संत चोखामेळा म. चरित्र १९

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

संत चोखामेळा  भाग  –  १९.

संत चोखामेळा चरित्र सर्व भाग पहा

नामदेवांविषयी गांवात अतिशय आदर होता.त्यांनीच चोखोबांची ओळख करुन दिल्यामुळे गणाच्याही मनांत चोखाबद्दल आदर आणि आपुलकी निर्माण झाली.गणा स्वतः वारकरी असुन त्यानेही माळ घातलेली होती.नामदेव त्यालाही उराउरी भेटले.गणाच्या शेजारी चोखोबाचे खोपटे बांधायचे ठरवुन सर्व मंडळींनी निरोप घेतला. गणासारखा अनुभवी बुजुर्ग आणि वारकरी शेजारी लाभल्याचा आनंद चौघांनाही झाला.गणाने वस्तीवरच्या ४-५ तरुणांच्या सहाय्याने संध्याकाळ पर्यंत चोखोबाचे खोपटे उभारल्या गेले. तिसर्‍या दिवशी सकाळीच काम घेऊनच गोरोबा त्यांच्याकडे आले.मंदिराजवळ एका धर्मशाळेच्या बांधकामावर रात्रीचा पहारेकरी म्हणुन चोखोबाची नेमणुक केली.महिन्याला दोन होन,सहा माणसांना पुरेल एवढा शिधा असे वेतन ठरले.दुसरे दिवशीपासुन कामावर हजर व्हायचे होते.

रात्री सर्वजण जेवायला बसले असतां सावित्रीचे मन पुत्रकर्तृत्वाने इतके भारावले की,तिला अन्नाचा घास उतरेना, ते पाहुन काळजीने चोखोबाने विचारले! माय! कां ग जेवत नाही?जीवाला बरं नाही कां?मुलाने जिव्हाळ्याने विचारपुस केल्यामुळे तिच्या डोळ्यांतुन अश्रू वाहु लागले.लेकरा!तुझ्यासारखा लेक माझ्या पोटी आला,सारं भरुन पावली.आयुष्य धन्य झालं.पंढरपूरला येतांना नाना शंका मनी होत्या,पण इथे आल्यावर सगळं ऐकलं,बघीतलं,अनुभवलं,मोठमोठ्या मंडळींचे दर्शन झालं,विठ्ठल मंदिराचं दर्शन झालं.लेकरा!भरलं माझं पोट! आतां एकच इच्छा आहे,नातू बघायची! तेवढी पूर्ण झाली की,आम्ही मरायला मोकळे…त्यावर सुदामाने तिची मस्करी केली.हसत खेळत जेवणं झाली. रात्री झोपतांना मिस्किलपणे चोखोबा सोयराला म्हणाले,आई काय म्हणाली,त्याबद्दल माझा तर विचार पक्का आहे,तुझा विचार सांग.सोयरा लाजेने चूर होऊन त्यांच्या कुशीत शिरली

दुसर्‍या दिवशी पासुन रात्रीची भाकर बांधुन कामावर हजर होणे, सकाळी भावकीची व इतर कामकाज करणे आणी संध्याकाळी संतमंडळीत जाऊन बसणे,चांगले विचार ऐकणे, विठ्ठलाची भक्ती, भजन गाणे,किर्तन ऐकणे,आणि प्रतिभेची कृपा झालीच तर अभंग रचना करणे असा चोखोबांचा दिनक्रम सुरु झाला.अनंतभट नांवाचा एक ब्राम्हण या संतमंडळीत नेहमी येऊन बसायचा.चोखोबांनी केलेली अभंगरचना  लिहिण्याची कामगिरी नामदेवांच्या सांगण्यावरुन स्वेच्छेने व आनंदाने त्याने आपल्या शिरावर घेतली.चोखोबांच्या मुखातुन स्रवणार्‍या प्रतिभेला,अभंगरचने ला लिखित स्वरुप प्राप्त झाले.त्यांच्या प्रतिभेला आणखी बहर आला.नामदेव पंढरपूरात असले की,रोज त्यांचे किर्तन व्हायचे,त्या किर्तनाला चोखासहित सारे कुटुंब हजर असायचे.नामदेवांच्या सतत सहवासात असल्यामुळे चोखांच्या शब्द रचनेवर,अभंगरचनेवर इतका जास्त परिणाम होऊ लागला की,तेही नामदेवां प्रमाणेच अभंगरचना करुं लागले. एक दिवस नामदेव पंढरपूर या वैकुंठनगरीबद्दल अभंग गाऊ लागले…”अवघी ही पंढरी।सुखाची ओवरी। अवघ्या घरोघरी। ब्रम्हानंद ।।”असं गात त्यांनी वैकुंठनगरी पंढरपूरचे विलक्षण देखणे वर्णन आपल्या शब्दांतुन उभे केले नंतर जनाबाईंनी अभंग गायला सुरुवात केली…. “तूं माझे माहेर।काय पाहसी अंतर।

सर्व सुखाचा आगर।उभा असे विटेवर।
ओवाळुनी पाया।जीवे भावे पंढरीराया।।
जनीची आंतरिक,उत्कट शब्दरचनेत सगळे गुंगुन गेले.यानंतर जबलपूरजवळ बांदूगड येथे राहणारे सेना न्हावींचे पंढरपूर व विठ्ठलाच्या  दर्शनाने भान हरपून भावनोत्कट आवाजांत त्यांनी अभंग गायला सुरुवात केली.”विटेवरी उभा।जैसा लावण्याचा गाभा।।
पायी ठेवुनही माथा।अवघी वारली चिंता।
समाधान चित्ता।डोळा श्रीमुख पाहता।।
बहुजनी केला लाग।सेना देखे पांडुरंग।” सेना न्हाव्यांचा भावपूर्ण अभंग ऐकुन सगळ्यांच्याच डोळ्यांत पाणी आलं. चोखोबा तर अगदी भारावुन गेले.तोच  नामदेव म्हणाले,चोखोबा!तुम्ही नुकतेच या वैकुंठनगरीत प्रवेशले.ही वैकुंठनगरी कशी वाटली हे तुमच्या मनांतील भावनांना शब्दरुप देऊन ऐकु द्या.

क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.

संत चोखामेळा चरित्र सर्व भाग पहा

संत व दिव्य व्यक्तींचे प्रेरणादायी चरित्र

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *