सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १० वा ओवी २६ ते ५० पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, ,

26-10
तेचि षष्ठामाजीं प्रगट । आसनालागोनि स्पष्ट । जीवात्मभाव एकवट । होती जेणें ॥26॥
ज्या योगाने जीवात्मभावाचे ऐक्य होते, तेच योगतत्व सहाव्या अध्यायांत आसनादि अंगासह स्पष्ट करून सांगितले.
27-10
तैसी जे योगस्थिती । आणि योगभ्रष्टां जे गती । तें आघवीचि उपपत्ती । सांगितली षष्ठीं॥27॥
त्याचप्रमाणे योग्यांना प्राप्त होणारी स्थिती व योगभ्रष्टांना प्राप्त होणारी गती, हे संपूर्ण वर्णन सहाव्या अध्यायात सांगितले आहे.
28-10
तयावरी सप्तमीं । प्रकृतिपरिहार उपक्रमीं । करूनि भजती जे पुरुषोत्तमीं । ते बोलिले चाऱ्ही॥28॥
त्यानंतर सातव्या अध्यायात प्रकृतिनाश कसा करावयाचा, याचा उपक्रम करताना, भगवंताच्या भजन करणार्‍या चार भक्तांचे वर्णन केले.
29-10
पाठीं सप्तमींची प्रश्नसिद्धी । बोलोनि प्रयाणसमयसिद्धी । एवं ते सकळवाक्यअवधि । अष्टमाध्यायीं॥29॥
नंतर सात प्रश्नांची उत्तरे देऊन, मरणकाळी जी काळशुध्दी पाहिजे, तिचे वर्णन केले. याप्रमाणे आठव्या अध्यायातील भगवद्वाक्याची समाप्ती झाली.
30-10
मग शब्दब्रह्मीं असंख्याकें । जेतुला कांहीं अभिप्राय पिके । तेतुला महाभारतें एकें । लक्षें जोडे ॥30॥
जेवढे असंख्यात शब्दब्रह्म म्हणजे वैदिक वाङ्गमय आहे, त्यातून जो काही निष्कर्ष निघतो, तितका सर्व एक लक्ष श्लोकसंख्या असलेल्या महाभारतातून मांडलेला आहे.

31-10
तिये आघवांचि जें महाभारतीं । तें लाभे कृष्णार्जुनवाचोक्तीं । आणि जो अभिप्रावो सातेंशतीं । तो एकलाचि नवमीं ॥31॥
आणि संपूर्ण महाभारतात जे सांगितले आहे, ते सर्व कृष्णार्जुन संवादभूत गीतेंत सांगितले असून, या सातशें श्लोकरूपी गीतेचा जो मथितार्थ आहे, तो एकट्या नवव्या अध्यायात आहे.
32-10
म्हणौनि नवमींचिया अभिप्राया । सहसा मुद्रा लावावया । बिहाला मग मी वायां । गर्व कां करूं?॥32॥
म्हणून नवव्या अध्यायांतील अभिप्रायावर एकदम मत देण्याचे वेदाला देखील भय वाटतें, तेथे मी व्यर्थच कशाला अभिमान वागवूं.
33-10
अहो गूळासाखरे मालयाचे । हे बांधे तरी एकाचि रसाचे । परि स्वाद गोडियेचे । आनआन जैसे ॥33॥
गुळ, साखर, राब हे एका उसाच्या रसाचेच घनीभूत प्रकार असले तरी त्यांच्या गोडीची रुची जशी निरनिराळी असते (त्याप्रमाणे येथील अध्याय एका ब्रह्माचेच प्रतिपादन करीत असले तरी त्यांच्या प्रतिपादनाची गोडी निरनिराळी आहे.)
34-10
एक जाणोनियां बोलती । एक ठायें ठावो जाणविती । एक जाणों जातां हारपती । जाणते गुणेंशीं ॥34॥
काही अध्याय ब्रह्म जाणून त्याविषयी बोलतात, तर काही अध्याय तेथल्या तेथे दुसर्‍याला परब्रह्मवस्तूची जाणीव करून देतात. कांही अध्याय परब्रह्माला जाणण्याकरितां गेले असतां जाणिवेसह लय पावतात.
35-10
हें ऐसें अध्याय गीतेचे । परि अनिर्वाच्यपण नवमाचें । तो अनुवादलों हें तुमचें । सामर्थ्य प्रभू ॥35॥
असे गीतेचे अध्याय आहेत. पण हा नववा अनिर्वाच्य आहे. त्याचे वर्णन करवत नाही, पण त्याचा अनुवाद केला गेला हे, महाराज श्रीगुरुनाथा ! तुमचेच सामर्थ्य होय.

36-10
अहो एकाचि शाटी तपिन्नली । एकीं सृष्टीवरी सृष्टी केली । एकीं पाषाणीं वाऊनि उतरलीं । समुद्रीं कटकें ॥36॥
अहो श्रीगुरुराया ! एकाच्या (वसिष्ठाच्या) छाटीने प्रकाश देण्याची कामगिरी केली. एकाने (विश्वामित्राने) सृष्टिसारखी प्रतिसृष्टि उत्पन्न करून दाखविली. एकाने (नीलवानराने) समुद्रात दगड तरवून त्यावरून सैन्य उतरविले.
37-10
एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें । एकीं चुळींचि सागरातें भरिलें । तैसें मज मुकयाकरवीं बोलविलें । अनिर्वाच्य तुम्हीं ॥37॥
एकाने (मारूतीने) आकाशांतील सूर्याला धरले. एकाने (अगस्ति ऋषीने) संपूर्ण समुद्र एकाच चुळीने पोटांत सांठविला, त्याप्रमाणे मज मुक्याकडून तुम्ही या अनिर्वाच्य अशा नवव्या अध्यायातील विषय प्रगट करविला.
38-10
परि हें असो एथ ऐसें । राम रावण झुंजिन्नले कैसे । राम रावण जैसे । मीनले समरीं ॥38॥
पण हे असो, ज्याप्रमाणे श्रीराम व रावण युध्द कसे झाले असे विचारल्यास श्रीराम रावणासारखे झाले असे म्हणावे लागते (त्याला त्याचाच दृष्टांत द्यावा लागतो. दुसरा दृष्टांतच नाही असा भाव.)
39-10
तैसें नवमीं कृष्णाचें बोलणें । तें नवमीचियाचि ऐसें मी म्हणें । या निवाडा तत्त्वज्ञु जाणें । जया गीतार्थु हातीं॥39॥
त्याप्रमाणे येथे नवव्या अध्यायांतील भगवान श्रीकृष्णाचे बोलणे नवव्या अध्यायातील बोलण्यासारखेच आहे. त्याला दुसर्‍या अध्यायाचा दृष्टांत देता येत नाही, असे मी म्हणतो. व हा माझा निर्णय बरोबर आहे किंवा नाही हे, ज्याच्या दृष्टीसमोर गीतार्थ आहे ते तत्वज्ञ पुरुष जाणतात.
40-10
एवं नवही अध्याय पहिले । मियां मतीसारिखे वाखाणिले । आतां उत्तरखंड उवाइलें । ग्रंथाचें ऐका ॥40॥
याप्रमाणे पहिल्या नऊ अध्यायांचे यथामति व्याख्यान मी केले आहे. येथून ग्रंथाच्या उत्तरखंडाचे क्रमप्राप्त अख्यान श्रवण करा.

41-10
जेथ विभूति प्रतिविभूती । प्रस्तुत अर्जुना सांगिजेती । ते विदग्धा रसवृत्ती । म्हणिपैल कथा॥41॥
जेंथें या अध्यायांत भगवान अर्जुनाला आपल्या प्रधान व गौण विभूती आतां सांगणार आहेत, ती कथा अत्यंत रसभरीत शब्दाने मी तुम्हाला निरूपण करणार आहे.
42-10
देशियेचेनि नागरपणें । शांतु शृंगारातें जिणें । तरि ओंविया होती लेणें । साहित्यासि ॥42॥
(ज्या देशी मराठी भाषेत मी, ती कथा निरूपण करणार आहे.) त्या मराठी भाषेच्या सौंदर्यामुळे त्यात प्रतिपादिलेला शांतरस, श्रृंगाररसाला देखील फिका पाडील, तेव्हा माझ्या ओव्या साहित्यालाहि अलंकाराप्रमाणे सुशोभित करतील.
43-10
मूळ ग्रंथींचिया संस्कृता । वरि मऱ्हाठी नीट पढतां । अभिप्राय मानलिया उचिता । कवण भूमी हें न चोजवे ॥43॥
गीता ग्रंथाच्या मूळच्या संस्कृत भाषेवर माझी केलेली मराठी भाषेतील टीका नीट पडताळून पाहतां, मी काढलेला अभिप्राय योग्य आहे असे मान्य झाल्यास, मूळ कोणते हे निवडता येणार नाही.
44-10
जैसें अंगाचेनि सुंदरपणें । लेणिया आंगचि होय लेणें । तेथ अळंकारिलें कवण कवणें । हें निर्वचेना ॥44॥
ज्याप्रमाणे अत्यंत सुंदर शरीरावर घातलेल्या अलंकाराला तें शरीरच लेणें होतें म्हणजे शोभा आणते, मग कोणी कोणाला शोभा आणली हे सांगतां येत नाही.
45-10
तैसी देशी आणि संस्कृत वाणी । एका भावार्थाच्या सोकासनीं । शोभती आयणी । चोखट आइका ॥45॥
त्याप्रमाणे मूळ गीता ग्रंथाची संस्कृत भाषा व माझ्या टीकेची मराठी भाषा ह्या दोन्ही एक भावार्थरूप पालखींत बसून कशा चातुर्याने शोभतात, हे लक्ष देऊन ऐका.

46-10
उठावलिया भावा रूप । करितां रसवृत्तीचें लागे वडप । चातुर्य म्हणे पडप । जोडलें आम्हां ॥46॥
चित्तांत स्फुरलेल्या भावार्थाचें स्पष्टीकरण करतांना किंवा तो व्यक्त करतांना, त्याला रसभरित भाषेचा पाऊस लागेल व त्यामुळे आजच्या जगांत या अशा भाषेने आम्हाला प्रतिष्ठा प्राप्त झाली असे चातुर्य म्हणेल.
47-10
तैसें देशियेचें लावण्य । हिरोनि आणिलें तारुण्य । मग रचिलें अगण्य । गीतातत्त्व ॥47॥
तसे मराठी भाषेचे सर्व सौंदर्य एकत्र करून रसाला तारूण्य आणले व मग त्या योगाने अमर्याद अशा गीता तत्वाची मराठी भाषेत रचना केली.
48-10
जो चराचर परमगुरु । चतुर चित्तचमत्कारु । तो ऐका यादवेश्वरु । बोलता जाहला ॥48॥
जो चराचर ब्रह्मांडाचा आद्यगुरु, थोर जाणत्याच्याहि चित्ताला आश्चर्यचकित करून सोडणारा, असा तो यादवांचा राजा भगवान श्रीकृष्ण पुढे बोलूं लागला.
49-10
ज्ञानदेव निवृत्तीचा म्हणे । ऐसें बोलिलें श्रीहरी तेणें । अर्जुना आघवियाची मातु अंतःकरणें । धडौता आहासि ॥49॥
श्रीनिवृत्तिनाथांचे ज्ञानदेव म्हणतात, त्या श्रीकृष्णाने अर्जुनाला म्हटलें, की अर्जुना ! सर्वच गोष्टी ऐकतांना तूं अंतःकरणाने योग्य असतोस म्हणजे एकाग्र चित्ताने ऐकतोस.
श्रीभगवानुवाचः
भूय एव महाबाहो श्रृणु मे परमं वचः ।
यत्तेऽहं प्रीयमाणाय वक्ष्यामि हितकाम्यया ॥10.1॥

50-10
आम्हीं मागील जें निरूपण केलें । तें तुझें अवधानचि पाहिलें । तवं टाचें नव्हें भलें । पुरतें आहे ॥50॥
अर्जुना ! मी मागें जें निरूपण केले, तें तुझें चित्त एकाग्र आहे किंवा नाही हे पाहण्याकरितांच होतें, पण तें अर्धवट नसून पूर्ण एकाग्र होतें, हें कळून आले.

, ,
1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *