ॥
आज मात्र माझे मनोरथ फळले; आणि ते केवळ तुझ्यामुळे हो ! कां म्हणशील तर कांहींही आशंका न घरितां केवळ ह्याच म्हणजे निरुपाधिक स्वरूपाविषयींचा प्रश्न केलास म्हणून. 49
450-15
जें अद्वैताहीवरी भोगिजे । तें अनुभवींच तूं विरजे । पुसोनि मज माझें । देतासि सुख ॥ 450 ॥
(अद्वैतरूपतेनंतर) अद्वैतप्राप्तीच्या सुखाचा जो एक भोग आहे, तो देण्यास तू मला साह्य झाला आहेस. कारण, तुझा प्रश्न माझ्या निरुपाधिक स्वरूपाचा असल्याने माझ्या सुखाचाच मला पुन्हा भोग घडवीत आहेस.450

, , , , , , ,

Sartha Dnyaneshwari Chapter 15th Complete
Sartha Dnyaneshwari Adhyay Pandharawa Sampurn
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय पंधरावा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 15 वा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १५ वा संपूर्ण

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *