ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.218

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-८ वे, उपदेश अभंग २१८

उपजोनी संसारी आपुला आपण वैरी । मी माझे शरीरी घेऊनि ठेला । या देहाते म्हणे मी पुत्र दारा धन माझे । परी काळाचे हे खाजें । ऐसे नेणतु गेला ॥

काम क्रोध मद मत्सराचेनि गुणें । बांधला आपण नेणे भ्रमित जैसा । मिथ्या मोह फांसा शुक नळिके जैसा । मुक्त परी अपैसा पळों नेणे ॥

जळचरू आमिष गिळी । जैसा कां लागलासे गळीं । आपआपणापें तळमळी । सुटिका नाही । तैसे आरंभी विषयसुख गोड वाटे इंद्रिया ।

फळपाकी पापिया दुःख भोगी. ॥ राखोंडी फुकितां दीप न लगे जया परी । तैसा शब्द ब्रह्मकुसरी ज्ञान न पवे । व्रत तप दान तीर्थ भजन वेचिले पोटा ।

दंभाच्या खटपटा । सिणतु गेला ॥ मृगजळाची नदी दुरूनी देखोनी धांवे । परी गंगोदक न पवे तान्हेला जैसा । । तैसे विषयसुख नव्हेचि हित ।

दुःख भोगितो बहुत । परी सावधान नव्हे ॥ परतोनी न पाहे धावता सैरा । करितो येरझारा संसारीच्या । ज्ञानदेव म्हणे बहुंता जन्माचा अभ्यासु । तरीच होय सौरसु परब्रह्मी ॥

अर्थ:-

ह्या संसारात जन्म घेऊन तुच तुझा वैरी झालास. मी म्हणजे हा देह हे मानु लागलास,देहाचे असणारे पुत्र, दारा व धन स्वतःचे मानु लागलास हे सर्व देहासकट काळाचा खाऊ आहे. हे मात्र विसरलास,

काम क्रोध मत्सराने बांधला गेलास व मी वेगळा आहे हा भ्रम पाळत बसलास. नळीवरचा पोपट स्वतःच बध्द असतो व बांधलेला समजतो तसे तुझे झाले आहे. तु मुक्त आहेस पण बध्द समजतोस. गळाला लागणारा मासा आमिषाला भुलतो व गळ गिळतो व तिकडे अडकतो. तसेच विषयांचे आहे. ते इंद्रियाना आमिष दाखवतात. व मग सुटका होत नाही

फक्त तळमळ व दुःख मिळते. राखोंडी फुंकुन अग्नी लागणार नाही तदवत शब्द ज्ञानाने ब्रह्म कळणार नाही पोटासाठी व्रत तप दान भजन व तीर्थयात्रा केल्या हा नुसता दंभ वाढवणारा शिण झाला.

मृगजळ पाहुन धाव घेणाऱ्याला गंगोदक मिळत नाही तसे विषयसुख भोगणाऱ्याचे आहे. ती ही नुसती खटाटोपच आहे. व दुःखमय आहे तरी सावध होत नाहीस. नुसता संसारासाठी जन्ममरणाच्या फेऱ्यात येरझरा करत आहेस. अरे अनेक जन्म ज्याने ब्रह्माभ्यास केला त्यालाच ह्या जन्म ब्रह्मप्राप्तीची गोडी लागते असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *