संत चोखामेळा म. चरित्र ३७

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

 संत चोखामेळा  भाग- ३७.

संत चोखामेळा चरित्र सर्व भाग पहा

दीपमाळेवरील तेवणार्‍या ज्योती कडे चोखोबा एकटक बघत असतांना डोळे भरुन आले,दीपमाळेच्या प्रत्येक पणतीत त्यांना सोयराचा चेहरा दिसत होता.सोयरा?संसाराचा खस्ता खाणारी, सर्वस्वाने साथ देणारी,दीपमाळेवरील पणत्यांसाठी तेलाची साठवणुक करणारी दीपमाळ बांधुन पुर्ण होण्याआधीच तीने जगाचा व चोखाचा कायमचा निरोप घेतला.त्यारात्री झोपतांना म्हणाली होती, धनी!महाएकादशी दोन महिन्यावर आली त्याआधी सगळ्या पणत्या तयार व्हायला हव्यात.कार्तिकएकादशीला जेव्हा ह्या  दीपमाळ उजळतील,तेव्हा पंढरपूरांतील लोकांचे डोळे दिपून जातील.सोयरा बोलत होती,पणत्यांचे तेज त्याच दिवशी तिच्या डोळ्यात लखलखत होते. दीप माळेचे स्वप्न बघणारी सोयरा त्या रात्री निजली ती कायमचीच!रात्रीच कधीतरी तिचे प्राण विठ्ठलाच्या पायाशी विलीन झाले होते.चोखोबांच्या दुःखाला पारावार राहिला नाही.

६५-७० वर्षाच्या संसारात चोखोबाला तिची संजीवनी साथ होती. तिच्या अचेतन चेहर्‍याकडे बघतांना चोखोबाला तिची अनेक रुप आठवत होती.परकरी सोयरा,लग्नानंतर अल्लड पणे वावरणारी,सावित्रीच्या हाताखाली शिकणारी,निर्मळला बहिण मानणारी, चोखांवर आलेल्या लहान मोठ्या वाईट प्रसंगात समर्थपणे साथ देणारी,एका शब्दाखातर नीट मांडलेला संसार मोडुन त्यांच्याबरोबर पंढरपूरला येणारी,त्यांना शिक्षा झाल्यावर धाय मोकलुन रडणारी, देवाचा धावा करणारी!हद्दपारीची शिक्षा झाल्यावर चंद्रभागेच्या तीरावर त्यांच्या सोबत येऊन राहणारी,त्याही परिस्थितीत चार घरची कामे करणारी,जीला प्रत्यक्ष नामदेवांनी सरस्वती म्हटलं तो अभंग रचना करणारी सोयरा!एक ना दोन, चोखोबांना तिच्या मिटल्या डोळ्यांंकडे पाहुन अनेक रुपं आठवत होते.

संसारातल्या कोणत्याच कर्तव्याला चुकली नव्हती.नात्यातीलच मुलगी बघुन कर्ममेळाचे लग्न लावुन, त्यांच्या गावातील जुन्या घरांत त्यांचा संसारही थाटुन दिला होता.अशा प्रकारे स्वतः व चोखोबाला प्रापंचिक कर्तव्या पासुन मुक्त करुन पतीभक्ती आणि चोखोबाच्या विठ्ठलभक्तीचा मार्ग तीने सोपा केला.शेवटपर्यंत साथ देण्याचे कबुल करुनही एकटीच महाप्रवासाला निघुन गेली होती.आता चोखोबा एकटा, अगदी एकटा होता. पण चोखोबाला थांबुन चालणार नव्हतं.कार्तिकी एकादशीला दीपमाळ लखलखलीच पाहिजे ही इच्छा मनी घेऊनच तीने प्राण सोडला होता.त्यांना संकल्प तर पूर्ण करायचा होताच,पण आतां त्या संकल्पाला सोयराच्या अंतिम इच्छेचे स्वरुप प्राप्त झाले होते.आज कार्तिक एकादशीला लखलखणार्‍या दीपमाळा बघून तिच्या वचनातुन मुक्त झाले.डोळे पुन्हा पुन्हा भरुन येत होते. सोयराच्या वियोगाचे दुःख तर होतेच पण त्याचबरोबर वचनतुर्तीचा आनंद त्या अश्रूतुन वाहत होता.ते दीपमाळा बघत सोयराच्या आठवणीत दंग होते.सोयरा गेली,योजलेला संकल्प सिध्दीस गेला.आतां त्यांनी स्वतःला त्या खोपटात एकट्याला विठ्ठलभक्तीत झोकुन दिले होते.नामस्मरणाबरोबरच अभंगरचना करणे हेच जीवितमर्म बनवले होते.सावलीसारखा सोबत राहणारा अनंतभट अनेक विषयांना स्पर्श केलेली अभंगरचनेचा शब्द नी शब्द कागदावर उतरवत असे.

दैनंदिन कामात कितीही गुंतववुन घेतले तरी  सोयराची उणीव जागोजागी जाणवत होती.दीपमाळ बांधुन झाल्या वर आपले जीवितकार्य संपत आल्याची भावना निर्माण झाल्याने विठ्ठलाने आपल्या चरणाशी जागा द्यावी असे वाटत असतांनाच,नामदेवांची आतुरतेने वाट बघत होते.आणि प्रतिक्षेला फळ आले.एकदाचे चोखोबाला भेटायला नामदेव आले.त्यांना समोर बघताच अश्रूंचा बांध फुटला.ते नसतांना सोसलेले आघात,अचानक निघून गेलेली सोयरा, दीपमाळेचा पूर्ण झालेला संकल्प सारे सारे भरभरुन त्यांनी नामदेवांना सांगीतले.नामदेव निःशब्द त्यांच्या पाठी वरुन हात फिरवत होते नामदेव तीर्थयात्रेला गेल्यावर इकडे बरेच कांही घडले होते.संतमंडळीं पैकी बरेचजण अनंतात विलिन झाले होते.एकापाठोपाठ एक चोखोबांचे मानसिक आधार तुटत गेले.मराठी सारस्वताची हानी झाली ती वेगळीच! गोरोबाकाकांचा आणि सोयराचा मृत्यु चोखोबांनी मनाला फारच लावुन घेतला होता.देवा!तुम्ही विठ्ठलाचे निस्सीम भक्त ना?आतां मी थकलोय.सगळे सगे सोयरे सोडुन गेले.योजलेले संंकल्प पूर्ण झालेत.मनांत कोणताही किंतू किल्मिष उरले नाही.माऊलीसारखी संजीवन समाधी घेण्याचे धैर्य,पात्रता नाही.पुरे आतां आयुष्य!माझ्यासाठी विठ्ठलाला विनंती करा.म्हणावं या चोखोबाला चरणाशी जागा द्या.

संत चोखामेळा चरित्र सर्व भाग पहा

संत व दिव्य व्यक्तींचे प्रेरणादायी चरित्र

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *