संत चोखामेळा म. चरित्र ७

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

संत चोखामेळा  भाग  –  ७.

संत चोखामेळा चरित्र सर्व भाग पहा

नामदेवांच्या मिठीत,आजपर्यंत चोखांनी उच्चवर्णीयांकडुन झालेली अवहेलना,अपमान,परंपरेने अंगावर पडलेली कामे,त्यातुन विठ्ठलाबद्दल लागलेली ओढ हे सगळे सगळे घेऊन दुधात खडीसाखर विरघळावी तसे चोखा विरघळले.चोखा स्फुंदत होते,नामदेव निःशब्दपणे त्यांच्या पाठीवरुन हात फिरवत होते मुकपणे!पण त्या स्पर्शातही एक नाद,एक आवाज,एक भाषा,एक लय होती.. विठ्ठल…विठ्ठल.चोखामेळा अगदी विठ्ठलमय झाले होते.त्यांचे पालकत्वं,जनकत्व जणूं स्वतः विठ्ठलाने नामदेवाने घेतले होते.जणूं पुर्वजन्मच झाला होता.तीच पुण्याई म्हणुन नामदेवां ची गाठ पडली,त्यांचा सखा झाले.त्यांचे पाय धरत व्याकुळतेने चोखा म्हणाले, देवा!मला शहाणं करा,शिकवुन मार्ग दाखवा. त्यांची घायाळ अवस्था बघुन नामदेव म्हणाले,चोखोबा तुमची योग्यता फार मोठी आहे. माझ्या पायावर डोके ठेवुन लाजवुं नका.चला!आपण त्या वडाच्या पारावर बसु या!

नामदेवांनी चोखोबाला बोलतं करुन त्याची सर्व माहीती काढुन घेतली. चोखा आतांपर्यंतच्या साठुन असलेल्या मनातील सार्‍या वेदना,व्यथा,शंका त्यांच्या समोर सांडत होते.गहिवरुन नामदेव म्हणाले,तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे विठुरायाने सांगीतली आहेत आणि ज्ञानोबामाऊलीने माझेकडुन घोटवुन घेतली आहे.ती सांगण्याआधी थोडा भाकरतुकडा खाण्याराठी या वर्दळीपासुन दूर एका गर्द झाडाच्या सावलीत दोघेही बसलेत.चोखोबाने शिदोरी सोडुन देवाला नैवद्य दाखवावा तसे भाकरीवर कोराडा,कांदा ठेवुन भित भित नामदेवापुढे धरला.प्रसन्नपणे चोखाच्या हातची भाकरी,एका क्षुद्राच्या घरची भाकरी आवडीने,प्रसन्न मनाने नामदेव खात असलेले पाहुन,स्वतः खाण्याचेही भान राहिले नाही.चोखोबा खाताय ना? चोखोबांना आज भाकरीची चव वेगळी,जरा जास्तच गोड लागतीय.. आणि हे सर्व मायला सागायचे त्यांनी ठरविले.

चोखोबा काय काय खदखदतय तुमच्या मनांत?निःसंकोच विचारा.विचारुं की नको अश्या संभ्रमात असतांनाच, मनाचा हिय्या करुन एकदम विचारले, देवा!हा भागवत धर्म म्हणजे काय? या धर्मात जातीभेदाचं वाकडं कसं नाही? शिवाशिव,विटाळ चांडाळ,जात पात नाही,हे कस?आणि माझ्यासारख्या क्षुद्र जातीचा माणुस या भागवत धर्मात सामावुन घेऊन देवाची भक्ती करतां येते? जिथे नुसती सावली पडली तरी हे उच्च वर्णीय आंघोळ करतात,मग या धर्माला तसलं कांही बंधन नाही हे कसं?रस्त्याने येतांना बघीतले,वारकरी दिसला की, जात पात,विटाळचांडाळ कांहीही न बघतां सरळ उरभेट घेऊन मिठी मारतात हे कस? विचार कर करुन डोक्याचा पार भुग्गा झालाय!देवा एवढा हा गुंता सोडवा चोखांच्या सच्चेपणाची साक्ष पटुन,सगळं जाणुन घेण्याची सखोल आस पाहुन,हा माणुस ज्ञानलालसेपोटी खुप मोठा माणुस होणार याची नामदेवांना खात्री पटली.चोखांच्या मनाची घायाळ अवस्था बघुन ज्ञानेश्वर माऊलीचे बोल आठवले

‌”संमोह विक्रम माझे।गिळीत धैर्याची अविसे।तेथ देव्हडे भोवत वळसे।अज्ञानाचे ।। किती समर्पक सांगीतले चोखोबांची या संभ्रम व्याकुळ अवस्थेतुन सुटका करायचे निश्चित केल्यावर, नामदेवांच्या स्निग्ध,आश्वासक स्पर्शाने चोखोबा अंतर्बाह्य थरारुन स्वैरभैर झालेली बुध्दी एका जागी स्थीर झाली. त्यांच्या शरीरांतील कण न् कण अंतर्बाह्य फुलुन सगळ्या शरीराला ऐकण्यासाठी कान फुटले.नामदेवांनी मनोमन विठोबांना दंडवत घालुन सस्मित मुद्रेने बोलायला सुरुवात केली.

चोखोबा! तुमची संभ्रामावस्था, व्याकुळता,ज्ञानलालसा बघुन परंपरे विरुध्द पोहण्याचं सामर्थ्य बहुधा कुणास नसतं,पण तुम्ही विचारण्याचं धाडस केले कौतुकास्पद आहे..वारकरी जात,धर्म, विटाळचांडाळ मानत नाही हीच भागवत धर्माची शिकवण आहे.देवा!हा भागवत धर्म म्हणजे काय?आतांपर्यत हिंदु धर्म, यवन धर्म ऐकला,पण हा भागवत धर्म कुठुन,कोणी,त्याची तत्वं,त्या तत्वांचे अर्थ ती तत्वे लोकांपर्यंत कुणी पोहोचवले?देवा! एक प्रश्न सोडवला की,दुसरा तयार मला झोप लागत नाही.विठुरायाचे नामस्मरण केले की,थोडं बरं वाटते.देवा! तुम्ही माझे गुरु होऊन या गुंत्यातुन माझी सोडवणुक करा.चोखोबांची व्याकुळता, काकुळता,उत्कट ज्ञानलालसेची जाणीव, हा क्षुद्र जातीतील असुनही त्यांची ज्ञान पिपासा पाहिल्यावर,ज्ञानदेवांनी भक्ती मार्ग सर्वांसाठी मोकळा केल्याचे सार्थक झाले असे नामदेवांना वाटले.चोखोबांची असीम उत्सुकता,विठ्ठलाबद्दलची भक्ती पाहुन,विठ्ठलाला निष्ठावान भक्त,वारकरी  संप्रदायाला एक खंदा पाईक,संतांच्या मांदियाळीत एका अनुयायाची भर पडणार होती.ते जातीचा,कुळाचा उध्दार कर्ता ठरणार होते.

क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.

संत चोखामेळा चरित्र सर्व भाग पहा

संत व दिव्य व्यक्तींचे प्रेरणादायी चरित्र

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *