संत चोखामेळा म. चरित्र १७

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

संत चोखामेळा  भाग  –  १७.

संत चोखामेळा चरित्र सर्व भाग पहा

मारहानीत झालेल्या जखमांतून बरे व्हायला चोखोबाला बरेच दिवस लागले. सावित्रीचे उपचार,सोयराची रात्रंदिवस सेवा,सुदामाने दिलेला धीर,निर्मळचे प्रेम या सार्‍यामुळे १॥-२ महिन्यात चोखा बरे झाले.शरीराच्या जखमा बर्‍या झाल्यात पण मनाच्या?त्या कश्या बर्‍या होतील? आपल्या हातुन घडले ते चुक की बरोबर याचे समाधानकारक  उत्तर मिळत नसल्याने कैक वेळा रात्र रात्र झोप यायची नाही आणि एके रात्री मनाच्या उन्मनी अवस्थेत शब्द उमटले….

“याती हीन मज म्हणती देवा ।न कळे करु तुमची सेवा ।
आम्हा निचांचे ते काम ।वाचे गावे सदा नाम।उच्छिटाची आस।
संत दासाचा मी दास।चोखा म्हणे नारायणा। पदरी घेतले मज दीना ।।”

बेभानपणे चोखोबा हा अभंग,स्वरांत उमटलेली आर्तता,दुःखाची तिव्र जाणीव वेदनांची अभिव्यक्ती इतकी विलक्षण होती की,अंगावर पडलेल्या माराच्या प्रत्येक वळाचा,जखमेचा,व्रणाचा हिशोब जणूं ते पांडुरंगाला देत होते,आणि अभि व्यक्तीचे आत्मगान सांगणारे एक नवीन कौशल्य आत्मसात झाल्याच्या नादात मग चोखोबाने स्वतःला झोकुन दिले. विटाळ चांडाळ,अस्पृश्यता हे भेद मानणार्‍या रुढीमुळे,शरीरावर,मनावर झालेले आघात शब्दरुपात प्रगट होऊन  स्वरांच्या माध्यमातुन मुखोद्गत करुं लागले.मग मात्र त्यांनी मागे वळुन पाहिले नाही.

अशातच एक दिवस विलक्षण घटना घडली.चोखोबांना झालेल्या मारहाणीची व जबरदस्त जखमींची माहिती त्यांचा मेहुणा,सोयराचा भाऊ बंकाला कळल्यावर तो भेटायला आला. तोही वारकरी,स्वभावाने शांत,दोघांचेही स्वभाव जुळल्यामुळे एकमेकांना आपली सुख दुःखे सांगायचे,त्यामुळे सहाजिकच तो आल्याचा आनंद चोखोबाला झाला. बंका व चोखा जेवायला बसले असतां निर्मळा वाढत असलेली आपली बहिण मोठी झाल्याची जाणीव चोखोबांना झाली.अचानक त्यांच्या मनांत आले, बंका या आपल्या बहिणीसाठी योग्य वर आहे.त्यादृष्टीने विषय काढल्यावर सर्वांना बंका पसंद पडल्यावर भावकीच्या रिवाजानुसार सर्व ठरल्यावर लग्नाच्या तयारीत आणि आनंदात चोखा शरीरा च्या व मनाच्या जखमांचा विसर पडला. नंतरचे दिवस चांगलेच धावपळीत गेले.

निर्मळाचे लग्न उत्तमरितीने पार पडले. बंकाचे वडील यमाजी आणि सुदामा आधी मित्र होतेच आता सोयरा चोखाच्या व आतां निर्मळा बंकाच्या लग्नामुळे आणखी जवळ येऊन दोन्ही घरं एक झाली.लग्नाची गडबड शांत झाल्यावर चोखोबांच्या मनांत एक वेगळाच विचार फेर धरु लागला. आषाढी एकादशीवेळी चोखा पंढरपूरला गेले तेव्हा संतांच्या संगतीत त्यांच मन चांगलच रमल होतं.शिवाय पंढरपूर हीच तुझी कर्मभूमी” असे म्हणुन पंढरपूरला येण्याचे अगत्याचे आमंत्रणही दिले होते.तशातच देव व देऊळही बाटवले म्हणुन केलेल्या मारहाणीने त्यांच्या मनावर जन्मभराचा ओरखडा उमटला होता. निर्मळाचे लग्न झाल्यामुळे त्यांच्यावरची जबाबदारीही संपली होती. म्हणुन कायमचे पंढरपूरला वास्तव्य करायचे त्यांच्या मनाने घेतले.खरंतर याच प्रश्नाने ते गेले कित्येक दिवस त्रस्त होते व त्याच उन्मानी अवस्थेत मंदिरात शिरले, आणि देव बाटवला म्हणुन गांवकर्‍यांनी त्यांना अर्धमेला केले.

या घटनेने एक मात्र झाले,मनाला सतावणार्‍या प्रश्नाचे उत्तर आपोआपच मिळाले.ज्या गांवाने आतांपर्यत विश्वास दाखवला,ज्या गावकर्‍यांनी त्यांच्या कामावरच्या निष्ठेचे कौतुक केले,ज्या ब्राम्हणआळीने त्यांचे निटनेटके काम पाहुन गोडाधोडाचा घास काढुन ठेवत असत,त्यांनीच लाथा बुक्क्यांनी तुडवले. चोखोबांचे निष्पाप मन पुरते हादरले. जखमी झाले.लग्नाची धामधुम संपल्या वर मात्र मनाच्या जखमेवरची खपली निघाली कारण परत गावकीच्या कामावर गेल्यावर लोकांच्या बोचर्‍या तिरस्कृत नजरा पाहुन घायाळ मनाने घरी परतले तेच मुळी पंढरपूरला जाण्याच्या इराद्यानेच! सावित्रीने इतकी नीट बसलेली घडी सोडुन न जाण्याबद्दल मन वळवण्याचे बरेच प्रयत्न केले,पण चोखोबा आपल्या निर्णयावर ठाम असल्यामुळे नाईजाने शेवटी सर्वजण जाण्यास तयार झाले आणि बांधाबांधी करायला सुरुवात केली. चोखोबांच्या पंढरपूरला कायमचे येण्याच्या पक्क्या निर्णयाने पांडुरंगाच्या आनंदाला पारावार राहिला नाही.आतां चोखोबा भक्तांच्या परिवारात सामील होईल.अस्पृश्यतेचे,विटाळ चांडाळाचे क्लेश कमी होऊन,संत परिवारात निश्चिंत मनाने वावरुन निरामयपणे भक्ती करुं शकणार होते.

क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.

संत चोखामेळा चरित्र सर्व भाग पहा

संत व दिव्य व्यक्तींचे प्रेरणादायी चरित्र

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *