संत चोखामेळा म. चरित्र १५

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

संत चोखामेळा  भाग  –  १५.

संत चोखामेळा चरित्र सर्व भाग पहा

पंढरपूरचे सारे सारे अनुभव,घटना सांगुन झाल्यावर, निघतेवेळी नामदेवांनी म्हटलेले “पंढरपूर हीच तुझी कर्मभूमी” याचे उत्तर त्यांना सांपडत नसल्यामुळे त्यांची केविलवाणी स्थिती पाहुन,सुदामा म्हणाले,त्यात काय अवघड?अरे!पुढच्या आयुष्यातील तुझं कामकाज तू पंढरपूर ला राहुन करायचय!ज्यामुळे चोखा चिंतेत पडले होते त्याचे उत्तर सुदामाने दिले.एकाबाजुने सुतासारखा सुखाने सरळ चालणारा संसार आणि दुसर्‍या बाजुने विठ्ठलभक्तीने व्यापलेले जग! कशाची निवड,स्विकार करावा?या ओढाताणीत इतके बुडुन गेले की,शेजारी झोपलेली सोयरा कांही अपेक्षेने त्यांच्या कडे पाहते आहे,याचेही त्यांना भान नव्हते.

चोखोबा पंढरपूरला येऊन संत मंडळींच्या स्नेहरज्जूत गुरफटुन त्यांच्या तीलच एक झालेला पाहुन विठ्ठल समाधान पावला.श्रेष्ठ भक्तांच्या रांगेत चढुन बसण्यासाठी सोपानची पहिली पायरी चोखोबा चढले होते.डोक्यांत उठलेल्या प्रश्नांचा गुंता आणि विचारांचा गोंधळ घेऊनच चोखोबा आपल्या दैनंदिन कामाला लागले.पण मन थार्‍या वर नसल्यामुळे नेहमी बिनचुक कामे करणार्‍या त्यांचे हातुन सर्वच कामात चुका होऊ लागल्या.ते अस्वस्थ ते अस्वस्थच राहिले.हा गुंता सोडवण्या साठी एकच व्यक्ती योग्य होती,ती म्हणजे नामदेव!सध्या तेही शक्य नव्हते.ते ज्ञानेश्वर माऊलीसोबत तीर्थयात्रेला गेले होते.त्यांचे कशातच मन लागत नव्हते. त्यांची घायाळ,विकल अवस्था कोणाला च बघवेना,पण इलाजही नव्हता.

चोखोबा अशाच विषण्ण मनःस्थितीत बसले असतां,एकदम त्यांना नामदेवांचे वाक्य आठवले.ते म्हणाले होते,चोखोबा!मनांत शंका किंवा प्रश्न उद्भवला तर,त्या प्रश्नांची उत्तरे बर्‍याच अंशी आपल्या मनांतच दडलेले असते.ते फक्त शोधायची असतात.अर्थात कांही प्रश्न असे असतात की,त्यांची उत्तरे आपल्याला सांपडत नाही ती उत्तरे एक तर जेष्ठाकडुन आणि तेही शक्य नसले तर प्रत्यक्ष पांडुरंगाकडुन मिळवायची असतात.कारण तो वीटेवर उभा असलेला विठ्ठल आहे ना तो सर्वसाक्षी, सर्वज्ञ आहे.तो सारं जाणुन असतो. नामदेवांचे हे बोलणे आठवले आणि चोखोबांना एकदम हुरुप आला.चेहरा उजळला.पण पांडुरंगासमोर पोहचायच कसं? इतके दिवस नीट जेवण न केलेले चोखोबा त्या दिवशि मन लावुन जेवले. सावित्री सोयराच्या चेहर्‍यावर समाधान पसरले.मनांतील विचारांचा गोधळ पांडुरंगावर सोपवुन त्यांना शांत झोप लागली.

दुसर्‍या दिवशी उठले,तेच मुळी उत्साहाने,मनात निश्चय पक्का झाल्याने आजची सारी कामेही बिनचुक झाली. स्वअस्तित्वाची जाणीव झालेले,विचारां ची दिशा हरवलेले घायाळ चोखोबा लुप्त होऊन,एका नव्या आत्म विश्वासाने वावरणारे,मनाशी केलेला निश्चय,ध्येय पूर्ण करणे,पांडुरंगाकडुन उत्तरं मिळण्या साठी त्याला भेटुन त्याचे दर्शन घ्यायला सिध्द झाले.कामे आटोपुन संध्याकाळी घरी येऊन स्वच्छ आंघोळ केली.व कुणाला कांहीही न सांगता बाहेर पडलेले चोखोबा थेट विठ्ठलमंदिराजवळ आले. पायरीजवळ उभे राहुन विठ्ठलमूर्तीला मनोमन नमस्कार केला.आणि झपाटल्या सारखे कुणाचीही पर्वा न करतां झपाझप पायर्‍या चढुन विलक्षण तळमळीने,वेडे झालेले अस्पृश्य,भोवती वावरणार्‍या वर्ण भेदी समाजाची पर्वा न करतां भारल्या, पछाडल्या सारखे विठ्ठलाच्या मूर्तीसमोर जाऊन उभे राहिलेत.एकच क्षण! त्यांनी निमिषात सावळ्या विठ्ठलाला नखशिखां त नाहाळत असतांना पुजार्‍याचे लक्ष चोखोबाकडे जातांच आरडा ओरडा करुन एकच गल्ला केला.मंदिरभर दंगा उसळला.दुसर्‍याच क्षणी चोखोबावर शेकडो हात पडले.

लोकांनी मारले तुडवले,लाथाडले, फरफटत आणतांनाही लाथाबुक्यांनी तुडवत,मारत,शिव्यांची लाखोली वाहत, नाकातोंडात,डोळ्यात माती घालत,वरुन ढकलुन दिले.चोखोबांचे सारे अंग रक्ताळले,ठेचाळले,काळेनिळे पडले होते. आतां तर लोकांनी लाठ्या काठ्यांनी मारायला सुरुवात केली होती.जखमी, रक्तबंबाळ चोखोबा गुरासारखे ओरडत होते पण लोकांना दया नाही आली. त्याच्या किंचाळण्याची,वाहणार्‍या रक्ताची ना त्यांच्या जीविताची पर्वा होती, त्यांना चिंता होती फक्त मंदिराच्या पावित्र्याची,पांडुरंगाच्या शुचिर्भूततेची, परमेश्वर एकच आहे तो सर्वात वसलेला आहे असे टाहो फोडुन सांगणार्‍या ज्ञानोबांचे अभंग ज्यांच्या ओठावर घोळत होते,ते प्रत्येक हात चोखोबावर पडत होते,घाव घालत होते आणि भक्तांचा सखा,कणवाळु विठोबा कमरेवर हात ठेवुन हा अन्याय उघड्या डोळ्यांनी पाहत होता.

क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.

संत चोखामेळा चरित्र सर्व भाग पहा

संत व दिव्य व्यक्तींचे प्रेरणादायी चरित्र

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *