संत चोखामेळा म. चरित्र १६

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

संत चोखामेळा  भाग  –  १६

संत चोखामेळा चरित्र सर्व भाग पहा

माणसांतील क्रौर्य बघुन सूर्यालाही लाज वाटली असावी.त्यानेही डोळे झाकुन अस्ताला निघुन गेला.मार खाऊन चोखोबा बेशुध्द झाले.मारुन बोलुन थकल्यावर जखमांनी भरलेल्या,मातीत लोळागोळा झालेल्या चोखाला फरफटत नेऊन त्यांच्या वस्तीत टाकुन अंगावर थुंकुन निघुन गेले.४-५ माणसं गलका करत कांहीतरी वसतीसमोर टाकले हे वस्तीतल्या राणूने,ते लोकं निघुन गेल्या वर काय टाकले म्हणुन बघीतल्यावर त्याला जखमी चोखा दिसल्यावर त्यांनी बोंब ठोकली.सावित्री,सोयरा,सुदामा जेवण्यासाठी चोखाची वाट पाहत बसले असतांनाच लोकांनी येऊन चोखोबा जखमी अवस्थेत बेशुध्द पडलेले असल्या चे सांगीतल्याबरोबर तिघांच्याही तोंडचे पाणी पळाले.

अरे देवा! कुठाय माझं पोर?म्हणुन सर्वजण रडत भेकत धावत सुटले.चोखा ची दयनीय अवस्था पाहुन तिघांच्याही जीवाचा ठाव सुटला.वस्तीवरच्या लोकां च्या सहाय्याने चोखाला खोपटात आणले त्यांचे सारे अंग ठेचकाळलेले,रक्ताळलेले, डोक्यात खोक पडलेली त्यातुन रक्त वाहते आहे,सर्वांगावर काळे निळ वण पडलेल्या अवस्थेत,अर्धवट शुध्दीत चोखा कण्हत,जीवघेण्या वेदना सहन न होऊन किंचाळत होते.ताबडतोब उपचाराची निकड लक्षात येऊन सावित्री तील घायाळ आई नाहीशी होऊन कर्तव्य दक्ष माता जागी झाली.सावित्रीच्या उपचाराने व सोयराच्या प्रेमळ स्पर्शाने चोखाच्या ठुसठुसणार्‍या वेदना कांही अंशी कमी झाल्या,पोटात गेलेल्या कढत दुधाने त्यांना झोप लागली.मधुन मधुन कण्हणार्‍या,कोणाच्याही अधेमधे नसणार्‍या चोखाची ही हालत कां व कशी झाली या चिंतेत रात्रभर कोणालाच झोप आली नाही,

सकाळी चोखोबा तापाने फणफणलेले,बेहोशी अवस्थेत जोराने ओरडत,नका..नका..मारुं,मी नाही कुठे शिवलो,देव नाही बाटवला..नका..मारु.. नका.. मारु..शरीरांत वेदनेचा नुसता आग डोंब उठला होता.सुदामाने बाळं भटाकडुन औषध व लेप आणला व बाहेर पडवीत डोक्याला हात लावुन बसलेला पाहुन चिंतेने सावित्रीने विचारले असतां,विठ्ठलभक्तीच्या वेडापायी भावने च्या भरात पोराकडुन घडलेल्या पापाची शिक्षा म्हणुन त्याला मारले.एवढ्याशा चुकीला इतकी जबर शिक्षा?सावित्री पेटुन उठली.व गांवपंचायतीत गार्‍हाणे नेण्याचा निर्धार केला.वस्तीतला पंच धाकुला सोबत घेऊन सावित्री चावडीत रावजी पाटील व चार पंच बसले होते तिथे आली.तिचा तिथं येण्यातला आवेश डोळ्यांतुन उडणार्‍या संतापाच्या ठीणग्या रावजी पाटलाच्या नजरेतुन सुटल्या नाही कालच्या प्रकाराचा जाब मागायला येण्याची हिम्मत करेल असे त्याला वाटले नाही.त्याचा राग अनावर होऊन जरबेने येण्याचे कारण विचारल्यावर सावित्री म्हणाली,आम्ही वारकरी,विठ्ठलाची माळ घातलेलो,भावनेच्या भरात माझ्या लेका कडुन चुकलं म्हणुन का अर्धमेलं होई स्तोवर मारावं कां? सावित्रीss चोखा थेट मंदिरात शिरतो म्हजे काय?संतापाने सावित्री म्हणाली,आमची सावलीही पडलेली तुम्हा लोकांना चालत नाही ना? मग माझ्या पोराला लाथाबुक्क्यांनी मारतांना,देवळाच्या पायरीवरुन फरफटत ओढत आणतांना तुमची ही सारी मोठी माणसं चोखोबाला मारहाण करतांना शिवली त्यावेळी त्यांना विटाळ,शिवाशिव झाली नाही कां? देवाला जर विटाळ होत नाही तर तुम्हा माणसांना कसा होतो? हे गौडबंगाल काय आहे हे कळलं नाही म्हणुन विचारायला आले.

चोखोबाला मारतांना झालेली शिवा शिव कशी चालते हा सावित्रीचा बिनतोड प्रश्न ऐकुन पंच आवाक झालेत,काय उत्तर द्यावे सुचेना!तेवढ्यात तिथे सावित्री च्या मागेच निघालेला सुदामा,पंचायतपुढे निर्भयपणे उभे राहुन बोलणार्‍या सावित्री ला पाहुन पुढील होणार्‍या परिणामाच्या विचारानेच तो गर्भगळीत झाला.पटकण पुढे होऊन तिच्या दंडाला धरुन ओढतच घरी आणले आणि पंचांची संभ्रमावस्थेतु न सुटका झाली.‌        मंगळवेढ्यात नांदते घर,सुरळीत चाललेला संसार,नीट बसलेली घडी सोडुन पंढरपूरला राहाण्यास जावे की नाही या दोलायमान मनःस्थितीत असलेल्या चोखाला कांहीतरी जबरदस्त झटका बसल्याशिवाय,मन विटल्या शिवाय,पंढरपूर हीच कर्मभूमी आहे हे खरे करण्यासाठी कांहीतरी मोठे निमित्य घडणे आवश्यक होते आणि ते काम कर कटेवर ठेवुन वीटेवर उभ्या असलेल्या विठ्ठलाने केले,नव्हे घडवुन आणले.आतां संतांच्या मांदियाळीत आलेले चोखा पंढरपूरात जाऊन एक अलौकीक कार्य त्यांचे हातुन घडणार होते.सुरुवात झाली होती.

क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.

संत चोखामेळा चरित्र सर्व भाग पहा

संत व दिव्य व्यक्तींचे प्रेरणादायी चरित्र

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *