संत ज्ञानेश्वर भाग-१४
अवघ्या वारकर्यांवर अपरंपार प्रेम करुन वेडं केलं. पण हा वारसा पुढे चालवायला नामदेवा सारख्या योग्यतेचा पुरुषच करुं शकेल, म्हणुन त्याला तयार करण्याच्या दृषटीने आपल्या बरोबर तिर्थयात्रा करीत, तळागळातील जनतेची स्थीतीचे अवलोकन व्हावे या विचाराने त्याला बरोबर हिंडवावं, त्यानुसार ते नामदेवाला म्हणाले,
तुझ्या बरोबर अंतरीच्या गुजगोष्टी कराव्यात, त्यासाठी तिर्थ पाहत फिरत फिरत चालतांना सुवांद साधता येईल.पण नामदेवाला प्रश्न पडला, पांडुरंगाला सोडुन कसे जावे? दोघेही देवांजवळ जाऊन जाण्याची आज्ञा मागीतली. देवाने अनुमती दिल्यावर दोघेही उत्तरेकडे निघाले. प्रभास, द्वारका, गिरनार करीत ते चारी धाम हिंडले. ज्ञानोबाची किर्ती चहुकडे पसरलेली! त्यामुळे जिथं तिथं त्यांचं कौतुक होई.
ज्ञानोबा काशीजवळ आल्याचे कळल्यावर रामनगर जवळ विश्वनाथ त्यांना सामोरे गेले. विश्वनाथ शंकर ज्ञानोबांचे आदिगुरु! आणि आदिनाथ महादेवाच्या परंपरेतले ज्ञानोबा! दोघेही कडकडुन मिठी मारुन भेटल्यावर, आतांपर्यंत केलेल्या कार्याचा परिहार विश्वनाथांना कथन केला. त्यावर प्रेमाने, कौतुकाने म्हणाले, ज्ञानोबा! तू धन्य झालास! जीवन सफल झाले. तुझे कार्य संपले. कृतार्थ झालास!
नामदेवाशी हितगुज करीत पंढरीला परतले. सावता माळी, जगमित्र नागा, सुदाम, विसोबा खेचर, नरहरी सोनार, चोखामेळा, बंका, गोरा कुंभार, ही सगळी मंडळी त्यांच्या स्वागताला जमा झालेत. आणि किर्तनाच्या गजराने पंढरीचं आकाश हरीनामानं दुमदुमलं.भक्तीगंगेला दुथडी जणुं पूर आला. ही सर्व वेडी, बेभान होऊन नाचायला, गायला लागली.
नामदेवांच्या आग्रहाने ज्ञानोबा किर्तनाला उभे राहिले. आज ते वेगळेच दिसत होते. सर्वांत असुनही त्यांच्यापासुन अलिप्त होते. मन उन्मन, दृष्टी प्रेमाने भरलेली, सगळ्या अंगातुन जणुं तृप्ती वाहते आहे, निवृत्तीनाथ समोर बसलेले, सगळी संत मंडळी टाळ विणा घेऊन उभी आहेत. ज्ञानोबा म्हणाले, माझे जीवन गुरु निवृत्तीनाथांनी कृतार्थ केले. माझ्याकडुन जे कांही कार्य करायचे ते करवुन घेतले व मी ते कार्य माझ्या कुवतीप्रमाणे मनोभावे कायावाचे केलेत. आतां मी माझ्या गावाला जाऊन सुखसागरी विसावा घ्यावा असे मनी आले.
ज्ञानदेवांच्या तोंडुन हे बोल ऐकले मात्र! सर्व संत मंडळी चैतन्यशुन्य झालीत, त्यांना प्रचंड हादरा बसला, म्हणजे ज्ञानदेव समाधी घेणार! जिथं शंकराचा वास आहे, जिथं अनेक त्रृषी-मुनींनी साधना, तपस्या केली, जे शिवपीठ आहे, अशा आळंदी-अलकापुरीला ज्ञानदेव समाधी घेणार! आधीचीच पवित्र अलंकापुरी, ती अधिकच पावन होणार, उजळणार! जीथे इंद्रायणी झुळझुळ वाहते आहे, जे सिध्दबेट कैलासाहुन श्रेष्ठ आहे, ज्याठीकाणी अलीकडे पलीकडे संतमंडळींच्या भगव्या पताकांनी आकाश कोंदले आहे अशा ठीकाणी ज्ञानदेव समाधी घेणार!
अवघी संतमंडळी जपीतपी, मुनी, संन्यासी, त्रृषी तिथे गोळा झालीत. कारण हे ज्ञानाचं अंजन, बोलता चालता कैवल्याचा पुतळा, योग्याची जीवनकळा, मोक्षमार्गीचा सांगाती परत दिसायचा, भेटायचा, लाभायचा नाही. सगळे खिन्न होऊन रडताहेत, उदास आहेत. फक्त दोघेच तेवढे प्रसन्न आहेत,ज्ञानदेव आणि पांडुरंग!
पांडुरंग जगाची सुत्र हलविणारा म्हणुन, अन् ज्ञानोबा! जो अत्यंतिक समाधानी, मन उन्मन झालेलं, अंगावर रोमांच उभे राहिलेले असा ज्ञानोबा स्वरुपी मिळालेला हा विरक्त पुरुष तुमच्या आमच्यातला नाही तर त्याला कसा खेद होईल?
ज्ञानोबाजवळ जाऊन खेद करायची सोय नाही, मात्र पांडुरंगाजवळ जो तो गार्हाणे मांडतो आहे. नामदेव देवाजवळ अगदी कळकळीने, काकुळतेने विचारतो आहे, देवा! ज्याच्यामुळे माझा उध्दार झाला, मला किर्तन करायला लावून तळागळ्यातल्या जनांपर्यत माझ्याकरवी भावना पोहोचवल्या तो जिविचा जिव्हाळा आज आम्हाला सोडुन जाणार? आतां मी काय करुं? कुणाशी हितगुज करु? कंस बोलु? श्रीहरी माझा जीव कासावीस होत आहे रे!
