सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १४ वा ओवी ३७६ ते ४०० पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, , , , , , ,

376-14
अगा हिम जें आकर्षलें । तेंचि हिमवंत जेवीं जालें । नाना दूध मुरालें । तेंचि दहीं ॥376॥
अर्जुना, बर्फ जे एकत्र गोठून झाले तेच जसे हिमालय पर्वत होय अथवा विरजलेले दूध तेच जसे दही असते,
377-14
तैसें विश्व येणें नांवें । हें मीचि पैं आघवें । घेईं चंद्रबिंब सोलावें । न लगे जेवीं ॥377॥
त्याप्रमाणे विश्व म्हणून जे म्हणतात ते सर्व मीच आहे. पहा चंद्रबिंब जसे सोलावे लागत नाही चंद्र पहाणे असल्यास चंद्राच्या कला वेगळ्या कराव्या लागत नाहीत.
378-14
घृताचें थिजलेंपण । न मोडितां घृतचि जाण । कां नाटितां कांकण । सोनेंचि तें ॥378॥
तुपाचा घट्टपणा न मोडणे ते जसे तूपच आहे अथवा (सोन्याचे) कडे हे आटवले नसताना ते सोनेच आहे.
379-14
न उकलितां पटु । तंतुचि असे स्पष्टु । न विरवितां घटु । मृत्तिका जेवीं ॥379॥
वस्त्राचे धागे न उकलता ते वस्त्रच जसे उघड दोराच आहे, अथवा मातीची घागर न विरघळवता जशी ती घागर मातीच आहे.
380-14
म्हणौनि विश्वपण जावें । मग तैं मातें घेयावें । तैसा नव्हे आघवें । सकटचि मी ॥380॥
म्हणून विश्वपण काढून टाकावे विश्वाचा निरास करावा. व मग मला घ्यावे, तसा मी नाही, तर विश्वासकट सर्व मीच आहे.

381-14
ऐसेनि मातें जाणिजे । ते अव्यभिचारी भक्ति म्हणिजे । येथ भेदु कांहीं देखिजे । तरी व्यभिचारु तो ॥381॥
अशा प्रकारे मला जाणणे ती अव्यभिचारी भक्ती असे म्हणतात. येथे (या विश्वात व माझ्यात) काही भेद पाहिला तर तो व्यभिचार होतो.
382-14
याकारणें भेदातें । सांडूनि अभेदें चित्तें । आपण सकट मातें । जाणावें गा ॥382॥
या कारणास्तव अर्जुना, भेदाला टाकून अभेद अशा चित्ताने आपल्यासकट आपणास माझ्या वेगळे न मानून मला जाणावे.
383-14
पार्था सोनयाची टिका । सोनयासी लागली देखा । तैसें आपणपें आणिका । मानावें ना ॥383॥
अर्जुना सोन्याचीच टिकली जशी सोन्यावर बसवलेली असते पहा त्याप्रमाणे आपल्याला (माझ्याहून) वेगळे मानू नये.
384-14
तेजाचा तेजौनि निघाला । परी तेजींचि असे लागला । तया रश्मी ऐसा भला । बोधु होआवा ॥384॥
किरण हे तेजोमय असते व तेजापासून झालेले असते व ते तेजालाच लागलेले असते, त्या किरणांसारखा चांगला बोध असावा, म्हणजे तू आपल्याला माझ्याहून भिन्न समजू नकोस.
385-14
पैं परमाणु भूतळीं । हिमकणु हिमाचळीं । मजमाजीं न्याहाळीं । अहं तैसें ॥385॥
पृथ्वीवर असलेला अल्प परमाणू जसा पृथ्वीरूप आहे अथवा बर्फाच्या पर्वतावरील बर्फाचा कण जसा बर्फाच्या पर्वतरूपच आहे त्याप्रमाणे तू आपला मीपणा माझ्या ठिकाणी पहा.

386-14
हो कां तरंगु लहानु । परी सिंधूसी नाहीं भिन्नु । तैसा ईश्वरीं मी आनु । नोहेचि गा ॥386॥
समुद्रावरची लाट जरी लहान असली तरी ती समुद्राहून वेगळी नाही, तसा मी ईश्वराचे ठिकाणी दुसरा (ईश्वराहून वेगळा) खरोखर नाही.
387-14
ऐसेनि बा समरसें । दृष्टि जे उल्हासे । ते भक्ति पैं ऐसे । आम्ही म्हणों ॥387॥
अरे अर्जुना, अशा ऐक्याने जेव्हा दृष्टी विकसित होते त्याला आम्ही भक्ती असे म्हणतो.
388-14
आणि ज्ञानाचें चांगावें । इयेचि दृष्टि नांवें । योगाचेंही आघवें । सर्वस्व हें ॥388॥
हीच दृष्टी म्हणजे ज्ञानाचा चांगलेपणा होय आणि योगाचे सर्व सार हेच आहे.
389-14
सिंधू आणि जळधरा- । माजीं लागली अखंड धारा । तैसी वृत्ति वीरा । प्रवर्ते ते ॥389॥
मेघ व समुद्र ह्यांच्यामधे जशी अखंड जलधारा लागलेली असते, अर्जुना, त्याप्रमाणे (त्या पुरुषाची) वृत्ती वहावत असते, म्हणजे जेथून वृत्ती उत्पन्न होते तेही ब्रह्म व ज्याला विषय करते तेही ब्रह्म व वृत्तीही ब्रह्म अशी त्याची ही त्रिपुटी एक ब्रहरूप असते.
390-14
कां कुहेसीं आकाशा । तोंडीं सांदा नाहीं तैसा । तो परमपुरुषीं तैसा । एकवटे गा ॥390॥
अथवा आडाच्या तोंडी असलेल्या आकाशाचा महाकाशाशी जोड दिलेला नाही, तर जसे आडातले आकाश हे महाकाशाशी नेहेमी मिळालेलेच असते, त्याप्रमाणे अर्जुना, तो परमपुरुष परब्रह्माशी ऐक्याला पावतो.

391-14
प्रतिबिंबौनि बिंबवरी । प्रभेची जैसी उजरी । ते सोऽहंवृत्ती अवधारीं । तैसी होय ॥391॥
प्रतिबिंबापासून बिंबापर्यंत जसा प्रभेचा एकसारखा सरळपणा असतो. तशी ती सोऽहंवृत्ती आहे असे समज.
392-14
ऐसेनि मग परस्परें । ते सोऽहंवृत्ति जैं अवतरे । तैं तियेहि सकट सरे । अपैसया ॥392॥
याप्रमाणे जीव व ब्रह्म या दोहोत (जीवाच्या ठिकाणी) जेव्हा सोहंऽवृत्ती (ते ब्रह्म मी आहे अशी वृत्ती) प्रगट होते, तेव्हा ती सोहंवृत्तीसुद्धा आपोआप सरते (नाहीशी होते).
393-14
जैसा सैंधवाचा रवा । सिंधूमाजीं पांडवा । विरालेया विरवावा । हेंही ठाके ॥393॥
अर्जुना, ज्याप्रमाणे मिठाचा खडा समुद्रात विरघळल्यावर तो मिठाचा खडा विरघळावा हेही थांबते (नाहीसे होते).
394-14
नातरी जाळूनि तृण । वन्हिही विझे आपण । तैसें भेदु नाशूनि जाण । ज्ञानही नुरे ॥394॥
अथवा गवत जाळून जसा अग्नीही आपण विझतो त्याप्रमाणे भेदाचा नाश करून ज्ञान रहात नाही.
395-14
माझें पैलपण जाये । भक्त हें ऐलपण ठाये । अनादि ऐक्य जें आहे । तेंचि निवडे ॥395॥
मी मायेच्या पलीकडे आहे व भक्त मायेच्या अलीकडे आहे असा माझ्यात व भक्तात असलेला पलीकडेपणा व अलीकडेपणा नाहीसा होतो. आणि माझ्यात व भक्तांमधे अनादि जे ऐक्य आहे तेच प्रगट होते.

396-14
आतां गुणातें तो किरीटी । जिणे या नव्हती गोष्टी । जे एकपणाही मिठी । पडों सरली ॥396॥
अर्जुना, आता तो गुणाला जिंकतो ही भाषाच रहात नाही, कारण की आता एकपणाही सरला.
397-14
किंबहुना ऐसी दशा । तें ब्रह्मत्व गा सुदंशा । हें तो पावें जो ऐसा । मातें भजे ॥397॥
फार काय सांगावे? अशा प्रकारची जी अवस्था ते जे मर्मज्ञ अर्जुना, ब्रह्मत्व होय. वर सांगितल्याप्रमाणे जो अव्यभिचारित्वाने मला भजतो त्यास ते प्राप्त होते.
398-14
पुढतीं इहीं लिंगीं । भक्तु जो माझा जगीं । हे ब्रह्मता तयालागीं। पतिव्रता ॥398॥
शिवाय आणखी या लक्षाणांनी युक्त असा जो या जगात माझा भक्त आहे त्याच्या करता ब्रह्मता पतिव्रता आहे.
399-14
जैसें गंगेचेनि वोघें । डळमळित जळ जें निघे । सिंधुपद तयाजोगें । आन नाहीं ॥399॥
ज्याप्रमाणे गंगेच्या प्रवाहाने खळखळ वाहणारे पाणी जे निघते त्याला समुद्राचे स्थान अवश्य मिळतेच यात अन्यथा नाही.
400-14
तैसा ज्ञानाचिया दिठी । जो मातें सेवी किरीटी । तो होय ब्रह्मतेच्या मुकुटीं । चूडारत्न ॥400॥
त्याप्रमाणे अर्जुना, ज्ञानाच्या दृष्टीने जो माझे सेवन करतो, तो ब्रह्मस्थितीच्या मुगुटात अग्रभागी असणारे रत्न (मुकुटामणी) होतो.

, , , , , , ,

Sartha Dnyaneshwari Chapter 14th Complete
Sartha Dnyaneshwari Adhyay ChaudavaSampurn
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय चौदावा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 14 वा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १४ वा संपूर्ण

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *