अध्याय ३ अष्टावक्र गीता Ashtavakra Gita

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

अष्टावक्र गीता – अध्याय ३

अष्टावक्र गीता म्हणजे आयुष्यातील महत्वाचे जीवनसार होय. या गीतेत अद्वैत वेदांत असून, यात अष्टावक्र आणि मिथील नरेश जनक यांमधील संवाद आहे.अध्याय ३अष्टावक्र म्हणालाअष्टावक्रानें जनकाला विचारलें कीं, आत्म्याला तत्त्वतः एक आणि अविनाशी जाणूनही तुझ्यासारख्या आत्मज्ञानी आणि धैर्यवंताला अजूनही धन कमावण्यांत रुचि आहे का ? ॥१॥आश्चर्य आहे कीं, शिंपल्याच्या अज्ञानानें चांदी आहे असा भ्रम निर्माण होतो, तसाच आत्म्याच्या अज्ञानामुळें विषयभ्रम झाल्यानें लोभ निर्माण होतो. ॥२॥

ज्या आत्मरुपी सागरावर हा संसार तरंगाप्रमाणें स्फुरित होत असतो तो आत्मा मी आहें हें जाणूनही तूं दीनवाणा कां पळत आहेस ? ॥३॥अत्यंत सुंदर आणि शुद्ध चैतन्यरुप आत्म्याबद्दल एवढें जाणूनही कोण कसा इंद्रियांच्या विषयांत अत्यंत आसक्त होऊन मलिनतेला प्राप्त होतो ते ध्यानांत घे. ॥४॥सर्व भूतांत आत्मा आहे आणि सर्व भूतें आत्म्यांत आहेत असें ज्ञान असूनही मुनीला माया-ममता निर्माण होते हें आश्चर्यकारक आहे. ॥५॥परम अद्वैतांत आश्रय घेतलेला आणि मोक्षांकरितां उद्युक्त झालेला पुरुषही कामातुर होऊन कामक्रीडेच्या विचारानें व्याकुळ होत असतो हें मोठें आश्चर्य आहे.

॥६॥काम हा ज्ञानाचा शत्रु आहे हें माहीत असूनही एखादा अतिदुर्बल आणि मरण जवळ आलेला पुरुषही कामभोगाची इच्छा करतो हेंच मोठें आश्चर्य आहे. ॥७॥जनका, जो इहलोकांतील व परलोकांतील भोगांबद्दल विरक्त आहे आणि जो नित्य व अनित्याचा विवेक ठेवतो व जो मोक्षाची इच्छा करणारा आहेअ तोही मोक्षाचें, मरणाचें भय बाळगतो हें एक आश्चर्यच आहे. ॥८॥ज्ञानाला उपलब्ध झालेला धीर पुरुष भोग भोगतांना किंवा दुःख सहन करतांनाही नित्य केवल आत्म्याला पाहात असल्यानें प्रसन्नही होत नाहीं वा रागावतही नाहीं.॥९॥जो आपल्या कार्यमग्न शरीराला, तें दुसर्‍याचें शरीर आहे अशा तटस्थ भावनेनें पाहातो, तो महाआशय असलेला पुरुष स्तुति अथवा निंदा यामुळें क्षोभाला कसा प्राप्त होईल ? ॥१०॥

जो या विश्वाला मायामात्र पाहातो आणि ज्याच्या मनांत आताम कसलेंही कुतूहल शिल्लक नाहीं-शंका-नाहीं-तो धीर पुरुष मरण आल्यावर भयभीत कां होईल ? ॥११॥जो महात्मा मनांत मोक्षाचीही इच्छा करीत नाहीं व जो आत्मज्ञानानें तृप्त आहे, त्याची तुलना कोणाबरोबर करतां येईल ? ॥१२॥जो खराखुरा धैर्यवान व शांत झाला आणि ज्यानें हें जाणलें कीं, दिसणारा हा संसार वस्तुतः नाहींच, त्याच्या मनांत मग हें घ्यावें व तें टाकावें, अशी वासनाच निर्माण होत नाहीं. ॥१३॥ज्यानें अंतःकरणांतील कामक्रोधादि विषयांचा त्याग केला, ज्यानें साक्षी होऊन पाहिलें कीं, हे राग-लोभ माझे नाहींत, मी फक्त प्रकाश आहें आणि भेदबुद्धिरहित व आशारहित जो झाल आहे त्या पुरुषाला दैवयोगानें आलेल्या भोगांचा—-सुखाचें सुख व दुःखाचें दुःख वाटत नाहीं.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *