संत चोखामेळा म. चरित्र २३

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

संत चोखामेळा भाग  –  २३.

संत चोखामेळा चरित्र सर्व भाग पहा

चोखोबा,सोयरा!निर्मळाच्या लक्षात बोलण्याचा अर्थ आला नी तिघेही रडायला लागले.भागीरथीला कळेना, मुलगा झाल्याचा आनंद न मानतां  कां रडताहेत?ती निघुन गेली. चोखोबा आपल्या आणखी निकट यावा म्हणुन पांडुरंगाने नियतीला विश्वासात घेऊन मातापित्याचा वियोग घडवुन आणला.पण त्या वादळी रात्री सोयराचा प्रसुतीकाळ जवळ आला,घरी दारी कुणीच नाही.ती आर्ततेने आपल्या ला हाकारत आहे तेव्हा,भक्तांचा पाठीराखा परमेश्वर निर्मळा बनुन तिच्या सहायार्थ धावुन जाऊन तिची सुटका केली.

आपल्याला मुलगा झाला या आनंदापेक्षा प्रत्यक्ष विठ्ठल घरी येऊन सोयराचे बाळांतपण केले या गोष्टीचा चोखोबाला अतिशय आनंद झाला.या सार्‍या घटनेमुळे ते दोन दिवस किर्तनाला गेले नाहीत.असे कधी घडले नाही.म्हणुन चौकशीकरीतां गोरोबा घरी आले.मुलगा झाल्याचे कळल्यावर,चोखोबाची पाठ थोपटत म्हणाले,हे मूल तुमच्यासारखं कष्टाळु,विठ्ठलभक्त आणि तल्लख बुध्दीचा होणार बघा!गहिवरुन चोखांनी घडलेली घटना सांगीतल्यावर त्यांच्याही डोळ्यांना धारा लागल्या.धन्य!धन्य!धन्य चोखोबा!तुमच्या भक्तीचे सामर्थ्य मोठे आहे.तुम्हा दोघांपेक्षा नशीबवान तुमचा मुलगा!त्याचा जन्म प्रत्यक्ष इश्वराच्या हातुन झाला.चोखोबा! लेकराचं नशीब त्याच्या कपाळावर सटवाई लिहिते,पण तुमच्या लेकराचं कर्म तर प्रत्यक्ष देवानेच लिहिले.त्याच्या कर्माचा,कल्याणाचा मेळ प्रत्यक्ष पांडुरंगानेच लिहिले आहे.म्हणुन तुमचा मुलगा साक्षात कर्ममेळा आहे. चोखोबांना अतिशय आनंद झाला.

सोयराला पांच दिवस झाल्यावर चोखोबा किर्तनाला गेल्यावर सर्वांनी त्यांचे मनापासुन अभिनंदन केले.नामदेव म्हणाले,प्रत्यक्ष पांडुरंगाने तुम्हाला जवळ केलेय आणि बाप पण झालात,या दोन्ही गोष्टींचा आनंदोत्सव व बारसे तुमच्या घरी सर्वमिळुन सहभोजन करुन साजरा करुया!सध्या ज्ञानेश्वर माऊलीचा मुक्कामही नेवाशात आहे,त्यांनाही तुमच्यावतीने आमंत्रण देतो.चोखोबांच्या कानावर विश्वास बसत नव्हता.गदगदुन म्हणाले देवा!खरचं?तुम्ही सगळे माझ्या, या क्षुद्र चोखाच्या घरी जेवायला येणार? माझ्या घरी शिजलेले अन्न खाणार?मी क्षुद्रातिक्षुद्र,अस्पृश्य जातीतला,समाजाने बहीष्कृत केलेला,तुम्ही सारे माझ्या घरी बसुन जेवणार?तुम्ही माझी चेष्टा तर करीत नाही ना?अश्रू भरलेल्या गहिवरल्या आवाजात चोखोबांचे मुखातुन शब्द उमटले…..
तयाचे साहिले अपराध।तैसा मी पामर यतिही न देवा।
माझा तो कुढावा करा तुम्ही ।।नाही अधिकार उच्छिष्टा वेगळा।
म्हणवोनी कळवळा पाळा माझा ।।चोखा म्हणे मज कांही ते न कळे।
नामाचिया बळे काळ कंठी ।।”देवा या समाजामधे अशी अवस्था असतांना आपण सर्व माझ्या घरी जेवायला येणार यापरते भाग्य ते कोणते आपल्या सर्वांच्या रुपाने प्रत्यक्ष देवच जेवायला येणार,माझे पूर्ण घर धन्य पावेल.अत्यानंदाने घराकडे निघाले असतां,त्यांना थांबवत नामदेव म्हणाले, तुम्ही बरेच दिवसांपासुन ज्या गोष्टीची मागणी,हट्ट,आग्रह करीत होता,ती गोष्ट, तुमच्या मुलाच्या जन्माप्रित्यर्थ माझेकडुन प्रेमाची भेट देतोय.आज तुम्हाला माझा शिष्य करुन गंडा व गुरुमंत्र देतो.

चोखोबांचा आनंद गगनात मावेना.अनन्यभावे शरण जाऊन आपल्या अश्रूंनी त्यांच्या पायावर अभिषेक करीत राहिले.नामदेवांनाही गहिवरुन आले. खांद्याला धरुन उठवित म्हणाले,चोखोबा “वर्म आले नाही हाता।तोवरी वाव सर्वथा नामा म्हणे चोखासी।खूण कळली नाही तुसी ।।” चोखोबा! तुम्हाला गुरुमंत्र देतोय,चोखोबाच्या मस्तकावर नामदेवां नी हात ठेवला,डोळे मिटले,मन स्थिर केले.सगळे लक्ष कुंडलिनीवर एकवटले, आपल्यातली सगळी ऊर्जा हातात आणली आणि “विठ्ठल विठ्ठल” हा त्रिक्षरी मंत्र देऊन आपले शिष्यत्व बहाल केले. चोखोबांच्या मस्तकावर ठेवलेल्या हातातुन जणूं एक संजीवक ऊर्जा बाहेर पडली आणि चोखोबा नखशिखांत थरारले.देहाचा अणूरेणू जणूं विठ्ठलरुप झाला.नामदेवांनी उच्चारलेल्या “विठ्ठल विठ्ठल” या तीन अक्षरी मंत्रानी त्यांच्या शरीरातल्या सगळ्या चेतनांच्या तारा झंकारल्या.विठ्ठल विठ्ठल हे नांव शरीराच्या प्रत्येक बिंदुतुन निनादत, रक्ताच्या प्रत्येक थेंबातुन वाहत, नख शिखांत शरीरभर पसरले आणि चोखोबां च्या सचेतन शरीराचा प्रत्येक अणूरेणू विठ्ठल विठ्ठल नावाने व्यापला.नामदेवांनी दिलेल्या त्रिक्षरी मंत्राने चोखोबा अंतर्बाह्य बदलले.सारे चैतन्य विठ्ठलमय झाले.धन्य धन्य झाले.

क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.

संत चोखामेळा चरित्र सर्व भाग पहा

संत व दिव्य व्यक्तींचे प्रेरणादायी चरित्र

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *