संत ज्ञानेश्वर म. चरित्र ६

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

संत  ज्ञानेश्वर भाग-६.

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची

विठ्ठलपंतांना देहान्ताची शिक्षा फर्मावल्यावर ते क्षणभर विचलित झाले, पण आपल्यानंतर मुलांचे कल्याण होत असेल, त्यांना सामाजिक दर्जा, स्थान मिळत असेल, सन्यासाची पोर म्हणुन हिनवणार नसतील तर, देवच घेइल त्यांची काळजी असा विचार करुन ते कुटीत आले.  निवृत्ती-ज्ञानदेवाला जवळ घेऊन बर्‍याच महत्वाच्या गोष्टी सांगीतल्या. निरवानिरवीची भाषा ऐकुन ज्ञानदेवांना शंका आली. त्यांनी विचारल्यावर विठ्ठलपंताने समजावण्याच्या सुरात म्हणाले, तुमची मुंज होऊन शिक्षणासाठी गुरुकडे जाऊ शकाल. रात्री मुलं झोपल्यावर विठ्ठलपंतानी रखुमाईला  खुण करुन कुटीबाहेर बोलावले. ग्रामसभेत घडलेला सर्व वृतांत कथन करुन, प्रयागला जाऊन गंगेत जलसमाधी  करण्याचा बेत सांगीतला. हे ऐकल्यावर रखुमाईला ब्रम्हांड आठवले. पतीला थोडं थांबायला सांगुन ती कुटीत शिरली. आपल्या काळजाच्या तुकड्यांना शेवटचे डोळाभर पाहुन बाहेर आली. दोघेही अंधारांत विलिन झाली… नेहमीकरतां!

दुसर्‍या दिवशी पहाटे निवृत्ती जागा झाल्यावर आई-बाबा सर्वीकडे शोधुनही नाही दिसल्यामुळे त्याला काय झाले असावे याची कल्पना येऊन चुकली. हळुच ज्ञानोबाला ऊठवुन कुटीबाहेर नेले, आणि त्याला घट्ट मिठी मारुन अश्रुला वाट मोकळी करुन दिली.मोठ्या भावाच्या डोळ्यातील अश्रु पाहुन ज्ञानोबास सर्व कांही उमगले.

‌         सोपान, मुक्ताई झोपेतुन उठल्यावर आई-बाबांची चौकशी केल्यावर मोठ्या धीराने ज्ञानोबा त्यांची आई होऊन समजुत काढली. सोशिकता, सहनशीलता त्यांच्या रक्तातच असल्यामुळे त्यांना सावरायला जास्त वेळ लागला नाही. युगांताचं दुःख ते वैरागी मुलं पिऊन गेले. आणि नेहमीप्रमाणे नित्यनेमाणे ध्यानधारणा, योगाभ्यास, भजन किर्तन अशी गतिविधी सुरु केली. सोपानाने मुक्तेला सांभाळावं, आणि निवृत्ती-ज्ञानदेवाने मधुकरीला जावं! पण गांवातल्या ठेकेदारांना तेही सहन झालं नाही. त्यांनी मुलांना त्रास द्यायला सुरुवात केली. त्यांना खुप छळावं. विसोबा चाटी नांवाचा वजनदार आसामी तर  अग्रस्थानी होता. एकदा मुक्ताला मांडे खायची इच्छा झाली म्हणुन ज्ञानोबाला कुंभाराकडुन खापर आणायला सांगीतले, पण विसोबा चाटीने सर्व कुंभारांना दम दिल्यामुळे ज्ञानोबा रिकाम्या हाताने परत कुटीत येऊन तीला पीठ मळायला सांगीतले. योगसामर्थ्याने ज्ञानोबाची पाठ तव्याइतकी तापवली. मुक्ताई ज्ञानोबाच्या पाठीवर मांडे भाजु लागली. ही मुलं काय करीत असतील या कुतुहलाने विसोबा लपुन कुटीतील दृष्य पाहुन चाटच पडला, सपशेल ज्ञानोबाच्या पायावर कोसळला. तसाच कुटीत धावला. ज्ञानोबाच्या पायावर डोके ठेवुन पश्चाताप दग्ध झाला व त्या क्षणापासुन त्याने प्रपंचाचा त्याग केला. पण एकाने काय होतय? असे कितीतरी विठोबा या कैवल्याच्या पुतळ्यांना छळणारे, दुस्वास करणारे गांवात होतेच.

छळकरांनी परोपरीने त्यांना छळावे, एखादे द्वाड कुत्रंच अंगावर सोडावे, कधी माधुकरी वाढतो म्हणुन तासंतास दारात ऊभं करावं, कधी धक्का देऊन आणलेली माधुकरी सांडवावी वर शिवलास म्हणुन मारायला धावावं, फार फार सहन केलं ज्ञानोबांनी! हाल अपेष्टा, तिरस्कार, चिडवण, धुडकावणं, खेकसणं! एका चांडाळानं तर त्यांच्या भरल्या ताटांत रस्त्यावरची धुळ टाकली अन् ज्ञानोबाच्या सहन शक्तीचा अंत झाला. ताट तिथेच सोडुन विजेसारखे धावत कुटीत शिरले. पुनः या जगाचं तोंड पाहयचं नाही असं ठरवुन कुटीचे दार घट्ट लावुन घेतले. त्यांनी ठरवलं, प्रायोपशन करायचं, आत्मा ब्रम्हांडी नेऊन देहत्याग करायचा. निवृत्ती माधुकरी घेऊन परतला. त्यांनी दाराच्या फटीतुन पाहिलं तर आंत ज्ञानोबा निर्वाणीचं ठाण मांडुन बसलेले दिसले. त्यांनी व सोपानाने दार उघडण्यासाठी काकुळतीने हाका मारल्या पण ज्ञानोबांचा निश्चय कायम! कमळासारख्या डोळ्यांतुन मोत्याच्या सरी पाझरत होत्या.

क्रमशः
मिनाक्षी देशमुख

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण चरित्र सर्व भाग

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य एकाच ठिकाणी पहा

सर्व संत चरित्र पहा एकाच ठिकाणी

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *