संत ज्ञानेश्वर म. चरित्र १०

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

संत  ज्ञानेश्वर भाग-१०

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची

आतां कुचेष्टा, थट्टा, मस्करी, टिंगल टवाळी मागे पडली. त्यांचा जिकडे तिकडे जयजयकार होऊ लागला. धर्माधिकारी हात जोडुन म्हणाले, आम्ही काय आपल्याला पावन करुन घेणार? आपण पावन करुन घेण्याच्या पलीकडे आहात. सर्व त्रिभुवन पावन करण्याची आपली योग्यता! आपल्याला सरतं करुन घ्यायची भाषा म्हणजे सुर्याला काजवा दाखवण्यासारखेच आहे. कर्मठपणाच्या अभिमानानं सर्व जीवन व्यर्थ, वाया गेले. फुकाचा डौल! कशाचे आम्ही शास्री, पंडीत? वैराग्य माहित नाही, भक्तीची ओळख नसलेली, नुसते प्रपंचाचे दास! आपल्याला मुंज करुन घेण्याची गरजच नाही. मुक्त आहात आपण.

निंदक वंदु लागले, कुचेष्टा करणारे लोटांगण घालु लागले. ही चौघे भावंड जिथे असतील तिथे ही तोबा गर्दी! प्रत्येकाचा आग्रह, आपल्या घरी येऊन चटणी भाकर जेवायला यावे. कांही दिवस पैठणमधे मोठ्या आनंदात गेले. भजनाचा, किर्तनाचा,प्रवचनाचा, श्रवणाचा आनंद! संध्याकाळी देवळात रसाळ प्रवचण करावं! कधी ज्ञानोबा स्व-रचित एखादा देखणा अभंग म्हणावा,

किर्तनाला उभं राहावं. निवृत्तीदादा ज्ञानोबाचे गुरु, त्यांनी समोर बसावं, मागे सोपान, मुक्ताबाईंनी टाळ घेऊन  ऊभे राहावं! गर्दी एवढी की, मुंगी शिरायला वाव नसायचा. झाडुन सर्व पैठण लोटायचं ! ज्ञानोबाच्या एखाद्या अभंगात गोकुळातल्या एखाद्या गोपीचं वर्णन करतांना श्रीहरी कुठे गेला? तो सांपडेना म्हणुन गोपीची तळमळ व्यक्त करायचे तर कधी श्रीहरीची वाट पाहणार्‍या गोपीचं  रसाळ वाणीत हुबेहुब वर्णन करायचेत.

कधी ज्ञानोबानं गोपाळाचं रुपक करुन देवाशी भांडण उकरुन काढावं. तो( गोपाळ) देवाला म्हणतो, देवा, तु मोठा लबाड आहेस. स्वतः तेवढी चांगली घोंगडी, जी सत्वगुणांनी विणलेली आहे, तिला रत्नांनी जडवलेले सहा गुणांचे गोंडे आहेत आणि आम्हाला मात्र सहा विकारांनी विणलेली फाटकी, नऊ ठीकाणी ऊसवलेली  अशी वाईट घोंगडी तेवढी आम्हाला! ज्ञानोबांनी जणुं सगळ्या पैठणला वेडच लावले. आळंदीकरांच्या समाधानासाठी पैठणकरांनी या भावंडाच्या हाती पत्र लिहुन दिले. काय लिहिले होते त्या पत्रात? नामदेवांनी सांगीतलय, हे परलोकीचे तारुं देवत्रय यांसी। प्रायश्चितासी घ्यावे कोणी।। जणुं हे तिघेही ब्रम्ह, विष्णु, महेशच! तेव्हा यांना कोणी आणि काय प्रायश्चित देणार? उलट यांच्या संगतीत राहणारेही संसारसागर तरुन जातील, एवढा यांचा महिमा!

पत्र घेऊन हे चार बाल साधु, बरोबर भक्त मंडळी, हरी रंगात रंगलेली, गांवोगावी भक्तीचा पूर वाहावित प्रवरातीरी नेवाशाला पोहचलेत. नेवासा गांव मोठं देखणं! प्रवर नदीला मोठाले घाट, गांवात मोहणीराजांचे देऊळ, मोहणीराज म्हणजे महामाया. देव-दैत्यात अमृतासाठी भांडण झाले तेव्हा श्रीविष्णूंनी आदीमायाचं रुप घेतलं. ती आदीमाया म्हणजेच मोहणीराज! नेवाशाला त्यांचं वास्तव्य,

त्यामुळे  या गावाला क्षेत्राचा महिमा! गांवाबाहेर प्रवरेकाठी असलेल्या महादेवाच्या देवळांत ही सर्व मंडळी उतरली. ओघवती, रसाळ वाणीत भजनं किर्तन, भक्तिचा रंग जमु लागला. एके दिवशी निवृत्तीनाथ ज्ञानोबाला म्हणाले, अरे! आजपर्यतचा सगळा परमार्थ, गीता, महाभारत, रामायण, स्मृती, पुराण हे सगळं संस्कृतमधे असल्यामुळे याची मक्तेदारी फक्त विद्वान ब्राम्हणांकडेच! भोळ्या भाबड्या जनतेला यापासुन वंचितच राहावे लागले. परमार्थरुपी ही गंगा त्यांच्यापर्यत पोहचलीच नाही.

क्रमशः
मिनाक्षी देशमुख

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण चरित्र सर्व भाग

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य एकाच ठिकाणी पहा

सर्व संत चरित्र पहा एकाच ठिकाणी

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *