संत चोखामेळा म. चरित्र १२

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

संत चोखामेळा  भाग  –  १२.

संत चोखामेळा चरित्र सर्व भाग पहा

चोखोबांना नामदेवांचा प्रत्यक्ष सहवास लाभला होता,पण ज्ञानेश्वरादी भावंडे,सावता माळी,नरहरी सोनार,गोरा कुंभार,जनाबाई,सेना न्हावी,परिसा भागवत,विसोबा खेचर हे सगळे विठ्ठला चे निस्सीम भक्त असुन वारकरी संप्रदाया तील मानाची स्थानं मिळवलेले संत होते. या सर्वांचा सहवास,त्यांना बघायला मिळणार,ओळखी होणार म्हणुन चोखा उत्तेजित झाले होते.त्यातही ज्ञानेश्वरादी भावंडांना भेटण्याची उत्सुकता जरा जास्तच होती.ज्ञानदेव नामदेवांचे परात्पर गुरु तर होतेच,पण त्यांच्या भावंडांचा तेजस्वीपणा,ज्ञानाची सखोलता बद्दल नामदेवांकडुन ऐकल्यामुळेच चोखोबा पंढरपूरला जाण्यास उताविळ झाले होते.

सोयरा चोखोबांच्या प्रवासाच्या तयारीला लागली.आषाढी एकादशीला अजुन १५ दिवस अवकाश होता,पण निरातिशय भक्ती असणारे अनेक जणं आतांपासुनच पंढरपूरास जायला लागले ते सर्व गोरोबाकाकांच्या घरी उतरले. चोखोबा पण त्यांच्याचकडे पोहोचले. तिथे नामदेवांशिवाय कुणीच ओळखीचे नव्हते.तेवढ्यात गोरोबाकाका आलेत.ते वयस्क दिसल्यामुळे त्यांच्या पायावर डोके ठेवल्याबरोबर त्यांनी खांद्याला धरुन उभे करुन कोण म्हणुन विचारल्या वर,मी मंगळवेढ्याचा चोखोबा!म्हणजे तुम्हीच कां चोखामेळा?भेटुन खुप आनंद झाला.उच्चवर्णीयांकडुन लाथाडला जाणारि,हाडत हुडत केल्या जाणारा, गावकीची गलिच्छ कामे करण्यासाठीच जन्माला आलेला हा चोखोबा,नामदेवांनी इतरांजवळ उल्लेख करण्याइतका महत्वाचा,आपलासा वाटावा,या विचारा ने चोखोबांच्या मनांत एक आगळी उर्मी जागवली,अंतर्मनात आत्मविश्वास जागृत झाला.या नव्या जाणीवेने चोखोबा अंतर्बाह्य थरारले.

सगळी संतमंडळी जमल्यावर, प्रत्येकाशी चोखोबांची ओळख करुन दिल्यावर,हेच कां चोखामेळा?असं म्हणुन त्यांची विशेष दखल घेत होते,ते पाहुन डोळ्यांतुन अश्रू वाहूं लागले.ते पाहुन गोरोबाकाकांनी चोखोबाला मिठी मारली.चोखोबांच्या डोळ्यांतुन वाहणार्‍या अश्रूंनी जणूं आपली व्यथा त्या संतासमोर मांडली.काय नव्हते त्यात  उच्चवर्णीयांकडून झालेली छीः थूः,इतर समाजाकडून केला गेलेला अपमान, तिरस्कार,अवहेलना,कर्मकांडात गुंतलेल्या समाजाने केवळ जातीपायी त्यांच्यावर केलेले अन्याय,गावांची उचलावी लागणारी घाण आणि अस्पृश्य अस्पृश्य म्हणुन सतत केलेली हेटाळणी, इतक्या वर्षांचा मनात साचलेल्या या सगळ्या भावनांचा कोंडमारा चोखोबां च्या अश्रूतुन वाहत होता.मनांत साठलेला सगळा मळ वाहुन स्वच्छ,पवित्र,मलिनता जाऊन चोखोबा निर्मळ होत होते.

त्यांनी भरुन आलेले मन आवरले.अठरापगड जातीची माणसं तिथं जमली होती,पण सगळे एकमेकांचे सगेसोयरे असल्यासारखे वागत होते. आपणही त्यांच्यातील एक आहोत या भावनेने चोखोबा भारावुन गेले.एवढ्यात एका प्रौढ स्रीसह नामदेव आले.चोखोबां ना पाहुन नामदेव म्हणाले,या संतांच्या मंदियाळीत हे १५ दिवस तुमच्या चिरंतर स्मरणांत राहतील.येत्या २-४ दिवसांत ज्ञानेश्वर माऊलीचेही दर्शन होईल.नामदेव  म्हणाले,ह्या जनाबाई!माझी माता,भगिनी कन्या सर्व कांही.पांडुरंगावर यांचा फार मोठा अधिकार आहे.नामदेवांच्या स्तुतीने कांहीशी संकोचुन जनाबाई म्हणाली, चोखोबा! मी या नामदेवाची दासी जनी! या नामदेवांच्या घरची कामे करणे आणि विठ्ठलाची भक्ती एवढेच माझे काम.

तीचे प्रेमळ बोलणे ऐकुन त्यांच्या डोळ्यांत आलेले पाणी पाहुन,नामदेव म्हणाले,असे घडोघडी डोळ्यांतुन पाणी काढायचे नाही.या मोठ्या परिवाराकडुन तुम्हाला इतके प्रेम मिळेल की,समाजाने केलेली सारी अवहेलना पुसली जाईल. तुम्ही भगवद् भक्त,वारकरी,भागवत संप्रदायी झालां आहांत.इथे कसलाही भेदभाव,स्पृश्य अस्पृश्य,कसलेही कर्मकांड,शिवाशिवी,विटाळ चांडाळ कांही नाही.मानवतेच्या आणि केवळ मानवतेच्या पायावर अधिष्ठीत असलेलं भगवद् भक्तीचं हे लोकराज्य तुमचं,माझं आपलं सर्वांच आहे.मनांतील सर्व शल्य पुसुन खुल्या दिलाने,मोकळ्या मनानं या परिवारांत सामिल व्हा असे म्हणुन त्यांनी दृढ अलिंगन दिले. अपमाने त्रस्त,जातीभेदापायी विटाळलेल्या,अवहेलना,अन्यायाने पिचलेला आणि अस्पृश्यपणामुळे नाडलेले चोखोबा,नामदेवांच्या मिठीत बर्फाप्रमाणे वितळुन गेले.आणि उरले फक्त चोख,निर्मळ,पवित्र,स्वच्छ मनाच्या कोर्‍या पाटीवर वारकरी लिहिलेलं बिरुदावली मोठ्या अभीमानानं मिरवणारे चोखोबा!नामदेवांच्या परीस स्पर्शानं चोखोबांचं सोनं झालं आणि त्यांच्या अवघ्या दुःखाचं,वेदनेचं,व्यथेचं भक्तीरसांत भिजलेलं गाणं होऊन गेलं. ३-४ दिवसांतच या संताच्या मंदियाळीत एकरुप झाले.

क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.

संत चोखामेळा चरित्र सर्व भाग पहा

संत व दिव्य व्यक्तींचे प्रेरणादायी चरित्र

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *